अफ्रिकेतील अतर्क्य - भाग ५

Submitted by रुद्रसेन on 6 August, 2022 - 03:10

कुकुच कु ... कोंबड्याची बांग ऐकू आली तसा मी शुद्धीवर आलो. शुद्धीत आल्यावर समजलं, कि मी माझा गेस्टहाउस वर बेडवर पडलेलो होतो. माझा हाताला मलमपट्टी केलेली होती. सकाळ झाल्यासारखं वाटत होतं. खिडक्यांच्या फटीमधून हलकासा सकाळचा सुर्योदयापुर्वीचा प्रकाश येत होता. कसलातरी जळका वास बाजूच्या खोलीमध्ये पसरला होता आणि माझा नाकात शिरला, मी बेडवर उठून बसण्याचा प्रयत्न करू लागलो, आणि मला शिंकायला आलं. माझा शिंकण्याचा आवाजाने बाहेर च्या खोलीत बसलेला अॅलन पळतच आत माझाकडे आला.

“ मित्रा बऱ वाटतय का तुला” काळजीनेच माझा जवळ येत अॅलन ने मला विचारलं.

“ हो ठीक आहे आता” असं म्हणत उठत मी उशीच्या आधाराने भिंतीला टेकून बसू लागलो.

“ मला रात्री इथे आपण कसे आलो ते काहीच आठवत नाहीये” भिंतीला टेकत मी अॅलन ला विचारलं.

या माझा प्रश्नावर तो फक्त हसला. आणि माझी शुद्ध हरपल्याची आणि इथे त्याने मला आणल्याची इत्यंभूत माहिती त्याने मला दिली. रात्री पळत इथे आल्यानंतर त्याने मला बेडवर झोपवलं आणि माझी मलमपट्टी सुद्धा केली होती. रात्री परत पिशाच्च इथे येऊ नये म्हणून घरात जागोजागी शेकोट्या पेटवून ठेवल्या होत्या. आणि पहारा देत रात्रभर जागाच होता. मगाशी त्याच शेकोटीच्या जळका दर्प माझा नाकात गेला होता.
खरंच अॅलनमुळे आज माझे प्राणच वाचले होते असे म्हणायला हरकत न्हवती. मी त्याचे मनापासून आभार मानले. आज खरंच तो नसता तर माझी काहीच धडगत न्हवती. पण अॅलन च्या म्हणण्यानुसार माझे प्राण वाचवणे हे अॅलन चे कर्तव्यच होते कारण ते पिशाच्च अॅलन च्या मागावर होते, घरमालकाच्या मुलीला बर करायला गेल्यावर तिथे आलेले पिशाच्च हेच होते. अॅलन च्या म्हणण्याप्रमाणे त्यानेच त्या पिशाच्चाला उकसावले आणि म्हणूनच ते त्याचा मागावर त्याचा खोलीपर्यंत आले आणि योगायोगाने त्या रात्री मी अॅलन च्या खोलीवर असल्याने त्या पिशाच्चाने माझासुद्धा खरपूस समाचार घेतला होता.

पिशाच्चाचा त्या नुसत्या आठवणीनेच मला सकाळ सकाळ घाम फुटला. त्या रात्री माझी अवस्था खरंच भयानक झाली होती. पिशाच्चाची ती भयंकर आकृती मी इतक्या जवळून पहिली कि अजूनही आठवल तरी अंगावर काटा येत होता. एवढ जीवावर बेतलं आपल्या खरंच या गोष्टी घडतील अशी अपेक्षासुद्धा केली न्हवती. आता इथे राहणं खरंच मला धोक्याचं वाटू लागलं. दैवयोगाने म्हणा किंवा अॅलन च्या तल्लख बुद्धीने त्या रात्री आपण जिवंत राहिलो नाहीतर काय झालं असत याचा विचार न केलेलाच बरा. ते काही नाही आजच कंपनी मध्ये प्रकृतीच कारण सांगून इथून सटकलेलच बर नाहीतर उद्या परत काही वेगळा घडलं तर आपल्या घरच्यांना अंतिम संस्कार करायला आपलं शरीर सुद्धा सापडणार नाही. मी माझा विचार अॅलनला बोलून दाखवला इथे राहण्याबाबतचे धोके आणि इथल्या विचित्र पद्धती एके दिवशी आपल्या जीवावर उठतील. माझं बोलणं ऐकून अॅलन विचारात पडला.

“ कसला विचार करतोयस “ मी म्हणालो.

