वाचतानाचे तुकडे

Submitted by पाचपाटील on 27 August, 2022 - 07:49

१. खात्री आहे की पुढे सुदूर भविष्यात
"मनुष्यस्वभावाचा आजवरचा थोर निरीक्षक",
असं काही त्याच्याबद्दल कुणी म्हणणार नाही..!
कारण दुनियेला हादरवून बिदरवून टाकणारं काहीतरी
लिहिण्याची महत्वाकांक्षा ऐन तारुण्यात थोडीबहुत
असते..! ती नंतर सरळसरळ भुईसपाटच होते..!

आणि त्यातही समजा लिहिण्यासाठी वगैरे त्याने
मराठी भाषेचीच नैसर्गिक जैविक वाट
निवडल्यामुळे.. अर्थात, तेसुद्धा अगदीच काही
मराठी साहित्यविश्व समृद्ध करण्याचा वसा घेऊन
वगैरे नाही समजा..
कारण एकेकाळी तसा वसा घेतलेले आणि
स्वतःस 'साहित्यसम्राट' 'आचार्य' किंवा समजा
'आधुनिक वाल्मिकी' किंवा तत्सम
'महाराष्ट्राचे लाडके' वगैरे म्हणवून घेणाऱ्यांचं
तरी आज काय होय ?
कारण आपल्याकडच्या एकेकाळच्या त्या
प्रसिद्ध लेखकाला बर्फाच्छादित पर्वतशिखरं बघून
मसालेभातावरचा खोबऱ्याचा किस आठवला होता
म्हणे..! कमालच झाली..!
असो. अशी शेरेबाजी करायची म्हटलं तर,
वाचणाऱ्याला त्यामुळे कितीही मज्जा वाटत असली,
तरीही शेवटी ते सगळं बुमरॅंग होऊन उलटू शकतं..!
म्हणून भीतीपोटी तरी ती आवरती घेतली पाहिजे.

तर आपल्याकडे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक,
नागपूर सोडलं तर उर्वरित महाराष्ट्रात फक्त
साहित्याला वाहिलेली पुस्तकांची दुकानं
अस्तित्वात नसतीलच..!
कारण समजा १३ कोटी मराठी लोकांमध्ये
साधारण पाव टक्के लोक वाचणारे..! त्यातही
समजा मासिके किंवा पौराणिक ऐतिहासिक
कौटुंबिक तेलकट कादंबऱ्यांचे चणेफुटाणे इत्यादी...!
आणि आता चणेफुटाणे भरघोस उपलब्ध आहेत
म्हटल्यावर ते आवडीने खायला लागणारच ना
वयाच्या एका टप्प्यापर्यंत तरी..!
शिवाय 'पोटाभोवती अचानकच वाढून बसलेली
चरबी कशी कमी करावी?' किंवा समजा
'उन्हाळ्यात ओठांची काळजी कशी घ्यावी?'
किंवा समजा 'चुटकीसरशी यशस्वी उद्योजक
होऊन नातेवाईकांचे डोळे कसे पांढरे करावेत?'
वगैरे विषयही वाचन-व्यवहाराच्या व्यापक कक्षेत
येतात..!
तर मग हा सगळा आकडाही समजा त्या पाव
टक्क्यांत धरला तर, खरा आकडा ऑलरेडीच
ढासळून बसलेला असणार..!
तर अशी उत्साहवर्धक रसिक चोखंदळ व्यासंगी
ग्रंथोपजीवी इत्यादी परंपरा आपल्या पाठीशी
भक्कमपणे उभी आहे..!
आणि त्यामुळेच कुठल्याही नवाड्या लेखकाने
लिहिताना कसलाही ताण बिण घेऊ नये..!
सरळ लिहून टाकावं..! हाय काय आनी
नाय काय..!
कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन वगैरे..!

