पत्र

Submitted by पाचपाटील on 16 August, 2022 - 08:07

तर्काच्या निसरड्या रस्त्यावरून घसरलेलं
एक पत्र :-

आज इतक्या दिवसांनी तुझी आठवण येण्याचं
काही कारण नव्हतं खरं तर आणि आठवण
आली तरीही आता गप्पच बसायला शिकलं
पाहिजे मी..! कारण त्याशिवाय इतर कुठला
रस्ताच शिल्लक ठेवलेला नाहीयेस तू..!

परंतु ही ताजी आठवण सरळसरळ काही
मौलिक प्रश्नांसंबंधी असल्याने थोडीशी
तातडीचीही आहे..! म्हणून म्हटलं की आता
थेट कबुतराच्या पायाला बांधून एक पत्रच
पाठवून चाचपणी करावी की.. किस करताना
चावण्याची सवय वाईट आहे, हे आतातरी
तुझ्या लक्षात आलंय की नाही वगैरे ?
आणि शिवाय, दाढीमुळे गुदगुल्या न होता उलट
रसभंग होतो, हे तुझं मत अजूनही कायम
आहे काय?

तसेच, थिएटरच्या अंधाराचा गैरफायदा
घेऊन माझ्यासारख्या एखाद्या तंतोतंत
सत्शील निरागस पुरूषाचा विनयभंग
करण्याचा तुझा छंद अजूनही टिकून आहे काय?
असेल तर आतापर्यंत कितपत विकसित
झालेला आहे?

आणि अशा पद्धतीने एखाद्या अतिनिर्मळ
पुरूषाची तपस्या भंग करून त्यास वारंवार
पापाच्या दलदलीत खेचण्यात तुझ्या जीवाला
अजूनही काहीच वाटत नसेल ना?

किंवा नंतर समजा तुझ्या इतर पुरूषमित्रांचं
गुणगान सध्याच्या पुरुषमित्रापुढे गाऊन, त्याचा
उरलासुरला आत्मविश्वास खलास करण्याची
खोड अजूनही शाबूत आहे किंवा कसे?

आणि जाताजाता आणखी एक कुतुहल म्हणजे,
तुझी ती प्रसिद्ध चुरचुरीत बेरहम तिखट
विनोदबुद्धी तुला सोडून तर गेली नाही ना ??

---------------******-----------------
---------------******-----------------
ह्यावर समजा तर्कास व्यापक पातळीवर
कवटाळू पाहणारं पत्रोत्तर :-

तुझं पत्र मिळालं..! सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून
तुला ब्लॉक करून टाकलं, तर आता तू ही
कबुतराची जुनीच भानगड शोधून काढलीस..!
ह्यावरून पापाच्या तल्खलीत भस्मसात व्हायला
कोण आणि कित्ती आसुसलेलं आहे, हे
आपोआपच प्रकट झालं..!
तू तेव्हाही काही निरागस बिरागस होतास असं
मला वाटत नाही...! उलट विनयभंग करून
घ्यायला साग्रसंगीत पाट मांडून, रांगोळी घालून,
उदबत्ती वगैरे लावून हरहमेश तयारच बसलेला
असायचास, असं माझं आकलन आहे..!
कारण वारंवार नेम धरून फक्त मराठीच सिनेमांना
घेऊन जायचास, ज्यात संपूर्ण थिएटरमध्ये
शुकशुकाट असण्याची खात्रीच असायची..!
हे काही मला समजत नव्हतं, असं वाटलं
की काय?

बाकी माझा 'तो' छंद विकसित होत होत आता
कडेलोटापर्यंत पोहचला आहे..! काय म्हणणं आहे
तुझं ? कशाला उगाच आता चौकशा वगैरे?
कारण आता त्याचं काय होय ? एकदा माणसाची
ट्रेन चुकली की मग हळहळत, उष्ण उसासे
टाकत बसावं शांतपणे..!
शिवाय तू तिथे..! आणि मी इथे..! एवढ्या दूर..!
मग आता तू समजा स्वतःच्या फॅंटसीज् कितीही
मोकाट सोडल्या तरी, त्याचेही एवढे काय होय ?
फॅंटसीज् काही वस्तुस्थितीला रद्दबातल करू शकत
नाहीत..!

