क्रिप्टो ( Crypto ) भाग - २६

Submitted by मिलिंद महांगडे on 25 June, 2022 - 02:28

₿₿₿

ओमी मीरचंदानीचा लॅपटॉप ओपन करण्यात सौदामिनी मॅडम आणि चिकटे यांना यश आल्याने या केसमध्ये पुढील धागेदोरे पोलिसांच्या हाती आले. लॅपटॉपमधल्या कोड्याची उकल झाल्यावर सायबर क्राईमची टीम तात्काळ साऊथ मुंबईतल्या बाणगंगेला जायला निघाले. मलबार हिल परिसरातला बाणगंगा तलाव , त्या आजूबाजूची मंदिरे , बाणगंगा तलावात उतरण्यासाठी चारही बाजूंनी बांधलेल्या पायऱ्या , निळ्याशार पाण्यात मुक्तपणे विहार करणारी पांढरीशुभ्र बदके , हे सर्व एक विलोभनीय दृश्य होते. काही पर्यटक या भागात फिरत होते , काही जण उत्तरकार्य करण्यासाठी पायऱ्यांवर बसलेले होते . सायरन वाजवत सायबर क्राईमची टीम बाणगंगा परिसरात दाखल झाली . पोलिसांनी संपूर्ण तलावाला घेराव घातला . तिथे फिरणाऱ्या पर्यटकांना आणि लोकांना तिथून निघून जाण्यास सांगितले . या असल्या प्रकारामुळे आजूबाजूचे लोक बिथरून गेले .
" क्या सर , क्या हुआ ? कुछ बॉम्ब वगैरे रखा है क्या इधर ? " , एकाने अमरला विचारलं . त्याची काही चूक नव्हती, मोठ्या प्रमाणावर पोलीस दिसले की , सामान्य मुंबईकराला हीच भीती !
" नय , कुछ नय … चलो , निकलो इधरसे … " , अमरने त्याला उडवाउडवीची उत्तरे देऊन त्याला तिथून पिटाळले . एकूणच कामधंदे नसलेल्या लोकांना बऱ्याच चौकशा असतात. पोलीस बाणगंगा परिसरात आले ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली . खूप लोक तलावाच्या परिसरात जमा झाले , पोलिसांना बॅरिगेट्स लावावे लागले . आता इतका गोंधळ झाला म्हटल्यावर पत्रकार आणि न्यूज चॅनलचे रिपोर्ट्स त्या भागात आले नसते तर नवल होतं . त्यांनी वाघचौरे साहेबांना घेराव घालून प्रश्न विचारायला सुरुवात केली , पण त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला , मग न्यूजचॅनलवाल्यांनी आपापल्या परीने जे घडतंय त्याचं चित्रीकरण करायला सुरुवात केली . बाणगंगेला एखाद्या छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. ओमी मिरचंदानीच्या लॅपटॉपमधल्या कोड्यानुसार बाणगंगेचा ठिकाणी खजिना सापडेल असं सूचित केलं होतं , खजिना सापडेल म्हणजे नक्की काय याबाबत मात्र काहिही माहिती नव्हती .
" सर , आपण इथे आलोय खरे , पण नक्की काय शोधायचंय ? " , अमरने हळू आवाजात वाघचौरे साहेबांना विचारलं .
" खजिना ! ओमी मिरचंदानीच्या कोड्यात तर तेच लिहिलंय ना ? "
" तेच सर , म्हणजे नक्की काय शोधणार आपण ? " अमरने पुन्हा विचारलं .
" मला वाटतं , ओमीने त्याच्या एक्स्चेंजचे बिटकॉईन एका कोल्ड वॉलेटमध्ये ठेवले असल्याचं आधी बोललं जात होतं … कदाचित असं काहीतरी डिव्हाईस , किंवा बिटकॉईन ठेवण्यासाठीचं एखादं वॉलेट या परिसरात त्याने लपवलं असणार असं मला वाटतंय … " , सौदामिनी मॅडम म्हणाल्या .
