सुहृद - भाग ५

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

********घरी जाऊन आता हे सारे पत्नीला सांगायचे होते. सारेच कठीण होऊन बसले होते...... ********

नेहमीचा घरचा रस्ता आज संपतच नाही, असे मास्तरांना वाटत होते... अतिशय थकल्या मनाने मास्तरांनी घरचा दरवाजा ठोठावला.

"आलातही इतक्यात? झाल का काम? काय म्हणाले ते लोक?"

"अग, हो, हो, आत तरी येऊदेत मला.... " आत येता येता हुsssश्श करत मास्तर जवळच्याच खुर्चीवर टेकले. अचानक मास्तर थकलेले दिसत होते. बघूनच पत्नीच्या लक्षात आले की काहीतरी बिनसले आहे, नक्कीच! त्यांच्या मनालाही हुरहूर लागली... काय घडले असावे? देवा, गजानना, काही त्रासदायक तर नाही घडले? कोणी काही खोडा तर नाही घातला? झाले तरी काय असेल? नाना शंका, कुशंका मनात उभ्या राहू लागल्या...

" अहो... चहा ठेवते बर का, इतक्या लवकर कसे आलात? काय झाल ? झाल का काम? लवकरच झाल मग!! का परत बोलावलय वगैरे?"

"नको, चहा नको, जरा पाणी आण गारस माठातल... आणि हे पहा, तूही ये जरा इथे, बोलायच आहे, किती ते प्रश्न... अन हो, जाई कुठे आहे? घरातच आहे का? "

"नाही, बाहेर गेली आहे इथेच जरा मैत्रिणीकडे, एवढ्यात नाही यायची, अजून दोनेक तास तरी आहेत तिला...."

"बर झाल, ये बैस इथे.. सांगतो तुला, सांगायचे तर आहेच...." आणि धडधडत्या मनाने शेजारी येऊन बसलेल्या आपल्या पत्नीला मास्तरांनी सार्‍या घटना एकामागून एक सांगितल्या. "सरळ सरळ धमक्या दिल्या आहेत मला त्या माणसाने!! लायकी तर काहीच नाही!! नुसता पैशाचा माज!! काय करायच ग आता....? मन नुसत पोखरून निघाल्याप्रमाणे झाल आहे माझ! जाईचा विचार मनात येऊन वेड लागेल अस वाटत!! काय वाटेल तिला माझ्याबद्दल? या बापाबद्दल काय वाटेल तिला? दादासाहेब तर किंम्मत करतीलच आपली, आणि गावात पण लोकांच्या कुचाळक्यांचा विषय होणार पहा आपण..... " मास्तर दु:खातिशयाने थरथरत होते...

"अहो, अहो, शांत व्हा!! काही तरी मार्ग निघेल हो... अप्पांना विचारायच का??" मास्तरांच्या पत्नी सार ऐकून हबकल्याच होत्या, पण पतीला धीर देण्यासाठी काही बाही बोलत होत्या. जाईची हे सर्व ऐकून काय अवस्था होईल हा विचार मनात येऊन त्यांना अगदी खचल्यासारखे वाटू लागले....

"अहो, हे सगळ जाईला कस सांगायच हो? पोर अगदी जिवाला लावून घेईल हो माझी..."

"अग, नाही, एवढ्यात जाईला नको सांगूस काही!! खचूनच जायची ग ती.... तिचेच जास्त वाईट वाटते, आपणच अस स्वप्न ठेवल ना तिच्या हातात आणि आपणच आता हे अस... कुठे पुण्याई कमी पडली माझी, काही कळत नाही, बघ!! अप्पांशी बोलून पाहतो, काय सल्ला देतात... माझी अक्कल गुंग झाली आहे ख्रर तर!!" मास्तर विमनस्कपणे काही न बोलता बसून राहिले. घरातले सकाळचे हसरे, उत्साही वातावरण आता कुठल्याकुठे निघून गेले होते! खिन्न मनाने मास्तरांच्या पत्नी उठून आत जाता जाता त्यांना दारापाशी काही तरी वाजल्यासारखे वाटले. अरे बापरे!! कोणी ऐकले की काय!! दारापाशी जात त्या पुटपुटल्या, त्यांची काळजी अधिकच वाढली!! कोणी काही ऐकले तर गावात बोभाटा व्हायला कितीसा उशीर!! असे कसे विसरलो आपण दाराला कडी लावायला??!! भरभर बाहेर येऊन त्यांनी बाहेर डोकावल, घराच्या आसपासही जरा पाहिल... कोणीच नव्हतं... वारा सुटला होता. हं!! वार्‍याने हलल असाव दार.. आपल मन कमकुवत झाल की सगळयाच गोष्टींचा संशय येतो, झाल!! मनाशीच म्हणत त्या दार बंद करून आत वळल्या.

