मुलांना गोष्ट सांगत झोपवून ती बाहेरच्या खोलीत आली. घड्याळात बघितलं तर साडेदहा वाजून गेलेले. नवऱ्याचं प्रोजेक्ट रिलीज आलेली त्यामुळे आजकाल त्याला यायला तर उशिरच होत होता. खिडकी बंद करायला म्हणून गेली तर क्षणभर तिथेच थबकली. खडकीतून छान शुभ्र चंद्र तिच्याकडे बघून जणू हसत होता. वाऱ्याच्या मंद झुळुकीन अंगालाच नाहीतर मनाला पण छान गारवा मिळाला, आणि कुंडीतल्या मोगऱ्यानेही स्वतः ची जाणीव करून दिली. शुभ्र शीतल चांदणं, हळुवार वाऱ्याची झुळूक आणि त्याबरोबर येणारा मोगऱ्याचा मंद सुवास ! हेच तर स्वर्गसुख नव्हे ! आणि तेही दुसऱ्या तिसऱ्या महागड्या रिसॉर्ट मध्ये नाही तर घरबसल्या, आपल्या स्वतःच्या इतक्या छोटयाश्या ब्लॉक मधे ?
इतक्या वर्षांत पहिल्यांदाच आपण हे अनुभवतोय! तीन वर्षांपूर्वी किती तरी घरं बघून झाल्यावर शेवटी मिळालं हे पूर्व-पश्चिमवाल घर. सगळे हिशेब ठिशेब जमवून, जमवलं कसं बस एकदाच! मग अजून थोडं कर्ज काढून ते सुंदर सजवलं. आता जाणवतंय इतक्या आटापिटा करून घेतलेल्या घरात गेल्या तीन वर्षात म्हणजे, १०९५ दिवसात, दहा मिनिटंही स्वस्थपणे घराचं घरपण अनुभवायला मिळू नयेत. आपण कुठल्या सुखाच्या मागे त्याला पकडायला पळतोय?
नवीन घर घेतल्याचा, ते सजवल्यावर झालेला आनंद हा खरंच आनंद होता कि अभिमान ? कि आम्ही पण करून दाखवलं असा किंचितसा अहंकार?
आणि तो आनंद खरा म्हणावा तर घर घेतल्यापासून आठवतात ते कर्जाचे हफ्ते , ऑफिसच्या कटकटी , मुलांची आजारपणं , वीकेंडची कामं आणि सगळं झेपेनास झालं कि होणारी पेल्यातली वादळं.
सुखं ,आनंद दोन प्रकारचे असतात का?
एक आनंद खूप मोठा, साजरा करावा असा, सगळ्यांना दिसतो असा , शेजाऱ्याने हेवा करावा असा ! चांगले मार्क मिळाले, लग्न केल, घर घेतलं , बढती मिळाली . मुलं झाली, झालच तर लाखांची लॉटरी लागली. पण मग ते काही रोज तर नाही मिळणार. म्हणजे लग्न केलं तरी एकदा, घर घेतलं (एकदा किंवा फारतर दोनदा). मुलं झाली (एकदा किंवा दोनदा ), नोकरी बदलली तरी काही वर्षांच्या अंतराने तेच झालं बढतीच ! बरं ह्या मोठया मोठया आनंदाबरोबर जबाबदाऱ्या आणि कटकटी हि वाढणाऱ्या असतात, मग त्यात आधी ज्याच्या मागे पळत इथवर येतो ते सुख पण लपून कुठेतरी हरवून जातं.
दुसरा आनंद सहजच मिळणारा अगदी आजच्यासारखा वाऱ्याच्या मंद झुळुकेबरोबर येणारा, पहिल्या पावसाच्या मृदगंधाने सुखावून टाकणारा, उमललेल्या कळीसारखा लाजरा बुजरा , दुडू दुडू धावणाऱ्या बाळासारखा खट्याळ, त्या बोबड्या बोलांनी कान सुखावणारा, सुग्रास जेवणाच्या सुवासावर येणारा , पाखरांच्या किलबिलाटाने जागवणारा, आई वडिलांच्या समाधानी चेहऱ्याने हास्य फुलवणारा, मित्रांच्या मैफिलीत वेळकाळाचं भान हरपवणारा, प्रियकराच्या आठवणीने धुंदावणारा, लताच्या सुरांनी न्हाऊन घालणारा, सूर्योदय-सूर्यास्त अनुभवताना शाश्वततेचे आश्वासन देणारा .... ! अरे हे तर किती प्रकारचे आनंद, ज्यांच्या मागे पळावही नाही लागत. अगदी क्षणाक्षणाला वेचता यावं इतकं भरभरून ठेवलेलं हे सुख. फक्त ह्यातली गोम अशी आहे कि ते आपल्याला जाता जाता वेचाव लागतं अगदी जाणीवपूर्वक. नाहीतर मोठ्या सुखाच्या मागे पळताना हे अनायासे असलेलं सुख दुर्लक्षित होऊन मागेच पडत आणि आपण आपले भरधाव गाडीतून पुढे मृगजळाच्या मागे!
