रंगदृष्टीचे तिरंगी सूत्र

Submitted by कुमार१ on 11 July, 2022 - 08:29

पृथ्वीवरील जीवसृष्टीत निसर्गाने अनेक रंगांची उधळण केलेली आहे. ती अर्थातच मनमोहक आहे. विविध वनस्पती आणि प्राणी हे भिन्नरंगी असून ते वेळोवेळी आपापले ‘रंग’ दाखवत असतात ! मानवनिर्मित अनेक गोष्टीही रंगीत आहेत. विविध रंगांच्या दर्शनातून मनात वेगवेगळे भाव उमटतात. आपल्या दैनंदिन जीवनातील सुसूत्रता अनेक रंगांवर आणि रंगबदलांवर अवलंबून आहे. मुळात आपल्याला रंगज्ञान होण्यासाठी आपले डोळे व मेंदू यांच्यातील विशिष्ट यंत्रणा कारणीभूत आहेत. या अद्भुत व अमूल्य अशा जीवशास्त्रीय प्रणालीवर दृष्टिक्षेप टाकण्यासाठी हा लेख.

निसर्गातील ज्या विद्युतचुंबकीय लहरी आपल्या डोळ्यांना जाणवतात त्याला आपण प्रकाश म्हणतो. या प्रकाशलहरी भिन्न तरंगलांबीच्या असतात. त्यांची लांबी नॅनोमीटर्समध्ये मोजतात. अशा विविध लहरींच्या मिश्रणातून आपल्याला रंगज्ञान होते.
रंगज्ञानाच्या किचकट प्रक्रियेची सुरुवात प्रकाशकिरण डोळ्यात शिरण्यापासून होते. ती समजण्यासाठी आपण डोळ्यांची अंतर्गत रचना थोडक्यात पाहू.
retina-structure-eye-vision-rods-cones-vector-diagram-40412249.jpg

डोळ्याच्या सर्वात आतील थराला दृष्टीपटल (retina) म्हणतात. त्यामध्ये दोन प्रकारच्या प्रकाशसंवेदी पेशी असतात. त्यांना त्यांच्या आकारानुसार दंडपेशी (rods) व शंकुपेशी (cones) अशी नावे आहेत. रंगज्ञान शंकूपेशीमुळे होत असल्याने आता फक्त त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. या पेशींची एकूण संख्या सुमारे ६० ते ७० लाख असते. त्या प्रखर प्रकाशात सर्वाधिक कार्यक्षम असतात. या पेशींमध्ये एक रंगद्रव्य असते, जे एक प्रथिन आणि ‘अ’ जीवनसत्व यांच्या संयोगातून तयार होते.

शंकुपेशींचे तीन प्रकार असतात : L, M व S.
त्यापैकी L ची संख्या सर्वाधिक असते. त्या खालोखाल M आणि सर्वात कमी S असतात. या प्रत्येक प्रकाराचे एक वैशिष्ट्य आहे. संबंधित प्रकार प्रकाशाच्या एका विशिष्ट तरंगलांबीला सर्वाधिक संवेदी असतो. म्हणजेच,

L (= Long) : लाल रंग (560nm)
M (= Medium) : पिवळा ते हिरवा रंग (530nm)
S (= Short) : निळा रंग (420nm).

LMS spe.png

जेव्हा एखाद्या तरंगलांबीचा प्रकाश डोळ्यात शिरतो तेव्हा तो वरील तीन पैकी किमान दोन प्रकारच्या शंकूपेशींना उत्तेजित करतो. त्या दोघांच्या परस्पर सहकार्यातून विशिष्ट संदेश तयार होतात. त्यातूनच प्रमुख रंग आणि त्यांच्या दरम्यानच्या अन्य रंगछटांचे ज्ञान होते. रंगज्ञानाच्या या थिअरीला तिरंगी प्रणाली (trichromatic)असे म्हणतात. थॉमस यंग या प्रसिद्ध वैज्ञानिकांनी हे मूलभूत संशोधन केले.
अन्य एका थिअरीनुसार आपली दृष्टीयंत्रणा ही निव्वळ एक सुटा रंग पारखत नाही. परंतु, रंगांमधील परस्परविरोधीपणावरून आपल्या मेंदूत रंगप्रतिमा उमटतात. रंगांच्या अशा परस्परविरोधी जोड्या म्हणजे :
• लाल विरुद्ध हिरवा
• निळा विरुद्ध पिवळा, आणि
• काळा विरुद्ध पांढरा
या दोन्ही थिअरीज वैज्ञानिक जगतात मान्य झालेल्या आहेत.