“ काही नाही रे .. एकतर ते पिशाच्च माझामुळे क्रुद्ध होऊन आपल्या मागे लागलं. त्यादिवशी मांत्रिकाच्या मुलीचा जीवसुद्धा माझामुळेच धोक्यात आला. काल सुद्धा ते पिशाच्च माझा मागावरच रूमपर्यंत आले असणार पण योगायोगाने ते तुला पाहून तुझा जीवावर उठले “अॅलन म्हणाला.

“ पण तुला नक्की म्हणायचंय काय “ न कळून मी विचारलं.

“ हेच कि तू इथून जा हवं तर.. पण मी इथेच थांबणार.. माझामुळे ते पिशाच्च आता इतर कोणालाही त्रास देणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार मला, कारण आज ते तुझा जीवावर उठले उद्या न जाणो माझा घरमालकाच्या मागे लागेल, त्याचे कुटुंब आधीच गरिबी आणि आजारांनी त्रस्त आहे त्यात अजून हि असली भयानक अवदसा मागे लागल्यावर तर बिचारा कोलमडूनच पडेल. देव ना करो पण घरमालकाच्या कुटुंबातल्या लोकांचा जीवास अपाय मी त्या पिशाच्चाला करू देणार नाही ” अॅलन निग्रहाने म्हणाला.

काही वेळ शांततेत गेला. अॅलन ने उठून खोलीमधली खिडकी उघडली. त्याने जशी खिडकी उघडली तसं मंद थंड हवेची झुळूक आतमध्ये आली, मला ती बरीच सुखावून गेली.

काही वेळाने त्या शांततेचा भंग करत मी अॅलन ला म्हणालो “ पण आपण काय करू शकतो मित्रा. ते एक पिशाच्च आहे कोणी हाडामांसाचा माणूस असता तर मारून मुटकून वठणीवर आणता आला असता. इथे भयंकर अशा पिशाच्चाशी गाठ आहे. आपण त्याचं काय वाकडं करू शकणार आहोत.
“ माहित नाही, पण आता काही झालं तरी या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी माघारी परतणार नाही, मग परिणाम काहीही होवो” हात मागे बांधून खिडकीच्या बाहेर पाहत अॅलन निश्चयपूर्वक म्हणाला.
अॅलन च्या या निग्राहाच्या निर्णयामुळे मला एकट्याला या आफ्रिकन भुमिमधून काढता येईना. आपण किती स्वार्थीपणाने विचार करतो याचच मला दुख: झालं याउलट अॅलन ने त्याचा घरमालकाच्या गरीब कुटुंबाचा विचार केला. आपण इथून कसेबसे जीव वाचवून जाऊ पण त्या गरीब घरमालकाच्या कुटुंबाचं काय हा विचार त्याने केला पण असा विचार माझा मनात आला न्हवता. श्या.. काय हे आपण असे कसे विचार करू शकतो याची माझी मलाच लाज वाटू लागली. प्रकृतीच कारण सांगून २-३ दिवस कंपनी मध्ये येणार नाही असं तिथल्या सुपरवायझर ला मी निरोप दिला आणि मी सुद्धा अॅलन च्या या कार्यात सहभागी होण्याचं ठरवलं.

त्या दिवशी दुपारच्या सुमारास अॅलन च्या घरमालकाच्या घरी आमची बैठक जमली, मी , अॅलन, माझा गेस्टहाउस चा केअरटेकर बोमान, अॅलन चा घरमालक आणि त्याचा घरातले लोकं माझावर आणि अॅलन वर काल रात्री गुदरलेला बाका प्रसंग ऐकून चांगलेच हादरलेले होते.

“ तुम्हाला सांगत होतो मी साहेब रात्री अपरात्री बाहेर पडू नका “ बोमान काळजीच्या सुरात म्हणाला.

“ अरे हो .. पण मी अॅलन कडेच गेलो होतो दुसरीकडे कुठे नाही “ मी उत्तरलो.

“ खरंच मी उगीचंच तुम्हाला त्या मांत्रिकाकडे नेलं आणि त्यामूळेच तुमच्यावर अशी वेळ आली.” अॅलन चा घरमालक अॅलन कडे पाहत म्हणाला.
सगळेजण आपापलं म्हणण मांडत होते, घरमालकाची बायको आणि मुलगी मात्र एका कोपऱ्यात शांतपणे ऐकत उभे होते. तसचं अॅलनसुद्धा शांतपणे सगळ्याचं ऐकत भिंतीला टेकून उभा होता. घरमालक आणि बोमान त्या पिशाचाच्या मागे किती ताकद आहे हे सांगत होते.

“ आता आपल्या पुढे एकंच मार्ग आहे.” अॅलन जमिनीकडे पाहत मधेच म्हणाला.
“ कोणता मार्ग “ घरमालक आणि बोमान आपली बडबड थांबवून शंकेच्या सुरात म्हणाले.