लॅचच्या आवाजाने ती भानावर आली. "काय वेळ आहे हि घरी यायची ,आज अगदी कहर केलाय ह्याने, बारा वाजायला आले " हे वाक्य मनातच गिळून, कपाळावरची आठी घालवून, हलकीशी हसली, " अरे आज बघ काय छान चांदणं पडलंय, अगदी कोजागिरीचं जणू , मोगरा तर इतका सुरेख दरवळलाय. तू पट्कन फ्रेश होऊन ये, मी जेवण गरम करून आणते. " दबकत घरात शिरणाऱ्या नवऱ्याला म्हणत ती स्वयंपाक घराकडे वळली.
रात्री बाराला मिळणाऱ्या ह्या अनपेक्षित धक्क्याने तोही क्षणभर गडबडला, पण लगेच हलकिशी शीळ घालत , "सुखं म्हणजे नक्की काय असतं ... ?" गुणगुणत बाथरूमच्या दिशेने निघाला .
सुखं म्हणजे नक्की काय असतं ... ?
Submitted by छन्दिफन्दि on 25 August, 2022 - 02:12
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ख वर टिंब द्यायचा राहिला असेल
ख वर टिंब द्यायचा राहिला असेल.
@sonalisl "लग्न, घर, मुलं
@sonalisl "लग्न, घर, मुलं ही मोठी सूखे मिळाल्यावर छोटी-छोटी सूखे जास्त छान वाटतात." <<<<<
किंवा हे सगळं (इतरांना वाटणार सुख ) सांभाळता सांभाळता इतके नाकी नऊ येतात कि मोगऱ्याच्या झुळके बरोबर (फुकटात सहजच ) मिळालेल्या आनंदाचे मोल कळते. : )
“ मांडे पुरणाचे असतात, हे मला
“ मांडे पुरणाचे असतात, हे मला आत्ता काही वर्षांपूर्वी कळलं.” - पुरणाचे दिंड असतात ना? मांडे तुम्ही म्हणता तसे खापरावर भाजलेले (मुक्ताई - ज्ञानेश्वर फेम). #अवांतर
“ बसुन घेतलेला मोगर्याचा सुगंध, आर्मचेअर वर वाचलेलं पुस्तक, वाफाळती कॉफी ...! टोटली ओव्हररेटेड!” - फारएण्डाच्या ‘उपमा’ वाल्या लेखाची आठवण झाली.
मला नुसतं सोफ्यावर बसलं तरी
मला नुसतं सोफ्यावर बसलं तरी सुखी वाटतं. मोठ्या झालेल्या मुलाने कधी छोटीशी मागणी केली तरी सुख वाटतं. गरम कॉफी वगैरे फारशी सुखप्रद वाटत नाही. कारण ती इतकी गरम असते की पिण्याजोगी होईपर्यंत थांबावं लागतं आणि तोपर्यंत मनाने दुसरे विचार करायला सुरुवात केलेली असते. मग कॉफीतल्या क्षणभंगुर सुखाचे चार क्षण भुर्रकन उडून जातात.
मला नुसतं सोफ्यावर बसलं तरी
मला नुसतं सोफ्यावर बसलं तरी सुखी वाटतं. >> +७८६ स्पेशली ऑफिसमधून मरमर करत काम करून घरी आल्यावर. अन्यथा एखादा दिवस सोफ्यावरच लोळायचे ठरवले तर तासाभराने कंटाळा येतो. थोडक्यात सुखाची किंमत दु:खानंतर, किंवा त्रास सहन केल्यानंतरच. आणि याचाच दुसरा अर्थ असा की तुम्ही आयुष्यात पुर्ण सुखी होऊच शकत नाही. कारण मग तुम्हाला ते सुख जाणवणारच नाही. त्यासाठी सुखाच्या जोडीला पुढेमागे दु:खं हवेच
जगी सर्वसुखी असा कोण आहे - कोणीच नाही, ते याचसाठी
पुरणाचे दिंड असतात ना? मांडे
पुरणाचे दिंड असतात ना? मांडे तुम्ही म्हणता तसे खापरावर भाजलेले >>
दिंड म्हणजे पूरण भरून उकडलेले कानवले (कणकेची पारी असलेल्या करंज्या).
