काश्मीर डायरीज - ६ ( अंतिम )

Submitted by स्मिता श्रीपाद on 26 July, 2022 - 07:31

आधीचा भागः
काश्मीर डायरीज - ५ - https://www.maayboli.com/node/81969

२० मे २०२२
काश्मीर मध्ये आल्यापासून आज पहिल्यांदाच उशीरा म्हणजे 8 वाजता जाग आली. कालचा गुलमर्ग चा हँगओव्हर अजूनही गेला नव्हता. शरीर थकलं होतं.आजचा आमचा दिवस ऑप्शनल होता, दुधपथरी किंवा सोनमर्ग.चाय पे चर्चा करून आम्ही सर्वांनीच या दोन्ही वर काट मारली.दोन्हीकडे जाण्यासाठी कमीत कमी १.५-२ तास प्रवास म्हणजे जाऊन येऊन ४ तास प्रवास करावा लागणार होता आणि अजून आम्हाला शंकराचार्य मंदिर, लाल चौक भेट आणि खरेदी अशा गोष्टी करायच्या होत्या.
ही ट्रिप ठरवतानाच असे मनातून ठरवले होते की जास्त दगदग करून प्रत्येक गोष्ट बघायचा अट्टाहास करायचा नाही.जिथे आहोत ते ठिकाण एन्जॉय करायचे.पहाटे 5 - 5.30 ला उठवून, ट्रिप मधले प्रत्येक ठिकाण टिक मार्क करत दाखवणाऱ्या ट्रॅव्हल कंपन्यांची आणि आमची कुंडली कधी जुळू शकेल असे आम्हाला वाटत नाही.त्यामुळे आम्ही अशा customized टूर चा पर्याय निवडला होता.पटापट आवरून शंकराचार्य मंदिरात जायला निघालो.शंकराचार्य मंदिर एका टेकडी वर आहे त्याला शंकराचार्य टेकडी म्हणतात. अर्धी टेकडी चढून गेलो तर ट्राफिक जाम सुरू.

यंदा आम्ही काश्मीर ट्रिप बुक केल्यापासून अचानक सगळे ओळखीपाळखी चे लोक, नातेवाईक, मित्र मैत्रिणी या सगळ्यांच्या स्टेटस वर काश्मीर चेच फोटो दिसायला लागले होते. सगळेच अचानक काश्मीर ला जात होते.वर्तमानपत्रात काश्मीर मधील रेकॉर्ड ब्रेक गर्दी वगैरे बातम्या येऊ लागल्या. हे सगळं सगळं खरंच होतं कारण काश्मीर मध्ये कुठेही जा, लांबलचक लाईन आणि गर्दी असायचीच. आणि सगळ्यात गम्मत म्हणजे आम्हाला पहलगाम आणि गुलमर्ग च्या ऐन बर्फ़ात अगदी पुण्यातले ओळखीचे लोक सुद्धा भेटले. ( सारसबागेत सुद्धा ओळखीचे लोक भेटत नाहीत कधी पण काश्मीर ला भेटले ) फारच विषयांतर झालं असो.

