जेम्स वेब्ब दुर्बीण: काही रोचक आणि रंजक माहिती

Submitted by अतुल. on 16 July, 2022 - 13:12
James Webb Telescope

काहीच दिवसांपूर्वी जेम्स वेब या ‘नासा’ च्या इन्फ्रारेड दुर्बिणीने घेतलेले SMACS J0723 या दीर्घिका समुहाचे सुस्पष्ट फोटो जगभर प्रसिद्ध झाले. या दुर्बिणी विषयी विशेषतः ज्या रोचक आणि रंजक गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊ.

जेम्स वेब पृथ्वीभोवतो नव्हे तर सूर्याभोवती फिरते

    जेम्स वेब दुर्बीण (Observatory) हि आजवरची अवकाशात पृथ्वीपासून सर्वाधिक दूरवर स्थित केलेली इन्फ्रारेड दुर्बीण आहे. यापूर्वीची हबल दुर्बीण हि पृथ्वीपासून ५४० किलोमीटर अंतरावर पृथ्वीभोवती फिरत ठेवलेली आहे. पण जेम्स वेब्ब पृथ्वीपासून तब्बल पंधरा लाख किलोमीटर अंतरावर आहे! आणि विशेष म्हणजे पृथ्वीभोवती न फिरता ती सूर्याभोवती फिरते आहे. होय, ती पृथ्वीसोबतच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत आहे.

    अवकाशातील कोणत्याही खगोलाभोवती (ग्रह/तारे इत्यादी) वस्तू एका ठराविक कक्षेत राहण्यासाठी विशिष्ट गतीने त्या खगोलाभोवती फिरत ठेवावी लागते (अन्यथा ती वस्तू एकतर त्या खगोलावर जाऊन तरी आदळेल, नाहीतर आपली कक्षा सोडून कायमची दूर निघून जाईल). या वक्राकार गतीमुळे त्या वस्तूला आपसूकच केंद्रापसारक बल (Centrifugal force) प्राप्त होते. पृथ्वीभोवती अवकाशात पाच बिंदू असे आहेत. या बिंदूंच्या ठिकाणी पृथ्वी आणि सूर्य यांचे गुरुत्वीय बल, तसेच त्या बिंदूंच्या कक्षेत सूर्याभोवती फिरणाऱ्या वस्तूचे केंद्रापसारक बल, हि सर्व बलं एकमेकांस तुल्यबळ ठरतात. इथे या सर्व शक्ती सारख्याच प्रमाणात पण परस्परविरोधी बाजूनी वस्तूला ओढत असतात. परिणामी या जागेत कोणतेही एक बल वा गुरुत्वाकर्षण प्रबळ नसते. म्हणून या ठिकाणी वस्तू “ठेवल्यासारखी” जागच्या जागी स्थिर राहू शकते. यांना लॅग्रँजियन बिंदू (Lagrangian Points) असे म्हणतात. कारण इटालियन-फ्रेंच गणिततज्ञ जोझेफी-लुईस लॅग्रँजे यांनी कोणत्याही दोन ग्रहगोलांदरम्यान असे पाच बिंदू कुठे असू शकतात ते शोधण्याचे समीकरण इ.स. १७७२ साली तयार केले.


    वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे पृथ्वी आणि सूर्य यांच्या आसपास असे पाच बिंदू आहेत. जेम्स वेब यातीलच एका म्हणजे L2 या बिंदू शेजारी त्या बिंदू भोवती छोट्या कक्षेत फिरत ठेवलेली आहे (या व्यतिरिक्त अजूनही असे काही पाच-सहा उपग्रह यापूर्वी तिथे फिरत ठेवलेले आहेत). जेणेकरून तिची पाठ नेहमी पृथ्वी आणि सूर्य यांच्या बाजूला तर तोंड विरुद्ध दिशेला अवकाशाकडे असेल. याचा फायदा असा कि सूर्याकडून येणारी उर्जा तिच्या पाठीशी बसवलेल्या सौरउर्जा पॅनलला मिळत राहील आणि त्याचबरोबर तिच्या तोंडाकडे अवकाश निरीक्षणासाठी जे रेडिओ-आरसे बसवले आहेत त्यांना सूर्याचा वा पृथ्वीचा अडथळा कधीच येणार नाही.
    घराच्या समोर घरातल्या गोंगाटापासून बऱ्याच दूर अंतरावर घराकडे पाठ करून दूरवर आकाशात पाहत खुर्ची टाकून बसावे, अगदी तसेच हि दुर्बीण पृथ्वीपासून तब्बल पंधरा लाख किलोमीटर अंतरावर पृथ्वीकडे पाठ करून “बाहेरच्या अवकाशात डोळे लावून” बसली आहे. आणि तशीच ती पृथ्वीसोबत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत आहे.