कारण उद्या समजा श्याम मनोहरांसारखा
कसलेला लेखक एखाद्या चौकात येऊन उभा
राहिला, तर मानसुद्धा न वळवता लोक निघून
जाऊ शकतील..! किंवा तसे जातातच.!
कारण डी मार्ट किंवा मॉलमध्ये बंपर ऑफर
चाललेली असते आणि ऑफर संपली बिंपली
तर काय करता ? किंवा अचानक डिस्काउंटवाला
सगळा माल उडाला तर ?
ते काही नाही..! आधी चपळाईने शेलका शेलका
माल ताब्यात घेतला पाहिजे..!
उद्या आपण असू नसू, काय सांगावं?
आजच खरेदीची मौज लुटलेली बरी.!!

शिवाय सेलिब्रिटी वगैरेही असतात..!
त्यांना फावल्या वेळेत सांस्कृतिक उत्सवांच्या
सुपाऱ्या घ्याव्या लागतात..! सेलिब्रिटींचं दर्शन,
त्यासाठी चेंगराचेंगरी, हे पण समजा आवश्यकच
आहे..! म्हणजे त्यांचं समजा तिकडं लांब
स्टेजवरनं हात हलवणं किंवा समजा फ्लाईंग
किस वगैरे फेकणं..!
आणि त्यावर मग इकडं खाली दाटीवाटीनं
सगळ्या झुरळांनी आनंदविभोर होत्साते
चित्कारणं वगैरे..!

{{मग ? अहो, त्यांनी हात हलवला..!! ही काय
साधी गोष्ट नाही..! शतकातून एकदा घडतं असं..!
ते आले..! त्यांनी दर्शन दिलं..!
त्यांनी चक्क हातसुद्धा हलवला..!!
मग आपण चित्कारायला नको ?
आनंदास वाट खुली करून द्यायला नको ?
असं का बरं टोचून बोलता तुम्ही??
आम्हीच सापडलो का तुम्हाला?
का छळता असे ?? तुम्ही मार्क्सवादी
वगैरे आहात की काय.??}}

२. अर्थात, पैसा आणि
वेळही नसतो आपल्या
लोकांकडे फारसा, हे एक आहेच..! म्हणजे
समजा उद्याच्या हातातोंडाचा सवाल अजून
उघडाच असेल किंवा रोजची घणघण पार
बुडवून टाकत असेल, तर मग कसली कला
आणि कुठल्या कवितांचं रसग्रहण वगैरे?

पण हे ही काही अगदीच अंतिम सत्य नसेल..!
कारण बॉलिवूडच्या भंगड पिच्चरांची,
फक्त स्टेटससाठी घेतलेल्या बिनगरजेच्या
वस्तूंची, शिवाय हॉटेलिंगची, देवाधर्मांची,
पावसाळी पर्यटनांची चैन जर परवडत असेल,
तर मग पुस्तकं घेतानाच काय मोठी इस्टेट
वाया जाते?

की ह्यात आळसाचीच भूमिका मोठी आहे..?
रोज टीव्ही सिरीयल्स आणि तत्सम फोकनाड
न्यूज चॅनल्स बघून बघून मेंदूला बुरशी
आणण्याची उत्तम सोय असताना,
उगाच पुस्तकं बिस्तकं कशाला?
तुम्हाला समजा हौस आहे तर तुमचं तुम्हीच
वाचा ते सगळं..! आणि काय तो सारांश चार
ओळीत सांगा आम्हाला..! नाही सांगितला तरी
काही आग्रह नाहीये.! आणि हट्ट तर मुळीच नाहीये..!
त्यामुळे आता तुम्ही उगाच पिरपिर नका करू
बरं प्लीज..!

३. एक फॅंटसी आहे..!
कधी पुरी होईल असं वाटत नाही..!
दोन वेळचं जेवण, थोड्याफार सिग्रेटी,
मागेल तेवढ्या पुस्तकांचा अखंडित पुरवठा
आणि चांगले कागद..!
('ना नफा, ना तोटा' वाल्या वह्या नकोत..!)
आणि त्या पुस्तकांच्या गुहेत तो अजगरासारखा
निवांत पडलेला..! मग बाहेर जगात समजा काय
खरे खोटे भूकंप होतच राहतात रोज..!
त्याचं काही नाही एवढं..!

