राष्ट्रपती भवन, अम्मा जी आणि सर जी

Submitted by अनिंद्य on 14 June, 2022 - 02:56

भारताचे नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. (लेख त्याबद्दल नाही) लवकरच सध्याचे राष्ट्रपती दिल्लीतील भव्य राष्ट्रपती भवनातून दुसरीकडे राहायला जातील आणि नूतन निर्वाचित राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय रायसीना हिलवरच्या ब्रिटिश राजवटीने बांधलेल्या व्हॉईसरॉय हाऊस उर्फ आताचे राष्ट्रपती भवन नामक राजेशाही प्रासादात राहायला येतील.

प्रासाद अतिभव्य आहे, भारताच्या प्रथम नागरिकाच्या पदाला आणि गौरवाला साजेसा आहे, ३४० खोल्या, रमणीय बागबगीचे, शेकडो सहायक, पोषाखी अंगरक्षक आणि घोडदळ, खानसामे, नोकरचाकर असा सर्व जामानिमा असलेला आहे हे आपण सर्वच जाणतो. पण सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीच्या जोडीदारांबद्दलही आपल्यासारख्या सामान्यांना कुतूहल असतेच. अमेरिकेत FLOTUS (The first lady of the United States) उर्फ ‘फ़र्स्ट लेडी’ आणि आपल्याकडे 'प्रथम महिला' असे नामनिधान असलेल्या राष्ट्रपतींच्या पत्नींबद्दल लोकांमध्ये उत्सुकता असते.

8C0E2F4D-0B4B-4254-8497-690659753B21.jpeg

आपल्याकडे 'राष्ट्रपती' हे पद सीमित अधिकार असलेले प्रतीकात्मक प्रमुखाचे पद आहे. भारतीय 'प्रथम महिला' हे पद तर कुठेच चर्चेत नसते. पण देशी-विदेशी पाहुणे, सोहळे -समारोह आणि त्यासाठी लागणारे मोठे मन्युष्यबळ असा सगळा गोतावळा पडद्यामागे राहून सांभाळण्याचे काम या प्रथम महिला करत असतात. काहीजणी अहोंसोबत देशी-विदेशी दौऱ्यांवर, विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावतात. काही समाजकार्यात अग्रेसर तर काही सक्रिय राजकारणात ओढल्या गेलेल्या. त्यांच्याबद्दल थोडेसे :-

लेडी एडविना माउंटबॅटन भारत स्वतंत्र झाल्यानंतर साधारण दहा महिने 'प्रथम महिला' किंवा तत्कालीन नामनिधानानुसार 'लेडी व्हॉइसराय' होत्या. ब्रिटिश राजवटीतर्फे होणाऱ्या भव्य सोहळ्यांचे, राजेशाही मेजवान्यांचे, संगीत-नृत्यादी कार्यक्रमांचे चोख आयोजन करण्यात त्यांचा हातखंडा होता. स्थानिक भारतीय आणि जगभर पसरलेला असा त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. तत्पूर्वी अनेक ब्रिटिश मडमांनी हे पद सांभाळलेले असल्याने त्यात काही नावीन्य नव्हते.

प्रथम 'शुद्ध भारतीय' व्हॉईसरॉय चक्रवर्ती राजगोपालाचारी उर्फ राजाजी राष्ट्रपती भवनात राहायला आले तेव्हा ते विधुर होते, त्यांच्या पत्नी अलमेलू मंगलम्मा आधीच निवर्तल्या होत्या. गांधीवादी विचारसरणी आणि अत्यंत साधी राहणी असलेल्या राजाजींना बडेजाव नापसंत होता, त्यामुळे दीडेक वर्षे राष्ट्रपती भवनात फारसे सोहळे वगैरे नव्हतेच. ते एका साध्या खोलीतच राहत. देशात अन्नधान्याच्या कमतरतेच्या बातम्यांनी अस्वस्थ होऊन त्यांनी प्रसिद्ध मुघल उद्यानाच्या काही भागात गव्हाची शेती करण्याचे आदेश दिले होते !