डोळा -मेंदू संदेशवहन
रंगीत प्रकाशामुळे शंकूपेशींमध्ये तयार झालेले संदेश चेतातंतूंच्या अनेक थरांतून शेवटी मेंदूतील दृष्टीकेंद्रात पोचतात. हे केंद्र मेंदूच्या पाठीमागच्या भागात असते. इथे त्या संदेशाचे विश्लेषण होऊन अंतिम रंगज्ञान होते.

रंगांचे आकलन
इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. एखादा माणूस जेव्हा असे म्हणतो की, अमुक एक गोष्ट या ठराविक रंगाची आहे, तेव्हा ते त्याचे व्यक्तिगत आकलन असते. अशा आकलनात काही प्रमाणात व्यक्तीभिन्नता आढळते. दृष्टीयंत्रणा आणि मानसिकता यांच्या संयोगातून एखाद्या व्यक्तीचे रंगांचे आकलन ठरते. प्रत्येक रंगाच्या अनेक छटा असतात. त्या सर्व छटा सर्वच माणसांना एकाच प्रकारे समजत नाहीत; त्याबाबत मतैक्य होतेच असे नाही. या संदर्भात काही वांशिक भेदही आढळले आहेत. प्रमुख रंगांच्या अधल्यामधल्या छटांना कोणती नावे द्यायची यावरून मानवी समूहांत मतभेद आहेत.

या संदर्भात एक ठळक उदाहरण म्हणजे नामिबिया व अंगोलात राहणारे हिंबा या जमातीचे लोक. गुरांचे पालन हा त्यांचा पारंपरिक पिढीजात व्यवसाय आहे. गाई-म्हशींच्या अंगावरील विशिष्ट खुणा बारकाईने ओळखण्याच्या गरजेतून त्यांची दृष्टी तीक्ष्ण झालेली आहे. या लोकांचे रंगाकलन हे अन्य मानवी समूहांपेक्षा काहीसे भिन्न आहे. अनेक रंगछटांना त्यांनी त्यांच्या प्रणालीतील वेगळी नावे दिलेली आहेत.

रंगज्ञान आणि जैविक उत्क्रांती
सस्तन प्राणी उत्क्रांतीच्या सर्वात वरच्या पायरीवर आहेत. त्यांना निसर्गातील विविध गोष्टींचे रंगज्ञान होणे का गरजेचे असावे हे आता पाहू. माकडे, वानरे आणि माणसांचे एक वैशिष्ट्य म्हणजे दिवसा काम करणे व अन्न शोधणे. वनस्पतींची ताजी(हिरवी) पाने आणि पिकलेली फळे हा भरण-पोषणासाठीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. पाने व फळांच्या रंगांवरूनच त्यांचे कच्चे अथवा पिकलेपण प्राणीमात्रांना समजू लागले. अन्नशोध या प्राथमिक गरजेसाठी रंगज्ञान आवश्यक ठरलेले दिसते. त्या अनुषंगाने डोळे व मेंदूत तशा चेतायंत्रणा विकसित झालेल्या असाव्यात.

रंगदृष्टीदोष
डोळ्याद्वारा होणारे रंगज्ञान हे नैसर्गिक वरदान आहे. परंतु काही जणांच्या बाबतीत या संदर्भात कमतरता आढळते. अजिबात रंग न ओळखता येणारे लोक दुर्मिळ आहेत. परंतु रंग अर्धवटपणे ओळखणे किंवा दोन रंगांमध्ये गोंधळ होणारे लोक बऱ्यापैकी असतात. अशा लोकांना दैनंदिन आयुष्यात काही समस्या जाणवतात. कच्चे व पिकलेले फळ लांबून ओळखता न येणे, कपडे खरेदी करताना अनुरूप रंगांची निवड न जमणे आणि रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण दिव्यांचा रंग न समजणे ही त्याची ठळक उदाहरणे. या लोकांच्या बाबतीत रंग ओळखण्याचा गोंधळ असला तरी त्यांची मूलभूत दृष्टी मात्र स्वच्छ असते. रंगदृष्टीदोष हा विशेष तज्ञांचा प्रांत असून त्याची व्याप्ती बरीच मोठी आहे. या लेखात त्याचा थोडक्यात आढावा घेतो.