तर शंकराचार्य टेकडी वर पोचायला ट्राफिक जाम मुळे खुप वेळ गेला. मंदिराच्या पायथ्याशी चेकिंग वगैरे झाल्यावर पायऱ्या चढायला सुरू केले. सुमारे 200-250 पायऱ्या चढून वर पोचलो. सुंदर असं दगडात बांधलेलं हे शिवमंदिर आहे.हे मंदिर सम्राट अशोकाच्या मुलाने बांधले असे मानले जाते.मंदिरात अत्यंत सुंदर असे चमकदार काळ्या पाषाणातले सुमारे 4 फूट उंचीचे भव्य शिवलिंग आहे.
284377217_10159174690989355_8864900706022168227_n.jpg
मंदिराच्या आवारातून संपूर्ण श्रीनगराचे अप्रतिम दृश्य दिसते.विस्तीर्ण पसरलेला दल लेक, शिकारे, हाऊसबोटी, सुंदर रंगीत घरे, शहरात फिरून वाहणारी झेलम नदी,हिरवेगार डोंगर असे अप्रतिम दृश्य वरून दिसते.
284494968_10159174690329355_7159797417065787277_n.jpg
खूबसुरत कश्मिर
284515859_10159174690564355_1730472460555212621_n.jpg
मंदिराचे आवारात चिनार ची सुंदर झाडे आहेत. संपूर्ण परिसर प्लॅस्टिकमुक्त ठेवला आहे. खाली चेक पॉईंट पाशी सर्वांच्या सामानाची कसून तपासणी होते आणि प्लॅस्टिक वस्तू तिथेच ठेवून यावे लागते.
आद्य शंकराचार्य हिंदू धर्माच्या प्रचारासाठी पूर्ण भारतभर पायी फिरले होते. तेव्हा फिरत फिरत काश्मीर ला पोचले होते. या ठिकाणी त्यांनी तप केला होता असे मानले जाते. जिथे त्यांनी तप केला ती दगडात कोरलेली गुहा सुद्धा आहे. या मंदिराच्या परिसरातून जाऊच नये असे वाटत होते.आमच्या कडे भरपुर वेळ होता त्यामुळे आम्ही तिथे बराच वेळ रेंगाळलो. संपूर्ण श्रीनगर पुन्हा पुन्हा डोळ्यात आणि कॅमेरा मध्ये साठवून ठेवले.
बघता बघता हवा बदलली. आणि पावसाचं चिन्हं दिसायला लागलं.
283160880_10159174690784355_4607335182966919468_n_0.jpg
मग मंदिराच्या पायऱ्या उतरायला सुरू केले. तोवर छान भुरभुर पाऊस सुरू झालाच होता. खूप भूक लागली होती.
"आज मी रोटी भाजी किंवा कुठलाच भारतीय पदार्थ खाणार नाही" असे मधुजा ने आधीच जाहीर केले होते.
त्यामुळे दल रोड वरती एक इटालियन पदार्थ मिळणाऱ्या हॉटेल मध्ये गेलो. गरमागरम सूप, पास्ता ,पिझ्झा खाऊन सर्वांनी पोट शांत केले.
आणि आता मोर्चा वळवला लाल चौकाकडे.
लाल चौक, श्रीनगर.
284523013_10159174815019355_8469814707287595275_n.jpg
अनेक कारणांनी वर्तमानपत्रात सतत चर्चेत असणारी जागा.याला ऐतिहासिक महत्त्व आहे त्यामुळे इथे नक्की भेट द्यायलाच हवी होती.
आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे खरेदी.खरेतर पहिल्या दिवसापासुन खरेदी चालुच होती पण तरी खरेदी साठी खास वेळ राखुन ठेवला होता आजचा Wink लाल चौक आणि इथल्या सगळ्या गल्ल्या काश्मिरी वस्तूंनी ओसंडून वाहतात. 100 रुपयांच्या कलाकुसर केलेल्या पर्स पासून अगदी एक लाख रुपयांच्या अस्सल पष्मीना शालीपर्यंत इथे अनेक वस्तू मिळतात.अगदी विकतच घ्यायला पाहिजे असे काही नाही पण लाखो रुपयाच्या शाली, गालिचे बघणे म्हणजे सुद्धा मेजवानीच की.पर्स, नाजूक धाग्याने कशिदाकाम केलेले ड्रेस मटेरियल, साड्या, पडदे, बेडशीट, अभ्रे, पाईन आणि अक्रोड लाकडाच्या वस्तू, सुकामेवा, केसर,स्वेटर, टोप्या, शाली अशा अनेक वस्तू इथे मिळतात. सुमारे 2 तास तिथे मनसोक्त फिरलो. शेवटी पायाने असहकार पुकारला तेव्हा हॉटेल चा रस्ता धरला.
आज श्रीनगर मधली शेवटची संध्याकाळ. उद्या सकाळी परत निघायचे होते. रुम वर जाऊन थोडा आराम केला. आता पाऊस अगदी धो धो जोरातच सुरू झाला होता.संध्याकाळी हॉटेल च्या आसपास चक्कर मारली. आमच्या हॉटेल जवळ एक संपूर्ण लाकडात बांधलेला सुरेख पूल होता.
श्रीनगर चा "लकडी" पूल
284649531_10159174691429355_5158372220657514349_n.jpg
तिकडे जाऊन आलो. हा फक्त पादचारी पूल होता, त्यावर सुरेख गझिबो आणि छानपैकी लायटिंग केलेले होते. नदीवरून गार वारा वाहत होता. सुरेख ट्रिप ची सुंदर सांगता होत होती.
284664842_10159174691529355_5154179093773420121_n.jpg
हॉटेल वर परत येऊन सामानाची बांधाबांध केली.आणि झोपेच्या स्वाधीन झालो.

