त्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणी (भाग-१)

Submitted by पराग१२२६३ on 2 July, 2022 - 13:16

पुणे आणि सिकंदराबाददरम्यान धावणारी शताब्दी एक्सप्रेस 20 मार्च 2020 पासून बंद आहे. या जुलैमध्ये देशात पुन्हा धावायला लागणाऱ्या गाड्यांच्या यादीत या शताब्दीचं नाव नाही. ही शताब्दी सुरू होण्याची वाट पाहून मीसुद्धा कंटाळलो आणि या शताब्दीनं मी केलेल्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा देऊ लागलो.

पुणे सिकंदराबाद शताब्दी मध्य रेल्वेची एकुलती एक शताब्दी असल्यामुळं ही गाडी स्वच्छ, सुंदर ठेवण्याकडे आणि तिची सेवा कशी चांगली ठेवता येईल याकडे मध्य रेल्वेही जरा जास्तच लक्ष देत असे. नेहमीच्या सवयीप्रमाणे गाडी सुटायच्या आधी तासभर मी पुणे जंक्शनवर पोहचलो. बाहेरून एक गाडी दोन नंबरवर उभी दिसली. ती होती पुणे निझामुद्दिन होळी विशेष एसी एकस्प्रेस. सव्वापाचची तिची वेळ होती. त्यामुळे गाडी सुटण्याआधीची प्रवाशांची आणि रेल्वेचीही लगभग दिसत होती. ही गाडी सुटेपर्यंत मी त्याच फलाटावर रेंगाळून मग पाच नंबरवर शताब्दीच्या फलाटावर गेलो. गाडी लागली होतीच. आज नेहमीच्या गुत्ती शेडच्याऐवजी पुण्याचा WDP-4D हा कार्यअश्व आमच्या शताब्दीचं सिकंदराबादपर्यंत सारथ्य करणार होता. घड्याळात 5.40 होऊन गेले होते. आता रेल्वेचा कर्मचारी BPCवर गार्डची सही घेऊन आला आणि ते पुस्तक त्याने आमच्या लोको पायलट-मेलकडे दिले. त्यावर लोको पायलटने इंजिनातील ब्रेक पॉवरचं रिडिंग लिहिलं आणि नंतर तो कागद त्या कर्मचाऱ्याने लोको पायलटकडे दिला. अशा रितीने शताब्दी सुटण्याआधीची फलाटावरची सर्व प्राथमिक काही वेळातच ती जोडणी पूर्ण झाल्यावर मी माझ्या जागेवर बसायला गेलो. डबा पुढेच होता. दोनच महिन्यात तो पुन्हा पूर्ण overhaul करण्यासाठी जाणार होता. रेल्वेच्या 2016 मधल्या ऑपरेशन सुवर्णमधून या शताब्दीच्या डब्यांच्या अंतर्गत रचनेत सुधारणा करण्यात आली होती. त्यावेळी प्रत्येक सीटच्या प्रवाशाच्या डोके टेकण्याच्या बाजूला बदलता येणारी पोपटी रंगाची कव्हर्स लावली होती. ती काढून आता हिरव्या रंगाची सीटच्या वरच्या बाजूला पूर्ण कव्हर्स घातली गेली आहेत.

गाडी मोकळी असल्यामुळे तिघांच्या सीटवर शेवटपर्यंत मी एकटाच होतो. बरोबर 5.50 ला शताब्दी निघाली. लगेचच पोलिसांची गस्तही सुरू झाली होती. पाचच मिनिटांत आमच्या डब्यातील खानपान सेवेचे कर्मचारी सगळ्यांना पाण्याच्या बाटल्या देऊन गेले. एव्हाना गाडी लोणीच्या पुढे आली होती आणि शताब्दीनं चांगला वेगही घेतला होता. डब्याच्या आतील घडामोडी पाहता पाहता बाहेरच्या रेल्वेच्या हालचालींकडेही माझे स्वभावतःच लक्ष होते. बाहेर अजून उजाडलेलं नव्हतं, पण रेल्वेच्या हालचाली दिसत होत्या. वाटेत हडपसरला बीसीएन वाघिण्यांची मालगाडी विजेवरच्या इंजिनासह पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी सिग्नलची वाट बघत उभी होती. पुण्यातील नियंत्रकानेच ही गाडी तेथे थांबवून ठेवून प्रवासी गाड्यांना पुढे सोडण्याची सूचना हडपसरच्या स्टेशन मास्तरला केली होती. पुढे तीनच मिनिटांनी 12150 दानापूर-पुणे एक्सप्रेस आम्हाला क्रॉस झाली. त्यावेळी ती गाडी आणि शताब्दी यांच्या लोको पायलट आणि गार्ड यांच्यात नियमानुसार सिग्नलची देवाणघेवाण झाली. त्यापाठोपाठ पाचच मिनिटांनी 71416 सोलापूर-पुणे डेमू क्रॉस झाली. पुढे उरुळीमध्ये शताब्दी जरा हळू धावू लागली. शताब्दीच्या पलीकडच्या लाईनवर तपकिरी रंगाच्या दोन WAG-5 अश्वांसह बीसीएन वाघिण्यांची एक मालगाडी पुण्याकडे जाण्यासाठी सिग्नलची वाट बघत उभी होती. विभाग नियंत्रकाने (Section Controller) ही गाडी बाजूला उभी करून प्रवासी गाड्यांना मार्ग मोकळा करून देण्याची सूचना केली होती. सकाळच्यावेळी पुण्याकडे येणाऱ्या प्रवासीगाड्यांची संख्या जास्त असल्यामुळे मालगाड्यांना बाजूला ठेवावे लागत होते.

