स्मरणरंजन : पिरसा

Submitted by Mandar Katre on 3 August, 2022 - 01:12
कोकण

पाऊस सुरू झाला की मन आपोआप भूतकाळात जातं. सहावीत आम्ही चोरवणे मराठी शाळेतून नाणीज हायस्कुल ला गेलेलो. सकाळी साडेनऊ वाजता घरातून निघून दहापर्यंत शाळेत पोहोचायचो... पण ओलेचिंब होऊन... रेनकोट, छत्री जे काही असायचं ते जून जुलै मधल्या कोकणातल्या मुसळधार पावसापुढे कधीच धाराशायी ठरायचं...

दफ्तरात एका प्लास्टिक पिशवीत सगळी वह्यापुस्तकं सुरक्षित असायची पण कपडे मात्र भिजायचेच... मग तसंच कुडकुडत शाळेत बसावं लागे... पण तसा मी काही एकटाच नव्हतो, सगळीच मुलं कमी अधिक भिजूनच शाळेत आलेली असत...मी रोज अडीच किलोमीटर चालतं शाळेत जायचा पण आमच्या शाळेत काही मुलं रोज आठ ते दहा किमी चालून शाळेत यायची त्यावेळी! आम्हाला खरंच त्यांचं भारी कौतुक वाटायचं. करंजारी, घटिवळे, नांदवली, शिरंबवली, खानू, कशेळी या गावातली मुलं देखील अक्षरशः धावत पळत शाळेत यायची...

मग दुपारच्या सुटीपर्यंत कपडे अंगावरच वाळत असत. डबा पाच मिनिटात संपऊन एकमेकांच्या खोड्या काढत मधली सुट्टी संपून शाळा परत कधी भरत असे ते समाजायचं ही नाही...

संध्याकाळी साडेचार ला वंदे मातरम झालं किं सगळी वानरसेना तुरुंगातून सुटलेल्या कैद्यानप्रमाणे धावत शाळेबाहेर निघायची... रानवाटा तुडवत अक्षरशः धावत आणि शर्यती लावत आम्ही घरी पोहोचायचो... दुपारचं काही शिल्लक असेल ते जेवण जेवून मग आम्ही सोना गडी रानातून गुरं आणायची वाट बघत असायचो...

सहा वाजेपर्यंत सोन्या यायचा... मग गाईचं दूध काढून गुरांना खाणं घालून तो अंघोळ करायचा. त्यावेळी आमचा वाडा (गोठा ) गायी गुरांनी भरलेला असायचा. मला आठवत त्याप्रमाणे तेव्हा आमच्याकडे 22 गुरं होती... तर आमचं सगळं लक्ष सोन्या अंघोळ करुन कधी येतोय त्याकडे लागलेलं असायचं...कारण होतं पिरसा!

पिरसा म्हणजे तीन बांबू दोन बाजूला दुसऱ्या एका लाकडाने जोडून अधांतरी लटकवले जातं. वरती आढ्याला हे दोरीने बांधत आणि खाली लाकडे पेटवून जाळ करत. या बांबूवर गुराख्याची घोंगडी वाळत घातली जातं असे. पण प्रत्यक्षात त्या पिरश्याचे अनेक किस्से स्मरणात आहेत. भातशेती साठी जे नांगरी म्हणजे गडी असायचे त्यांच्याही घोंगड्या पीरश्यावर वाळत असत...

सोन्याने पिरसा पेटवून घोंगडी वाळत घातली किं आम्ही मुलं लगेच तिकडे जमत असू, मग सोन्या काजू किंवा फणसाच्या वाळवलेल्या आठला भाजायला घेई. आणि हे करताना त्याच्या गोष्टी सुरू होत. आज रानात कायकाय झालं? कुणाची गाय रानात व्यायली? कुणाच्या बैलांची झुंज लागली? कुणाची गुरं कुणाच्या शेतात घुसली? हे सगळं त्याच्या शैलीत तो सांगत असे. तोपर्यंत काजू भाजून होत आणि आम्ही त्या मटकावत असू...

मग आठ साडेआठ ला आजी किंवा बाबा जेवायला बोलवत ... जेवण झालं किं परत आम्ही पिरश्या जवळ. पाऊस इतका प्रचंड असे किं थंडीपासून बचावासाठी पिरश्या जवळ बसावंच लागे. मग सोन्याच्या अफलातून भूतकथा सुरू होत... निलमा आणि शिलमा, पिटुंगली च्या भुताच्या गोष्टी... एकदा तो रात्री उशिरा नाणीज वरून येत असताना चकव्याने त्याला कसा गुंगवला? एकदा पलीकडे डोंगरावर आग लागलेली रात्री दिसली पण दुसऱ्या दिवशी जाऊन बघतो तर काहीच नाही, मग समजले ति वेताळाची पालखी निघाली होती... तो त्याला भुतावळ म्हणे... अशा अनेक गोष्टी ऐकत ऐकत आमचा तिथेच डोळा लागायचा... मग बाबा रात्री उचलून आम्हाला अंथरुणात आणून झोपवायचे....

गेली कित्येक वर्ष घरात पिरसा नाही... कारण सोन्या गेला त्याला आता तीस वर्ष झाली... गुरं ही कालमांनाप्रमाणे कमिकमी होत गेली. आता तर शेतीही नाही...

आज सहज आठवण आली... म्हणून हा लेखनप्रपंच...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुसुमाग्रजांची स्मृती नावाची कविता खास आपल्यासाठी

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरती तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातील मंद दिव्याची वात!

वाऱ्यावर येथील रातराणी ही धुंद
टाकता उसासे, चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
त्या परसा मधला एकच तो निशिगंध!

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट !

बेहोष चढे जलशांना येथील रंग
रुणझुणता नृपुर जीव बने नि:संग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तू आर्त मला जो ऐकविलास अभंग !

लावण्यवतींचा लालस येथ निवास
मदिरेत मानकापरी तरारे फेस ्
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
ते उदास डोळे, त्यातील करूण विलास !