झलक जिंदगी

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आमचे बिहेवियरल ट्रेनिंग गुरू म्हणतात. या क्षणात रहा म्हणजे ताण कमी होईल.
(अगदी कायकिणी गोपाळरावांच्या गुरूजींच्या चालीत " Remaaaaaaaain in the NaaaaaOw And see aaaaaaaall the stress
disappearing like thiiiiiiiiis. " असं. नाहीतर म्हणे आपण सतत भूतकाळात काय घडलं याचा विचार नाहीतर भविष्यात
काय घडेल याची चिंता करत असतो. पेंडींग कामं कशी संपवायची याचं प्लॅनिंग किंवा काल कशी मेली ती शर्मीण
मिरवत होती नवीन गाडीतून असा जळफळाट. हे आणि असलंच म्हणे सतत चालू असतं मेंदूत.
आता इतके वैताग असताना कसं रहायचं म्हणे या क्षणात? तर त्यांनी सांगितलेलं की माणूस जेंव्हा अतिशय आनंदात असतो
तेंव्हा तो या क्षणात असतो. आता झालं का? हे सरळच आहे ना. आनंदात असेल तेंव्हा कशाला स्ट्रेस येतोय? तर तसं नाही म्हणे.
असे क्षण फार विरळा. आणि खरे खुरे. काही अगदी कॉमन म्हणजे तुमच्या प्रेयसाच्या बाहुपाशातला तो अत्युच्च आनंदाचा क्षण
किंवा सूर्यास्त किंवा रौद्रभीषण निसर्ग बघतानाचा एखादा क्षण. आणि हे फार क्षणभंगूर असतं बरंका.
तुम्ही म्हणाल मी असाच रोज अर्धा तास निसर्ग पाहीन तर तसं फोर्स करून हे मन वढाय ऐकतं म्हणता की काय? नाही. तर
अचानक गवसलेला एखादा क्षणच तुम्हाला खेचून आत्तामधे घेऊन येतो.
खरे आनंद नेहमी विनामूल्य मिळतात पण ते पहायला डोळ्यांवरची पैशाची पुटं बाजूला घ्यावी लागतात.
मी आठवत राहीले ही अशी छोटी छोटी आनंदाची क्षणचित्रं. आणि हे सगळं त्यावेळचं ऍबस्ट्रॅक्ट.
त्या दिवशी सकाळी ऑफिसात जायला खाली उतरले कामाचा पाढा वाचत तर स्कूटीच्या सीटवर एक मांजराचं पिल्लू
झोपलेलं. काम गेलंच डोक्यातून आणि एकदम हिवाळ्यातल्या सकाळी उन्हाला बसावं अंगणातल्या कट्ट्यावर पेपर वाचत
बसलेल्या आजोबांना रेलून तसं मस्त वाटलं एकदम. एकूणच कुठलेही प्राणी फारसे आवडत नाहीत मला. पण ते दृष्य
अजून डोळ्यासमोर आहे. त्याला उठवूच वाटेना. आपणही अंगाची तशीच मुटकुळी करून जगाची सगळी चिंता
इतरांच्या डोक्यावर टाकून त्याच्याशेजारी पसरावं वाटलं.
एकदा सिग्नलवर गाडी थांबली असताना फ्लायओव्हर खालची भिकारीण मांडीवर मुलाला घेऊन बसली होती. तिचा लंचटाईम
असावा. निवांत बसली होती. मुंबईच्या भिकार्‍याइतके गलिच्छ दिसणारे भिकारी कुठं नसतील. व्यवस्थित मेकप करून येतात.
(त्याविषयी पुन्हा कधीतरी) तर ही बया निवांत बसली होती त्या मळकट मुलाला मांडीवर घेऊन. तिनं त्याला गुदगुली केली
आणि काय सुरेख खिदळलं ते पोर. त्या मळकटपणाच्या, दारिद्र्याच्या बीभत्स प्रदर्शनाच्या पलिकडचं होतं ते निरागस निखळ हसू.
एकदा असंच एका वैताग ट्रॅफीक जॅममधे अडकले होते. संध्याकाळी ऑफिस सुटायची वेळ. त्यामुळे सगळे अगदी फ्रस्ट्रेशन लेव्हल तीनवर. एकतर रस्ता अरुंद आणि वर अर्ध्या रस्त्यावर BMC ची कृपा झालेली.
त्यात भर म्हणून दिवस पावसाचे. सगळेच जाम चिकचिकले आणि चिडचिडले होते. जाम सोडून कुठे कुठे स्वतंत्र
कुरबुरीही चालू होत्याच. " दिखता नही क्या. इतना जाम है.... अरे मै बोलता हू कट लगा है. पहलेका नही आपकी
गाडीकाही है. " वगैरे नेहमीचे संवाद. इतक्यात एकदम शांतता पसरली. मी पाहिलं तर हळूहळू प्रत्येक जण माना
वर करत होता. मी वर पाहिलं तर एक अख्खं ठसठशीत इंद्रधनुष्य. कोण जाणे किती वेळ तसाच शांततेत. कुणीच बोलत नव्हतं किंवा असेल तर मला ऐकू येत नव्हतं ते. आणि मग एकदम गाड्या सुरू झाल्याचे आवाज आले. ट्रॅफिक मूव्ह होत होते.
हे नैमित्तिक झाले पण खरंच अतीव आनंदाचे काही क्षण नित्यातही असतातच की.
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी सकाळभर वणवणून किंवा यथेच्छ हुंदडून झाल्यावर जेवायच्या वेळी घरी येऊन आधी पळत माठापर्यंत धाव घ्यायची आणि ते वाळ्याच्या वासाचं पाणी घशाखाली उतरलं की येणारा अमृतमयी अनुभव. अहाहा!
किंवा थंडीत सकाळची शाळा असेल तर नाईलाजाने चडफडत उठून सायकल दामटताना रस्त्याकडेला बहुधा मुन्शिपालटीच्या
सफाईकामगारांनी पेटवलेल्या शेकोटीची झळ पायांना बसली की काय बरं वाटायचं! नंतर कॅंप फायरची मजा समजली
तरी आधी हेच आठवते.
मार्च एप्रिलमधे जेंव्हा सगळं भवताल हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश करतं तेंव्हा एक विचित्र हुरहुर दाटून येते संध्याकाळी.
अनुभवलंय कधी तुम्ही? अशा वेळी एखाद्या झुळकेबरोबर मोगर्‍याचा गंध आला की तर हुरहुर पार आत काळजात पोचते.
हल्ली मोगरा कधीही मिळतो. पण तो तसा बहकतो मात्र तेंव्हाच.
आणि हवं तेंव्हा मिळवता येणारे हुकमी आनंद आहेतच की. पाणीपुरीची पुरी तोंडात फुटल्यावर जे होतं तसे.
तुम्ही काय म्हणता?