हबल आणि इतर दुर्बिणी

    याआधी एप्रिल १९९० मध्ये हबल दुर्बीण प्रक्षेपित केली होती. ती खरेच “दुर्बीण” होती. काचेची दुर्बीण. जिच्यातून दीर्घ-प्रदीर्घ अंतरावर असणाऱ्या तेजोमय खगोलांकडे पाहता येत असे (जसे तारे, आकाशगंगा, मोठे पण परप्रकाशित ग्रह, नेब्युलाज इत्यादी). या दुर्बिणीमुळे अतिदूरवर असलेल्या बऱ्याचशा खगोलांच्या स्वच्छ स्पष्ट प्रतिमा प्रथमच मानवाला पाहता आल्या. इतकेच नाही, तर विश्वाचे वय १३.७ अब्ज वर्षे आहे याचे गणित, जवळपास प्रत्येक दीर्घिकेच्या (आपल्या दिर्घिकेला ‘आकाशगंगा’ म्हणतात. विश्वात अशा अब्जावधी आहे) केंद्रस्थानी अतिविशाल कृष्णविवर असते, नेब्युला ढगांपासून सूर्यमाला निर्माण होतात, विश्वातले सर्वात मोठे तारे, जवळपासची अँड्रोमेडा दीर्घिका, विश्वात गूढपदार्थाचे (Dark Matter) अस्तित्व इत्यादी. या व अशा कितीतरी महत्वाच्या शोधांमध्ये ‘हबल’ने मोलाची भूमीका बजावली आहे. एडविन हबल या प्रख्यात खगोल वैज्ञानिकाचे नाव तिला दिले गेले. (अर्थात ‘नासा’ सारख्या जगातील इतरही अवकाश संशोधन संस्थांनी इतरही अनेक दुर्बिणी अवकाशात स्थिर केल्या आहेत).


इन्फ्रारेड दुर्बीण? का? असे काय आहे इन्फ्रारेड प्रकाशात?

    अतिदीर्घ अंतरावरून येणाऱ्या दृश्यमान प्रकाशाला प्रचंड मर्यादा येतात. जसे कि कोट्यावधी प्रकाशवर्षे दूर अंतरावरच्या त्या तेजोमय खगोलांकडून येणारा प्रकाश, हा वाटेत असणारे धुलीकणांचे अतिविशाल ढग, अस्ताव्यस्त पसरलेले नेब्युलाज व इतर अनेक प्रकाशमान खगोल यांच्यामुळे 'हबल'पर्यंत येईतोवर फार फार क्षीण झालेला असतो. त्यामुळे अतिदीर्घ अंतरावर असणाऱ्या दीर्घिका वा ताऱ्यांच्या प्रतिमा खूपच धूसर येत. म्हणून त्यांचे निरीक्षण करणे फार जिकीरीचे होऊन जाते. यासाठी केवळ दृश्य प्रकाशकिरणांवर अवलंबून न राहता त्या तेजोमय खगोलांकडून येणाऱ्या इतर किरणांच्या प्रतिमा घेणे जास्त उपयुक्त ठरते. याचसाठी दृश्य प्रकाशकिरणांपेक्षा जास्त लांबीच्या प्रकाशकिरणांची निवड केली जाते. या किरणांना वास्तविक ‘प्रकाश’ म्हणता येणार नाही कारण ते डोळ्यांना दिसत नाहीत. संपूर्ण विद्युतचुंबकीय लहरी आणि त्यातल्या आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या किती हे खालील आकृतीवरून ध्यानात येते.


    तारे/नेब्युलाज/दीर्घिका अशा विश्वातल्या तेजोमय खगोलांमधून या सर्वच लहरी उत्सर्जित होत असतात (कारण या तेजोमय ज्योती म्हणजे अतिविशाल अक्राळविक्राळ अशा नैसर्गिक अणुभट्ट्याच असतात जणू). वर दाखवल्याप्रमाणे त्यातल्या फार कमी लहरी आपल्याला दिसतात ज्याला आपण दृश्य प्रकाश म्हणतो.

यामध्ये लक्षात येईल “दृश्य प्रकाशकिरणांपेक्षा कमी तरंगलांबीच्या” लहरी म्हणजे अल्ट्राव्हायोलेट, एक्स-रे आणि गामा किरणे. वर उल्लेख केल्याप्रमाणे या तरंगलहरी अवकाशातच विविध अडथळे आणि धुलीकण यांमध्ये विरून जातात किंवा अतिक्षीण होतात. आणि “दृश्य प्रकाशकिरणांपेक्षा जास्त तरंगलांबीच्या” लहरी म्हणजे इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ लहरी या सर्वाधिक दीर्घ अंतराचा प्रवास करतात.

अजस्त्र अशा रेडिओ दुर्बिणी आणि वैश्विक पार्श्वकिरणांचा शोध

    यापैकी रेडिओ लहरी पकडून त्याद्वारे अभ्यास करण्यासाठी रेडिओ दुर्बिणीची निर्मिती केली गेली. तरंगलांबी जास्त असल्याने या दुर्बिणीचे आरसे (परावर्तक) मोठे असावे लागतात. तसेच जास्त तरंगलांबीच्या लहरी असल्याने पृथ्वीच्या वातावरणाचा फारसा त्रास होत नाही. त्यामुळे या दुर्बिणी जमिनीवरच स्थिर केलेल्या असतात. कोणत्याही दुर्बिणीला अतिदूरच्या वस्तू जास्तीत जास्त स्पष्ट दिसाव्यात यासाठी चांगले अँग्युलर रिझोल्यूशन असणे आवश्यक असते. ते मिळवण्यासाठी त्यांचा आकार वाढवला गेला. त्या अवाढव्य झाल्या. जगातील अनेक नामांकित अवकाश संशोधन संस्थांनी या रेडिओ दुर्बिणी बसवल्या आहेत. या दुर्बिणीद्वारे रेडिओतरंग आणि मायक्रोवेव्ह पकडले जातात.