आणि तुझा सहावा प्रश्न.
तर असतात बाबा काही पुरूष असेही..!
की जे इतरांच्या गुणगायनांमुळे ईर्षाग्रस्त किंवा
संतप्त होण्याच्या ऐवजी उलट उत्तेजितच
होतात..! अर्थात, ते काही हे उघड उघड कबूल
करणार नाहीत समजा..! खाजगीत कबूल
करतील आणि उघडपणे मात्र अशा स्वरूपाच्या
स्खलनशीलतेचा घाईघाईने निषेध वगैरे करायला
सरसावतील..! कारण त्यातून ह्या ग्रेट
कुटुंबव्यवस्थेचा आधीच भुसभुशीत झालेला
सगळा डोलाराच ढासळण्याची वाट मोकळी
व्हायची..! अर्थात कुटुंबव्यवस्थेचं काय व्हायचं
ते होवो..! प्रश्न तो नाही..!

पण मला काळजी अशी आहे की, तुझ्यासारखे
इतरही काही 'भामटे सुसंस्कृत' छुपेपणाने
समाजात वावरत असतील; तर माझ्या शब्दांनी
त्यांच्या मनावरचा दाब अचानक ढिला होऊन..
समानधर्मी कुणीतरी भेटल्याच्या आनंदात त्यांचे
डोळे चमकू लागतील की काय..! आणि कशाला
उगाच तसलं काही? कारण कोण आवरणार
त्यांना मग..??

पोस्ट स्क्रिप्ट :
मध्यंतरी तू लिहिलेलं एक व्हॉट्सॲप फॉरवर्ड
फिरत फिरत पोचलं माझ्यापर्यंत..!
पाठवणारीनं मोठ्याच कौतुकाने पाठवलं
होतं..!
परंतु त्यासंदर्भात मला पूर्वीच हे विचारायचं
होतं की, बंडलबाजी करणं हीच तुझ्या
लिखाणामागची मूलभूत प्रेरणा आहे
किंवा कसे? कारण कुढतोस किती अरे?
आयुष्यात कुढतोस ते एकवेळ ठीकच आहे
समजा..! पण कथा-बिथा लिहितानाही
कुढेपणा लपत नाही, म्हणजे कमाल झाली..!!
आणि काय सारखं सारखं फटकारायचं असतं
स्वतःलाच? काय साधतं त्यातून?
ॲट लीस्ट, लिहिताना तरी मोकळं स्वच्छ काहीतरी लिही..!
ते स्वातंत्र्य आहेच ना तुला त्यात..! हवंतर
थोडंसं बशीभर रडून-बिडून घेत जा आधी
आणि मगच लिहायला बसत जा..! जमेल ना ?
जमव बाबा..!

बाकी, ऐकलं ते खरंय का ?? तू म्हणे लपून
बसण्याची प्रॅक्टिस करत असतोस हल्ली ??
जीए वगैरे समजायला लागलायस की काय
स्वतःला ??
अर्थात, तसं समजायला हरकतही नाही..!
पण नुसतं समजून काय होणार ना..! त्या
माणसाची प्रतिभा कोठून आणशील??
की प्रतिभेचा तुटवडा झाकण्यासाठीच ही
सगळी एकांतप्रियतेची हूल वगैरे ??
तेवढं सांग नंतर..! हवंतर गुपचूप कानात सांग..!

आणि आता हे पत्र जपून बिपून ठेवू नकोस..!
उगीच नंतर 'मराठी साहित्यातला अभिजात ठेवा'
वगैरे होऊन बसायचं..! अर्थात, एकमेकांना
वाड्मयीन अभिरुचीसंपन्न चर्चेनं ओतप्रोत
भरलेली लांबलचक पत्रं पाठवायला आपण दोघं म्हणजे
काही ''ते अमकेतमके'' नाही आहोत..! पण तरीही एक आपलं
सांगितलं..! उगाच रिस्क कशाला ? नाही का?