" येस ! मॅडम … अगदी बरोबर ! आपल्याला असंच एखादं डिव्हाईस शोधायचं आहे … , चला लागा कामाला . " असं म्हणून सर्वजणांनी शोधकाकार्याला सुरुवात केली . बराच वेळ शोध घेऊनही काही सापडेना , आजूबाजूची मंदिरे तपासली . दीपमाळा तपासल्या , परंतु काहीच हाती लागले नाही . अशातच अंधार पडू लागला . दिवसभर प्रयत्न करूनही काही सापडले नाही तर आता रात्रीच्या अंधारात काय सापडणार ? असा विचार अमरच्या मनात आला , परंतु वाघचौरे साहेब भलतेच पेटले होते , त्यांनी फ्लड लाईट्स मागवले आणि सगळा परिसर प्रकाशमान करून टाकला . आणखी पोलीस मागवले . इकडे मीडियाच्या लोकांना काहीही माहिती मिळत नसल्यामुळे ते काहीही तर्कवितर्क करू लागले. अगदी सौदामिनी मॅडम आणि त्यांचा असिस्टंट चिकटेही या शोधकार्यात सामील झाले होते. परंतु बराच वेळ शोधूनही काही सापडत नव्हते , वेळही बराच झाला होता , आता हे शोधकार्य थांबवावं असं वाघचौरे साहेबांना वाटलं. त्यांनी तसं जाहीर केलं. सर्वजण कंटाळून निघणार, तेवढ्यात सौदामिनी मॅडम अचानक म्हणाल्या , " सर, बाणगंगा तलावात ज्या गोमुखातून पाणी येतंय , त्याच्या गळ्यात काहीतरी चमकल्या सारखं दिसलं … "
" काय दिसलं ? " , त्यांनी आशेने विचारलं .
" काय आहे माहीत नाही , आपल्याला त्या कोपऱ्यात जाऊन बघावं लागेल … " , असं म्हणून त्या तिकडे घाईघाईत निघाल्या देखील ! त्यांचा असिस्टंट चिकटेही त्यांच्या मागे निघाला .अमर आणि वाघचौरे साहेबही त्यांच्या मागे गेले . एका कोपऱ्यातून गोमुखातून बाणगंगेत पाणी येत होतं . त्याच्या गळ्यात एका बारीकशा काळ्या धाग्यामध्ये एक पेन ड्राइव्हसारखं डिव्हाईस लावलेलं दिसलं.
" हे बघा , हेच असावं ते डिव्हाईस ! " , असं म्हणत सौदामिनी मॅडमने तो काळा धागा तोडला , डिव्हाईस त्यांच्या हातात आलं .
" काय आहे हे ? ",वाघचौरे साहेब निरखत म्हणाले.
" सर , बहुतेक हे कोल्ड वॉलेट आहे … हेच असणार ते डिव्हाईस ज्याचा उल्लेख ओमी मिरचंदानीच्या लॅपटॉपमध्ये कोड्याच्या स्वरूपात होता . " , अमर उत्साहित होऊन म्हणाला .
" काय सांगतोस काय ! " , वाघचौरे साहेब उड्या मारायचे बाकी राहिले होते .
" सर , पण आपल्याला अजून नक्की माहीत नाही , हे काय आहे ते ! आणि मीडियाच्या लोकांनाही हे कळता कामा नये … " , अमर बारीक आवाजात त्यांना म्हणाला . वाघचौरे साहेबांना ते पटलं त्यांनी हळूच ते कोल्ड वॉलेट पँटच्या खिशात सरकावलं आणि काहीच महत्वाचं नसल्यासारखं ते सर्वजण तिथून निघाले .
" आपण उद्या पुन्हा नव्याने शोध घेऊ . आजच्यापुरतं राहू द्या … ", असे निर्देश त्यांनी त्यांच्या स्टाफला दिले . त्यांची शोधमोहीम आजच्यापुरती थांबली . थोडा स्टाफ त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी ठेऊन बाकी सगळे तेथून निघाले . जाताना पुन्हा त्यांना मीडियाच्या रिपोर्ट्सने घेरलं आणि प्रश्नांचा भडिमार केला , परंतु याही वेळी त्यांच्या हाती ठोस असं काही लागलं नाही . ते कोल्ड वॉलेट घेऊन वाघचौरे साहेब आणि त्यांची टीम पोलीस स्टेशनला आली त्यावेळी रात्रीचे एक वाजून गेले होते . आपल्या हाती जे लागलंय याबाबत वाघचौरे साहेब , अमर सौदामिनी मॅडम आणि त्यांचा असिस्टंट अशा केवळ चारच जणांना माहीत होते, इतर पोलीस स्टाफला याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती . अत्यंत गोपनीय रीतीने त्यांनी ते कोल्ड वॉलेट सर्वांपासून लपवून पोलीस ठाण्यात आणले होते. रात्रीचा एक वाजून गेला तरी कुणाच्या मनात घरी जायचा विचार आला नाही . एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह सर्वांच्यात संचारला होता . वाघचौरे साहेबांनी दोन हवालदार दरवाज्याबाहेर तैनात केले आणि आपल्या केबिनमध्ये कुणालाही न सोडण्याचे आदेश दिले . आत केबिनमध्ये केवळ चार जण होते . सौदामिनी मॅडम खुपच उत्साही दिसत होत्या , आणि का नसाव्यात ? पोलिसांचा एवढा मोठा स्टाफ असतानाही कुणाच्या नजरेला न पडणारं डिव्हाईस त्यांना दिसलं होतं . वाघचौरे साहेब तर त्यांचं तोंड भरून कौतुक करत होते . सर्वजण वाघचौरे साहेबांच्या टेबलापाशी आले . साहेबांनी टेबलावर ग्लासात ठेवलेलं पाणी प्यायलं , या सगळ्या गोंधळात त्यांनी पाण्याचा एक थेंबही घेतला नव्हता . सर्वांना फ्रीजमधलं थंडगार पाणी प्यायला दिलं. सर्वजण शांतपणे साहेबांच्या टेबलापाशी गोलाकार बसले . साहेबांनी ते डिव्हाईस त्यांच्या खिशातुन काढून सर्वांसमोर टेबलवर ठेवले .