विषय: 
प्रकार: 

पाणीपुरीची पुरी तोंडात फुटल्यावर जे होतं तसे.>>>
आणि
तेंव्हा एक विचित्र हुरहुर दाटून येते संध्याकाळी.>>. आणि दसरा दिवाळीचे दिवसातील लवकर येणारी सांयकाल तर विलक्षण असते..!!!

सुंदर लिहीलंय .. इतकं की मला पण वाटलं आपणही आपल्याला आनंद देणारे फुकट आणि निखळ क्षण आत्ताच्या आत्ता लिहून काढावेत .. Happy

सुरेख लिहिलंस सन्मी Happy
असलेल्या छोट्या आनंदाकडे दुर्लक्ष करून नसलेल्या मोठ्या चिंता उगाच विकत घेत असतो आपण! खूप पॉझिटिव्ह विचार आहेत.. धन्स! Happy

मस्त लिहिलयस सन्मे........ उन्हातले आजोबा, पाणिपुरीची पुरी, मोगर्‍याचा सुगंध सगळंच छान आहे. मेकप करणार्‍या भिकार्‍यांवर शेरलॉक होम्सची एक अख्खी कथाच आहे.

सन्मे, एकदम मस्त. खरतर, कायकिणी गोपाळराव वाचल त्याक्षणीच मन सुखावल !

मस्त वाटले वाचून... ते पूर्वी कॅडबरीच्या जाहिरातीत साध्या घटनांमधे काहीतरी हास्य निर्माण करणारे लोक दाखवायचे ते मला यामुळेच आवडायचे

सन्मी अगदी सही झालय हे. पाणीपुरीची उपमा तर पर्फेक्ट!

अगदी मधुर! सन्मे, काय लिहिलयस गं. त्या माउडीच्या मुटकुळ्यापासून तुझा लेख 'हा क्षण' बनून गेला.... ते पाणी पुरी पर्यंत Happy
आहेस की नाही, मस्तच?
मेरा तो दिन बना दिया आपने! जियो!

सही लिहीतेस , मी तुझा प्रत्येक लेख वाचुन हेच म्हणतेय. Happy किती सहज ,साध्या शब्दात मनातलं लिहीतेस तु !! (मला माउच्या पिल्लाला हात लावावासा वाटतोय , अत्ताच्या अत्ता! )

सही लिहिलं आहे. खूप खूप आवडलं. मनीमाऊची मुटकुळी, इवलुष्या गुदगुल्यांचं निखळ हसू,पानीपुरी सगळं कसं मस्त मस्त जणू.

काही दिवस विशाखापट्टणमला होते तेव्हाची अशीच एक संध्याकाळ आठवली. मनात उठलेल्या काहूराला कुठेतरी विसरून शांत करावं या हेतूनं बाहेर पडले आणि दुरवर समुद्रात अगदी ईवलूष्या दिव्याचा प्रकाश घेऊन एक बोट किनारी पोहचण्यासाठी लांटांचा प्रवास पार करत होती. बहुदा सुर्य मावळेपर्यंत तीला किनारी पोहचायचं असावं म्हणून तीच्या सुद्धा मनात अशीच शांततेची ओढ दाटून आली असेल ना?
काही वेळात ती बोट किनार्‍यावर पोहचली. तोपर्यंत मी हि तिथून निघून गेले. जेवणानंतर पुन्हा एकदा फेरफेटका मारायला बाहेर पडले तेव्हा समोर पाहीलं तर मस्त चांदण्यांच्या प्रकाशात ती बोट शांत पहूडलेली दिसली. तेव्हा जे काही वाटलं ते आजही डोळ्यासमोर आलं कि आनंदाने गहिवरून येतं.

प्रत्येक्ष क्षण हा आपल्याला काहीना काहीतरी देऊन जातोच आपल्याला फक्त त्याचाशी समरस होणं जमलं पाहीजे. मग काय ते जमलं कि ओठांवर "आनंद पोटात माझ्या माईना रे माईना आनंद पोटात माझ्या माईना" आपसुक यायला लागतं.