कारणमीमांसा
ज्या कारणांमुळे हा दृष्टीदोष उद्भवतो त्यामध्ये आनुवंशिक बिघाड हे प्रमुख कारण आहे. असा दोष जन्मजात असून तो प्रामुख्याने पुरुषांमध्ये आढळतो. स्त्रियांत तो तुलनेने खूप कमी असतो. याचे कारण थेट गुणसूत्रांच्या पातळीवरील आहे. पुरुषाची सूत्रे XY तर स्त्रीची XX असतात. रंगज्ञानासंबंधीची जनुके X गुणसूत्रावर असतात. त्यामुळे फक्त एका X मधील बिघाडाने देखील पुरुषात हा दोष उत्पन्न होतो. तर स्त्रीमध्ये दोष उत्पन्न व्हायला दोन्ही X मध्ये बिघाड असावा लागतो. एखाद्या स्त्रीची रंगदृष्टी वरकरणी जरी निकोप असली तरी तिच्या एका X गुणसूत्रात बिघाड असू शकतो. अशी स्त्री या दृष्टीदोषाची निव्वळ वाहक असते; तिला झालेल्या मुलग्यात हा दोष दिसू शकतो.

आनुवंशिक बिघाडामध्ये दोन प्रकारचे रंगदोष दिसून येतात :
१. लाल-हिरव्या रंगांचा पारखदोष : याचे प्रमाण सर्वाधिक आहे. हा दोष समाजातील ८% पुरुष तर अवघ्या अर्धा टक्के स्त्रियांमध्ये आढळतो.
२. निळ्या-पिवळ्याचा पारखदोष .
बिगर-अनुवंशिक कारणे अशी आहेत :
• वृद्धापकाळ
• अपघातात मेंदूला झालेली इजा
• दृष्टिपटलाची झीज होणारे आजार
• लेझर किंवा नीलातीत किरणांचा दीर्घ संसर्ग
• औषधांचे दुष्परिणाम : यामध्ये क्षयरोगावर दिले जाणारे ethambutol आणि पुरुषाच्या लैंगिक दुर्बलतेवर दिले जाणारे Viagra यांचा समावेश आहे.

व्यवसायिक मर्यादा
जन्मजात रंगदृष्टीदोष असलेल्या व्यक्तीला दैनंदिन जीवनात विशेष सरावाने ‘रंगज्ञान’ करून घ्यावे लागते. वाहतूक नियंत्रण दिवे ओळखणे हे त्याचे एक महत्त्वाचे उदाहरण. या यंत्रणेमध्ये वरपासून खालपर्यंत रंगीत दिव्यांचे क्रम ठरलेले असतात. ते जाणून (आणि अन्य लोकांचे अनुकरण करून) अशी व्यक्ती त्यांचा अर्थ समजून घेते. मात्र काही विशिष्ट नोकरी आणि व्यवसायांमध्ये असा दोष असलेल्या व्यक्तींना घेता येत नाही. अशा व्यवसायांची ही काही उदाहरणे :
रेल्वे व विमानाचे पायलट
• लष्करी सेवा
• भूगर्भशास्त्र अभ्यास

अशा व्यवसायांमध्ये इच्छुक उमेदवारांची निवड करताना त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये रंगदृष्टी चाचणीचा विशेष समावेश केलेला असतो.
वैद्यकीय पेशात सुद्धा खरेतर निरोगी रंगदृष्टीची गरज आहे. काविळीच्या रुग्णाचा रंग, सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारे विविध जंतू आणि पेशींचा रंग, तसेच विविध दुर्बिणींद्वारा केलेल्या शरीराच्या अंतर्गत तपासण्यांमध्ये रंग अचूक ओळखण्याचे महत्त्व नक्कीच आहे. भारतीय वैद्यक परिषदेचा एक पूर्वापार नियम होता, की वैद्यकीय शिक्षण-प्रवेश घेण्यासाठी रंगदृष्टी निरोगी पाहिजे. परंतु 2017 मध्ये या नियमाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाचा निकाल याचिकाकर्त्याचे बाजूने लागला. मग न्यायालयीन आदेशानुसार भारतीय वैद्यक परिषदेने समिती नेमून तो नियम काढून टाकलेला आहे (https://timesofindia.indiatimes.com/india/mci-agrees-to-allow-colour-bli...). जागतिक वैद्यक विश्वातही या मुद्द्यावर बराच खल झालेला आहे आणि तज्ञांत त्याबाबत मतांतरे आहेत.