पश्चिम महाराष्ट्रात पुरणाच्या प्रचंड मोठ्या (खापरावर भाजलेल्या) पोळ्यांना मांडे म्हणतात.
विदर्भात मांडे म्हणजे, कणकेच्या घरी काढलेल्या रव्या पासून कागदासारखा अतिशय पातळ मांडा बनवून खापरावर भाजतात. पापडाच्या लाटी पेक्षा लहान गोळा घेऊन दोन्ही हातांच्या बोटांनी हातांच्या कोपरपर्यंत मोठा मोठा करत न्यायचा असतो. आणी अलगद गरम खापरावर टाकायचा. त्याला मांडे नाचवणं असंही म्हणतात. हे बरेच दिवस (शेवयांसारखे) टिकतात. खातांना त्यात दूध आणी किंचित साखर टाकतात. पूर्वी मांडे हे लग्नाच्या रुखवताकरता बनवायचे. त्यावर नवरा नवरीची नावे की केशराने लिहिली जायची.
अहो इथे अॅशबेबी/ साधना
अहो इथे अॅशबेबी/ साधना ह्यांनी फोटो सकट कृति लिहिलेली आहे ह्या पदार्थाची. २००६ -७ साली बहुतेक.
अहो इथे अॅशबेबी/ साधना
अहो इथे अॅशबेबी/ साधना ह्यांनी फोटो सकट कृति लिहिलेली आहे ह्या पदार्थाची. २००६ -७ साली बहुतेक.>> ती कृती पुरणाच्या मांड्या ची आहे. खाली ती लिंक आहे. :-
https://www.maayboli.com/node/12329
रुखवतात ठेवायचे मांडे हे साधे. पूरण नं भरता केलेले असायचे.
त्या रुखवतातील मांड्यांचा
त्या रुखवतातील मांड्यांचा एका मराठी पुस्त कात फार ह्र् द्य उल्लेख आहे. लेखकाची आई असे मांडे हाताने करुन करुन हात भाजवून घेउन अगदी थकून गेलेली असते - बहुतेक नेमाड्यांचे पुस्तक आहे. व लेखकाचे वडील आम्ही नेहमी मनचेच मांडे खाल्ले असे डिरोगेटरी पद्धतीने म्हणतात म्हणजे ह्याच्या संसारात तिचे अगदी चिपाड होउन गेले पण त्या बापाला तिची आजिबात कदर नाही.
मी लहान पण बघितले आहेत हे मांडे अवघड प्रकरण आहे आत्म सात करायला.
किती सुंदर लिहिले आहे!!!
किती सुंदर लिहिले आहे!!!
अचानक आलेला पाऊस, डोंगर माथ्यावर अचानक ऐकू आलेली बासरी, कुणीतरी अपरिचिताने स्मित हास्य करून मोडलेली घडी, अचानक आठवलेले सुंदर गाणे- जे इतके दिवस आठवत नव्हते, जुनी कॅसेट, सलग ८ तास झोप, नि:स्तब्धता.... लाँग वॉक........ किती तरी साधे आनंद !!!
Aavadale..
Aavadale..
Maande charcha dusareekade manda..
रेव्यु, thank you. सुम्देर
रेव्यु, thank you. सुम्देर सहज सुखद अनुभव...
नानबा Thank you. 100% agreed
हा माझा माबो वरचा पहिला लेख!
हा माझा माबो वरचा पहिला लेख!
सुख म्हणजे काय असतं . ..
सुख म्हणजे काय असतं . ..
जमलंय.
लिहित राहा नवनवीन स्फुटं.
_______________
बाकी आमचं तसं नसतं. . .
आपणच आपल्याला पाहिल्यावर . .
पितळ उघडं पडतं.
पहिलाच प्रयत्न.
काय असतं . ..
काय असतं . ..
जमलंय.>>> धन्यवाद!
लिहित राहा नवनवीन स्फुटं>>> प्रयत्न करत राहीन
Pages