    वैश्विक पार्श्वकिरणोत्सर्ग CBMR (Cosmic Background Microwave Radiation) म्हणजे विश्वनिर्मितीच्या अगदी सुरवातीच्या काळात निर्माण झालेले मायक्रोवेव्ह तरंगकिरण. विश्वातील निर्वात पोकळीत हे किरण अजूनही अस्तित्वात असल्याचा शोध रेडिओ दुर्बिणीमुळे पण केवळ अपघातानेच लागला. या शोधामुळे विश्वनिर्मितीच्या अभ्यासामध्ये फार मोलाची मदत झाली. “हे किरण कुठून येत आहेत? रेडिओ दुर्बीण खराब झाली कि काय? ती गरम झाल्यामुळे किरणासारखे काही दिसतेय कि काय? त्यावर कबुतरांची घाण पडली कि काय?” अशा शंकांनी सुरवात झालेला प्रवास CBMR च्या शोधापाशी थांबला. आणि ते शोधणाऱ्या वैज्ञानिकांना त्यावर्षीचा नोबेल पुरस्कार मिळाला.

‘हबल’ने शोधली सर्वात दूरची दीर्घिका

    दृश्य प्रकाशावर काम करणाऱ्या दुर्बिणी झाल्या, रेडिओ दुर्बिणी झाल्या. अतिदूरच्या (अब्जावधी प्रकाशवर्षे) खगोल ज्योतींकडून येणारे किरण पकडण्यात या दोन्हींना अगदी पूर्ण नसले नसले तरी बरेचशे यश आले होते. हबलद्वारे अतिदूरवरील दीर्घिकांचा अभ्यास करणाऱ्या टीमला (MACS team) काही दीर्घिकांचे समूह असे सापडले कि ते गुरुत्वीय भिंगेसारखे (Gravitational Lens) काम करत होते. त्यामुळे या समुहाच्या मागील दीर्घिका फारच ठळक आणि स्पष्ट दिसत होती. जसे नेहमीच्या काचेच्या भिंगेतून पलीकडची वस्तू मोठी दिसते, अगदी तसेच दीर्घिकांच्या समुहात असलेल्या तीव्र गुरुत्वाकर्षणामुळे पलीकडून येणाऱ्या प्रकाशाचे विस्फारण होते आणि पलीकडचे खगोल ठळक व मोठे दिसू लागतात. या दीर्घिका समूहांपैकी MACS 0416, MACS 0025, MACS 0647, MACS 0717 हि काही नावे.
    अशा समूहांपैकीच एक SMACS 0723. याच्या मध्ये विश्वाच्या सुरवातीच्या काळातील दीर्घिका दडल्या आहेत असे आढळून आले. 'हबल'ने शोधलेली आजवरची सर्वात दूरवरची दीर्घिका म्हणजे GNz11. हि साडेतेरा अब्ज प्रकाशवर्षे अंतरावर आहे. म्हणजे आता जो काही तिच्याकडून येणारा प्रकाश दिसतो आहे तो तब्बल साडेतेरा अब्ज वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे विश्व निर्मितीनंतर (जी जवळपास १४ अब्ज वर्षांपूर्वी झाली) केवळ चाळीस ते पन्नास कोटी वर्षानंतरचा हा प्रकाश!

जेम्स वेब्ब दुर्बीण: अंदाज पन्नास कोटी डॉलर, प्रत्यक्ष खर्च दहा अब्ज डॉलर

    या अतिदूरच्या समुहातून दिसणाऱ्या दीर्घिका अजून स्पष्ट दिसण्यासाठी, इन्फ्रारेड किरणांवर चालू शकणाऱ्या दुर्बिणीची गरज असल्याचे काही वैज्ञानिकांना अगदी १९८० पासून वाटत होते. प्रत्यक्षात मात्र सर्व चाचपण्या गणिते आकडेमोडी आणि प्रपोजल बनवायला १९९६ साल उजाडले. या साली 'नासा' मधल्या एका कमिटीने १३.६ अब्ज प्रकाशवर्षे अंतरावरच्या दीर्घिका पाहता येतील अशी इन्फ्रारेड दुर्बीण बनवून ती २००७ पर्यंत लॉंच करण्याचा प्रस्ताव मांडला. Next Generation Telescope असे नाव असलेला हा प्रोजेक्ट होता. १९९६ साली यासाठी अपेक्षित खर्च अंदाजे पन्नास कोटी डॉलर इतका काढला होता. अमेरिकेसाठी तो अर्थातच किरकोळ होता. त्यानुसार काम सुरु झाले खरे पण पुढे अनेक अडचणी येत गेल्या. ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत. आणि अखेर २० मीटर x १४ मीटर इतका पाया ज्यावर पूर्णपणे सोन्याचा वर्ख दिलेला ६ मीटर उंचीचा आरसा आहे, अशी तब्बल ६ हजारहून अधिक किलो वजनाची हि महाकाय इन्फ्रारेड दुर्बीण तयार झाली. ती लॉंच व्हायला २०२१ चा डिसेंबर उजाडला. तोवर खर्च सुद्धा अवाढव्य म्हणजे दहा अब्ज डॉलरच्या घरात गेला होता! आणि १९६० च्या दशकात ‘नासा’चे नेतृत्व करणारे जेम्स वेब्ब (ज्यांच्या काळात नासाचे यान चंद्रावर उतरले) यांच्या सन्मानार्थ या दुर्बिणीचे ‘जेम्स वेब्ब’ असे नामकरण करण्यात आले.