४. जमवलेली सगळीच पुस्तकं
वाचून होतात
असं नाही..! सगळीच आवडतात असं नाही..!
पण तरीही गोळा करण्याचा हावरटपणा
संपत नाही..! काही पुस्तकं एखाद्या ठिकाणी
अचानक समोर येतात..! त्या विठ्ठलासारखी
कंबरेवर हात ठेवून उभीच राहतात पुढ्यात..!
आणि मग विठ्ठलाची नजर काही सहजासहजी
टाळता येत नाय ना..!
कारण तसं केलं तर लय खतरनाक वाट लागती,
असं म्हणतात..! अर्थात, आम्हाला त्यातलं काय
एवढं माहिती नाय..!
पण तुकाराम म्हणतो की बाबा असं असं आहे..!
विठ्ठलाशी अबोला धरला तर माणसाची नौका
पैलतीराला लागत नाय बाबा.!
आणि तुकाराम आवडतो म्हणल्यावर त्यानं
सांगितलेलं ऐकावंच लागतं ना..!
तर पुन्हा मिळतील ना मिळतील, उचल पटकन्..!
असं पुटपुटत आपण त्यांना सोबत घेऊन येतो..!
हे चक्र थांबणाऱ्यातलं नसतं..!

"आता बास्स झालं..! आता हा पुस्तकांचा
अव्यवहारी नाद सोडून स्वतःच्या आयुष्याचं
काहीतरी भक्कम केलं पायजे..!''
असं वाटण्याच्या वेळाही फक्त सुरूवातीलाच
येतात..! मग हळूहळू पूर्ण बंद होत जातात..!

कारण एका स्टेजनंतर माणूस पुस्तकांच्या
बाबतीत पार बेवडा होऊन जातो..!
एखाद्या अट्टल दारूड्याची पावलं ज्याप्रमाणे
ठरलेल्या वेळी गुत्त्याकडं वळतात..
तसंच वेळ झाली की पुस्तकांच्या काही
ओळखीच्या अड्डयांकडं जावं लागतं..!
चांगल्या इंग्रजी दारूसाठी जसा पैसा
फारच मोजावा लागतो, तसा चांगल्या इंग्रजी
पुस्तकांसाठीही मोजावा लागतो.
अर्थात, आपल्यालाही अगदीच पैसा वर
आला नसल्यामुळे पुस्तकं फुटपाथवर स्वस्तात
मिळू शकतात, हे एक बरंच आहे.

आणि एकदा माप ओलांडून घरात आलेली
पुस्तकं त्यांची त्यांची जागा बळकावून बसतात..!
त्यांना तिथून काढून टाकणं, सोपं असतं,
असं वाटत असेल तर तुम्ही चुकता आहात.

कारण समजा आपण घोषणा करतो की,
बाबा आता मनावर घेऊन ह्यातली काही पुस्तकं
काढून टाकायलाच पाहिजेत..! खूपच जागा
खाऊन टाकतायत..! नवीन लॉट ठेवायचा कुठे ??

पण ही काही कुठल्याच भविष्यात घडणारी
गोष्ट नसते..! कारण जेव्हा आपण पुस्तकं
काढायला हात घालतो, तेव्हा आपल्या मूडमध्ये
बारीकसा बदल व्हायला लागतो..!
मग आपण पलटी मारतो..! स्पष्टीकरणं देतो..!
माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला, वगैरे वगैरे
बंडल मारायला लागतो..!
पटवून द्यायला लागतो की बाबा आहेत तर
असू द्या..! काही खाऊ तर मागत नाहीयेत..!
त्यांनाही त्यांचा त्यांचा जीव आहे..! मान आहे..!
राहतात राहू द्या..! त्यांना आश्वासन देतो की
काही कुठे जायची गरज नाहीये..!
मी श्वास घेतोय तोपर्यंत तुम्हाला काळजी
करण्याचं काही कारण नाही..!

