काश्मीर डायरीज - ४

Submitted by स्मिता श्रीपाद on 18 July, 2022 - 03:55

आधीच्या भागाची लिंकः
काश्मीर डायरीज -३ : https://www.maayboli.com/node/81928

18 मे 2022
पहाटे 5.15 च्या दरम्यान अजान च्या आवाजाने जाग आली.लख्ख उजाडलं होतं. थोडा वेळ गादी मध्ये लोळून घालवला पण आता झोप लागेना. लगेच बाहेर डेक वर धाव घेतली.( खरंतर डेक म्हणणं अगदीच अरसिक वाटेल.. सज्जा हा जास्त सुंदर शब्द आहे.. लाकडी कमानी असलेला आणि बसायला गाद्या असलेला असा हा सज्जा होता )
सज्जा
20220519_072556.jpg
राजेशाही हाउसबोट
283995600_10159171505824355_2543849247434212201_n.jpg
दल चं पहाटेच सौंदर्य अजूनच खुललं होतं. काल पर्यटकांचे शिकारे फिरत होते. आज दिसणारे शिकारे वेगळेच होते. भाजी विक्रेते, फुलं विक्रेते, दैनंदिन गरजेच्या वस्तू जसं की पेस्ट, साबण, ब्रश ई विकणारे असे शिकारे फिरत होते. ताजी फुलं घेऊन जाणारा शिकारा अप्रतिम दिसत होता. शाळेत जाणारी मुलं युनिफॉर्म घालून शिकारा मध्ये बसून किनाऱ्यावर जात होती. त्यांच्या आया शिकारा चालवत त्यांना सोडायला निघाल्या होत्या. हे सगळं वेगळच जग होतं.
284127579_10159171502264355_9022912490083822734_n.jpg
फुलांचा शिकारा
283958697_10159171504884355_6514406353203049665_n.jpg
शिकारा मधे बसुन शाळेत...
283985987_10159171504919355_2764082688121347351_n.jpg
काश्मिरी भाषेमध्ये दल म्हणजेच तलाव.त्यामुळे दल लेक म्हणणं खरंतर चुकीचं. पण आता सगळेच जण तेच म्हणतात.
दल म्हणजे 22 square km पसरलेलं एक तरंगत शहर. इथे 1 लाख लोक राहतात.त्यांचे सगळे दैनंदिन व्यवहार शिकाऱ्यामधून चालतात. शाळेत,नोकरीला येणे जाणे, किराणा,भाजीपाला खरेदी सगळं शिकाऱ्यावरून.आम्ही तर एक भांडीकुंडी विकणारा शिकारा पण बघितला. Happy
बोटीच्या सज्जा वरून समोर शंकराचार्य टेकडी आणि मंदिर दिसत होतं. 6.30 नंतर तिथुन पूजा आणि मंत्रोच्चार ऐकू येऊ लागले. सूर्योदयाची सुंदर वेळ आणि ते मंत्र असं एकदम भारलेलं वातावरण होतं ते.
हळू हळू आजूबाजूचे लोक जागे झाले.चहा चे राउंडस झाले आणि फिरते विक्रेते आपल्या पोतड्या घेऊन बोटीवर दाखल होऊ लागले.ही एक बेस्ट सिस्टीम होती. शाल,ड्रेस मटेरियल, स्टोल, इमिटेशन ज्वेलरी, केसर, ड्रायफ्रूटस विकणारे असे सगळे लोक एक एक करून आपल्या हाऊसबोट वर येतात. आपण निवांत मांडी ठोकून बसायचं, त्यांच्या वस्तू बघायच्या, दर जमला, पटला तर ठीक नाहीतर सोडून द्यायचं. फिरते शॉपिंग.आम्ही पण थोडीफार खरेदी करून त्यांना नाराज केले नाही.;-)
आजचा दिवस होता श्रीनगर दर्शन.
आज निवांत उठणे, खरेदी या सगळ्या मुळे बाहेर पडायला उशीर झाला त्यामुळे शंकराचार्य टेकडी 4 नंतर करू असे ठरवून आम्ही आधी आमचा मोर्चा बागांकडे वळवला. आधी पोचलो बोटॅनिकल गार्डन ला.विस्तीर्ण तलाव, त्यात जागोजागी कारंजे, सुंदर राखलेली हिरवळ आणि फुलच फुलं.लहान मुलांच्या शाळेची ट्रिप आलेली बागेत. ती गोरी गोबरी गोंडस मुलं आणि त्यासोबत फ़ुलं अशी डोळ्यांना एकदम मेजवानी बघायला मिळाली.
20220518_114419.jpg284106173_10159171505639355_4415157287202396399_n.jpg
तिथून बाहेर पडून पोचलो "निशांत बाग" ला.दल च्या समोरच्या डोंगरावर वेगवेगळ्या लेव्हल्स वर पसरलेली, प्रचंड मोठी अशी ही बाग.