    २५ डिसेंबर २०२१ रोजी दक्षिण अमेरिकेतील फ्रेंच गियानामधल्या कौरौ शहराजवळील युरोपीयन अंतराळ केंद्राच्या अवकाशयान उड्डाण तळावर हि बहुचर्चित दुर्बीण रॉकेटसोबत अंतराळात झेपावायला सज्ज झाली होती. लॉंच करत असताना किंवा नंतरच्या काळातही दुर्बीण नादुरुस्त होऊ शकते. अशा वेळी ‘हबल’कडे अंतराळयानातून वैज्ञानिक पोहोचून हवी ती दुरुस्ती करू शकत होते. आणि तशी अनेकदा केलीसुद्धा आहे. कारण 'हबल' तुलनेने जवळ होती. पण 'जेम्स वेब्ब'बाबत तो पर्यायच नाही. इतक्या दूर अंतरावर अवकाशयानाने दुरुस्तीसाठी जाणे शक्य नव्हते आणि नाही. त्यामुळे लॉंच नंतर कोणत्याही कारणाने दुर्बीणीला जर काही अपघात वा नुकसान झाले असते, तर पंचवीसहून अधिक वर्षे सुरु असलेला दहाअब्ज डॉलरचा हा प्रोजेक्ट थेट कचऱ्यात जाऊ शकला असता!
    पण सुदैवाने तसे काही न होता, झेपावलेल्या रॉकेटमधून वाहून नेली गेलेली हि दुर्बीण तब्बल पंधरा लाख किलोमीटरवर असलेल्या L2 या आपल्या गंतव्यस्थानी जवळपास एक महिन्याने सुव्यवस्थितपणे पोहोचली. तिथे स्थिर झाल्यानंतर काहीच महिन्यांनी एक छोटुसा दगड (छोटी उल्का म्हणता येईल हवे तर) दुर्बिणीच्या आरशावर आदळला आणि इकडे वैज्ञानिकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण सुदैवाने कोणतेही गंभीर नुकसान झाले नाही.

एक बाजू गरमागरम तर दुसरी अतिथंड

    इन्फ्रारेड दुर्बिणीत सगळ्यात अडथळा असतो तो उष्णतेचा. कारण सूर्याच्या उष्णतेमुळे निर्माण होणारी मायक्रोवेव्ह आणि इन्फ्रारेड किरणे, ज्यासाठी दुर्बीण बनवली आहे त्या दूरवरून येणाऱ्या किरणांना अगदी सहज वरचढ ठरली असती आणि मग दुर्बीण काही कामाचीच राहिली नसती. हे टाळण्यासाठी बहुस्तरीय सूर्य ढाल बनवलेली आहे. ज्यायोगे सूर्याच्या बाजूचे तापमान ८५ डिग्री पर्यंत गेलेले असताना दुर्बिणीच्या भागात मात्र अतिथंड म्हणजे उणे २३३ डिग्री इतके असते.


आजवरच्या सर्वधिक दूर दिर्घिकेचा फोटो

    यथावकाश या दुर्बिणीने आपले काम सुरु केले, आणि जसे आपणा सर्वाना माहिती आहे, काहीच दिवसांपूर्वी या दुर्बिणीने घेतलेला SMACS J0723 या दीर्घिका समुहाचा सुस्पष्ट फोटो जगभर प्रसिद्ध झाला. साडेचारहून अधिक अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेला हा समूह, वाळूचा अगदी छोटा कण हातभर अंतरावर धरला कि जितका दिसेल, तितका प्रत्यक्ष आकाशात त्याचा आकार आहे. पण 'जेम्स वेब्ब'ने अनेक तासांच्या अवधीत विविध तरंगलांबीच्या इन्फ्रारेड किरणांचे फोटो घेऊन हा एकसंध फोटो बनवला.


    आधी लिहिल्याप्रमाणे SMACS J0723 हा दीर्घिका समूह भिंगेसारखे काम करतो व त्यामुळे याच्या मागे असलेल्या दीर्घिका ठळक दिसतात. त्यातीलच एक आहे १३.६ अब्ज प्रकाशवर्षे दूर. म्हणजे हबलद्वारे शोधलेल्या GNz11 पेक्षा हा वीस लाख वर्षाहून अधिक जुना प्रकाश! पण विश्वाचा सुरवातीचा वीस लाख वर्षाचा फरक संशोधकांच्या दृष्टीने खूप मोठा असतो. यामुळे विश्वाच्या सुरवातीच्या काळातला बराचसा टप्पा समजण्यास मदत होणार आहे.

