क्रिप्टो ( crypto ) भाग - २७

Submitted by मिलिंद महांगडे on 27 June, 2022 - 09:08

₿₿₿

सकाळी व्हॉट्सअपच्या नोटिफिकेशनमुळे रागिणीला जाग आली. डोळे चोळत तिने मोबाईल पाहिला. एका नाव नसलेल्या परंतु परिचित असलेल्या नंबरवरून मेसेज आला होता . तो नंबर मेघनादचा होता .
" आपलं अर्ध काम झालं . पोलीस कधीही तुझ्याकडे येतील . बी प्रिपेअर्ड ! "
" म्हणजे पोलिसांना कोल्ड वॉलेट मिळालं का ? " तिने मेसेजवर विचारलं .
" हो, काल रात्रीच मिळालं . " पलीकडून रिप्लाय आला.
" पण मग माझ्याकडे कशाला येतील पोलीस ? "
" कारण ओमी मिरचंदानी तुझा नवरा आहे . आणि त्या कोल्ड वॉलेटचा सिक्रेट पिन तुझ्याकडे आहे … "
" ओह ! मला वाटलं होतं , पोलीस तो पिन शोधून काढतील ! " , तिने टाईप केलं .
" ते तेवढं सोपं नाही . कॉम्प्लिकेटेड आहे . त्यांना तुझी मदत लागणारच ! यात आपले दोन फायदे आहेत . "
" कोणते ? "
" ते तुला आपोआप कळेल . फक्त पोलिसांनी कोल्ड वॉलेटच्या सिक्रेट पिनबद्दल विचारलं तर फार आढेवेढे न घेता पिन देऊन टाक ! " , मेघनादने पलीकडून लिहिलं .
" ओके . तू येणार आहेस का ? "
" नाही . तुला एकटीलाच मॅनेज करावं लागेल . ओके ना ? "
" ओके , डोन्ट वरी "
" तो इन्स्पेक्टर अमर जरा जास्त हुशार आहे . त्याचं काय करायचं ? " , त्याने विचारलं .
" त्याची काही काळजी नाही . आय कॅन हँडल हिम ! "
" दॅट्स माय गर्ल ! बाय " असं लिहून त्याने चॅटिंग बंद केलं . रागिणी बेडवरून खाली उतरली . मेघनादच्या मेसेजमुळे तिच्यात एक उत्साह संचारला. आता या नाटकाचा अंतिम अंक सुरू होणार होता . तिने पटापट आवरायला सुरुवात केली . छान तयार झाली . हलकासा मेकअपही केला. मन मोहवून टाकणारा सुगंधित सेंट फवरला. आता ती शेवटच्या अंकासाठी तयार झाली होती.

₿₿₿

" साहेब , पक्षप्रमुख फोनवर आहेत . " , प्रतापराव बोडकेपाटलांचा पी ए एका हातात मोबाईल घेऊन त्यांना सांगत होता . प्रतापरावांनी घाईघाईने तो फोन घेतला .
" नमस्कार साहेब … होय साहेब … होय आता झाली चूक … साहेब , तुम्ही नाही सांभाळणार तर कोण सांभाळणार …. तुम्ही जे सांगाल ते …. बरं ..… थोडे जास्त होतात ….. नाही , मला कल्पना आहे , बऱ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागणार आहेत …. ठीक आहे …. मी पाठवतो …. पण तेवढं लक्ष ठेवा साहेब …. ओके …. " , असं म्हणत त्यांनी फोन बंद केला आणि त्यांच्या पी ए कडे दिला . बाजूला ठेवलेल्या काचेच्या ग्लासातलं पाणी त्यांनी प्यायलं. कपाळावर जमा झालेला घाम रुमालाने टिपून घेतला आणि एक निश्वास सोडला . समोर त्यांचा पी ए अदबीने उभा होता . त्यांनी एकदा त्याच्याकडे पाहिलं .
" एक महत्त्वाचं काम आहे . तुम्ही स्वतः जाणार आहात . " , खासदार साहेब म्हणाले .
" होय साहेब … "
" बाकी कुणाला काहीही कळता कामा नये . " , असं म्हणत त्यांनी टेबलाच्या एका कप्प्यात ठेवलेली काळ्या रंगाची ब्रिफकेस बाहेर काढली . " माझी गाडी घेऊन जा . आणि ही ब्रिफकेस डायरेक्ट साहेबांकडे द्यायची . समजलं ? लगेच निघा . "
" होय साहेब . " , असं म्हणत प्रतापरावांच्या पी ए ने ती ब्रिफकेस उचलली आणि ते निघून गेले . प्रतापराव खुर्चीत मागे रेलून बसले . एक सुटकेचा निश्वास त्यांनी टाकला. ते विचारांच्या गर्तेत बुडाले . मागचा सगळा प्रवास एखाद्या चित्रपटासारखा त्यांच्या डोळ्यांसमोर तरळून गेला . पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते खासदार हा प्रवास मोठा विलक्षण होता . इथपर्यंत येण्यासाठी काय नाही केलं आपण ! सर्व काही आहे पण तरीही एक पोकळी जाणवत होती. एका मोठ्या शून्यात आपण आहोत असं त्यांना वाटून गेलं. खुर्चीत बसल्या बसल्या त्यांचा डोळा लागला. त्यानंतर मीडियामध्ये प्रतापराव बोडकेपाटील यांच्या विरोधातल्या बातम्या अचानक बंद झाल्या .