“ या पिशाच्चाने आपल्यापैकी कोणाला काही करायचा आत आपणच त्या पिशाच्चाला शोधून नेस्तनाभूत करणे” अॅलन ची नजर अजूनही जमिनीवरच होती.

“ का..काय बिर्नाखाला नेस्तनाभूत करायचं.. अहो साहेब काय बोलताय एवढ सोपं आहे का ते,” घरमालक घाबरत मोठ्याने म्हणाला.

“ हे तर मोठ्ठ वेडेपणाच काम आहे “ आपले मोट्ठे डोळे अजूनच मोठे करत बोमानने घरमालकाला दुजोरा दिला.

“ का ? काय अवघड आहे. आपल्या कुटुंबावर त्याने जीवानिशी हल्ला केला तर की करणार आहात तुम्ही लोकं ? “अॅलन आपली नजर घरमालकावर रोखत म्हणाला.

“ साहेब हे मान्य आहे तुम्ही दोन वेळा बिर्नाखाचा सामना केलं आहे, त्यामुळे तुम्ही एवढ आत्मविश्वासाने बोलताय पण तुम्ही म्हणताय एवढं सोपं काम नाहीये ते.त्यात आपला जीव सुद्धा जाऊ शकतो. त्या मांत्रिकाची काय हालत झाली आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलीय ना साहेब “ घरमालक दीनवाण्या सुरात म्हणला.

त्यावर मी पुढे होऊन घरमालकाला म्हणालो “ हे बघ मी आणि अॅलन इथून जर निघून गेलो तर ते पिशाच्च तुमचा जीवावर उठेल, तुमचा कुटुंबाला धोका आहे हे तुम्हाला कळत कसं नाहीये. आपण की नाही केलं तरी तसंही ते आपल्या मागे लागलेलंच आहे, तुमच्या कुटुंबाला कोणताही धोका नको म्हणूनच अॅलन त्याला संपवायला निघालाय ना..? आणि पिशाच्चाला मारण एवढं अवघड असलं तरी अशक्य नक्कीच नसेल. कारण परमेश्वरापेक्षा शक्तिशाली दुसरं कोणी असू शकेल का ? अमी परमेश्वर आपल्या सोबत आहे म्हणूनच तर दोनदा आपण पिशाच्चाच्या तडाख्यातून वाचलो ना. काहीतरी मार्ग नक्कीच असेल त्या बिर्नाख पिशाच्चाला संपवण्याचा.

माझा बोलण्याने घरात खूपच शांतता पसरली घरमालकासह इतर सगळेच शांत झाले. घरमालकाला माझं म्हणण पटत होतं पण त्याचं हे करण्याचं धाडस होत न्हवत. बिर्नाखाशी टक्कर म्हणजे साक्षात मृत्यूशी सामना असं त्याला वाटत होतं.
शेवटी अॅलन पुढे आला आणि घरमालकाच्या हाताला पकडून त्याचा मुलीसमोर ओढत उभं केलं आणि म्हणाला” हि तुझी मुलगी आणि बायको हे तुझावर विसंबून आहेत. आता जर तू माघार घेतलीस आणि यांना उद्या काही झालं तर सर्वस्वी तू जबाबदार असशील कळतंय का तुला.
घरमालक मान खाली घालून उभा होता. तो काहीच बोलत नसल्याचं पाहून अॅलन माझाकडे पाहत बोलला “ असं वाटतय आपल्या दोघांनाच हि कामगिरी पार पाडावी लागणार आहे. असं बोलून तो दरवाजाजवळ गेला.

“ आपल्याला “बांगा” कडे जावं लागणार मदतीसाठी” घरमालक बोलला तसं अॅलन जाताजाता दरवाजाजवळच थांबला.

“ काय..कोणाकडे..” मला नाव नीट न ऐकू आल्यामुळे मी घरमालकाला विचारलं.

“ बांगा” घरमालकाने पुनुरुच्चार केला..बऱ्याच लोकांना त्याने मदत केलीय पिशाच्चांचा त्रासा पासून, कोणाच्या शेतात धान्य उगवत नसेल किंवा अचानक रात्री पाळीव प्राण्यांचे मृतदेह घराबाहेर पडत असतील तर लोकं बांगा लाच शरण जात” घरमालक गूढ स्वरात म्हणला.

“ अस्स.. कुठे मिळेल हा माणूस आपल्याला “अॅलन घरमालकाजवळ येत म्हणला.