    दहाहून अधिक वर्षे पुरेल इतकी क्षमता असलेल्या या दुर्बिणीमुळे येणाऱ्या काळात अनेक गोष्टी उलगडण्यास मदत होईल असा विश्वास `नासा`च्या वैज्ञानिकांना वाटतो. हि तर केवळ सुरवात आहे!

संदर्भसूची:
Webb Orbit:
https://webb.nasa.gov/content/about/orbit.html

NASA’s Webb Delivers Deepest Infrared Image of Universe Yet:
https://www.nasa.gov/image-feature/goddard/2022/nasa-s-webb-delivers-dee...

What These Dazzling James Webb Telescope Images Mean for Space:
https://time.com/6195785/james-webb-telescope-images-released-space/

NASA unveils first images from James Webb Space Telescope:
https://www.washingtonpost.com/science/2022/07/11/nasa-james-webb-space-...

Webb telescope reaches its final destination far from Earth:
https://www.nature.com/articles/d41586-022-00128-0

Webb Reveals Deepest View of Universe Yet:
http://www.sci-news.com/astronomy/webbs-first-deep-field-10989.html

Hubble Space Telescope:
https://en.wikipedia.org/wiki/Hubble_Space_Telescope

Galaxy cluster:
https://en.wikipedia.org/wiki/Galaxy_cluster

MACS J0416.1-2403:
https://en.wikipedia.org/wiki/MACS_J0416.1-2403

Webb's First Deep Field:
https://en.wikipedia.org/wiki/Webb%27s_First_Deep_Field

GN-z11:
https://en.wikipedia.org/wiki/GN-z11

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.
हबल दुर्बिणीच्या तुलनेत जेम्स वेब दुर्बीण किती उत्तम आहे, हे बघण्यासाठी इथे बघा.

छान लिहिलंय अतुल. सविस्तर माहिती सोप्या शब्दात दिली आहे.
फक्त एक दुरुस्ती सुचवते.
atm_opacity.jpg
रेडिओ दुर्बिणींना वातावरणाचा अडथळा येत नाही. त्यांचा आकार अवाढव्य असण्याचं कारण जास्तीत जास्त चांगलं अँग्युलर रिझोल्यूशन मिळवणं हे आहे.

इतकी छान माहिती असलेला कदाचित मराठीतील पहिला लेख. अभिनंदन आणि धन्यवाद.

हबल आणि वेब यांची तुलना अस्थायी आहे. त्या एकमेकांस पूरक म्हणून काम करू शकतील.

@उपाशी बोका: धन्यवाद! वाह मस्त आहे लिंक Happy

@वावे. हो तो मुद्दा सहमत. तरंगलांबी वाढेल तसे अडथळे पार होतात. दुरुस्ती केली आहे. धन्यवाद Happy

@Filmy: खूप खूप धन्यवाद. हो त्या दोन्हींची निरीक्षण शक्ती वेगवेगळी आहे. एकीला जे स्पष्ट दिसते ते दुसरी नीट पाहू शकेलच असे नाही.

@उदय: खूप खूप धन्यवाद.

छान लेख. ईतकी माहिती आहे की पुन्हा वाचावे लागेल समजून घ्यायला Happy

शेवटचा दिर्घिकेचा फोटो एकदम सेक्सी दिसतोय. स्क्रीनसेव्हर म्हणून छान दिसेल. सर्वात दूरच्या दिर्घिकेचा आहे हे कौतुकाने सांगताही येईल Happy

हबल दुर्बिणीतून दिसलेली सगळी चित्रं/दृष्यं कृष्णधवल असतात असे ऐकलेय, रंग नंतर दिलेला असतो. कारण रंगांसहीत दिसलेली (परावर्तित?) प्रतिमा तितकी अचूक वा स्पष्टं असत नाही. तसंच वेबचेही आहे काय ?!
अतिशय मोठमोठ्या संख्यांमधली परिमाणं असूनही लेख अजिबात क्लिष्ट झालेला नाही. लेखन माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण झालेले आहे. सगळी चित्रही सुरेख आहेत. अशा प्रकारचे लेखन अजून वाचायला आवडेल. आवडता विषय आहे.

@ऋन्मेऽऽष,
धन्यवाद Happy होय हे फोटो खरंच खूप सुंदर आहेत. सुरवातीला मला वाटले होते आर्टीस्टने फिनिशिंग वगैरे केले असेल. पण तसे नाही. याशिवाय सुद्धा काही सुंदर फोटो पाठवलेत: वरच्या washingtonpost च्या लिंक मध्ये पहा.

@अस्मिता.
खूप खूप व मन:पूर्वक धन्यवाद तपशीलवार प्रतिसादाबद्दल Happy खूपच छान आणि नेमका प्रश्न विचारलात. लेख लांबेल म्हणून याबाबत लिहिता लिहिता थांबलो होतो. इंटरनेटवर अनेक ठिकाणी "प्रतिमेतील रंग खोटे आहेत" (Fake colors) असा उल्लेख आहे. वास्तविक ते खोटे नाहीत.