₿₿₿

अमर गाढ झोपला होता , सलग २४ तासांच्या वर काम केल्याने त्याला बराच थकवा आला होता. तरी सवयीप्रमाणे त्याला सकाळी जाग आली. वाघचौरे साहेबांचा फोन आला तेव्हा अमर नुकताच झोपेतून उठला होता .
" जय हिंद सर ! " , अमर म्हणाला .
" अरे , झोप झाली का नाही ? " , साहेबांनी विचारलं .
" येस सर , आत्ताच उठलो आहे , मी अर्ध्या तासात पोहोचतो पोलीस स्टेशनला . " , धडपडत उठत अमर म्हणाला .
" बरं , सौदामिनी मॅडमना सुद्धा फोन करून बोलावून घे . आणि लवकर ये . "
" येस सर ! " म्हणत त्याने फोन ठेवला . आणि पटापट आवरायला घेतलं. काल एवढं दमला होता , तरी आज त्याला एकदम मस्त वाटत होतं. अंघोळ , दाढी करून तो पोलीस स्टेशनला जायला तयार झाला . त्याने सौदामिनी मॅडमचा नंबर डायल केला , पण तो स्विच ऑफ येत होता . सौदामिनी मॅडम अजून उठल्या नाहीत वाटतं . मनाशी म्हणत तो आवरू लागला . अर्ध्या तासात तो पोलीस स्टेशनला पोहोचला . थेट साहेबांच्या केबिनमध्ये शिरला आणि कडक सॅल्युट मारला .
" ये बस … सौदामिनी मॅडम कुठे आहेत ? " , साहेबांनी विचारलं .
" त्यांचा फोन स्विच ऑफ येतोय सर , बहुतेक झोपल्या असतील , दमल्या होत्या त्या , त्यांना अशा प्रकारच्या कामाची सवय नसेल ." , अमर म्हणाला .
" हम्म … पण बाई हुशार आहे . तिच्यामुळेच तर आपल्याला ते कोल्ड वॉलेट सापडलं . " , वाघचौरे साहेब कौतुकाने म्हणाले . अमरने त्यांना दुजोरा दिला . " अमर , त्या आठ आकडी पिन बाबत काही विचार केला आहे का ? " वाघचौरे साहेबांनी विचारलं .
" नाही सर , आपल्याला त्याबाबत काहीही करता येणार नाही . "
" मग आता पुढे काय ? "
" आता एकच पर्याय आहे , थेट रागिणीलाच विचारायचं … पिन बाबत .दुसरं काही करता येणार नाही सर ! " , अमर म्हणाला. त्यावर वाघचौरे साहेब विचारात पडले.
" मला वाटतं आपण सौदामिनी मॅडम येईपर्यंत थांबुया. त्यांचाही विचार घेऊ, कदाचित त्यांच्याकडे काही सोल्यूशन सापडेल … बघ त्यांचा फोन लागतोय का ? " , वाघचौरे साहेब म्हणाले. अमरने फोन लावून पाहिला , याही वेळी फोन स्विच ऑफ येत होता .
" स्विच ऑफ येतोय सर ! या आधी त्यांचा फोन कधी फोन स्विच ऑफ येत नव्हता सर ! ", अमर म्हणाला.
