अवतार घ्यायला हवा

Submitted by दत्तात्रय साळुंके on 23 August, 2022 - 01:01

कृष्ण स्वतःला स्वर्गात म्हणाला
खूप ऐकलाय जन्माष्टमी सोहळा
एकदाचा भूलोकी हवा पाहायला
याची देही याची डोळा

रुप बदलून अष्टमीच्या रात्री
कान्हा धरेवर आला
भजन किर्तनी रमला
सजलेल्या पाळण्यात झुलला
स्तुतीगाण ऐकून मनी हरखला
म्हणाला
सकाळी फेरफटका मारु शहरात
बघूया काय घडतयं गल्ली बोळात
रात्री जन्माष्टमीचा सात्विक सोहळा
दिवसाही लुटायचा नवनीत गोळा

हळूच शिरला गोविंदा पथकात
वेशांतर करुन ओळख लपवत

डोईचं मोरपीस काढलं
कपाळ घट्ट पट्टीनं बांधलं
अगांत घातला टी शर्ट छान
नेसला गुडघ्यावर अर्धी तुमान

गल्लोगल्ली ढाक्कुमाकु
गोंविदा रे गोपाळा
यशोदेच्या तान्ह्या बाळा
कान्हानंही ताल धरला
मधेच गाण्याचा नुर बदलला
एक दोन तीन चार
हमाल पु-यातली पोर हुशार
लाल लाल पागोटे, गुलाबी शेला
पिंट्या दादा गेला जीव झाला वेडा
कान्हा चक्रावला म्हणाला
माझ्या नावामागे याचं नाव ?
कोणतरी थोर झाला असेल राव

पुन्हा एक समूह गळा
तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
पाऊस नसता बरसल्या धारा
कान्हाच्या अंगावर आला शहारा

गल्लोगल्ली कान्हामय तुडुंब गर्दी
द्वापारयुगात कुठे होते एवढे दर्दी ?
परम भक्तीने उर आला भरुन
कशाला जायचं स्वर्गात परतून

गोविंदांसोबत गेला गल्लीत
अप्सरा मंचावर होत्या थिरकत
चुकून आलो का इंद्रसभेत ?
छे! मर्त्य मानव होता खुर्चीत

नाचात वासना काठोकाठ
कुठे रासक्रीडेतला थाट
नेत्र कटाक्षही कामूक
कटी, उरोज हालते घाऊक

कर्णकर्कश आवाजात गाण
हरवली होती मूरलीची धून

जीव गुदमरणारं सारं
लोक चिडीचूप गाय वासरं
मतांसाठी थाटले दुकान
स्वार्थी नेत्याचा फंडा महान
म्हणाला आता येणार निवडून
लोक विसरतील भूक तहान

मान वळवून पाहतो युगंधर
मानवी मनोरा थरावर थर
हंडी फोडायला लहान थोर
सर सर वर चढलं बारकं पोर
घसरला पाय झाल गप्प गार
कान्हाच्या नेत्री यमुनेचा पूर
यमाला जाब विचारायचाय
चित्रगुप्ताचा लेखा तपासायचाय

कुठेतरी रात्री काल्याचं किर्तन
मग भक्तांच रास नर्तन
फुटली सुखाची प्रतीक हंडी
लोणी माखले सर्व तोंडी
गरीब, श्रीमंत, छोटा, मोठा
सारा अभिमान खोटा

गोकुळात असताना
कोपला इंद्र, मेघ बरसले
गोवर्धना सा-यांनी उचलले
गोपांसह दही दूध लुटले
मी फक्त नेतृत्व दिले

कुरुक्षेत्री मी सारथ्य केले
ते का फक्त अर्जुनाचे होते ?
अन्याया विरुद्धच्या प्रत्येक
दबक्या आवाजाचेही होते
निष्काम कर्मयोगाचे धडेही
सा-यासाठी होते

इथे सारथीच चुकीचा निवडला
अन माणसाचा रथ भरकटला
महाभारतातला गीतेचा संदेश
स्वार्थलोलूप जगी फोल ठरला

कान्हा इतका अगतीक
नसेल कुरुक्षेत्री झाला
मनात दृढनिश्चय केला
आता अवतार हवा घ्यायला
विषण्ण तो तिथून निघाला

© दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कान्हा इतका अगतीक
नसेल कुरुक्षेत्री झाला >>> अगदी खरंय...

नेमकी ठुसठुसणारी नस पकडलीत... मनापासून धन्यवाद...

सुरेख.
फारच आवडली रचना.
जियो दत्ताभाव.

SharmilaR
प्राचीन

खूप धन्यवाद...