दुर्बीणीत तीन वेगवेगळ्या फिल्टर द्वारे फोटो घेतले जातात. लघु मध्यम आणि दीर्घ तरंगलाबीचे हे फोटो असतात. आपल्या डोळ्यांमध्ये सुद्धा RGB असे तीन वेगळे रंग ओळखणारे कोन असतात. यामुळे लाल (सर्वात जास्त तरंगलाबी), हिरवा (मध्यम तरंगलाबी) आणि नीळा (सर्वात लघु तरंगलांबी) असा सगळा इंद्रधनुष्यचा स्पेक्ट्रम डोळ्यांच्या आवाक्यात येतो. दुर्बिणीतून विविध फिल्टरद्वारे घेतलेले हे फोटो नंतर एकत्र करून त्यावर तरंगलांबीनुसार प्रक्रिया केली जाते आणि ते ते रंग जोडले जातात. अर्थात हे सगळे संगणकच करतो, आर्टीस्ट नव्हे. थेट आलेल्या कृष्णधवल प्रतिमांचे अवलोकन करणे संशोधकांना फार जिकीरीचे असते म्हणून सगळा हा खटाटोप. अर्थात हे होण्यासाठी वेळ लागतो. हबल मध्ये तर फार वेळ लागत असे. कारण प्रचंड गतीने ती दुर्बीण पृथ्वीभोवती फिरते. त्यामुळे दुसऱ्या फिल्टरने त्याच ठिकाणाहून प्रतिमा घेईतोवर बरीच वाट पाहावी लागे.

जेम्स वेब्ब सुद्धा याच तत्वावर फोटो घेते. इथे तितका वेळ लागत नाही. कारण हि पृथ्वीभोवती फिरत नाही. पण इथे फरक असा आहे कि इन्फ्रारेडचा पट्टा तीन तरंगलांबीत विभागला जातो (जो हबल मध्ये दृश्यकिरणांचा विभागला जात असे). आणि हे विभाग आपल्या डोळ्यांना प्रतिमा दिसावी (कारण इन्फ्रा आपल्याला दिसत नाही) म्हणून ते पुन्हा दृश्य पट्ट्याशी map केले जातात, आणि ते ते इन्फ्रा रंग त्या त्या दृश्य तरंगलांबीला प्राप्त होतात आणि आपल्याला दिसू शकणाऱ्या रंगात ती प्रतिमा तयार होते. अर्थातच हे सगळे संगणक करतो.
मला वाटतंय मी हे सगळे स्पष्टीकरण नीट मांडू शकलो असेन.

पुन्हा एकदा धन्यवाद, खूप छान पतिसादासाठी

@कुमार सर, @तेजो, @हरपा जी, @किशोरजी, @मेघनाजी... आपले सर्वांचे प्रतिसाद उर्जा आणि प्रोत्साहन देतात. खूप खूप धन्यवाद Happy

@वावे यांनी काही मुद्दे (विशेषतः रेडिओ टेलिस्कोप संदर्भात) अचूक करण्याबाबत सुचवले होते. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर लेखात योग्य ते बदल केले आहेत. धन्यवाद वावे. असे प्रतिसाद लेख अचूक होण्यास फार मदत करतात. इतरही काही बदल केले आहेत.

हरचंद पालव
ग्रेट!
व्हान गो च्या अप्रतिम चित्राची आठवण करून दिल्या बद्दल.
महान कलाकार ह्यांना दिव्य दृष्टी प्रतिभा असते हेच खरे!
लेख सुंदरच आहे.

Untitled.png
वेब दुर्बिणीच्या आधी अवकाशात दोन इन्फ्रारेड दुर्बिणी कार्यरत आहेत/होत्या. त्यांपैकी स्पित्झर Spitzer ही महत्वाची. ह्या दुर्बिणीने घेतलेले आकाशाचे फोटो.
वरची प्रतिमा दृश्य प्रकाशाची आहे. खालच्या दोन इन्फ्रारेड दुर्बिणीने- स्पित्झर ने घेतलेल्या आहेत.
स्पित्झर २०१६ पासून बंद -सेफ मोड - मध्ये आहे. २००९ मध्ये द्रवरूप हेलिअम संपल्यामुळे ह्या दुर्बिणीचे चार पैकी दोन चानेल बंद करावे लागले होते. ह्या दुर्बिणीने एकूण सोळा वर्षे काम केले.
वेब दुर्बिणीचे कूूलन्ट् किती वर्षे चालेल ह्याची काही कल्पना आहे का?
The mission duration of 5.5 to 10 years is not limited by the supply of liquid helium, as we stated. Rather, it is limited by the supply of hydrazine fuel needed to maintain the spacecraft’s orbit.
L2 बिंदूवर कक्षा व्यवस्थित ठेवण्यासाठी इंधन लागते.

Admin साहेब - असा माहितीपूर्ण लेख मायबोलीच्या मुख्य पानावर आल्यास अनेकांना त्या माहितीचा लाभ घेता येईल. अतुल. यांनी लेखाच्या शेवटी माहितीचे स्त्रोत/ references दिले आहेत हे तेव्हढेच महत्वाचे आहे. सामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचविण्याच्या कामाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. धन्यवाद.