" ठीक आहे , बघू थोडा वेळ वाट ! " , तोपर्यंत काही सुचतंय का पाहू . " , वाघचौरे साहेब म्हणाले , पण अमरला काही सुचत नव्हतं. या प्रकरणात काही वेगळं सोल्युशन निघेल असं त्याला काही वाटत नव्हतं. तो तसाच या केसची फाईल पुढ्यात घेऊन बसून राहिला. इतक्यात केबिनच्या दरवाज्यावर टक टक केलेलं ऐकू आलं. वाघचौरे साहेब आणि अमरने एकदम दरवाज्याच्या दिशेने पाहिलं. दरवाज्यावर दोन जण उभे होते. दोघेही पंचेचाळीस पन्नास वयाचे वाटत होते. त्यातल्या एकाला टक्कल पडलेलं होतं , दोघांच्या अंगावर ऑफिसर घालतात तसे व्यवस्थित कपडे होते.
" आम्ही आत येऊ शकतो का सर ? " , त्यातल्या टक्कल पडलेल्या व्यक्तीने विचारलं .
" या , कोण आपण ? " , वाघचौरे साहेबांनी विचारलं .
" सर , वाघचौरे साहेब आपणच ना ? "
" होय . बोला " , वाघचौरे साहेबांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह अजूनही तसंच होतं .
" सर , आम्ही एस एफ आय ओ मधून आलोय …. सिरीयस फ्रॉड इन्वेस्टिगेशन ऑफिस. आम्हाला या केसवर काम करण्याचे आदेश आहेत . हे बघा आदेश ! " , असं म्हणत त्या टक्कल पडलेल्या व्यक्तीने एक फाईल वाघचौरे साहेबांच्या समोर धरली . वाघचौरे साहेब त्या फाईलकडे आणि त्या दोन व्यक्तींकडे आळीपाळीने बघत राहिले .
" तुम्ही कोणत्या ऑफिस मधून आलात म्हणालात ? " , अमरने विचारलं .
" सिरीयस फ्रॉड इन्वेस्टिगेशन ऑफिस. " एकेक शब्दावर जोर देत समोरचा व्यक्ती म्हणाला .
" कसं शक्य आहे , तुमच्या ऑफिसच्या सौदामिनी मॅडम आधीच आमच्या सोबत काम करत आहेत . सौदामिनी मॅडमना ओळखता ना तुम्ही ? " , वाघचौरे साहेबांनी विचारलं .
" सौदामिनी मॅडम ? अशा नावाच्या कुणी ऑफिसर नाहीत आमच्या डिपार्टमेंटला . सौदामिनी मॅडम माहीत आहेत का तुला ? " त्या टक्कल पडलेल्या व्यक्तीने त्याच्या सोबत आलेल्या दुसऱ्या व्यक्तीला विचारलं . त्यावर त्याने नकारार्थी मान हलवली . " नाही साहेब , आमच्या डिपार्टमेंटमध्ये सौदामिनी नावाच्या कोणी ऑफिसर नाहीत ."
" काय सांगता काय ? असं कसं होईल ? बरं चिकटे नावाचे कुणी आहेत का ? " , अमरने विचारलं .
" चिकटे ? नाही … चिकटे नावाचं सुद्धा कोणीही नाही ." समोरचा व्यक्ती म्हणाला .
" एक मिनिट ! काहीतरी कन्फ्युजन आहे . " असं म्हणत वाघचौरे साहेबांनी त्याच्या ड्रॉवर मधून एक फाईल काढली आणि त्यातून एक पत्र काढलं . " हे बघा , हे तुमच्या ऑफिसचं पत्र आहे की नाही ? " वाघचौरे साहेबांनी विचारलं . त्या व्यक्तीने ते पत्र निरखून पाहिल्यासारखं केलं अन म्हणाला , " शिक्का तर आमच्याच ऑफिसचा आहे . पण अशा नावाचं कोणीच नाही आमच्या ऑफिसमध्ये . "
