माझा नेहमीचा दिनक्रम चालू होता कंपनी मध्ये जाणे, कामाचा आढावा घेणे, संबंधित अधिकार्यांना योग्य त्या सूचना देणे. कामाचा आराखड्यासंदर्भात त्यांचाची चर्चा करणे हे चालूच होतं. नंतर गेस्टहाउस यायचो तेवढ्यात बोमान आलेलाच असायचा तो सगळं घर वगेरे आवरून चहा पाण्याचं बघायचा. थोडा वेळ आराम करून मग मी माझा रोजचा कामाचा अहवाल लिहायला घ्यायचो. त्यात रात्र व्हायची मग नंतर रात्री जेवण करायला खानावळी मध्ये जायचं.
दिवस नेहमीसारखे चाललेले होते पण मला आता परतीचे वेध लागलेले होते कारण इथली आफ्रिकन जेवणाने आणि राहणीमानाने मी खरंच कंटाळलो होतो. आता मायभूमीची ओढ लागलेली होती. आपल्या लोकांची आठवण येऊ लागली होती. पण मला कुठे माहित होतं कि हि आफ्रिकन भूमी मला एवढ्या सहजासहजी सोडणार न्हवती.
त्यादिवशी अॅलन अचानक माझाकडे संध्याकाळी जेवणाच्या वेळेच्या आधी आला, तेव्हा मी अहवाल लिहित बसलो होतो.
“ अरे आलास तू ..ये ये बैस “ जवळच्या खुर्चीकडे निर्देश करत मी त्याला म्हणालो आणि परत अहवालातील वहीत डोकं खुपसू लागलो.
“ बसायचं वगेरे सोड बाबा, आज जरा लवकर जेवायला जाऊयात का आपण? दारामध्येच उभं राहून अॅलन ने मला विचारलं.
“ का रे बाबा .. आज लवकर आज काही विशेष आहे का ? मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो.
“ तसं काही विशेष नाही, आज जरा मला माझा घरमालकाकडे थांबायचं आहे म्हणून म्हटलं कि लवकर जेऊन गेलो असतो. अर्थात तुझं काम लवकर होणार असेल तरच ..” अॅलन म्हणाला.
“ अरे हे की झालंच माझं काम “ असं म्हणून मी लगबगीने उठलो आणि तयार होऊन अॅलन सोबत खानावळीवर नेहमीपेक्षा लवकर गेलो.
आम्ही जरा लवकर गेलो असल्याने जेवण अजून बनत होते. त्यामुळे खानावळवाल्याने आम्हाला थोडा वेळ वाट पाहण्यास सांगितले.
अचानक माझा लक्षात आलं कि अॅलन मगाशी म्हणत होता कि तो घरमालकाकडे आज थांबणार आहे म्हणून, मग मी लगेचच त्याला त्याबद्दल विचारलं.
त्यावर “ काही नाही रे घरमालकाची मुलगी आजारी आहे काही दिवस झाले, असं तो जरास त्रासिक सुरात म्हणला.
“ ओह्ह अच्छा मग डॉक्टर कडे न्यायचं आहे का तिला” मी त्याला विचारलं.
“ नाही रे आता बरी आहे ती ....असं म्हणून तो एकदम शांत झाला, आणि शून्यात पाहू लागला”
मला काहीच कळेना मधेच तो एकदम का गप्प बसला असं वाटलं कि तो काहीतरी लपवतोय माझापासून किंवा मला काही सांगायला कचरत आहे. मी पण जास्त त्याला काही विचारलं नाही आणि शांत बसलो.
मला शांत बसलेला पाहून तो स्वतःच मला म्हणाला “त्या घरमालकाच्या मुलीला काही दिवस झाले खूप ताप येत होता. तापामध्ये तिची शुद्ध पण हरपली होती. त्यामुळे घरातल्या लोकांनी चर्चा विमर्श करून त्या मुलीला एका मांत्रिकाकडे नेण्याचं ठरवलं होतं. कारण त्यांचा म्हणण्याप्रमाणे तिला काहीतरी बाहेरची बाधा झालेली होती. काही दिवसांपूर्वी ती मुलगी शेळ्या चरायला म्हणून एके ठिकाणी चुकून गेली होती जी जागा इथली स्थानिक लोकं निषिद्ध मानतात.
" असं मग पुढे " मी कान टवकारूनच म्हणालो.