“ टोन्डू टेकड्यांचा जवळ त्याची झोपडी आहे तो तिथेच असतो. चांगला माणूस आहे तो खूप लोकांना मदत केलीय त्याने त्याबदल्यात त्याला फक्त खाण्याचं सामान द्यावं लागत इतर काहीही तो घेत नाही. तो जास्त लोकांमध्ये मिसळत नाही पण त्याने आजपर्यंत बऱ्याच पिशाचांचा सामना केलाय“ बोमान मधेच बोलला.

“ मग आपल्याला या बांगा कडे जावच लागणार तर त्याची मदत होईल आपल्याला “अॅलन विचार करत म्हणाला.
यावर कोणीच काही बोललं नाही शेवटी त्या पिशाच्चाचा नायनाट करण्यावर सगळ्याचं एकमत झालं होतं. आता या बांगा नावाच्या माणसाकडे जाऊन पुढची आखणी करावी लागणार होती. आजचं निघावं असं अॅलन ने सगळ्यांना सांगितलं जेवढं शक्य असेल तेवढी लवकर हालचाल करावी असं अॅलन चं मत होतं.

त्यानुसार सगळेजण आवश्यक त्या गोष्टी घेऊन तयारीला लागले. बांगासाठी जेवणाच सामान, पायात मोठे बूट, मशाली वगेरे साहित्य. सगळ्या सामानाची तयारी करून संध्याकाळच्या सुमाराला आम्ही सगळेच म्हणजे टोन्डू टेकड्यांचा रोखाने निघालो. माझाकडे अॅलन ची रायफल होती ती कशी वापरायची याचं जलद प्रशिक्षण त्याने मला दिलेलं होतं. बोमान आणि घरमालकाकडे सुऱ्या होत्या. जवळपास २-३ मैलाचा रस्ता होता. मैलभर जंगलामधून गेल्यानंतर मोकळ्या मैदानातून पण झाडाझुडूपांचा गर्दीमधून आम्ही पुढे चाललो होतो. पुढे घरमालक आणि अॅलन त्यांचामागोमाग मी आणि बोमान आम्ही सगळेचजण चाललो होतो. अॅलन घरमालकाच्या कुटुंबासाठी एवढी जोखीम घ्यायला निघालेलं पाहून बोमान ला गहिवरूनच आलं. घरमालक सुद्धा अॅलन कडे आदराने पाहू लागलेला होता.

पश्चिम क्षितिजावरून सूर्य अस्ताकडे चाललेला होता त्याचा लालिमा आभाळात सगळीकडे पसरलेला होता. आकाश निरभ्र असल्याने तो रंग जास्तच उठून दिसत होता.

सगळेजण शांतपणे चाललेले होते ती शांतात तोडायचा प्रयत्न करून
“ बांगा आपली मदत नक्की करू शकेल ना “ मी उगाचच ने घरमालकाला विचारलं

“ हो हो नक्कीच .. मी सांगितलं ना तुम्हाला तो सगळ्यांना मदत करतो. त्याचाकडे पण काही विशिष्ट मंत्रसिद्धी आहेत ज्या तो लोकांच्या भल्याकरिता वापरतो. घरमालकाने उत्तरं दिल.

“ जर असं आहे तर तुझी मुलगी आजारी पडल्यावर तू तिला बांगाकडेच का नाही घेऊन गेलास” अॅलन ने घरमालकाला विचारलं.

“ त्याचं काय आहे कि . आजारी माणसाला बऱ करण्याची मंत्रशक्ती बांगाकडे नाहीये, तो फक्त शेतजमिनीची उत्तम जोपासना, पाळीव प्राण्याचे पिशाच्चापासून रक्षण, आणि जर घरावर कोणी वाईट हेतूने काळी सावली पाडली असेल तर यांपासून बचावाचे उपाय करतो” रोग बरे करायचे असतील तर बिर्नाखाला शरण जावं लागतं त्याची उपासना करावी लागते. बांगा कधीही कोणत्या पिशाच्चाची उपासना करणार नाही” घरमालक चालत चालत खाली पाहत म्हणाला. मोठं गूढ आणि रसपूर्ण वक्तव्य घरमालकाने केलं होतं त्याला अजून काही विचारावं असं वाटून मो तोंड उघडलं .

एवढ्या बोमान म्हणाला “ त्या बघा त्या टोन्डू टेकड्या आता आपण थोड्याच वेळात पोहोचू

समोर एका मैलावर पसरट आकाराच्या टेकड्यांचा घोळका दिसत होता. त्या टेकड्यापासून काही अंतरावर लांब माणसांची वस्ती होती होती. आम्ही चालत चालत त्या टेकड्यांचा जवळ पोचलो

“ आणी ती बांगा ची झोपडी “ घरमालक समोरच्या छोट्या टेकडीवरील झोपडीकडे निर्देश करत म्हणाला.

क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

+१