सामान्य नागरिकांना रस्त्यावर स्वयंचलित वाहने चालवण्यासाठी जो परवाना काढावा लागतो त्यासाठी वैद्यकीय चाचणी द्यावी लागते. रंगदृष्टीची कमतरता असलेल्या नागरिकांना वाहन परवाना द्यावा की नाही यासंबंधी अनेक देशांमध्ये बरीच चर्चा आणि नियमबदल झालेले आहेत. भारतात 2020 मध्ये संबंधित मंत्रालयाने यासंदर्भात पत्रक काढलेले आहे (https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/mild-to-medi...). सौम्य ते मध्यम दोष असलेल्या व्यक्तींना वाहन परवान्यासाठी अडवले जाऊ नये असे त्यात म्हटले आहे. फक्त तीव्र दोष असलेल्या लोकांबाबत तज्ञांच्या मतानुसार निर्णय घेतला जावा असे निर्देश आहेत.

निदान चाचण्या

रंगदृष्टीदोषाचे निदान करण्यासाठी काही चाचण्या उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वात सोपी असलेली चाचणी म्हणजे Ishihara चाचणी. या चाचणीचे नाव Ishihara या जपानी संशोधकांवरून देण्यात आलेले आहे. तिचा चाळणी चाचणी म्हणून वापर केला जातो. यामध्ये एकूण ३८ चित्रांचे तक्ते असतात. प्रत्येक तक्त्यामध्ये विविध आकाराचे व रंगांचे ठिपके असतात. त्यांच्या दरम्यान एखादा अंक किंवा आकृती काढलेली असते (चित्र पाहा):

Ishihara_9.svg_.png

या ‘दडलेल्या” गोष्टी उमेदवाराने अचूक ओळखणे अपेक्षित असते. तक्त्यांची रचना आणि सूत्रे वेगवेगळी असतात. काही तक्त्यांमध्ये दाखवलेला अंक (किंवा आकृती) निरोगी व्यक्तीच बरोबर वाचते तर दोष असलेली व्यक्ती गोंधळते. या उलट अन्य काही तक्त्यांत याच्या बरोबर उलट सूत्र असते. उमेदवाराने प्रत्येक तक्ता विशिष्ट बल्बच्या प्रकाशात ३ सेकंदात ओळखायचा असतो. सर्व तक्ते दाखवून झाल्यानंतर संबंधिताने किती बरोबर ओळखले यावरून गुणांकन केले जाते. साधारणपणे 85% गुण मिळाल्यास रंगदृष्टी निकोप मानली जाते.(वरील चित्रातील अंक कोणता आहे ते वाचकांनी प्रतिसादात जरूर लिहावे !)

लहान मुले किंवा अशिक्षित व्यक्तीसाठी या तक्त्यांत काही वेगळ्या प्रकारच्या सुधारणा केलेल्या असतात, ज्यात अंक ओळखण्याऐवजी एखाद्या रंगीत रेषेचा मार्ग बोटाने तपासून पाहिला जातो. उमेदवार या चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यास याहून वरच्या पातळीवरील काही चाचण्या केल्या जातात. संशोधन पातळीवर Anomaloscope हे महागडे उपकरण वापरून अंतिम खात्रीशीर माहिती मिळवता येते.
एखाद्याला रंगदृष्टीदोष असल्याचे लहानपणीच समजल्यास चांगले असते. त्यादृष्टीने शाळांमध्ये अनौपचारिक प्रकारे चाचणी घेण्यासाठी The Curious Eye(https://www.thecuriouseye.org/) यासारखी पुस्तके आंतरजालावर उपलब्ध आहेत. त्यांचा वापर प्राथमिक चाळणी चाचणी म्हणून सामान्य माणसालाही करता येतो.

उपचार
अनुवंशिक असलेल्या या दोषावर तो “बरा” करणारा उपचार अजून तरी उपलब्ध नाही ! तडजोड म्हणून काही उपायांच्या मदतीने संबंधितांना रंगासंबंधीची कामे करताना थोडीफार मदत होऊ शकते. हे उपाय असे असतात :
१. विशिष्ट प्रकारची कॉन्टॅक्ट लेन्स एकाच डोळ्यात घालून वापरणे.

२. मोबाईल ॲप्स : यामध्ये विशिष्ट प्रकारचे रंग code स्वरूपात परिवर्तित करून दाखवले जातात.