" मग काय कोंबडे बकरे आणि इत्यादींचा रतीब सुरु झाला" मांत्रिक ठराविक वस्तूची मागणी करू लागला कि हि लोकं त्याला ती वस्तू आणून द्यायचे.” अॅलन उत्तरला.
" पण मला खरच एक विचारायचं कि खरंच अशा विकृत पद्धती चा अवलंब केल्याने त्या मुलीला बरे वाटेल काय?" मी काहीश्या कुत्णासितपणे म्हणालो.
माझा या सध्या भोळ्या प्रश्नावर अॅलन गालातल्या गालात हसत होता. मग त्यावर तो म्हणाला " अरे मित्र हीच तर गम्मत आहे इथली"
गम्मत ? कसली गम्मत? मी जरा गोंधळूनच मी विचारलं.
मला तर काहीच समजेना कि यात कसली गम्मत आली आहे, ताप आला तर एखाद्या वैद्य किवा डॉक्टर कडे दाखवावं असा आपला साधारण समज आहे. त्याऐवजी मांत्रिकाकडे नेणारा तो त्या मुलीचा बाप मला तद्दन मूर्ख वाटला किंवा भोळसट म्हणा. आणि त्यात गम्मत आहे असा मला सांगणाऱ्या
माझा या परदेशी मित्राला काय बोलावे हेच कळेना.
माझा चेहऱ्यावरचे काहीच न समजल्यासारखे भाव किंवा बावळट भाव म्हणा, पाहून तो मला म्हणाला " मित्रा हीच तर इथली परंपरा आहे, ते काय करतात किंवा काय करत नाही हे फक्त आपण पहायचा असत. त्याबद्दल काही तर्कवितर्क लढवायचे नाहीत, कारण हि लोकं अशी का आहेत हे आपल्याला माहित नाही, या मागे काही कारण असू शकतात. आणि म्हणूनच नक्की काय प्रकार आहे हे पाहण्याकरिता मी काल माझा मालकासोबत त्या मांत्रिकाकडे गेलो होतो.
" ओह्ह असं " मी आश्चर्य वजा कुतुहलाचे भाव चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करत म्हणालो.
काल रात्री एका कोंबड्याचा खुराक घेऊन मी आणि माझा मालक त्या मांत्रिकाकडे गेलो होतो.
असं म्हणून अॅलनने सांगायला सुरुवात केली -
रात्रीच्या वेळी मी मालकाकडे सिगार पेटवण्यासाठी लायटर लायटर हवा असल्याने तो मागण्यासाठी गेलो असता मला असं दिसलं कि मालकाच्या मुलीची तब्बेत खूपच ढासळलेली होती तिला उभं सुद्धा राहवत न्हवता, आणि मालक तिला आपल्या खांद्यावर घेऊन कुठेतरी जाण्याचा तयारीत होता. अचानक आलेलं मी पाहून तसं तो जरा चपापलाच पण तरी त्याने " बोला ना काय हवंय" अशी विचारणा केली.
मी सांगितलं कि मला लायटर हवा आहे तसं त्याने लगबगीने आत जाऊन मला लायटर आणून दिला, अॅलन असा आगंतुकासारखा आलेला पाहून खरंतर घर मालकाला जास्त आनंद झालेला न्हवता. पण तो अॅलन ला असं हुसकावून लावू शकत न्हवता. आणी तसंही अॅलन घर मालकाला देत असलेल्या त्याचा रूम चं भरघोस भाडं पाहून तो जेमतेम उत्पंन असलेला घरमालक त्याला काही म्हणून शकला नाही.
अॅलन जाण्याची तो वाट पाहत होता, अॅलन ने पण ते ओळखलं, आणि त्याला म्हणाला कि " चला मी पण येतो तुमच्यासोबत."
" न.. ना..नाही तुम्ही कशाला तसदी घेताय.." असा ओढेवेढे घेत घरमालक म्हणला.
" त्यात तसदी कसली, झालं तर तुम्हाला मदतच होईल माझी. अशा अवेळी तुम्ही जंगलाच्या दिशेने जाणार म्हटल्यावर माझी सोबत तुम्हाला उपयोगी पडेल " अॅलन म्हणला.