जिथे नजर जाईल तिथे हिरवळ, मोठे वृक्ष, फुलांचे ताटवे, आणि बागेच्या मध्यातून पाणी खेळवलेले आहे. ही बाग इतकी मोठी आहे की ती पूर्ण फिरून बघायला एक अख्ख्या दिवस जाईल. बागेतून दल चा सुंदर नजारा दिसतो.इथे पण काश्मिरी ड्रेस घालून फोटो काढून देणाऱ्यांची फौज होती. पहलगाम मध्ये ड्रेस न आवडल्याने नवऱ्याने फोटो काढून घेतले नव्हते. इथले पुरुषांचे कपडे जरा वेगळे होते त्यामुळे आमच्या साहेबाना फोटो काढायला उत्साह आला. पटापट कपडे बदलून फोटोग्राफर समोर उभे राहिलो. त्याने अगम्य अशा पोझेस मध्ये दाणादण फोटो काढायला सुरुवात केली.आम्ही आपले पब्लिक बघून जरा लाजत होतो तर हा "आपकी ही बीबी है ना, या दुसरे की लेके आये है" असा टिपिकल डायलॉग टाकून मोकळा.आम्ही आपले 1-2 फोटो काढणार होतो पण हा बाबाजी थांबायला तयारच नव्हता. अखेर त्याचं मन आणि खिसा पुरेपूर भरेल अशी खात्री झाल्यावर तो थांबला. त्या फोटोचा अलबम आमच्या लग्नाच्या अलबम पेक्षा मोठा झालाय.;-);-)
तिथून बाहेर पडून झटपट जेवण केले आणि पुढच्या बागेत गेलो. "चष्मेशाही गार्डन"
एका टेकडीच्या पायथ्याशी असलेली ही अजून एक सुंदर बाग. साधारण निशांत बाग च्या पद्धतीचीच.. भरपूर फुलांचे ताटवे. इथे जरा कमी गर्दी होती.जेवण झाल्यामुळे पोट जड झालं होतं. आणि आता कडक उन्ह पडलं होतं. गेले २-३ दिवसात हिवाळा,पावसाळा आणि आता उन्हाळा असे सगळे सिझन पाहुन झाले होते Happy एका चिनार च्या दाट सावलीत सरळ आडवे झालो. आजूबाजूचा सुंदर नजारा, इकडे तिकडे पळणारी लहान मुले, बागेचे,घरच्यांचे फोटो घेणारे हौशी फोटोग्राफर अशी गंमत बघत १-१.५ तास मस्त वेळ गेला. आता ४ वाजत आले होते.सकाळपासून फिरून फिरून पाय दुखायला लागले होते. अजून काही बागा आणि शंकराचार्य मंदीर पहायचे बाकी होते पण आता कुठेतरी थांबणं गरजेचं होतं. तसही ही ट्रीप आम्ही आमच्या मर्जी प्रमाणे आरामात करायची ठरवली होती. त्यामुळे इनायत भाईंना गाडी सरळ हाऊसबोट कडे घ्यायला सांगितली. बोट वर जाऊन मस्त १-१.५ तास आराम केला.
संध्याकाळी उठुन फ्रेश होउन 7 च्या दरम्यान दल लेक समोर च्या रोड वर एक फेरफटका मारला. हा दल रोड फार मस्त आहे.श्रीनगर मधला सर्वात गर्दीचा असा हा रस्ता असावा कारण आम्ही जे 2 दिवस तिथे होतो तोवर सकाळी 10 ते थेट रात्री 9 पर्यंत इथे कायम ट्रॅफिक जाम असायचे.या रोड वर खुप सारे हॉटेल्स्,काश्मीर स्पेशल शॉपिंग साठी दुकाने आहेत. लांबच्या लांब फुटपाथ आहे. त्या फुटपाथवर कपडे, खेळणी ई विकणारे लोक होते. तिथे अक्रोड आणि पाईन च्या लाकडापासून बनलेल्या वस्तू विकणारे काही विक्रेते होते. त्यांच्याकडे थोडी किरकोळ खरेदी केली.इथे सुद्धा परत एकदा खुप स्वस्त अशा शाली आणि ड्रेस मटेरीअल मिळाले. दुकानातल्या आणि रस्त्यावर मिळणार्‍या सेम क्वालिटीच्या वस्तुंच्या किमतीमधे बराच फरक होता. त्यामुळे परत एकदा मोह झाला आणि अजुन थोडी खरेदी झाली. अंधार पडला की तिथुन पाण्यातल्या सगळ्या ओळीने लागलेल्या हाउसबोटस चे लाईट्स आणि त्याचे पाण्यातले प्रतिबिंब सुन्दर दिसते. लेक वरुन मस्त वारा वाहात असतो. तिथे चक्कर मारायला खुप मजा आली.
284552627_10159176647889355_3271510037282099287_n.jpg
इथे भेळ, पाणीपुरी,मोमो, आईस्कीम असे ठेले होते. अप्रतिम मोमो खायला मिळाले आम्हाला. काश्मीर ची पाणीपुरी खायचं तेवढं धाडस झालं नाही.;-)
आता परत जाऊन जरा लवकर झोपू असे ठरवले इतक्यात आम्हाला एक ओळखीचा बोर्ड दिसला.."सुखो थाई" हे एकदम अनपेक्षित होतं.
आपसूक पावलं आत शिरली. 30 मिनिटांचा मस्त थाई फूट मसाज करून घेतला.आणि अक्षरशः तरंगतच परत आलो.
आणि हो.. अजून एक असेच अचानक सापडलेले ठिकाण म्हणजे दल लेक घाट #9 समोरची एक फ्रेंच बेकरी.आता नाव विसरले मी.तिथे रेड वेलव्हेट, फ्रेश फ्रुट अशा अप्रतिम चवीच्या पेस्ट्री मिळाल्या.परत येऊन गुलजार भाईंनी बनवलेली चवदार काश्मिरी बिर्याणी,रायता आणि वर पेस्ट्री खाऊन आजचा दिवस संपला. उद्याची स्वप्नं बघत अंथरुणात शिरलो..
उद्याचं ठिकाण होतं.. गुलमर्ग.. बर्फ..
ज्यासाठी हा सगळा अट्टाहास केला होता.
-- क्रमशः