५. पण कधी कधी असंही
होतं की समजा चार पेग डाऊन असताना आपण
भलतेच लाडात आलेलो असतो..! आणि मग समजा
काही पुस्तकं एखाद्यास आग्रह करकरून स्वतःच
देतो की बाबा हे तू वाचच..!
आणि मग तो थोर मनुष्य नंतर ती अचूकपणे
गहाळ करून बसतो..! किंवा त्याला आठवतच
नाही की असं असं काही झालं होतं वगैरे..!
आणि नंतर मग ती आऊट ऑफ प्रिंट असली तर
मिळतही नाहीत..! आता ह्यामध्ये आपलं मोठंच
नुकसान झालेलं असतं हे त्या मनुष्यास पटू
शकत नाही..! आणि आता एखाद्याला पटतच
नाही, तर कसं पटवून द्यायचं ते आपल्याला
कळत नाही..!

ह्या पुस्तकांच्या भानगडीत असं होतं की
आपला शब्दसाठा अचानकच वाढून बसलेला आहे,
असंही लक्षात येतं कधीतरी..!
मग स्वतःला उघड करायची वेळ आलीच,
तर चावून चोथा झालेले फुळकावणी शब्द
वापरणं कमी कमी होत जातं..!
त्यामुळे आपण बोलायला लागलो की लोक
चमत्कारिक नजरेनं बघतायत की काय असा
भास व्हायला लागतो..!
आणि आपण चपापतो..!!

६. अजून एक प्रॉब्लेम म्हणजे, चमकदार,
भडकावू, टाळ्याखाऊ कुणी बोलत असेल तर
त्यात इंटरेस्ट राहत नाही..!
अमूकच धर्म कसा थोर..! तमूकच राष्ट्र कसं
महान..! ढमूकच विचारसरणी कशी
कायमस्वरूपी ग्रेट वगैरे..! असली प्रचारकी भाषा
बघून पोटात ढवळायला लागतं..!

किंवा कधीकधी एखादा आख्खा समाजच्या
समाज, एखादा देशच्या देश झुंडीसारखं
वागायला लागताना दिसायला लागतो..!
आणि आपल्याला त्यात काहीतरी फंडामेंटल
गंडल्यासारखं वाटायला लागतं..!
कारण तोपर्यंत कळपात वावरणं जमेनासं
झालेलं असतं...!

कधी आपलेच जुने आग्रह, हट्टी मतं हळूहळू
मोडकळीला यायला लागतात..!
सफाईदार आणि आत्मविश्वासपूर्ण आवाजात
किंचाळणं कठीण होऊन बसतं..!
तसं करायला गेलो तर आपल्या आतूनच
कुणीतरी आपल्यावर गालातल्या गालातल्या
गालातल्या गालात हसायला लागतं..!!

७. मग असंच कधीतरी
समाजापासून पूर्ण फटकून राहणाऱ्या एकांड्या
लेखकांची नेमकी अडचण काय असावी, ती
कळायला लागते..!
तर कधी चळवळींच्या मुशीतून घडलेल्या उग्र
लेखकांबद्दल अप्रूप वाटतं..!
अर्थात, ते अप्रूप फार काळ टिकत नाही म्हणा..!
कारण आपण तसे जगू शकत नाही..!
तो त्रास, ते सतत काट्यावरचं जगणं
पेलण्याएवढा आपला वकूब नाही,
हे आधीच माहिती असतं..!
'एकच तर आयुष्य आहे.. आणि आपल्या
एवढुशा बारक्या स्थलकालात आपण तरी
काय काय करणार?' वगैरे वगैरे समर्थनंही तयार
असतातच आधीपासून..!

८. एखादा लेखक सर्वकाळ
आणि संपूर्णपणे आवडतो, असं क्वचितच होतं..!
पण वाचता वाचता काही भाग प्रचंड आवडतो,
आतल्या आत एक सांधा जुळतो, तेवढं 'आपलं'
म्हणावं..! जिथं तसं होत नाही, ते आपल्यासाठी
नाही म्हणून पुढे निघावं..!
शिवाय ह्या गोष्टी मूडवरही अवलंबून असतात.. !
रात्री वाचतानाचा मूड वेगळा..! दुपारचा वेगळा.!

