त्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणी (भाग-३)

Submitted by पराग१२२६३ on 17 July, 2022 - 02:04

सोलापुरात चालक आणि गार्ड बदलले गेले आणि सव्वानऊला शताब्दी पुढच्या प्रवासाला निघाली. कोरोना साथीच्या भितीमुळे सर्वांचाच प्रवास कमी झाला होता. त्यामुळे सोलापूरहून गुलबर्गा, हैदराबादला जाणारी गर्दी आज दिसत नव्हती. आमच्या डब्यात बऱ्यापैकी गर्दी होती म्हणायची, पण पुढचा डबा तर पूर्ण मोकळाच होता. नाश्त्यानंतर तर बऱ्याच जणांनी मास्क उतरवलेच होते. दरम्यान, सोलापुरातून सुटत असतानाच होटगीकडून आलेली BOXN वाघिण्यांची मालगाडी शेजारच्या मार्गावर येऊन उभी राहिली होती.

आतापर्यंत दुहेरीकरणाचं काम कुलालीपर्यंत पूर्ण झालेलं होतं. त्यामुळे पूर्वीप्रमाणे शताब्दी किंवा उद्यानला एकमेकींना मार्ग मोकळा करून देण्यासाठी मधल्या स्थानकावर थांबण्याची गरज राहिली नव्हती. म्हणूनच दुधनीनंतर दोनच मिनिटांनी उद्यान शताब्दीला क्रॉस करून निघून गेली. त्यानंतर गाणगापूर रोडला शताब्दीला 10 मिनिटं थांबावं लागलं. कारण कुलालीनंतर एकेरी मार्ग सुरू झाल्यामुळे समोरच्या दिशेने येणाऱ्या 16340 नागरकोईल जं.-छत्रपती शिवाजी महाराज (ट) एक्स्प्रेसनं शताब्दीचा मार्ग अडवला होता. ती गाडी मागं WAP-7 हे इलेक्ट्रीक आणि पुढं WDP-4D हे डिझेल-इलेक्ट्रीक इंजिनांसंह धावत होती. मुंबई-चेन्नई मार्गाचं विद्युतीकरण अजून अपूर्ण होतं. त्यामुळं विद्युतीकरण न झालेल्या किंवा होऊनही ते कार्यान्वित न झालेल्या मार्गावर ती गाडी डिझेल-इलेक्ट्रीक कार्यअश्वासह धावणार होती. पण जिथं विद्युतीकरण सुरू झालेलं आहे, तिथं ती गाडी विद्युत कार्यअश्वासह धावत होती, उदा. दौंड ते मुंबई. दोन्ही इंजिनांची अदलाबदल करण्यात वेळ जाऊ नये यासाठी अशी दोन्ही कर्षण प्रणालींची (traction system) इंजिनं तिला एकाचवेळी जोडलेली होती.

कुलालीनंतर आता शताब्दीचा वेग वाढला होता. 10:41 ला सावलगी ओलांडत असताना तिथे शताब्दीसाठी रोखून धरलेली चेन्नई सेंट्रल-अहमदाबाद जं. हमसफर एक्सप्रेस (with WDM-3D loco) दिसली. गुलबर्ग्यात (सध्याचं नाव कलबुर्गी) एक मिनिटाचा थांबा घेऊन शताब्दी एका मालगाडीला मागे टाकून पुढच्या प्रवासासाठी धावू लागली. आता पुन्हा दुहेरी आणि विद्युतीकृत मार्ग सुरू झाला होता. गुलबर्ग्यानंतर लोहमार्गाच्या आजूबाजूला असलेल्या घरांवर कौलं म्हणून चक्क शहाबादी फरशांचाच वापर केल्याचं ठळकपणे दिसू लागतं. शहाबादच्या जवळ आपण येत आहोत, याची कल्पना त्यावरूनच येऊ लागते. अर्ध्या तासातच कोगणी नदी ओलांडून शताब्दी वाडी जं.ला पोहचली. वाडीला वेळेच्या आधीच चार मिनिटं पोहचली असल्यामुळं शताब्दी तिथं थोडा जास्त वेळ विसावणार होती. वाडीला आल्यावर पुन्हा एकदा गाडीचे चालक, गार्ड आणि तपासणीस बदलले गेले. नव्या Assistant Loco Pilot ने पटकन कार्यअश्वाची तब्येत ठीक असल्याची खात्री करून घेतली. तोवर शताब्दीच्या सगळ्या डब्यांमध्ये दुपारचे जेवण चढवले जात होते. काही प्रवासी इथे उतरले होते, पण गाडीत चढणारे कमीच होते.