3. Eyeborg : हे उपकरण दोष असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर बसवतात त्याला एक अन्टेना असते. तिच्या द्वारा विविध रंगांचे संदेश उपकरणात येतात. नंतर त्या संदेशांचे भिन्न ध्वनिलहरीमध्ये रूपांतर केले जाते.
एक मुद्दा स्पष्ट आहे. वरीलपैकी कुठल्याही उपायांनी ज्या प्रकारचा दृष्टिदोष आहे तो रंग मेंदूच्या पातळीवर “ओळखता” येत नाही. फक्त रंगांच्या संबंधित कामे करताना काही प्रमाणात साहाय्य होते.

समारोप
दृष्टीपटलातील शंकुपेशी आणि मेंदूच्या समन्वयातून आपल्याला रंगज्ञान होते. या क्षमतेमध्ये आनुवांशिक कमतरता असलेले बऱ्यापैकी लोक (प्रामुख्याने पुरुष) समाजात आहेत. या लेखाच्या वाचकांपैकीही काहीजण असे असू शकतील. त्यांना दैनंदिन व्यवहारापासून ते विशिष्ट व्यवसाय अंगीकारण्यात पर्यंत काही अडचणी व मर्यादा येतात. अन्य काही कौशल्यांच्या मदतीने त्यावर काही प्रमाणात मात करता येते. या सर्वांचा आढावा लेखात घेतला. तो वाचकांना उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.
......................................................................................................
दृष्टी या विषयावरील पूर्वीचे लेखन : ‘अ’ जीवनसत्व : निरोगी दृष्टीचा मूलाधार
https://www.maayboli.com/node/68592

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख !
वरची माहिती वाचून ...रंग ओळखण्यासाठी इतक्या कमी वेळात शरीरात एवढ्या संवेदना होणे व आपल्याला एक निमिषार्धात रंग सांगता येणे हा एक निसर्गाचा चमत्कारच वाटायला लागलाय. बाकी स्त्रीयांना रंगातला सूक्ष्म फरकही स्पष्ट कळतो याचा अनुभव अनेक वेळा घेतलाय. घरातले पुरुष सदस्य बऱ्याच गोष्टींना जेव्हा 'लाल रंगाच्या आहेत' असं म्हणतात, तेव्हा घरातील स्त्रिया हताश होऊन राणी कलर, गुलाबी, फ्युशा, बेबी पिंक, गेरू, गुलबक्षी, तांबडा, मरून, बर्गन्डी, शेंदरी, डाळंबी, गुलाली, कुंकू, जास्वंदी, किरमिजी अशी छटांची अधिक योग्य वर्गवारी करताना बघितले आहे व स्वतःही केली आहे. तरीही पुन्हा 'येरे माझ्या मागल्या' होतंच राहते. Happy

इथे रंगछटांबद्दल रोचक माहिती व दुवे सापडले आहेत.

ज्या प्रमाणे हिंबा या जमातीच्या लोकांमध्ये, रंगछटा ओळखण्याची क्षमता जास्त विकसित झाली आहे, त्याचप्रमाणे जगभरात सर्वसामान्य स्त्रियांची ही क्षमता सर्वसामान्य पुरुषांपेक्षा जास्त विकसित झालेली आहे काय? या मागे काही उत्क्रांतीसंबंधित कारणे असू शकतील काय? की तुम्ही दृष्टीदोष असण्याबद्दल जी कारणमीमांसा दिली आहे, तीच इथेही लागू होते?

आधी चर्चा झाली असल्यास क्षमस्व.

अस्मिता, साड्यांमध्ये तो एक रामा कलर की कायसा असतो तो कसा ओळखावा? बायकोने सांगितलेला रामा कलर मला कधी निळा वाटतो तर कधी हिरवा. एकदा मी उड्या मारत आलो आणि एक रंग दाखवून, हे बघ रामा कलर म्हणालो, तर म्हणे छे! हा मोरपंखी आहे. नशीब हे ७४ चे आकडे रामा कलर मध्ये नाहीयेत, नाहीतर मी घोळच घातला असता. अरे रामा!

सर्वांना धन्यवाद !
अस्मिता,
त्या दुव्यातील माहिती छान आहे. छटांची माहिती विस्तृत आहे.

माझ्या माहितीतील एक गृहस्थ साड्यांच्या दुकानात विक्रेते आहेत. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला.
ते म्हणाले की आम्ही एकावर एक तागे रचुन ठेवलेले असतात तेव्हा लांबून रंग सांगताना विविध स्त्रियांच्या रंग वर्णनामध्ये बरेच फरक आम्हाला ऐकायला मिळतात. त्या वर्णनातूनच आमचे रंग शिक्षण होत राहते !