शिवाय प्रत्येक लेखकाचा स्वॅग ही वेगवेगळा..!
त्यामागे त्या त्या लेखकाची जडणघडण,
आर्थिक/सामाजिक स्तर, विचारसरणी,
जगण्याचे भोग, ताणेबाणे वगैरे भानगडी..!
त्यातूनच कदाचित जगाकडे बघण्याची/ काळ
समजून घेण्याची प्रत्येकाची एक वेगळी नजर..!
आणि त्यामुळेच त्या प्रत्येकाच्या शब्दांच्या
निवडींमध्येही दिसून येणारं एवढं वैपुल्य..!
अर्थात, हे बरंच आहे..!
कारण सगळेच जण एकाच छापात
ढाळलेला रतीब घालायला लागले,
तर मग काय अर्थ राहिला?

म्हणजे खालची वाक्यं आणि त्यांचे
व्यत्यासही खरेच आहेत..
उदाहरणार्थ जे‌ नेमाडे देऊ शकतात ते जीए,
एलकुंचवार देऊ शकत नाहीत..
जे पठारे, जातेगावकर देऊ शकतात
तेच श्याम मनोहर देतील असं नाही..
जे ग्रेस, रेगे देऊ शकत नाहीत ते ढसाळ,
सुर्वे, अरूण काळे, सुदाम राठोड देतात...!
जे जयंत पवार, ऐनापुरे सांगू शकतात ते विश्राम
बेडेकर, नगरकर नाहीत सांगू शकत..!

जे नंदा खरे देतात, ते मिलिंद बोकील देऊ
शकत नाहीत..

शिवाय बहिणाबाई, लक्षुंबाई टिळक जे देऊ
शकतात ते गौरीबाई, मेघना पेठे, शांता गोखले
देऊ शकत नाहीत..!

मग चेकॉव्ह, थोरो, दोस्तोव्हस्की किंवा नित्शे,
काफ्का, काम्यू, सार्त्र, मुराकामी, मार्केझ,
कोएट्झी हे ही भेटतातच कधी ना कधी..
ह्यांना कधी शिळेपणाचा स्पर्श होऊ शकेल,
असं वाटत नाही.. एवढा मोठा काळ टिकले, म्हणजे
पुढेही टिकतीलच..!

आणि शेवटी, ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
आणि तुकाराम बोल्होबा आंबिले-मोरे
जे देऊ शकतात ते तर कुणीच
देऊ शकत नाही..!

९. पुस्तकांच्या दुकानांत काही संवादांचे
तुकडे कानांवर पडतात..

# तुकडा-१
"अहो, ते विक्रम संपतचं 'सावरकर'
इंग्लिशमधूनच घ्या..! आपला सन्मित वाचेल तरी..!
याच वयात वाचून बिचून होतं..!"

# तुकडा-२
"अरे येस्स...! आय्येम मराठी.. बट यू नो,
मराठी नॉवेल्स रीड करायला मला लिटल बिट
डिफिकल्टच जातं..!"
{मग नका ना वाचू बाई..! विसरून जा सगळं..!
मातृभाषा वगैरेचं काय एवढं..!
सगळ्यांनी आता पटापट ग्लोबल झालं पायजे.!
म्हणजे हा असा आठवून आठवून
मराठी शब्द वापरण्याचा त्रास तरी वाचेल..!
मग काई टेन्शनच राहणार नाई..! हो की नाई?? }

# तुकडा-३
"पप्पा, व्हॉट इज धिस सेपियन्स?" एक मुलगा
पप्पांना विचारतोय..!

त्या पप्पांच्या हातात युवाल नोआ हरारीचं
'सेपियन्स' हे पुस्तक आहे..!
तर पप्पा एका वेगळ्याच स्तरावरून बोलतात की,
लॉर्ड ब्रह्मा वॉज ए फर्स्ट होमो सेपियन सेपियन..!!
लॉर्ड ब्रह्माला सगळंच माहिती होतं..!
बट वुई नो नथिंग..! वुई ऑल आर होमो
इडियट्स इडियट्स..!

# तुकडा-४
"मम्मी, हे पुस्तक मला चालेल का गं?"
एक लहाना मुलगा विचारतोय..त्याच्या हातात
प्रोतिमा बेदींचं 'टाईमपास' आहे..!

(आणि इथे ती मम्मी गौरी देशपांडेचं एक
पुस्तक चाळत कदाचित स्वतःच्याच कुठल्यातरी
नॉस्टॅल्जियात शिरलेली..!
परंतु ती मुलाला घाईघाईने म्हणते की,
नाहीss.. तू स्टोरी बुक्स बघ ना...
तिकडे आहेत बघ त्या सेक्शन मध्ये..!)