पुढचा भागः
काश्मीर डायरीज - ५ - https://www.maayboli.com/node/81969

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.
सुखो थाय वाचुन रेड करी आणि वाफाळता भात खाल्ला असेल असं वाटलं चटकन. अशा वातावरणात रेडकरी मस्त लागेल बहुतेक. Happy

सगळे भाग एकदाच वाचले, मस्तच लिहिले आहे स्मिता Happy . फोटोही सुंदर आहेत. हाऊसबोटचा फोटो अप्रतिम आहे.
पुभाप्र

छान चालूय..
हाउसबोट तर मस्तच..
शेवटची हाऊसबोटींच्या लायटींगची माळ फार आवडली Happy

सर्व प्रतिसादांसाठी धन्यवाद. कामात अडकल्यामुळे पुढचा भाग टाकायला वेळ लागला. आता टाकला आहे Happy

सुखो थाय वाचुन रेड करी आणि वाफाळता भात खाल्ला असेल असं वाटलं चटकन. अशा वातावरणात रेडकरी मस्त लागेल बहुतेक. Happy >> हा हा ... कल्पना छान आहे...मिळतसुद्धा असेल थाई करी श्रीनगर ला.. शोधायला हवी होती Wink तसंही रोज ठरावीक पदार्थ जेवुन कंटाळा आल्यावर आम्हाला चौथ्या पाचव्या दिवशी असे अनेक पदार्थ आठवत होते. त्या मस्त पाउस थंडी च्या वातावरणात खाण्यायोग्य असे , अगदी पिठलं भाकरी ईंद्रायणी भात तूप पासुन पिझ्झा पास्ता पर्यंत..