२१ मे २०२२
आमचे परतीचे विमान 11 वाजता होते पण श्रीनगर विमानतळावर आर्मी तर्फे कडेकोट चेकिंग असते त्यामुळे सकाळी 7.30 लाच हॉटेल सोडले. वाटेत एका अस्सल पंजाबी धाब्या वर अस्सल पंजाबी नाश्ता आणि चहा मिळाला. विमानतळावर वेळेत पोचलो. सर्व चेकिंग च्या चक्रातून जाऊन ९.३० वाजता बोर्डिंग गेट पाशी पोचलो होतो. बरोबर 11 वाजता विमान आकाशात झेपावले. श्रीनगर शहराला मनातल्या मनात "येतो रे" असे म्हणत टाटा केले.
खरंतर ही डायरी कालच संपली असती. पण तरी काश्मीर बद्दल मला जाणवलेल्या आणि आधीच्या कोणत्याही लेखात उल्लेख न केलेल्या काही सुटलेल्या गोष्टी लिहून ठेवाव्यात असे वाटले म्हणून हे अजून एक पान.

श्रीनगर विमानतळावर उतरलो की एकदम वेगळी जाणवणारी गोष्ट म्हणजे सर्व ठिकाणी दिसणारे इंडियन आर्मी आणि CRPF चे सज्ज जवान.
डोळ्यात तेल घालून प्राणपणाने सर्व ठिकाणी लक्ष द्यायला ते सज्ज आहेत. विमानतळावर आणि विमानतळाच्या बाहेर पडलो की दर 10-15 फुटावर बंदूकधारी जवान दिसतोच.आणि फक्त चित्रपटात दिसणारे सिमेंट ची पोती लावुन तयार केलेले बंकर्स पण दिसतात. जणु काही आता लगेच युद्ध सुरुच होणार आहे. सतत पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस गाड्यांचे आवाज येत जात असतात.सुरवातीला जरा दचकायला होतं पण नंतर सवय होते आणि मग काही वेळाने त्यांच्यामुळे सुरक्षित वाटायला लागतं. रस्त्याच्या कडेला भरगच्च फुललेला गुलाबाचा ताटवा आणि त्याच्या मध्यभागी उभा असलेला बंदूकधारी जवान बघून एक क्षणी खुदकन हसू आणि दुसऱ्या क्षणी त्यातला विरोधाभास जाणवतो.
लहान लहान मुलांच्या शाळेबाहेर आणि शाळेच्या आत सुद्धा जवानांची फौज राखण करत असलेली बघुन नक्की काय भावना मनात आहेत ते कळतच नाही. बाग असुदेत की मंदिर सर्व ठिकाणी आर्मी आणि CRPF सज्ज आहे.लाल चौकात तर चाहुबाजुने जवान आणि बंकर्स आहेत.आपण निवांत फिरतोय आणि ते जवान अक्षरशः चहुबाजुला सावधपणे बघत बंदुक रोखुन उभे असतात.
काश्मीर इतकं इतकं सुंदर आहे, त्यामुळेच की काय, आपल्या सर्वात देखण्या लेकीचं वाईट लोकांपासून डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या बापाची भूमिका भारतीय सेना पार पाडते आहे कदाचित.
एरव्ही वर्तमानपत्रात येणारे राजौरी, पुलावामा, उरी अशा गावांच्या नावांचे बोर्ड रस्त्यात दिसतात आणि क्षणभर काळजाचा ठोका चुकतोच.पण हे सगळं असलं तरी तिथल्या लोकांचं वागणं बोलणं अत्यंत नॉर्मल असल्याने पेपर मध्ये येणारं काश्मीर वेगळंच वाटतं आणि प्रत्यक्षात एक सुंदर पर्यंटनस्थळच वाटतं.काश्मिरी लोकांशी अवघड विषयांबाबत बोलायचे आम्ही कटाक्षाने टाळले. मुळातच हे सर्व काश्मिरी लोक पर्यटकांशी अत्यंत प्रेमाने, आदराने, आपुलकीने वागतात.उगीच नको ते विषय काढण्यात आम्हाला पण रस नव्हता.