आता ह्या मम्मीने 'टाईमपास' नक्कीच वाचलेलं
असणार ह्याची आपल्याला खात्री पटते..!
तिच्या स्वरातलं चपापलेपणच सगळं सांगून जातं..!
पण असो..!
कारण शेवटी असंय की ह्या सगळ्या संवादांमध्ये
आपण बोलण्यासारखं काय असतं ना ??

१०. तर हे बहुधा असं आहे..!
पुस्तकं सुख देतात..! त्रासही देतात अर्थातच.‌.!
पण त्रासाचंही सुखच म्हणजे..!
बाकी, वाचायला चांगलं काही मिळत नाहीये,
अशा तक्रारीलाही फारशी जागा राहतं नाही..!
कारण चांगले लेखक निर्माण होणं, जुनेच
काही जबरदस्त लेखक माहिती होणं, हे
काही थांबत नाही...!

शेवटी, हा ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीचा
प्रश्न.‌.! पुस्तकांबद्दलची माया जबरदस्तीने लावता
येत नाही..! लागली तरीही फार संथ गतीने वाढत
जाणारी आणि प्रचंड वेळ मागणारी प्रक्रिया..!

अर्थात, नाही वाचलं तरी काही बिघडत नाही म्हणा..!
जगावं..! आपापलं स्वतःचं 'विष' शोधावं..!
ते जास्त महत्वाचं..!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेय. Happy नंबर सहाला अनुमोदन.
-----
माझा एक तुकडा झब्बू-
आपण जे काही वाचतो, अगदी काहीही.... ते आपण स्वतःतल्या 'न जगलेल्या' , 'न अनुभवलेल्या' आयुष्यासाठी वाचत असतो. वैचारिक लेखन वाचण्यामागे तर लेखक सांगतोय त्या मनाच्या प्रतलात जाण्याचीच धडपड असते. जिथे एरव्ही आपल्याला involuntarily जाता येत नाही, कुणीतरी न्यायला लागतं. त्यामुळे हा प्रभाव फार काळ टिकत नाही. मगं आपण अजून वाचतो...अजून वाचतो.... तुम्ही जे विष म्हणताय ते साधेसुधे नाही 'हलाहल' आहे. ज्या वेळी स्वतःला आपापले तिथे जाता येईल तेव्हा हे गूढच संपून जाईल. हॉलीवुडचे नट कसे म्हणतात, I do my own stunts, तसं I create my own हलाहल. Proud दुसऱ्याच्या अनुभवाची खोली वाचणे व स्वतः ते अवकाश अनुभवणे असा फरक आहे. मगं आपले highs हे अजून higher आणि lows हे अजून lower मागतात आणि कौटुंबिक तेलकट चण्याफुटाण्यात मन रमत नाही/ किक बसत नाही. हे माझं 'मी (वैचारिक) का वाचते? ', यावर शोधलेलं उत्तर आहे. ते चूक/बरोबर असं काहीही नाही, फक्त निरिक्षण आहे. Happy

आज वाचलेले बेस्ट लेखन !

एखादा लेखक सर्वकाळ आणि संपूर्णपणे आवडतो, असं क्वचितच होतं..!

+१

१० वर्षांपूर्वी फार ग्रेट वगैरे वाटलेले लेखन आज टुकार वाटू शकते आणि हे तथाकथित 'क्लासिक्स'बद्दलही होऊ शकते. त्याबद्दल स्वतःला मौन माफी द्यावी.

"मग स्वतःला उघड करायची वेळ आलीच,
तर चावून चोथा झालेले फुळकावणी शब्द
वापरणं कमी कमी होत जातं..!
त्यामुळे आपण बोलायला लागलो की लोक
चमत्कारिक नजरेनं बघतायत की काय असा
भास व्हायला लागतो..!"
अगदी अगदी.