पुढे व्हॉईसरॉय पद संपुष्टात येऊन 'भारतीय गणराज्याचे प्रथम राष्ट्रपती' म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासोबत राष्ट्रपतीभवनात राहायला येणाऱ्या भारतीय 'प्रथम महिला' म्हणजे डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या पत्नी राजवंशी देवी. वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांचा सुविद्य राजेंद्रबाबूंशी विवाह झाला होता. अत्यंत साधे आणि सोज्वळ व्यक्तिमत्व लाभलेल्या राजवंशी देवी राष्ट्रपतीभवनात होणाऱ्या कोणत्याही शासकीय समारोहात उपस्थित नसत. राष्ट्रपती भवन परिसरात असलेल्या शाळेचे सर्व कार्यक्रम, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्याचा सोहळा असो की खेळाच्या स्पर्धा, तिथे मात्र राजवंशी देवी सक्रिय सहभाग नोंदवत असत. राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या सर्वांशी त्यांचे फार चांगले संबंध होते. त्यांच्या सुखदुःखात नेहेमी उपस्थित असत आणि सर्वांना मायेनी वागवत, त्यामुळे स्टाफने त्यांना 'अम्माजी' असे संबोधन बहाल केले होते. पुढे सर्वच राष्ट्रपतींच्या सौभाग्यवतींना 'अम्माजी' म्हणण्याचा प्रघात पडला. राजेंद्रबाबूंना पदाच्या दोन टर्म मिळाल्यामुळे त्यांचा मुक्काम सलग दहा वर्षे राष्ट्रपती भवनात होता. त्यानंतर आजवर कोणालाही तशी संधी पुन्हा मिळाली नाही. अम्माजींच्या आग्रहामुळे दरवर्षी १ फेब्रुवारीला 'राष्ट्रपती भवन दिवस' साजरा करण्यास सुरुवात झाली. आजही तो दिवस राष्ट्रपतींचे कुटुंब, सर्व सेवक, मदतनीस, सैन्य अधिकारी आणि त्यांचा कुटुंबकबिला असे एकत्र येऊन साजरा करण्यात येतो. कठोर राजशिष्टाचार थोडा बाजूला पडून सर्वजण एकमेकांशी जोडले जातात, ही अम्माजींची सुंदर कल्पना.

दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हाडाचे शिक्षक. ते राष्ट्रपतिपदी पोहोचण्याच्या आधीच त्यांच्या पत्नी शिवकामु निवर्तल्यामुळे राष्ट्रपती भवनाला पुन्हा पाच वर्षे 'अम्माजी' नव्हत्या.

डॉ. झाकीर हुसेन यांच्या रूपाने पुन्हा एकदा एक विद्वान राष्ट्रपती त्यांच्या सुविद्य पत्नी शाहजहाँ बेगमसह राष्ट्रपती भवनात राहायला आले. कुटुंबवत्सल बेगम साहिबा मुघल गार्डन वगळता फारश्या बाहेर जात नसत. डॉ. झाकीर हुसेन आणि बेगम शाहजहाँ दोघेही दिल्लीतील जामिया विद्यापीठानजीकच्या एका मशिदीत शेजारी-शेजारी चिरनिद्रा घेत आहेत. राजधानी दिल्लीत पार्थिवावर अंतिम संस्कार होणारे पहिलेच राष्ट्रपती आणि प्रथम महिला.

चौथे राष्ट्रपती वराहगिरी वेंकट गिरी उर्फ व्ही व्ही गिरी यांच्या पत्नी सरस्वती बाई फारच धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या आणि कोणत्याही सार्वजनिक समारोहात सामील होत नसत. त्यांच्या नावे एक वेगळाच विक्रम आहे. त्यांना एकूण १४ अपत्ये होती, त्यातील चार तर एकाच वर्षात झाली होती - अनुक्रमे जानेवारी आणि डिसेम्बरमध्ये, दोनदा जुळी मुले !!! पतीसोबत रशिया (तत्कालीन सोव्हियत युनियन) च्या दौऱ्यावर गेल्या असता त्यांच्या उदंड अपत्यसंख्येने प्रभावित होऊन तेथील महिला संघटनांनी त्यांना 'वीरमाता' पुरस्कार देण्याचा घाट घातला होता. सुदैवाने त्यांनी तो नाकारला आणि तेंव्हा भारतात प्रचलित 'दो या तीन बस' या मोहिमेला मूक हातभार लावला.