यवत स्थानकात आमच्या वाटेत येणारी दौंडच्या दिशेने जाणारी WAG-9 इंजिनासह धावत असलेली बीसीएन वाघिण्यांची मालगाडी नियंत्रकाच्या सांगण्यावरून रोखून धरण्यात आली होती. त्याचवेळी पुण्याच्या दिशेने जाणारी बीसीएन वाघिण्यांची एक मालगाडीही अप मेन लाईनवर थांबवून ठेवण्यात आली होती. तोपर्यंत डब्यात तपासनीसही आला होता हातात टॅब घेऊन. आमची सर्वांची तिकिटे तपासून होत असतानाच सकाळच्या चहाचं किट दिलं गेलं, बिस्किटे, चहा-साखर-दूध पावडरचे सॅशे आणि थर्मासमध्ये गरम पाणी. त्या मास्क घालून बसलेल्यानं चहा नको म्हणून सांगितलं. आता बाहेर हळूच उजाडायला लागलं. त्यावेळी बाहेर गच्च धुकं असल्याचं दिसलं. या धुक्यातून वाट काढत जाणाऱ्या शताब्दीत बसून गरमागरम चहा पिण्याची मजा काही औरच! सहा बत्तीसला केडगाव ओलांडताना शताब्दीचा वेग कमी होता. कारण डाऊन मेन लाईनवर दौंडकडे जात असलेली कंटेनरची मालगाडी रोखून धरली होती आमच्यासाठी. त्यामुळे शताब्दीला लूप लाईनवरून पुढे जाण्यावाचून पर्याय नव्हता. त्या मालगाडीला भेल कंपनीने तयार केलेल्या तीन रंगांच्या आणि WAP-4 इंजिनाप्रमाणे ठेवण असलेले WAG-7 इंजिन जोडलेले होते. पुढे केडगावच्या होम सिग्नल पिवळा होता आणि त्यावरील रुट सिग्नलही लूपवरून जायचे असल्याचे दर्शवत होता. पावणेसात झाले होते. पाटस आले होते. तेथे डेमूचा रिकामा रेक लूप लाईनवर WAG-9 इंजिनासह शताब्दी पुढे जाण्याची वाट बघत उभा होता. आता सगळ्यांचा चहा घेऊन झाला होता आणि डब्यातल्या आणखी काही प्रवाशांनीही मास्क लावला होता.

आता काकीनाडा पोर्ट-लोकमान्य टिळक (ट) एक्सप्रेस WDP-4D इंजिनासह पुण्याच्या दिशेने निघून गेली. धुकं कमी झालं असलं तरी दौंडचा होम सिग्नल ऑन असल्यामुळं आधी हळुहळू जात असलेली शताब्दी पुढे 3 मिनिटं थांबली. तो सिग्नल हिरवा झाल्यावर दौंडमध्ये शताब्दी शिरली. दौंडच्या होम सिग्नलच्या थोडं पुढेच नवीन बायपास लाईन आणि फलाट उभारण्याचं काम सुरू आहे. त्यानंतर थोड्याच अंतरावर WAP-4 इंजिनाबरोबर धावत असलेली 22132 ज्ञानगंगा एक्सप्रेस फलाटाच्या पुढे थांबलेली होती. दौंडच्या एक नंबरच्या पलीकडच्या जागेत वेगवेगळे अश्व आपली ड्युटी येऊपर्यंत विश्रांती घेत होते. अखेर 7-04 ला दौंड जंक्शन ओलांडले. दौंडनंतर शताब्दीने परत वेग घेतला.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/07/1.html

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख वाचला छानच आहे. फक्त ते शी र्षक थोडे बदलता येते का ते बघा. शेवटचा प्रवास वाचून जरा हबकायला होते आहे.

जसे ते एक उत्तम ट्रे किंग चे किट आहे नाव काय तर स्वर्गारोहिणी.

कोरोना काळात बंद केलेल्या आणि अजूनही चालू न झालेल्या पॅसेंजर ट्रेन्सबाबत कधीतरी लिहा. तुमचे सरकार गरिबाला मारत आहे.

छान लिहीले आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
शताब्दीच्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणी …… त्या वाचून वाटते कि कोणतरी मरणार आहे.

Atleast shatabdi cha last journey ase tari liha. Title is depressing a bit.