क्रिप्टो ( Crypto) भाग - ३०

Submitted by मिलिंद महांगडे on 2 July, 2022 - 07:56

₿₿₿

" सर तुम्ही बोलावलंत का ? " , म्हणत अमरने वाघचौरे साहेबांच्या केबिनमध्ये जाऊन कडक सॅल्युट मारला.
" ये ये , बस …. आणि अभिनंदन ! वरिष्ठांनी आपल्या टीमचं अभिनंदन केलं आहे . हा बघ मेसेज आलाय … आणि या 26 जानेवारीला उत्कृष्ट कामगिरीबद्दल आपल्याला अवॉर्ड पण जाहीर झालाय. " , म्हणत त्यांनी त्यांचा मोबाईलमधला व्हॉटस अप मेसेज दाखवला .
" वा सर ! हे छान झालं … " , म्हणत त्याने फोन बघून पुन्हा त्यांच्याकडे दिला .
" का रे ? काय झालं ? तुला आनंद नाही झाला का ? "
" झाला ना सर ! ", कसनुसं तोंड करीत अमर म्हणाला .
" मग चेहऱ्यावर दिसत नाही तुझ्या ? "
" तसं नाही सर , पण हे सगळं काय चालू आहे काही लक्षात येत नाही . काहीतरी मिसिंग आहे असं सारखं वाटतंय मला. "
" आता काय राहिलंय ? सगळं तर सुरळीत झालं . आपल्या इतिहासात नव्हती इतकी मोठी रिकव्हरी आपण केली . जवळपास 1000 करोड रुपये ! ही साधी बाब नाही ! लोकांना त्यांचे पैसे मिळाले . आता उद्या त्या केसचा अंतिम निकाल आहे , आणि निकाल काहीही लागला तरी आपल्याला काही फरक पडत नाही . आपण आपलं काम योग्य पद्धतीने केलं आहे . " वाघचौरे साहेब त्याला समजावत म्हणाले.
" त्या सौदामिनी आणि चिकटेचं काय ? ते कोण होते ? कशासाठी आले होते ? मान्य आहे , त्यांनी आपल्याला मदत केली, पण मग ते अचानक गायब का झाले ? कुठे गेले ? त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध होता ? हे सगळे प्रश्न मला सतावतायत … " अमर म्हणाला .
" हम्म … ते प्रश्न तर मलाही पडलेत . पण आता त्यावर विचार करून काही फायदा नाही . आपली केस रागिणी ,ओमी आणि त्यांच्या बिटकॉईन एक्स्चेंजबद्दल होती . ती तर सोल्व्ह झाली ना ? "
" बरोबर आहे , त्यातही एक प्रश्न राहतोच , त्या ओमी मिरचंदानीचा नक्की मृत्यू झाला की त्याचा खून झाला ? "
" हे बघ , सकृतदर्शनी तर त्याचा मृत्यू झाला असंच म्हणावं लागेल , कारण तसे पुरावे आहेत . तुही लेहला जाऊन आलास , तिथल्या डॉक्टरांना भेटलास … त्याचं डेथ सर्टिफिकेट आहे आपल्याकडे . या उपर आणखी काय पुरावा पाहिजे ? "
" हम्म … बरोबर आहे सर … पण तरीही यात त्या रागिणीचा काहीतरी हात आहे , असं मला वाटतंय . "
" जाऊ दे , तू खूप विचार करतोयस … मला वाटतं तुला जरा आरामाची गरज आहे . तू एक काम कर , सुट्टी घे आणि फॅमिलीला घेऊन कुठेतरी फिरून ये … मी तुझी सुट्टी मंजूर करतो … " वाघचौरे साहेब असं म्हणाले त्यावर तो तोंडदेखलं हसला . साहेबांना सॅल्युट करून केबिनबाहेर पडला , तरीही मघाचे प्रश्न त्याच्या डोक्यात अजूनही पिंगा घालत होते .

₿₿₿

आज निकालाचा दिवस होता, न्यायालयात आणि न्यायालयाबाहेर लोकांची भलतीच गर्दी झाली होती. बाहेर गोंधळ आणि न्यायालयात स्मशान शांतता पसरली होती. जजसाहेब आले, तसे सर्वजण उभे राहिले. जजसाहेबांनी एकदा संपूर्ण कोर्टरूमवर नजर फिरवली . सर्वजण आतुरतेने त्यांच्या निकालपत्राची वाट पाहत होते.
" सर्व साक्षीदारांच्या जबान्या आणि पुरावे तपासून कोर्ट या निर्णयावर आले आहे की, क्रिप्टो कॉइन एक्स या बिटकॉईन एक्स्चेंजचे मालक ओमी मिरचंदानी यांच्या अकस्मात मृत्यूमुळे काही दिवस गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती . परंतु या केसमध्ये जेवढे बिटकॉईन नाहीसे झाले होते, जवळपास तेवढे बिटकॉईन परत मिळाले आहेत. मिसेस रागिणी यांनी बिटकॉईन रिकव्हर करण्यात पोलिसांना मदत केली ही बाब नाकारून चालणार नाही. त्यात त्यांचा हेतू चांगला होता , आणि त्यावर शंका घेता येणार नाही. त्यामुळे हे कोर्ट मिसेस रागिणी यांची निर्दोष मुक्तता करत आहे . "
माननीय न्यायालयाने निकाल जाहीर केला. सामुदायिक सुटकेचा निश्वास संबंध कोर्टात उमटला. रागिणी मटकन खुर्चीत बसली . तिने डोळे मिटून घेतले . मनातल्या मनात देवाचे आभार मानले . डोळे उघडले त्यावेळी तिच्या समोर मेघनाद उभा होता , त्याच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होते. वाघचौरे साहेब रागिणीच्या जवळ आले , त्यांनी तिचे अभिनंदन केले . रागिणी आता सर्व आरोपांतून मुक्त झाली होती .
त्या दिवशी सगळ्या मीडियाला जणू ऊत आला होता. जिथे बघावं तिथे रागिणीचा फोटो आणि तिचीच बातमी सुरु होती.
मेघनाद आणि रागिणी घरी आले. दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि दीर्घ चुंबन घेतले.
“ मेघ , आता पुढे काय ? ”, रागिणीने विचारलं.
“ आता ? ” विमानाचा आवाज काढत मेघनादने उजवा हात विमानासारखा हवेत उडवला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users