थँक्स अतुल Happy बहुतेक समजले.
Basically, infrared light wave is the key that gives James Webb telescope it's wider horizon, finer perspective and (almost big bang) way deeper range ..!!
हा व्हिडीओ पूरक वाटतोय.
Seeing the universe like we've never seen it before

उबो चित्रं छान आहेत.
केशवकूल छान प्रतिसाद.
व्हॅन गॉगच्या 'द स्टारी नाईट'चे हे बिग बँग रूप छानच आहे.
वावे, छान वाटले वाचून !

>> L2 बिंदूवर कक्षा व्यवस्थित ठेवण्यासाठी इंधन लागते.

हो, हा काल्पनिक बिंदू आहे ज्याभोवती ती फिरत ठेवली आहे (इथे अजूनही काही दुर्बिणी फिरत आहेत असे वाचले). असे फिरत राहण्यासाठी इंधन लागते. ते पाच ते दहा+ वर्षे पुरेल असा अंदाज आहे.

बऱ्याच दुर्बिणी सोडल्या गेल्या आहेत आजवर. इथे एक यादी आहे ती फारच रोचक व माहितीपूर्ण आहे. आजवर अवकाशात सोडलेल्या सगळ्या दुर्बिणी. आणि इतकेच नाही तर कोणत्या स्पेक्ट्रम मध्ये त्या काम करत आहेत त्यानुसार वर्गीकरण केले आहे. अगदी गामा किरण आणि क्ष किरण वाल्या दुर्बिणी सुद्धा सोडून झाल्या आहेत हे माझ्यासाठीसुद्धा तशी नवीनच माहिती आहे.

उबो यांनी शेअर केलेली लिंक खरंच छान आहे. मी सुद्धा पुढे शेअर केली.

व्हॅन गॉग द स्टारी नाईट.... Simply great! किती कल्पक असतात लोक.

@उदय, खूप सारे धन्यवाद Happy

>> Webb telescope it's wider horizon, finer perspective and (almost big bang) way deeper range ..!!
@अस्मिता: अगदी! विश्वाच्या जवळपास सुरवातीच्या काळातली प्रतिमा, आणि मुख्य म्हणजे येणाऱ्या काळात बऱ्याच नवीन discoveries पहावयास मिळतील, बऱ्याच गोष्टींची स्पष्टीकरणे मिळतील. तो व्हीडीओसुद्धा खूप माहितीपूर्ण आहे. खूप खूप धन्यवाद.

साडेतेरा अब्ज प्रकाशवर्षं दूरच्या दीर्घिकेची (आणि त्यामुळे साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वीची असलेली) प्रतिमा बघून एक 'फिलॉसॉफिकल' विचार मनात येतो.
आपण सध्याच्या काळात जगतो म्हणजे नेमकं काय? बघायला गेलं तर दिवसा दिसतो तो सूर्यप्रकाशही आठ मिनिटं जुना असतो. रात्री आकाशात दिसणारे सगळेच तारे अनेक वर्षं जुने (कारण अनेक प्रकाशवर्षं लांब) असतात. ही साडेतेरा अब्ज प्रकाशवर्षं दूर असलेली दीर्घिका आपल्याला या जेम्स वेब दुर्बिणीमुळे दिसली. पण इतके दिवस तिच्याकडून येणारा प्रकाश आपल्यापर्यंत पोचत होताच. भले तो खूप क्षीण असेल.

सूर्यप्रकाश, जो आठ मिनिटं जुना आहे, तो 'आत्ताचा' मानायचा आणि व्याध किंवा दुसऱ्या एखाद्या ताऱ्याकडून, किंवा देवयानीसारख्या दीर्घिकेकडून, जी पंचवीस लाख प्रकाशवर्षं दूर आहे ( आणि जी आपल्याला नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकते, अंधारी रात्र आणि आकाश स्वच्छ असेल तर) येणारा प्रकाश 'जुना' मानायचा, यातली रेष कुठे आखायची? मिनिटं, तास, दिवस, वर्षं ही आपल्या सोयीची परिमाणं आहेत. फुलपाखरं किंवा इतर काही कीटकांचं आयुष्य काही आठवडे किंवा महिन्यांचं असतं. त्यांच्यासाठी वर्ष हे एकक खूप मोठं आणि त्यामुळे (वैयक्तिक पातळीवर) irrelevant आहे. आपण इतिहास लिहून ठेवतो म्हणून आपण सामाजिक पातळीवर फार तर शतकांमध्ये विचार करतो. पण ही सगळी आपली सोय आहे. तसं बघायला गेलं तर (नवं आणि जुनं यातली रेषच आखली नाही तर) आपण एकाच वेळी सर्व काळांमध्ये जगतोय.

वेब दुर्बीण म्हणले "टाईम मशीन" आहे.
आपण जी आपली प्रतिमा आरशात बघतो ती देखील आपली भूतकाळातील प्रतिमा असते.
Because the image we see is the light coming into our eyes after reflecting from the mirror. So the answer for “how old is the image” depends on the distance b/w the mirror and the person. Suppose the distance b/w mirror and person is x meters. As we all know the speed of light is 300000000 meters per second. Now the light that comes from you and reflect back to you will cover 2*x meters distance to reach to you. So the time it takes will be : 2*x / 300000000 seconds.