" सौदामिनी मॅडम, अमर आपल्याला ओमी मिरचंदानीच्या लॅपटॉपमधल्या कोड्यानुसार त्याने ठेवलेले हे डिव्हाईस सापडलंय . ज्या अर्थी त्याने हे डिव्हाईस इथे ठेवलं होतं , त्या अर्थी यातच आपल्याला काहीतरी सापडेल ." , वाघचौरे साहेब म्हणाले .
" सर , हे लेजर नॅनो एस डिव्हाईस आहे . हे कोल्ड वॉलेट आहे , यात बिटकॉईन साठवून ठेवता येतात . आपल्याला हे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपला जोडावं लागेल , त्यानंतरच ते स्टार्ट होईल . " , अमर म्हणाला .
" मग वाट कसली बघताय , हा घ्या माझा लॅपटॉप ! " , वाघचौरे साहेब म्हणाले . अमरने लगेच त्यांच्या लॅपटॉपला लेजर नॅनो एस डिव्हाईस वायरच्या साहाय्याने जोडले . त्यातून लगेच ' वेलकम ' असा मेसेज आला . सर्वजण खुश झाले . लगेच दुसरा मेसेज आठ आकडी पिन टाकण्याचा आला . आता आली का पंचायत ! हे आठ आकडे कोणाला माहीत असणार ?
" आठ आकडी पिन मागत आहे हे डिव्हाईस " , अमर म्हणाला .
" आठ आकडी ? आता हे कुठून मिळेल ? , मॅडम , ओमीच्या लॅपटॉपमध्ये काही आठ आकडी पिन बाबत काही माहिती आहे का ? " , वाघचौरे साहेबांनी विचारलं .
" ते काही माहित नाही साहेब ! आपल्याला लॅपटॉप पुन्हा चेक करावा लागेल . " , सौदामिनी मॅडम म्हणाल्या .
" आणा तो लॅपटॉप ! " , वाघचौरे साहेब म्हणाले . अमरने संपूर्ण लॅपटॉप तपासला . परंतु त्यात आठ आकडी पिन काही सापडली नाही . किंवा त्यासंदर्भात काहीच माहिती मिळाली नाही . हताश होऊन सर्वजण त्या एवढ्याशा डिव्हाईसकडे पहात राहिले .

₿₿₿

पहाटेचे चार वाजले होते. या केस संदर्भातली सगळी कागदपत्रे दोनदोनदा पाहून झाली. ओमी मिरचंदानीचा लॅपटॉप बऱ्याच वेळा चेक करून झाला . परंतु तो आठ आकडी पिन काही सापडला नव्हता , किंवा त्याबाबत काही सांकेतिक भाषेतही लिहिलं नव्हतं . समोर पंचपक्वान्नाचं ताट वाढलंय , भूकही लागलीय , पण हात आणि तोंड बांधलंय , खाता येत नाही अशी अवस्था झाली होती .
" आता काय करायचं ? हा आठ आकडी पिन कसा शोधायचा ? " , वाघचौरे साहेब हताश होऊन म्हणाले .
" काहीच क्लू मिळत नाही सर … त्या पिन शिवाय काही करता येणार नाही. इतक्या जवळ आहोत पण त्या बिटकॉईनच्या खजिन्यापर्यंत पोहोचता येत नाही .", अमर वैतागून म्हणाला.
" समजा , आपण कोणतेही आठ अंक टाकले तर काय होईल ? " वाघचौरे साहेबांनी विचारलं .
" पिन चुकला तर त्यानंतर फक्त दोन वेळाच आपल्याला पिन टाकण्याचा प्रयत्न करता येईल. " , अमर म्हणाला .