थोड्या वेळाने जाई उत्साहातच घरी परतली आणि तिची बडबड सुरु झाली!! आपल्याच नादात, उत्साहात जाई वावरत होती!! मैत्रिणीकडे जाऊन काय काय धांगडधिंगा घातला याबद्दल अगदी उत्साहाने ती गप्पा मारत होती. मास्तरांच्या पत्नी मुलीचे बोलणे खोटा उत्साह दाखवून ऐकत होत्या, पण मास्तरांना मात्र त्यात भाग घेववेना. रात्रीच्या जेवणातही मास्तरांचे मन लागेना. भूक नाही, पोटात बरोबर नाही अशी कारणं देत मास्तर ताटावरुन लवकरच उठले. जाईला संशय येऊ नये म्हणून आईने कसेबसे लेकीबरोबर दोन घास पोटात ढकलले.

"आई, काय ग झाल बाबांना एकदम? दुपारपासून तसे मलूलच वाटताहेत नाही? खर तर मघाशीच तुला विचारणार होते ग मी... राहूनच गेल बघ!"

"नाही ग, काही नाही, जर दगदग झाली त्यांना आज, एवढच... बर वाटेल हं उद्यापर्यंत! जा आता झोपायला.."

"अग आई, हे काय??" जाईच्या आवाजात आश्चर्य होते! "अग, आज तू चक्क देव्हार्‍यात दिवा लावायला विसरलीस की!! अस कस काय??"

"अगsss बाई!! खर की काय?? कठीणच आहे ग बाई!! अग कामापुढे अन आता या गडबडी पुढे ना, मला लक्षातच नाही राहिलं बघ!" डोळ्यांतल पाणी थोपवत अन जाईपुढे हसण्याचा खोटा आव आणत जाईच्या आईने गणपतीपुढे वात उजळली. "माफ कर रे गजानना, बाबा!! पण चित्तच थार्‍यावर नाही रे माझ...." मनातल्या मनात गजाननाला आळवत त्यांनी देवापुढे हात जोडले अन मस्तक टेकल, "आता तूच रे बाबा त्राता!! आम्हांला जनांत लाज येईल अस काही होऊ देऊ नकोस रे...."

जाई झोपली याची खात्री करून अन बाकीची स्वयंपाकघरातली झाक पाक करून जेह्वा त्या निजण्यासाठी आल्या, तेह्वा मास्तर टक्क जागे आहेत हे त्यांच्या लक्षात आलं.

"अहोsss..." हलकेच त्यांनी हाक मारली. "झोपा आता, प्रयत्न तरी करा... उद्या अप्पांशी बोलून घ्या..."

एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न करत दोघेही पती पत्नी कूस बदलत रात्रभर जागेच होते.

"ऐकलस का?" मधेच मास्तर म्हणाले.

"काय झाल? काय म्हणता आहात?"

"उद्या अप्पांकडे जातो, अन बोलून घेतो. खर तर ते तरी काय म्हणणार?? उगाच आपल्यामुळे ते मात्र संकटात आता!!
त्यांचे आपापसातले संबंध दुरावले तर आपल्यामुळे.... " मास्तरांच्या मनात अनेक विचार थैमान घालत होते! "... पण जाईला तू घरातच थांबव, नाहीतर, काही तरी कामाने कुठेतरी पाठव तरी.... माझ्याबरोबर तिथे नको! सुनिताकडे येते म्हणून हट्ट धरून बसायची नाही तर!!"

सकाळी लवकरच ऊठून, सारी आन्हिकं आटोपून अन तयार होऊन मास्तर घराबाहेर पडले. अप्पांना पतपेढीत घडलेल सगळ सविस्तर सांगायच अस मनाशीच ठरवत त्यांनी अप्पांच्या घरचा दरवाजा ठोठावला. अप्पा नक्कीच काही तरी मार्ग दाखवतील, अशी आशाही त्यांना वाटत होती. अप्पांनी कदाचित दादासाहेबांना सार काही सांगितलही असेल, कोण जाणे!! तस असेल तर बरच होईल......

सुनिताने दरवाजा उघडला. "सर तुम्ही!! या, या ना, बसा. जाई आलीये का?" सुनिताने बाहेर डोकावत विचारल.

"नाही ग बाळा, मी एकटाच आलो आहे, जरा कामाच बोलायच होत अप्पांशी... काय करताहेत ते? बोलवतेस जरा?"

"सर, अप्पा ना, कालच रात्री जरा आत्याकडे गावी गेलेत... दोन तीन दिवसांत येतील परत. आत्याला काल ते फोन करायला गेले तेह्वा समजल की आत्याच्या सासूबाईना अगदी बर नाही, म्हणून बघायला गेलेत. काही अर्जंट आहे का काम तुमच? फोन देउ तुम्हांला आत्याचा? फोन करा न अप्पांना..."

"नाही ग, अस इतक काही अर्जंट नाही...." अश्या परिस्थितीत अप्पांना कुठल्या तोंडाने फोन करून मी माझे रडगाणे गाऊ?? मास्तर खिन्न मनाने अप्पांच्या घरून परत यायला निघाले.....

अपूर्ण******

विषय: 
प्रकार: 

आय टी,
अगदि योग्य ठिकाणी पॉज घेतेयस!! छान चाललीये कथा! आणि हो, फार वाट पण बघायला लावत नाहीयेस.. Happy
~ पन्ना ~

प्रतीक्रिया द्यायला पुर्ण व्हयची वाट बघ्त होते पण आता उत्सुकता वाढलीये , राहवल नाही गेले. लिहि लवकर..

पन्ना, लोपा दोघींचेही आभार Happy