ठीक साडेअकराला शताब्दी पुढच्या प्रवासासाठी निघाली. वाडीतून एक मार्ग पुढे गुत्ती जं. गुंटकल जं.वरून चेन्नई आणि बेंगळुरूला जातो. पण शताब्दीला सिकंदराबादला जायचे असल्यामुळे ती पूर्वेकडे जाणाऱ्या दीर्घ वळण असलेल्या मार्गावरून निघाली. पण गाडीनं वेग घेतला तशी ती जास्त हेलकावे खात असल्यासारखं वाटत होतं. मधल्यामधल्या स्थानकांवर सिकंदराबादकडे निघालेल्या मालगाड्यांना शताब्दीसाठी रोखून ठेवलेले होते. त्यांना ओलांडून गाडी पुढे निघाली होती. इकडे घडाळ्यात दुपारचे ठीक 12 वाजले होते आणि आम्हा प्रवाशांना गरमागरम जेवण प्रत्येकाच्या पसंतीनुसार (शाकाहारी/मांसाहारी) दिले जाऊ लागलं होतं. मी जेवण करताकरता खिडकीतून बाहेरचे दृश्य न्याहाळत होतोच.

जेवण झाल्यावर मी पुढच्या डब्यात जाऊन बसलो. तो डबा पूर्ण मोकळाच होता. त्यामुळे मला तिकडे हवी तशी जागा मिळणार होती. तो डबाही जरा नवीन होता माझ्या डब्यापेक्षा. तसं मी सोलापूरच्या आधीच नाश्ता झाल्याबरोबर त्या डब्यात जाऊन बसलो होतो. जेवणाच्यावेळी तेवढा माझ्या मूळच्या जागेवर येऊन बसलो होतो.

दुपारचा 1 वाजून 4 मिनिटांनी विकराबाद जंक्शनला पोहचलो आणि नंतर तिथून बाहेर पडत असतानाच शेजारून 11020 कोणार्क एक्सप्रेस लालभडक रंगाच्या WAP-4 कार्यअश्वासह वाडीच्या दिशेने निघून गेली. पाचच मिनिटांनी मुसी नदी ओलांडली. पुढच्या वीसेक मिनिटांत हैदराबादच्या जवळ आल्याचं शताब्दी धडाधड ओलांडत असलेल्या स्थानकांच्या नावांवरून लक्षात येत होतं. तसंच आजूबाजूला उंचउंच इमारतीही दिसू लागल्या होत्या. त्याचवेळी हैदराबाद परिसरातील लोकल्स म्हणजे MMTS ही शेजारून जाऊ लागल्या होत्या. फतेहनगरनंतर लगेचच बेगमपेट विमानतळाची धावपट्टीही दिसली. मग बेगमपेटला 14:03 ते 14:05 असा दोन मिनिटांचा थांबा घेऊन गाडी हुसेन सागर तलावाच्या किनाऱ्यावरून सिकंदराबादच्या दिशेने निघाली. बेगमपेटलाच गाडी 80 टक्के मोकळी झाली. पुढे 10च मिनिटांनी, निर्धारित वेळेच्या 5 मिनिटं आधी सिकंदराबाद जंक्शनच्या फलाट-1वर शताब्दी दाखल झाली.

ता.क. – हा लेख लिहीत असतानाच एक आनंदाची बातमी मिळाली, ती म्हणजे पुणे-सिकंदराबाद शताब्दी पुन्हा सुरू होत असल्याची.

Link
https://avateebhavatee.blogspot.com/2022/07/3.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users