" अरे देवा ! काय वैताग आहे साला … " , वाघचौरे साहेबांनी टेबलाच्या ड्रॉवरमधून सिगारेटचं पाकीट काढलं , पण त्यात एकही सिगारेट नव्हती .वैतागून त्यांनी ते पाकीट फेकून दिलं . " पण अमर , मी काय म्हणतो , 1 ते 8 आकडे सलग टाकून बघु … कधी कधी एखादा पिन किंवा पासवर्ड खूप अवघड असेल असं आपल्याला वाटतं पण तो खूपच सरळ असतो , बऱ्याच जणांचे पिन हे 1,2,3,4 असेही असतात . "
" पण सर , हे खूपच रिस्की होऊ शकतं. " , अमरने इशारा दिला.
" समजा तो पिन बरोबर नसेल तर अजून दोन अटेम्प्ट शिल्लक राहतात ना, चल बघू ! " , वाघचौरे साहेब म्हणाले . खरं तर अमरला हे पटत नव्हतं , पण बॉसपुढे काय बोलणार ! त्याने ते लेजर नॅनो एस डिव्हाईस लॅपटॉपला जोडलं . लगेच त्यातून वेलकम असा मेसेज आला. पिन टाकण्याबाबत मेसेज स्क्रिनवर दिसू लागला. त्याने एकदा वाघचौरे साहेबांकडे पाहिलं . त्यांनी मानेनेच मूक संमती दिली . अमरने १ ते ८ आकडे ओळीने सिलेक्ट केले आणि इंटरसाठी त्या डिव्हाईसवरची दोन्ही बटणे दाबली. एक सेकंद स्क्रिनवर काहीच उमटलं नाही. दुसऱ्याच सेकंदाला ' इनव्हॅलीड पिन ' असा मेसेज स्क्रीनवर दिसला आणि त्यापाठोपाठ ' रिमेनिंग ओन्ली 2 अटेम्प्ट ' असाही मेसेज लगेच स्क्रीनवर उमटला .
" शीट ! " , अमरच्या तोंडून निघून गेलं .
" हा पिन नाही का ? ", त्याच्याकडे बघत वाघचौरे साहेबांनी विचारलं .
" नाही सर , मी तुम्हाला म्हणालो ना , तसंच झालं . आता आपल्याकडे फक्त दोनच संधी आहेत , योग्य पिन टाकण्यासाठी ! " , अमर हताश होऊन म्हणाला .
" ओके , आणि समजा हे दोन्ही अटेम्प्ट चुकले तर ? "
" तर हे डिव्हाईस रिसेट होईल , आणि त्याचा पिन रिसेट करण्यासाठी आपल्याला 24 शब्दांची एक सिक्रेट की असते ती टाकावी लागेल . आता आपल्याकडे हा आठ अंकी पिन नाही , तर 24 शब्दांची की कुठून येणार ? आणि आपल्याला जर ही सिक्रेट की मिळाली नाही तर यातले बिटकॉईन किंवा जी कोणती क्रिप्टोकरन्सी असेल ते आपल्याला कधीच मिळणार नाहीत. ही जवळपास अशक्य गोष्ट आहे . " अमरने माहिती दिली. त्यावर वाघचौरे साहेब विचार करू लागले . त्यांना आता थकवा जाणवू लागला होता. जवळपास चोवीस तासांच्या वर ते सलग काम करत होते. आधीच संपूर्ण रात्र जागून झाली होती . त्यांच्या डोळ्यांवर आता झोप येऊ लागली . त्यांनी बघितलं , सौदामिनी मॅडम आणि त्यांचा असिस्टंट चिकटे खुर्चीत बसल्या बसल्या झोपून गेले होते . वाघचौरे साहेबांच्या लक्षात आलं , आपण सलग काम करतोय , आता पहाट व्हायला आली . बाकीच्यांना सुट्टी द्यायला हवी .
" अमर , मला वाटतं आपण जरा ब्रेक घेऊ … तू आणि सौदामिनी मॅडम आजच्या दिवस आराम करा , मीही थोडा वेळ इथेच पडतो . तू जा घरी …. सौदामिनी मॅडम … ओ मॅडम , उठा … घरी जाऊन आराम करा . " , वाघचौरे साहेब म्हणाले . आरामाची खरोखर गरज होतीच. अमर काहीही न बोलता साहेबांच्या केबिनबाहेर पडला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथेचा वेग आणि suspense चांगला ठेवलाय पण,
"एका कोपऱ्यातून गोमुखातून बाणगंगेत पाणी येत होतं . त्याच्या गळ्यात एका बारीकशा काळ्या धाग्यामध्ये एक पेन ड्राइव्हसारखं डिव्हाईस लावलेलं दिसलं." - हे जरा पटायला जड जातंय.
बिटकॉईन मध्ये काम करणारा असल्या विचित्र ठिकाणी electronic device मग तो पेन ड्राईव्ह का असेना ठेवेल असं वाटत नाही. कारण हवेतल्या आर्द्रतेमुळे पण device नाकाम होऊ शकतं.