अशा घटना इथे वरचेवर होत असतात त्यात तुम्ही एवढं गांभीर्याने घेऊ नका अस म्हणत तो घरमालक अॅलन ला टाळण्याचा प्रयत्न करत होता. पण अॅलन काही ऐकायला तयार न्हवता. आणि घरमालकाला सोबत करण्यापेक्षा हि मांत्रिक वगेरे भानगड तरी काय आहे हे जाणून घेण्याचीच अॅलन ला जास्त उत्सुकता होती.
त्यामुळे अॅलन च्या आग्रहाने म्हणा किंवा अॅलन देत असलेल्या भाड्याचा नोटांच्या वजनाने तो घरमालक दबला आणि अॅलन ला सोबत घेऊन जायला तयार झाला. पण तिथे गेल्यावर तोंडातून चकार शब्द काढायचा नाही असं घरमालकाने त्याला बजावलं, त्यावर आनंदाने होकार भरत अॅलन घरमालकासोबत जंगलची वाट तुडवू लागला. पुढे घरमालक त्याचा खांद्यावर त्याची आजारी मुलगी, कमरेला अडकवलेलं कोंबड आणि मागे अॅलन असा तो लवाजमा जंगलच्या दिशेने चालू लागला.
एका छोट्या पायवाटेने ते चालत होते, आजूबाजूला वाळलेल गवत आणि किर्रर्र काळोख. गावापासून चालत चालात ते बरंच अंतर कापत ते जंगलाच्या बाजूला आले.
पुढे अॅलन सांगू लागला - आतमध्ये दाट वनराई असलेल्या भागामध्ये आम्ही चालू लागलो, अंधार खूपच होता म्हणून मी छोटीशी मशाल पेटवली तेवढ्या उजेडात चालू लागलो. आजूबाजूला झाडांची गर्दी खूप होती त्यात काही मोठमोठे वृक्ष पण होते, रातकिड्यांचा आवाज वाढत होता. मधेच कोल्ह्याची कोल्हेकुई ऐकू यायची, माझी उत्सुकता त्यामुळे अजूनच वाढत होती. इथल्या लोकांना असले वातावरण सरावाचे असल्यामुळे त्यांना या काळोखाचे आणि प्राण्यांचे फारसे भय असे न्हवते. मशाल सुद्धा लावू नका असा घरमालक म्हणत होता कारण रस्ता त्याच्या पायाखालचा होता. पण आता पायाखालचे सुद्धा दिसेना म्हणून मग मी जवळ असलेल्या लायटरने एक लाकूड घेऊन मशाल पेटवली. घरमालकाची मुलगी निपचित खांद्यावर पडून होती, घरमालकाच्या कमरेला अडकवलेलं कोंबड मधूनच घूर्र घूर्र असा आवाज करायचं.
दाट वनराईच्या भागात जंगली श्वापाद असण्याची दाट शक्यता होती तरीसुद्धा आमचा धाडसी घरमालक एखाद्या सराईत वाटाड्या सारखा तरातरा चालत होता. गरज पडलीच तर ऐन वेळी काहीतरी हत्यार सोबत असावे म्हणून मी पूर्वी सैन्य दलात वापरत असलेला चाकू बुटामध्ये छुप्या पद्धतीने ठेवत असतो तो आतादेखील माझा बुटामध्ये होता. रात्रीच्या गडद अंधाराचा मागोवा घेत आणि कानावर पडणाऱ्या अनेक प्राण्यांच्या चित्र विचित्र आरोळ्या ऐकत काही वेळातच आम्ही जंगलाच्या अशा एका भागात पोहोचले जिथे बऱ्याच शिळा आजूबाजूला पडलेल्या होत्या. काही काही तर ३-४ पुरुष उंच अशा होत्या. जणू काही शिळांचा घोळकाच जमलेला असावा. अशाच ४-५ मोठय शिळांच्या मध्यभागी दोन चार लाडकं जाळून विस्तव केलेला होता. आणि त्या धगधगत्या विस्तावासमोर एक माणूस मांडी घालून आणि डोळे मिटून बसलेला होता अंग झाकण्यासाठी जेवढं कापड लागतं तेवढाच त्याने घातलेला होता. आणि दोन्ही दंडावर हत्तीच्या दातांचे ताईत बांधलेले होते. डोक्याभोवती दोरीसारखा काहीतरी गुंडाळलेला होतं. अगदीच रापलेला चेहरा आणि कृश शरीरयष्टी असलेला हा मनुष्य एक मांत्रिक होता, एका लाडकाच्या सरळसोट ओंडक्याप्रमाणे तो दिसत होता. हा नक्की काही जेवण करतो कि नाही अशी शंका त्याची शरीरयष्टी पाहून माझा मनाला चाटून गेली.