हर्पा,
मोरपंखीच्या प्रमाणात पाककृती सांगतेय. रामा रंग म्हणजे teal रंगात हिरवा १५% जास्त, निळा तेवढाच आणि पांढरा २५% जास्त मिसळला तर जे काही होईल ते ! पण प्रत्येक स्त्रीची एकाच पदार्थाची पाककृती जशी वेगळी असू शकते तसेच रंगछटांचे परसेप्शनही वेगळे असू शकते. त्यामुळे आता त्यासाठी एकच उपाय म्हणजे महाभारतातल्या संजयसारखी बायकोची दृष्टी घेऊन दुकानात जावे लागेल, नाहीतर धृतराष्ट्रासारखे 'मामकाः पांडवाश्चैव' (मामकाः बायकोश्चैव) करत बसावे लागणार.. ! Proud

Do women see more colors than men ! इथे बघू शकता .

धन्यवाद कुमार सर. विषयच खूप रोचक आहे.

ह पा,
सर्वसामान्य स्त्रियांची ही क्षमता सर्वसामान्य पुरुषांपेक्षा जास्त विकसित झालेली आहे काय? >>>
"सर्व" स्त्रिया नाही.
मी हे मागच्या पानावर लिहिले आहे:

काही स्त्रियांमध्ये एक्स गुणसूत्रावर एक विशिष्ट प्रकारचा जनुकबदल झालेला असतो. त्यातून त्यांच्या दृष्टीपटलात ४ प्रकारच्या शंकुपेशी निर्माण होतात. (लेखात म्हटल्याप्रमाणे निरोगी व्यक्तीत फक्त ३ प्रकारच्या असतात). या चौथ्या प्रकारच्या पेशीमुळे अशा स्त्रियांना एका अतिरिक्त तरंगलांबीचा प्रकाश दिसू शकतो. याला रंगदृष्टीचे चौरंगी सूत्र असे म्हटले जाते. अशा स्त्रिया सामान्यांपेक्षा कित्येक पट अधिक रंग(छटा) पाहू शकतात.
…..

Concetta Antico या स्त्रीबद्दल बऱ्याच जालचर्चा वाचायला मिळतील.
https://www.popsci.com/article/science/woman-sees-100-times-more-colors-...
.....

अर्थात संपूर्ण निरोगी दृष्टी असलेल्या स्त्रीमध्ये चौरंगी सूत्र असू शकते काय, हा मात्र सध्या कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय आहे. कालांतराने त्यावर प्रकाश पडू शकेल

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख, कुमार सर
यातील X lined inheritance हे कॉलेजमध्ये असताना वाचलं होतं, त्याच्या नोट्स साठी Essentials of Human Genetics हे पुस्तक संदर्भासाठी वापरलं होत. पुढे जाऊन KEM मध्ये त्या पुस्तकाच्या लेखकांची भेट आणि ओळख झाली तेव्हा खूप भारी वाटलं होतं.
अवंतराबद्दल क्षमस्व

धन्यवाद अस्मिता आणि डॉ कुमार.

डॉक्टर, तुम्ही ते जे सांगितलं, ते फक्त काही स्त्रियांच्या बाबतीत आहे. पण मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त रंगछटा कशा ओळखू शकतात, त्यामुळे मी तसा प्रश्न विचारला होता. किंवा कदाचित ते कंडिशनिंग असावे.

अस्मिता,
(मामकाः बायकोश्चैव) करत बसावे लागणार >> Lol जबरी होता हा.

सर्वांना धन्यवाद !
..
१. X lined inheritance ..... .... पुढे जाऊन KEM मध्ये त्या पुस्तकाच्या लेखकांची भेट आणि ओळख >>>
वा ! सुंदर आणि रोमांचक अनुभव.
X lined हा अनुवांशिकतेचा हा प्रकार सर्वांना समजावा म्हणूनच वर विनीता आणि सुनीलचे उदाहरण दिले.
...
२. कदाचित ते कंडिशनिंग असावे. >>

बरोबर. अगदी योग्य शब्द वापरलात.
रंगज्ञानात व्यक्तिगत आकलनभिन्नता आहेच.

>>> नाहीतर धृतराष्ट्रासारखे 'मामकाः पांडवाश्चैव' (मामकाः बायकोश्चैव) करत बसावे लागणार.. !>>> मस्तच !!

>>>X lined हा अनुवांशिकतेचा हा प्रकार>>> असे अजून कुठले आजार असतात?