" अमर , सौदामिनी मॅडम ना फोन लाव … " , वाघचौरे साहेबांनी आदेश दिला . अमरने त्यांचा नंबर डायल केला , पण अजूनही फोन स्विच ऑफ येत होता . त्याने नकारार्थी मान हलवली . " त्या चिकटेचा फोन लाव . " वाघचौरे साहेब म्हणाले . अमरने चिकटेंचा नंबर डायल केला
" आऊट ऑफ कव्हरेज एरिया येतोय सर . " अमर असं म्हणाला आणि प्रथमच वाघचौरे साहेबांच्या चेहऱ्यावर चिंतेची झाक दिसू लागली. अमरने त्यांना बाजूला घेतलं आणि त्यांच्या कानात म्हणाला , " सर , हे कोण आहेत माहीत नाही , कदाचित कुणी तोतया ऑफिसर असू शकतात , मी त्यांच्या ऑफिसला फोन करून पडताळणी करतो , तोपर्यंत तुम्ही यांना इथेच बसवा आणि चहा पाणी करा , मी लगेच परत येतो ." वाघचौरे साहेबांनी मानेनेच होकार दिला . अमर तातडीने केबिनबाहेर आला . त्याने पुन्हा एकदा सौदामिनी मॅडमना कॉल करायचा प्रयत्न केला पण व्यर्थ ! त्याने लगेच एस एफ आय ओ ची वेबसाईट ओपन केली त्यातून ऑफिसचा नंबर मिळवला आणि त्या ऑफिसला फोन लावला . इकडे वाघचौरे साहेबांनी त्या दोघांना बसवले , आणि त्यांच्यासाठी चहा मागवला . मग उगाचच अवांतर गप्पा मारू लागले . खरं तर त्यांचं लक्ष केबिनच्या दारावर होतं , अमरने पडताळणी केली आणि हे दोन जर तोतया निघाले तर या दोघांना इथेच थर्ड डिग्री द्यायचा त्यांचा विचार होता . पण त्याच वेळी त्यांचं दुसरं मन सौदामिनी मॅडम भोवती विचार करू लागलं . सौदामिनी मॅडम ज्या दिवशी पहिल्यांदा त्यांना भेटायला आल्या, तो दिवस त्यांना आठवला. एकदम तडफेने त्या आल्या होत्या , मिसेस रागिणीची चौकशी करतानाही त्यांनी फार उत्साह दाखवला होता. त्या दोघींची खडाजंगीच होत होती. शिवाय ओमी मिरचंदानीचा लॅपटॉप सुद्धा तिच्याच माणसाने डिकोड केला होता . आणि …. विचार करता करता अचानक त्यांच्या डोक्यात हजारो दिव्यांचा प्रकाश पडला. ओमी मिरचंदानीच्या लॅपटॉप मधल्या कोड्याचं उत्तर सुद्धा तिनेच सोडवलं आणि बाणगंगेत लपवून ठेवलेलं बिटकॉईनचं कोल्ड वॉलेटसुद्धा तिलाच सापडलं होतं . म्हणजे तिला हवं तेव्हा , आणि हवं तसं ती आपल्याला नाचवत होती ! पण या मागे तिचा काय फायदा ? ती कशाला आपल्या मदत करेल ? कदाचित तिच्या मागे कुणाचा तरी हात आहे , पण कुणाचा ? अरे देवा ! अशी चूक आपल्या हातून कशी झाली ? थोड्या वेळाने अमर केबिनमध्ये आला. त्याच्या पडलेल्या चेहऱ्यावरून वाघचौरे साहेब काय समजायचं ते समजले .

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्विस्ट!
येऊ द्या पुढचे भाग. मस्त चाललंय.