श्रीनगर बद्दल पेपर मध्ये वाचून जी प्रतिमा मनात होती त्याच्या एकदम वेगळंच श्रीनगर आहे. आपल्या पुण्यासारखच सर्वसाधारण मोठं शहर, सर्व मोठ्या ब्रँड्स ची दुकानं, सगळ्या प्रकारचे कुझिन्स मिळाणारी हॉटेल्स असे सर्व एकदम नॉर्मल शहर. अर्थात ही परिस्थिती राखण्यात आर्मी चा हात असणारच पण त्यावर भाष्य करणे हा या लेखाचा विषय नाही.
श्रीनगर मध्ये NIT, NIFT सारखी टॉप रेटेड कॉलेजेस आहेत.आम्हाला एकदा चक्क नागपूर हुन श्रीनगर NIFT ला शिकायला आलेला एक मुलगा भेटला.महाराष्ट्रातून आणि संपूर्ण देशातून भरपूर विद्यार्थी तिथे येतात असे त्या मुलाने सांगितले.
आम्ही जिथे जिथे फिरत होतो त्या ठिकाणी स्थानिक काश्मिरी कुटुंबे मोठ्या प्रामाणात दिसली.आम्ही ज्या ज्या बागांमध्ये गेलो तिथे अनेक स्थानिक काश्मिरी कुटुंबे फिरायला, पिकनिक ला आलेली होती. ठळक लक्षात येणारी गोष्ट म्हणजे हे लोक सोबत खाण्यापिण्याचे सामान , अगदी छोटी पोर्टेबल गॅस शेगडी आणि चक्क कुकर घेऊन आलेले दिसले. तिथे हिरवळीवर मस्त स्वयंपाक करून जेवणे चालू होती. बेताब व्हॅली मध्ये आणि अरु व्हॅली ला जायच्या रस्त्यावर अशी अनेक कुटुंबे आम्हाला दिसली. स्थानिक काश्मिरी लोक हॉटेल मध्ये फारसे दिसत नव्हते त्यामुळे त्यांना बाहेर जेवायला विशेष आवडत नसावे असे माझे मत झाले Happy
काश्मीरी लोक आपल्या कोकणी लोकांपेक्षा जास्त भात खाऊ आहेत असे जाणवले. श्रीनगर मध्ये मुघल दरबार मध्ये आलेले काही जण नुसताच भात आणि रस्सा ओरपत होते. रोटी वगैरे खाणारे जास्त करून पर्यटकच पाहिले.
सगळे च्या सगळे काश्मिरी एकजात देखणे, लालसर गोरे आणि सरळसोट नाकाचे होते. इतके दिवसात नकट्या नाकाचा एकही काश्मिरी मलातरी दिसला नाही Wink आणि काश्मिरी स्त्रियांच्या सौंदर्याबद्दल तर काय बोलू. सगळ्याजणी इतक्या देखण्या होत्या की बस रे बस.काश्मीर चं सगळं सौंदर्य तिथल्या लोकांत पण उतरलं आहे.
काश्मीर पॅकेज निवडताना आम्ही जेव्हा सगळ्या फेमस ट्रॅव्हल कंपनीज चा अभ्यास केला तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही ग्रुप टूर करू शकणार नाही.त्यांच्या टूर आमच्यासाठी हेक्टिक कॅटेगरी च्या होत्या आणि आमच्या बजेट मध्ये पण नव्हत्या.
मग दुसरा पर्याय होता स्वतः सर्व प्लॅन करणे. पण काश्मीर सारख्या ठिकाणी स्वतःच्या प्लॅनिंग ने जाणे मनाला पटेना. कोणीतरी आपली काळजी घेणारे ,अडीअडचणीला मदत करणारे असणे गरजेचे आहे असे वाटले.
फेसबुक वर श्रीनगर मधील लोकल टूर कंपनी काश्मीर हेवन्स चा पर्याय मिळाला, त्यांचे बरेच चांगले रीव्यु वाचले. त्यांची एक एजंट पुणेकर आहे आणि इथे पुण्यातुन काम बघते.तिच्याशी बोलले तेव्हा ते लोक खूप प्रोफेशनल आहेत हे जाणवले.Kashmir Heavens चे लोक आणि त्यांची टीम श्रीनगर मधीलच असल्याने पूर्ण itinerary बनवताना आम्हाला खूप मदत झाली. आम्ही अचानक केलेले सगळे बदल देखील त्यांनी शांतपणे मान्य केले.
KHAB ट्रॅव्हल्स च्या सर्वच टीम ने आमची अतिशय व्यवस्थित काळजी घेतली.
त्यांचे फेसबुक पेज https://www.facebook.com/khabtravels/