मला बाजूलाच उभा राहायला सांगून, किंबहुना गप्प राहायला सांगून घरमालक त्या दगडी शिळेच्या मध्ये शेकोटीजवळ गेला, खांद्यावरचा मुलीला खाली जमिनीवर झोपवलं, कमरेच कोंबड मांत्रिकाच्या पुढ्यात ठेवून, आफ्रिकन भाषेत काहीतरी बडबडत शरणागती पत्करल्यासारखे हातवारे करत घरमालक त्या मांत्रिकाला काहीतरी बोलला.
त्या मांत्रिकाने सावकाश डोळे उघडले आणि पुढ्यात टाकलेल्या कोंबड्याकडे पाहिलं. मग बाजूला बसलेल्या घरमालकाकडे पाहून त्याने काहीतरी गूढ विचारत असल्याप्रमाणे आफ्रिकन मध्ये काहीतरी विचारलं जे काही मला कळल नाही, त्यावर घरमालकाने खाली मान घालून उत्तरं दिलं. आपली करारी नजर घरमालकावर रोखून काहीतरी तो बोलला जे घरमालकाने खाली मान घालून ऐकल. इतक्यात त्या नजर बाजूला उभा असलेल्या माझावर वळली. आणि तीक्ष्ण नजरेने माझाकडे पाहून आफ्रिकन मध्ये काहीतरी बोलला.
घरमालक माझाकडे वळून परत त्या मांत्रिकाकडे पाहून काहीतरी कुजबुजला, त्यावर तो मांत्रिक अधिकच चवताळला आणि घरमालकाला जोरजोरात काहीतरी बोलू लागला, एकंदरीतच माझे घरमालकासोबत येणे त्या मांत्रिकाला पसंत पडलेले न्हवते. त्या मांत्रिकाचा तो रागीट चेहरा खूपच भेसूर दिसत होता. घरमालक काकुळतीला येऊन त्या मांत्रिकाला समजावत होता अखेरीस काही वेळाने तो मांत्रिक शांत झाला, त्याची समजूत घालून घरमालक माझाशेजारी येऊन उभा राहिला.
तो मांत्रिक एवढा का चवताळला असं मी घरमालकाला विचारलं असता बोटानेच चुप्प बसण्याची खुण करून घरमालक समोर पाहत राहिला. तो मांत्रिक घरमालकाच्या मुलीजवळ गेला. ती मुलगी निपचित पडलेली होती. बाजूला पडलेली घरमालकाने आणलेली कोंबडी त्या मांत्रिकाने घेतली आणि जवळ असणाऱ्या धारदार सुऱ्याने तिचे डोके उडवले. रक्ताच्या काही चिळकांड्या त्या मांत्रिकाच्या चेहऱ्यावर उडाल्या. अगदी निर्विकारपणे जणू काही हे रोजचेच काम आहे असं त्या मांत्रिकाचे वर्तन होतं. डोळे मिटून मांत्रिकाने आकाशाकडे पाहिलं जणू काही मंत्र म्हणत असावा, कोंबडीच्या रक्ताने त्याचे हात भरलेले होते त्याच हाताच्या एका बोटाने त्याने त्या मुलीच्या शरीराभोवती जमिनीवर एक गोल रिंगण तयार केलं. आणि खाली गुडघ्यांवर बसून अगम्य भाषेत हातवारे करत तो काहीतरी बडबडू लागला. काही वेळाने शांत झाला आणि नंतर घरमालकाकडे पाहून काहीतरी म्हणाला.
तसा घरमालक मला सोबत घेऊन त्या जागेपासूनच काहीअंतरावर असणाऱ्या एका मोठ्या शिळेच्या बाजुला घेऊन गेला. आम्ही त्या शिळेच्या बाजूला आलो तिथून आम्हाला मांत्रिक आणि ती मुलगी दिसत होती. तिथे आल्यावर मी घरमालकाला विचारलं
“ काय झालं, काय म्हणाला तो मांत्रिक” अॅलन ने उत्सुकतेने विचारलं
“ बाजूला जाऊन थांबा "ते" येण्याची वेळ झालीय “ घरमालक उत्तरला.
“ ते.. कोण 'ते' “अॅलन ने अजूनच उत्सुकतेने विचारलं.