मगं आपण अजून वाचतो...अजून वाचतो.... तुम्ही जे विष म्हणताय ते साधेसुधे नाही 'हलाहल' आहे.>> +१
अस्मिता,
तुमचा प्रतिसाद एक नंबर आहे. पूर्ववत केल्याबद्दल आभार. _/\_ Happy

१० वर्षांपूर्वी फार ग्रेट वगैरे वाटलेले लेखन आज टुकार वाटू शकते आणि हे तथाकथित 'क्लासिक्स'बद्दलही होऊ शकते. त्याबद्दल स्वतःला मौन माफी द्यावी.
+१
अनिंद्य,
खरंय. आवडी बदलतात. एकच पुस्तक विशीत वाचताना वेगळं आणि तिशीत वाचताना भलतंच वाटू शकतं. मधल्या काळात आपली वाढ किंवा समजा बरबादी झालेली असण्याची शक्यता असल्याने, नंतर कधीकधी आधीचं सगळंच अनोळखी (रिलेट न होणारं) वाटायला लागतं. Happy

हीरा, जाई, ऋन्मेष, सुनिती.. प्रतिसादाबद्दल आभारी आहे. Happy

सामो,
तुमच्या प्रोत्साहनपर शब्दांसाठी धन्यवाद. भविष्यात जरा बऱ्यापैकी मूलद्रव्य साठलं (आणि जर कुणी फुकटात छापून देणारा भेटला, तर त्याला फशी पाडून..) तर मग ताबडतोब एक पुस्तक काढायचं नियोजन तसं आहेच..! Happy

अवांतर:
अर्थात, त्यामुळे मग काय जी थोडीबहुत खळबळ डुचमळ माजायची ती त्या पाव टक्के वाचकांमधीच माजणार समजा..! तो प्रश्न नाही..! परंतु त्यानंतर मग समजा त्या प्रकाशकाने उर्वरित प्रतींचे भारे बांधून माझ्याकडे पाठवले आणि ते खपवण्याचा किंवा समजा त्याच्या नुकसान-भरपाईचा तगादा माझ्यामागे लावला, तर त्याला बाबा आता कसे चुकवावे, कुठे पोबारा करावा, कुठल्या आश्रमात लंपास व्हावे की सरळ हात वर करून मोकळे व्हावे की मग वेड लागल्याचा आव आणणंच योग्य होईल वगैरे वगैरे महत्त्वाच्या विचारांतून बाहेर पडायची वाट शोधून ठेवावी म्हणतो सध्यातरी.. Proud

आवडलं.
पुन्हा एकदा शांतपणे वाचणार.

अस्मिताचा प्रतिसादही आवडला.

एकच पुस्तक विशीत वाचताना वेगळं आणि तिशीत वाचताना भलतंच वाटू शकतं. मधल्या काळात आपली वाढ किंवा समजा बरबादी झालेली असण्याची शक्यता असल्याने, नंतर कधीकधी आधीचं सगळंच अनोळखी (रिलेट न होणारं) वाटायला लागतं. >>>
सिनेमांच्या सेन्सॉर सर्टिफिकेटमध्ये जसा प्रेक्षकांचा अपेक्षित वयोगट दिलेला असतो, तसं काही काही पुस्तकांच्या बाबतीतही करावं, असं मला कायम वाटतं. आणि हे केवळ 'प्रौढांसाठीचे विषय' अशा अर्थाने नव्हे.
माझं नेहमीचं आवडतं उदाहरण देते - गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज मी चाळीशीत वाचलं. खूप आवडलं. त्याच वेळी वाचताना हे देखील सतत जाणवत होतं, की हेच मी दहा-एक वर्षांपूर्वी (तिशीत) वाचलं असतं तर मला मुळीच आवडलं नसतं!!

कमाल लिहिलय!
एका स्टेजनंतर माणूस पुस्तकांच्या
बाबतीत पार बेवडा होऊन जातो..!>>> अगदी अगदी Lol

हाडाचे लेखक वाचक आहात.

नेहमीप्रमाणेच अफाट. पुस्तक काढा तुम्ही पाचपाटील.

Submitted by सामो on 27 August, 2022 - 19:17

सामोना अनुमोदन

कसलं अफाट सुंदर लिहलंय