आणि शेवटी असंय की माणसाच्या आयुष्यात
सेक्सच्या पलीकडेही काही असतं की नाही??
की सगळं तिथंच अडकून पडलेलं असतं
सर्वकाळ?? खरंतर यासंदर्भात सिग्मंड
फ्रॉईडबाबाचं 'ए जनरल इंट्रोडक्शन टू सायकोॲनॅलिसिस'
हे पुस्तकच पाठवणार होते तुझ्या ह्या कबुतरासोबत..!
परंतु त्याला बिचाऱ्याला ते ओझं पेलवणार नाही..!
म्हणून तुझं तूच विकत घेऊन वाचून टाक
एकदा..!
विशेषतः त्यातलं 'कामशक्तीचा विकास आणि
लैंगिक संरचना' हे प्रवचन..! अनुवादच वाच..!
नाहीतर तुझं फाफललेलं इंग्लिश लक्षात घेता,
तू काहीतरी भलताच अर्थ काढून ''आता मला सगळं
समजलं होss'' अशा आरोळ्या ठोकत सुटायचास..!
असो. हे जरा लांबलंच..! थांबते आता..!

(आणि ऐक ना..! आता कबुतर वगैरे
नकोस पाठवू..! इथे माझ्याशेजारी एक देशपांडेकाकू
म्हणून राहतात..! माझ्या पप्पांनी त्यांना
माझ्यावर बारीक लक्ष ठेवायला सांगितलंय सध्या..!
आणि काकू भूमिकेत अगदी चोखपणे शिरल्या आहेत..!
आणि अशात तुझं हे कबुतर एखादेवेळी रस्ता भरकटून
त्यांच्या घरात शिरलं तर कोण निस्तरणार ते उगाच..! )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाल!!
>>>>>साग्रसंगीत पाट मांडून, रांगोळी घालून,
उदबत्ती वगैरे लावून
हाहाहा कहर!!! मस्त लिहीलय.

झकासै हे.
पत्रास न ठेवता पत्रास उत्तर दिले आहे जोरदार Happy

पत्रास पत्रोत्तर हे 'शेरास सव्वाशेर' ह्या गुणोत्तरात आहे. असल्या पाणउतारा करणाऱ्या वास्तववादी नायिकांसाठी टाळ्या Wink
मजा आली. Happy

हीरा,
फार मोठं नाव घेतलंत...! 'सुर्वे'..! _/\_
(बाकी, "तुम्ही खुशाल समदी हावा, असं पत्रात लिवा ")

अस्मिता, Happy
असल्या पाणउतारा करणाऱ्या वास्तववादी,
सोनारणीनंच कान टोचलेलं बरं अस्तंय म्हणतेत..! Wink

भरत, अनिंद्य, सामो, जाई, मोद.. प्रतिसादांबद्दल आभारी आहे Happy

कारण वारंवार नेम धरून फक्त मराठीच सिनेमांना
घेऊन जायचास, ज्यात संपूर्ण थिएटरमध्ये
शुकशुकाट असण्याची खात्रीच असायची..!>>>>>> Lol
चांगले लिहिलय!

Lol येऊ दे की अजून पत्रे नि होऊ दे मराठी साहित्यातला अभिजात ठेवा'. "तुम्हारी अमृता" सारखं "Truly, विषखा" काळाची गरज आहे Wink

हे भारीच आहे पाच पाटील...

अशी झणझणीत फीडबॅक देणारी प्रिया असेल तर"क्षण एक पुरे प्रेमाचा...वर्षाव घडो मरणाचा..." मोड ऑन करायला हरकत नाही....!

!

सहीये!
दोघांमधली पत्र-केमिस्ट्री !!

Zakas

अरे, सही जमलय
स्टाईल वेगळीच अन छान आहे तुमची, लिहित रहा
वाचनही भरपूर असावं, गुड गोईंग

मजा आली वाचताना .. छान लिहीलंय

दाढीमुळे गुदगुल्या न होता उलट
रसभंग होतो, हे तुझं मत अजूनही कायम
आहे काय?>>> हे दाढी किती वाढलीए त्यावर अवलंबून असतं Proud

हे कोरावर एकाने स्वत:च्या नावावर लिहिल आहे>>
तुमची कमेंट पाहिली मी तिकडे. _/\_
तो मीच आहे. ..'चैतन्य' Happy

Pages