माझा प्रश्नावर घरमालकाने मोठा उसासा घेतला आणि म्हणाला “ तुम्ही येथे आलेलं त्याला मुळीच आवडलेलं नाही म्हणूनच तो मला रागवत होता. परदेशी लोकं आपल्या प्रथा परंपरांवर विश्वास ठेवत नाहीत उलट त्यात बिब्बा घालतात असं त्याचं म्हणणं होत.
“ पण तुम्हाला कबुल केलं त्याप्रमाणे मी तर शांतच होतो,” अॅलन म्हणला.
“ मी पण त्याला तेच सांगितलं कि हा माणूस माझा विश्वासातला आहे. हा आपल्या कामात काही अडथळा आणणार नाही. मग त्यावर कसाबसा तो शांत झाला” घरमालक समोर पाहत बोलला.
“ ओह्ह असं झालं तर... बऱ आपण इथे लांब का उभे आहोत आणि कोण येण्याची वेळ झालीय असं मांत्रिक म्हणतोय” अॅलन संशयाने समोर पाहत म्हणाला.
अॅलन च्या प्रश्नाने खरंतर घरमालक त्रासला होता पण तरीही तो अॅलन कडे पाहत म्हणाला. “ हे बघा महाशय मी जे सांगेल ते नीट ऐका थोड्याच वेळात या मांत्रिकाचा विधी पूर्ण होईल, त्यानंतर मांत्रिक ज्याची उपासना करतात "ते" येतील. आणि ते माझा मुलीला बरं करतील. त्यामुळे आपण शांतपणे काहीही आवाज न करता इथे या शिळेमागे उभे राहायला त्या मांत्रिकाने सांगितलंय. थोडीजरी आगळीक आपल्याकडून झाली तर आपण सगळे त्या मांत्रिकासकट जीवानिशी जाऊ ”
घरमालक असं म्हणताच मला परिस्थितीच गांभीर्य लक्षात आलं, माझा मनाला उगाचच शंका चाटून गेली. आणि जे कोणी येणार असेल ते कसं असेल याबाबत माझी भीती मिश्रित उत्सुकता अगदीच शिगेला जाऊन पोहोचली. समोर मांत्रिक काहीतरी बडबड करत होता. रातकिड्यांचा आवाज पण वाढला होता हि अंधारी रात्र काळरात्र ठरेल कि काय अशी शंका माझा मनाला चाटून गेली. क्षणभर हृदयाची धडधड वाढली, बुटामध्ये असलेला चाकू पायानेच हालचाल करून जागेवर असल्याची खात्री करून घेतली, पण परत वाटलं जर खरंच जे येणार असेल ते अमानवीय किंवा अनैसर्गिक असे काहीतरी असेल तर आपला चाकू काय कप्पाळ कामाला येणार आहे. कारण अशा प्रकारांना भौतिक शस्त्र अस्त्रांनी इजा करता येऊ शकेल कि नाही असं उगाचच वाटून गेलं.
अचानक मांत्रिक त्याची बडबड थांबवून समोर अंधारात जंगलाच्या दिशेने पाहू लागला आणि कानोसा घेऊ लागला. मांत्रिकाची बडबड कि मंत्र जे काही असेल ते थांबल्याने मी आणि घरमालक सतर्क झालो. मांत्रिकाने आमच्याकडे मान वळवली आणि घरमालकाकडे पाहून 'शिळे मागे जा' अशा अर्थाची खुण केली.
आणि तसं माझा घरमालक “ते” येत आहेत असं मला धीरगंभीर आवाजात म्हणाला आणि जवळजवळ मला ओढतच जरा लांब असणाऱ्या एक शिळे मागे घेऊन गेला.
क्रमश:
बाप रे! काय पण जबर वातावरण
बाप रे! काय पण जबर वातावरण निर्मिती, पुढील भागाची उत्कंठा अजूनच वाढली राव
पटापट येऊ द्या पुढचे भाग...
पटापट येऊ द्या पुढचे भाग... अब इंतझार नही किया जारा ..
छान लिहिताय. उत्कंठा वाढली.
छान लिहिताय. उत्कंठा वाढली.
खतरनाक...
खतरनाक...
जबरदस्त
जबरदस्त
Jabaraa!
Jabaraa!
उत्कंठा शिगेला पोचलेली आहे.
उत्कंठा शिगेला पोचलेली आहे.
एकदम भारी कथा...
एकदम भारी कथा...