* असे अजून कुठले आजार असतात? >>>
लाल-हिरव्या रंगांचा पारखदोष यासारखी आनुवंशिकता :

Haemophilia A ( रक्त गोठण्याची दुर्बलता) Duchenne muscular dystrophy (स्नायूनाश) ही महत्वाची उदा.

धन्यवाद डॉ.
Haemophilia >>> माझ्या मित्राला आहे हा.

छान लेख !

आपल्या दोन्ही डोळ्यांना एकाच रंगाच्या वेगवेळ्या छटा जाणवतात का?

धन्यवाद .
आपल्या दोन्ही डोळ्यांना एकाच रंगाच्या वेगवेळ्या छटा जाणवतात का? >>>

चांगला प्रश्न आहे. याचे सुयोग्य उत्तर नेत्रतज्ञच देऊ शकेल.
मला एक जो संदर्भ मिळाला आहे (https://www.vox.com/science-and-health/2016/1/13/10761712/color-percepti...) त्यानुसार असे दिसते :
१. तरूण निरोगी दृष्टी असलेल्या व्यक्तीत दोन डोळ्यांच्या रंगज्ञानातील फरक अत्यंत सूक्ष्म (subtle) असतो. याचे कारण असे दिसते :
प्रत्येक डोळ्याच्या दृष्टीपटलातील शंकूपेशिंची घनता थोडीफार वेगळी असू शकते.

२. दुसरा मुद्दा रंजक असून तो म्हातारपणी लागू होईल. आपल्या डोळ्यातील भिंग प्रकाशातले नीलातित किरण गाळून टाकते. जेव्हा डोळ्यात मोतीबिंदू चालू होतो तेव्हा भिंगाचे गुणधर्म बदलू लागतात आणि मग या गाळण प्रक्रियेवर परिणाम होतो. प्रत्येक डोळ्यातील मोतीबिंदू पिकण्याची क्रिया ही वेगवेगळ्या गतीने चालू असते. तर अशा परिस्थितीत रंगज्ञानात फरक पडू शकेल.

**अर्थात हे विवेचन करणारा खात्रीशीर संदर्भ मला मिळालेला नाही.

वरील प्रश्नावरून सुचलेला अन्य मुद्दा महत्त्वाचा आहे. आपण जेव्हा सरळ एखाद्या प्रदेशाकडे बघत असतो तेव्हा दृष्टीचे दोन भाग असतात :

१. थेट सरळ दिसणे (मध्यवर्ती दृष्टी) आणि
२. डोळ्यांच्या कडामधून दिसणे (बाजूची दृष्टी)
या दोन दृष्टीतील रंगज्ञानात नक्की फरक आहे.

दृष्टीपटलातील शंकूपेशी या मध्यवर्ती भागात एकवटलेल्या असतात. त्यामुळे थेट सरळ पाहतानाचे रंगज्ञान उत्तम असते. याउलट डोळ्यांच्या कडामधून दिसणारे / जाणवणारे रंगज्ञान कमी दर्जाचे असते.

आभार !
.......
समजा, एखाद्या मुलाला रंगदृष्टीदोष असल्याचे शालेय वयातच लक्षात आले आणि त्याला चित्रकलेची मनापासून आवड असेल तर निराश व्हायचे कारण नाही. खालील जागतिक स्तरावर यश मिळवलेली उदाहरणे प्रेरणादायी ठरतील :

1. Clifton Pugh हे ऑस्ट्रेलियाचे नामवंत चित्रकार. त्यांना रंगदृष्टीदोष होता. त्यामुळे त्यांना इच्छा असूनही नौदलात प्रवेश मिळाला नाही. पुढे ते उत्तम दर्जाचे चित्रकार झाले आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली.

2. Jin Kim या कोरीआच्या कलाकारांनी Animation क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. त्यांनाही हा दोष होता.
३. Charles Meryon या फ्रेंच कलाकारांनी चित्रकले ऐवजी धातू-नक्षीकामात प्राविण्य मिळवले.
…..
रच्याकने,
ॲनिमेशन ला मराठी शब्द सुचवा.

रंगाचे आकलन आणि मानसिकता
एकच रंग जास्त प्रमाणात सर्वत्र दिसत असेल तर एक मानसिकता तयार होते... कदाचित विकृती... त्यातूनच रंग भेदाभेद उगम पावला असावा जसे की गोरा काळा...पण काळ्यांनी कधी गो-यांना छळल्याचे ऐकले नाही....