अनेक वर्षांपासून काश्मीर ला जायचे स्वप्न पूर्ण झाले.
अजूनही रात्री डोळे मिटले की पहलगाम ची हिरवीगार कुरणे दिसतात, लीडर नदीचा खळखळाट ऐकू येतो, गुलमर्ग चे शुभ्र बर्फ़ाचे डोंगर दिसतात, कहावा ची आठवण येते. काश्मीर असं एका भेटीत कळणार नाही...तिथे परत परत जावंच लागणार...
अमीर खुसरो म्हणतात तसं...
आगर फिरदौस बार रू-ए-ज़मीन अस्त,
हमीन अस्त-ओ हमीन अस्त-ओ हमीन अस्त।
अगर धरती पर कहीं जन्नत है,
यही है, यही है, यही है
या सगळ्या लेखांच्या निमित्ताने परत एकदा मनाने तोच प्रवास करून आले.
प्रवासवर्णन लिहायचा पहिल्यांदाच प्रयत्न केला तो गोड मानुन घ्यावा.

-समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झाली तुमची सहल आणि वर्णनही मस्तच!

टूर कंपनीपेक्षा अशी आपल्याला सोयीस्कर सहल आखणं बरं पडतं हा आमचा केरळचा अनुभव आहे. पूर्णपणे स्वतः सगळं ठरवणं अवघड असतं, तिथली फारशी माहिती नसताना, आणि टूर कंपन्यांचा भरगच्च कार्यक्रम नको वाटतो, अशा वेळी हा मध्यममार्ग खूप चांगला.

अतिशय सुंदर सिरीज लिहिल्याबद्दल धन्यवाद. काश्मीर डोळ्यांसमोर उभं राहिलं.
आमच्याही ओळखीत, नात्यात अनेक लोक अलीकडे काश्मीरला जाऊन आले. एकेकाळी दहशतवादाचा बालेकिल्ला असलेल्या काश्मीरमध्ये आता पर्यटकांच्या रांगा लागत आहेत हे खूपच भारी आहे. MHTMH!

मस्तच झाली की तुमची काश्मीर वारी !! शेवटचे जोडलेले पान आवडले . वाचून असे वाटले की आर्मी चे आभार मानू तेवढे थोडेच आहेत. आमच्याकडे पण टूर कंपनीने जाणे फारसे आवडत नाही , पण काश्मीर साठी आम्ही सुरक्षितता या एकाच गोष्टीसाठी टूर कंपनी चा विचार केला होता . पण तुमचे वाचल्यावर असे वाटते आहे की आपल्यालाही जमेल असे जाणे ! इतके विस्तृत प्रवास वर्णन लिहिल्याबद्दल खरंच धन्यवाद !!

छान झाली मालिका. तुमच्या बरोबर आम्ही पण काश्मीर फिरुन आलो Happy

आमच्याकडे पण टूर कंपनीने जाणे फारसे आवडत नाही , पण काश्मीर साठी आम्ही सुरक्षितता या एकाच गोष्टीसाठी टूर कंपनी चा विचार केला होता . पण तुमचे वाचल्यावर असे वाटते आहे की आपल्यालाही जमेल असे जाणे ! ">>> सेम

मस्त.. खरे तर पहिलेच प्रवासवर्णन असल्याने लिखाण फ्रेश झाले आहे..
आणि काश्मीर टूरसाठी कित्येकांना उपयुक्तही..

सुपर्ब... खूप आवडली ही मालिका.
Meru, seven years in tibet पाहिल्यापासून माझ्या भटकंतीवेड्या पिल्लांना हिमालय खुणावतोय... जावेच लागेल आता.
सगळेच्या सगळे काश्मिरी एकजात देखणे... >>> इंजिनिअरिंग कॉलेजला बरेच काश्मिरी मित्रमंडळी झाली होती, त्यांचा देखणेपणा वेगळाच. Happy

अप्रतिम प्रवासवर्णन..... आम्ही १९८८ साली गेलो होतो आणि आता पुन्हा जाण्याचा हुऋप आला तुमचे वर्णन वाचून.... सुम्दर