जवळपास सगळे एक चूक करीत आहेत. तो प्रकाश साडेतेरा अब्ज वर्षांचा नाही आहे. फार फार तर पाच अब्ज वर्षे जुना असू शकेल. विश्व प्रसरण पावत आहे, त्याचा वेग गृहीत धरावा लागेल.

ते जे क्लस्टर आहे SMACS J0723, ते पाच अब्ज प्रकाशवर्षे दूर आणि त्यातून दिसणारी मागची दीर्घिका १३.६ अब्ज प्रकाशवर्षे दूर. असे उल्लेख आहेत सगळीकडे. पण हे सुद्धा तितकेच खरे आहे कि दिर्घिका मधली अंतरे वाढत आहेत कारण विश्व {अवकाश/Space) सातत्याने प्रसरण पावत आहे. म्हणजे रबर बँड वरून एक कीटक ठराविक गतीने चालत असेल तर त्याला रबर बँडच्या दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी आता लागणारा वेळ हा अजून काही सेकंदानी कमी न होता वाढेल. कारण रबर बँड सातत्याने ताणत आहे. म्हणून Comoving distance आणि Proper distance अशा दोन प्रकारचे अंतर सांगावे लागते.

दुसरे असे कि SMACS J0723 या क्लस्टर वर, जे पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाच्या दिशेला अवकाशात खाली कुठेतरी आहे, संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे. कारण सगळ्यात जुन्या काळातली किरणे त्यातून येत आहेत (हबल ने आधी शोधली). याचा अर्थ बिंग बँग (जर तसे काही झाले असेल तर) तिकडे कुठे सुरवात झाली असेल काय? पण त्यावर कुठे भाष्य आढळत नाही. कदाचित इतक्या लवकर तसा निष्कर्ष काढणे अपरिपक्वता ठरेल. पण समजा अशीच आणि इतक्याच जुन्या काळातली किरणे उत्तरेला किंवा अन्य दिशांकडे आढळली तर त्याचा अर्थ काय होईल? चौदा अब्ज वर्षापूर्वी विश्वाची सुरवात झाली हे तर गणिताने काढलेच. आणि १३.६ अब्ज वर्षापूर्वी एक दीर्घिका उत्तरेला तर दुसरी दक्षिणेंला होती Lol तसे काही आढळले तर तेंव्हा खरी मजा येईल Wink

>> आपण एकाच वेळी सर्व काळांमध्ये जगतोय
>> वेब दुर्बीण म्हणले "टाईम मशीन" आहे.

असं नाही (नसावं). कारण आता जे किरण इथे आलेत, भले आठ मिनिटापूर्वी सूर्याकडून निघाले असतील, ते आठ मिनिटापूर्वी इथे नव्हते. म्हणजे आता जे काही दिसते/ऐकायला येते ते सगळे जिथून उगम पावले तो काळ कितीही जुना असला तरी "ते किरण आता इथे आहेत" हा भाग आहेच की काळ "आताचा" आहे हे सांगायला.

@filmy
ह्या दिर्घीकांपासून येणारा प्रकाश "red shift" होऊन intrared झोन मध्ये गेला असणार . ही दुर्बीण इन्फ्रारेड झोनमध्ये बघत असल्याने ही करेक्शन होऊन प्रतिमा मिळाली असणार.
हे माझे सामान्य माणसाचे मत.
खरे खोटे आईनस्टाईन जाणे,
आम्ही सगळे चूक करत असू. पण NASA सुद्धा ?
FILMY तुम्ही कॉस्मोलोजीकल पंगा तर घेत नाहीयेत ना?

खूप सुंदर लेख आहे. नीटनेटका, मुद्देसूद, माहितीने परिपूर्ण, सोपा आणि समजायला सोप्या चित्रांसह आहे. संकलित असेल तरीही समयोचित असल्याने आवडला. वर्तमानपत्रात छापून यावा.

Astronomers talk about redshift in terms of the redshift parameter z. This is calculated with an equation, where λobserved is the observed wavelength of a spectral line, and λrest is the wavelength that line would have if its source was not in motion:

z = (λobserved - λrest) / λrest
z tells you the number of years the light from the object has traveled to reach us, however this is not the distance to the object in light years, because the universe has been expanding as the light traveled and the object is now much farther away.

The table below gives light travel times and distances for some sample values of z
z Time the light has been traveling Distance to the object now
0.0000715 1 million years १ million light years
0.10 1.286 billion years 1.349 billion light years
0.25 2.916 billion years 3.260 billion light years
0.5 5.019 billion years 5.936 billion light years
1 7.731 billion years 10.147 billion light years
2 10.324 billion years 15.424 billion light years
3 11.476 billion years 18.594 billion light years
4 12.094 billion years 20.745 billion light years
5 12.469 billion years 22.322 billion light years
6 12.716 billion years 23.542 billion light years
7 12.888 billion years 24.521 billion light years
8 13.014 billion years 25.329 billion light years
9 13.110 billion years 26.011 billion light years
10 13.184 billion years 26.596 billion light years

Pages