नेहमी प्रमाणे सुंदर, सोप्या शब्दात मांडलेली क्लिष्ट वैद्यकीय माहिती.... धन्यवाद

आभार !
....
रंगदोष असलेल्या व्यक्तींना सिग्नल ओळखायला मदत व्हावी म्हणून त्या दिव्यांच्या रंगाव्यतिरिक्त काही संकेतही असतात.
आपल्याकडे लाल दिवा गोल व स्थिर असतो, पिवळा चालू- बंद (ब्लिंक) होतो व हिरवा बाणाच्या स्वरुपात असतो.
अन्य देशांत काही वेगळे संकेत आहेत.
उदा. कॅनडामधील हे नियंत्रक दिवे पहा. प्रत्येक रंगाचा दिवा वेगळ्या आकाराच्या मुशीत बसवला आहे :

Colourblind_traffic_signal.JPG

लाल दिवा : चौरस चौकट
पिवळा दिवा : हिर्‍याच्या आकाराची
हिरवा : वर्तुळाकार

१९६८ च्या व्हिएन्ना कन्व्हेनशन नुसार ट्रॅफिकच्या खुणांचे मानकसंकेत (standard) ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार उभ्या सिग्नलमध्ये, सर्वात वर लाल सिग्नल, त्याच्याखाली पिवळा आणि त्याच्याखाली हिरवा सिग्नल असतो. सिग्नल क्षितिजाला समांतर (horizontal) असेल तर लाल, पिवळा, हिरवा असतो (on the side opposite to the direction of traffic).

बहुतेक ठिकाणी ही पद्धत वापरली जात असल्याने, रंगदोष असणाऱ्या व्यक्तींना विशेष त्रास होत नाही.

मीही ८% मधे आहे. मला वर दिलेल्या चाचणीतला आकडा अजिबात दिसत नाही. मायबोलीवर निळा रंग जास्त दिसतो याचे हेच कारण आहे. Happy
पण एक कामचलाऊ उपचार मला बर्‍याच वेळा उपयोगी पडतो (पण नेहमीच नाही) हा उपचार मला योगायोगाने सापडला.
मी अमेरिकेत ज्या भागात राहतो त्या भागात दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात पानगळ सुरु होते. त्यावेळेस झाडावरच्या पानांच्या छटा खूप सुंदर दिसतात. डोंगरच्या डोंगर अशा सुंदर दिसणार्‍या झाडांनी भरून गेले असतात. या रंगछटा पाहण्यासाठी (Fall colors) अनेक प्रवासी आमच्या भागात मुक्काम ठोकून असतात कारण निसर्गाचा हा खेळ फारतर १-२ आठवडे चालतो. पण मला अनेक वर्षे या छटा दिसतच नसत, त्यामुळे जरी घरातल्या माणसांबरोबर बाहेर पडलो तरी मला त्यात काही विशेष वाटत नसत. पण एक वर्षी असे पानगळीचे रंग पहायला गेलो होतो तेंव्हा कारच्या बाजुच्या खिडकीतून काच वर केली असताना मला एकदम खूप रंगछटा दिसू लागल्या. पण विशेष म्हणजे समोरच्या काचेतून काहीच वेगळे दिसत नव्हते. तेंव्हापासून मी थोडेतरी पानगळीचे रंग पाहू शकतो.

छान
**तेंव्हापासून मी थोडेतरी पानगळीचे रंग पाहू शकतो.
>>> रोचक अनुभव !

**Colour blind pal हे ॲप >>>
कोणाचा अनुभव असल्यास लिहा.

ह पा,
लेखातील हे बघा :

तडजोड म्हणून काही उपायांच्या मदतीने संबंधितांना रंगासंबंधीची कामे करताना थोडीफार मदत होऊ शकते. हे उपाय असे असतात :
१. विशिष्ट प्रकारची कॉन्टॅक्ट लेन्स एकाच डोळ्यात घालून वापरणे.

.... याच धर्तीवर काहीतरी होत असावे

म्हणजे, कारच्या काचेला एक रंग असेल तर त्या रंगातून बघताना काहीतरी कॉन्ट्रास्ट निर्माण होऊन एक वेगळी रंगजाणीव होत असावी.

काचेचे काही विशिष्ट गुणधर्म असतात
त्यानुसार प्रकाशकिरण जेव्हा त्यातून आरपार जातात तेव्हा विशिष्ट लहरी गाळल्या जातात.
पदार्थविज्ञानाचे अभ्यासक याबाबत अधिक काही सांगू शकतील.

Pages