केका

Submitted by चुन्नाड on 22 June, 2022 - 10:38

मोरोपन्त यान्च्या केकावली प्रेरणा मानून काही केका रचल्या आहेत:

असमाधानी मनाविषयी
---------------------------
जरी उलगडे विराट जग हे मना सारखे
तरी कधीतरी होऊन जावे जना पारखे

मित्र नसणाऱ्या व्यक्तींसाठी
------------------------------
सवंगडी सखा कुणी न समजे अजातमित्रा
कशी निपजते मनुष्यघाणी प्रजात, मित्रा

विधवा मातेविषयी
---------------------
सपुत्र विधवा आई अन कधी पिता भूमिका
करू न शके एक बैल नांगर सकस भूमी का

वर्ण /वस्त्र /बाह्य-स्वरूप विषयक जागरूकता
---------------------------------------------------
शरीर झाकी अनेक रंगी सुती कापडे
सवर्ण की तो अवर्ण असली दरी का पडे

तना आवरणे व आभूषणे जरी शोभती
मना मोहिनी करे हृदय जे खरी शोभा ती

सर्व त्यागिले अलंकार अन् वसन रेशमी,
शस्त्र पांडवे जतन करतसे वृक्ष रे, शमी

राम-लक्ष्मण जरी धारिली वनी वल्कले
क्षात्रसूर्य ना तरी तीळभरी ना नवल कले

मित्रवियोग
------------
सुदूर जाती मित्र अन् सखे (दे) मनी वेदना
वियोग दुःखा हरण करू शके असा वेद ना

पुस्तके
--------
ग्रंथ पुस्तके, वेदोपनिषदे पुराण सगळे
कथा, शिकवणी, उपदेशांचा सुधारस गळे

©चुन्नाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही रचना केल्या जातात तर काही "झाल्या" असं म्हंटलं जातं! तुझ्या ह्या रचना "झाल्या" मध्ये मोडण्याऱ्या आहेत असं मनापासून वाटतं! खूप खूप आभार हे असं काहीतरी दिल्याबद्दल! मोरोपंत "धन्य" झाले असतील... नक्कीच _/\__/\__/\_

धन्यवाद अपूर्व आणि @ aksharivalay 02
स्मिता , तुम्ही दिलेला विराम हाच प्रतिसाद आहे का ? (लिहायला विराम देऊ असा त्याचा अर्थ नाही ना ? Wink )