सरस्वती बाईंनी विदेशी दौऱ्यांवर जाण्यास सुरुवात केली तर पाचवे राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांच्या सुविद्य आणि उत्साही पत्नी बेगम आबिदा अहमद यांनी जवळपास सर्व विदेश दौऱ्यांवर अहोंना सोबत केली. त्यांना समाजकारणात - राजकारणात गती होती. पतीच्या अकाली निधनानंतर त्यांनी दोनदा उत्तरप्रदेशातील बरेली लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. आयुष्याच्या शेवटपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यरत असलेली ही वेगळी 'प्रथम महिला'. आज संसद भवनाजवळच्या मशिदीत दोघे पती-पत्नी चिरनिद्रा घेत आहेत. दिल्लीत त्यांचे समाधीस्थळ सुंदर राखले आहे.

सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्या पत्नी नागरत्नम्मा आणि आठवे राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या पत्नी जानकी दोघी कुटुंबवत्सल होत्या. दिल्लीतील वास्तव्य कमीच आवडणाऱ्या. गडद रंगाच्या भरजरी रेशमी कांजीवरम साड्यांमधे दिल्लीतील पंजाबी वातावरणात त्या उठून दिसत. राष्ट्रपती भवनात दक्षिण भारतातील सणवार उत्साहात साजरे करत. राष्ट्रपतींच्या काही दौऱ्यात-समारंभात दिसत पण प्रसिद्धीच्या झोतात फारश्या नसत.

अम्माजी राजवंशी देवींप्रमाणेच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाचे सर्वाधिक प्रेम आणि आदर लाभणाऱ्या प्रथम महिला ठरल्या प्रधान कौर - सातवे राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग यांच्या पत्नी. लौकिकार्थाने फारसे शिक्षण न लाभलेल्या प्रधान कौर फार प्रेमळ, निगर्वी, साध्या आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. अगदी चतुर्थश्रेणी सफाई कर्मचाऱ्याच्या घरी सहज जाऊन चहापान करणे असो की वाहनचालकाच्या घरी लग्नात भेटवस्तू घेऊन उपस्थिती असो, त्यांच्या मायाळू स्वभावामुळे त्यांना सर्वांचे भरपूर प्रेम लाभले. खऱ्या अम्माजी. अहोंच्या कोणत्याही शासकीय समारंभाला मात्र त्या कधीच उपस्थित राहिल्या नाहीत.

पुढे डॉ शंकर दयाल शर्मा यांच्या सुविद्य पत्नी विमला शर्मा 'अम्माजी' पदी आल्या. त्या स्वतः डॉक्टरेट होत्या आणि समाजकार्यात हिरीरीने भाग घेत. पती निधनानंतरही अनेक वर्ष दिल्लीतील विविध समाजसेवी संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय होत्या.

वेगळेपणाच्या तीन कथा लेखात समाविष्ट केल्याच पाहिजेत. दहावे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या पत्नी 'मा टिन टिन’ उर्फ उषा नारायणन या विदेशी मूळ असलेल्या एकमेव प्रथम महिला, त्यांचा जन्म बर्मा (आता म्यांमार) चा. नारायणन विदेश सेवेत कार्यरत असतांना त्यांचे प्रेम जुळले आणि त्यांनी लग्न केले. दोघेही एकत्र जग फिरले आणि आज दिल्लीतील पृथ्वीराज रोड भागातील एका ख्रिश्चन दफनभूमीत चिरनिद्रा घेत आहेत. राष्ट्रपती नारायणन यांच्याप्रमाणेच उषाजींनी स्वतः उत्तम दर्ज्याचे लेखन केले आहे.

समाजाच्या सर्व स्तरांतून अत्याधिक प्रसिद्धी लाभलेले डॉ अब्दुल कलाम हे पहिले 'बॅचलर' राष्ट्रपती. त्यामुळे प्रथम महिला हा विषय कटाप. गमतीचा योगायोग असा की त्यांच्या कारकिर्दीत श्री अटलबिहारी बाजपेयी हे पंतप्रधानही अविवाहित होते.

बाराव्या राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांची निवड झाली आणि राष्ट्रपती भवनाचे अधिकारी आणि अन्य सर्वांची एक वेगळीच पंचाईत झाली - आजवर 'फर्स्ट लेडी' आणि 'प्रथम महिला' कसेबसे रुळवले पण राष्ट्रपतींचे पती डॉ देवीसिंग शेखावत यांना काय म्हणून संबोधायचे असा प्रश्न आला. त्यांना 'फर्स्ट जेंटलमन' असे संबोधन वापरले बहुतेक. ते स्वतः बॉटनी विषयातले डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांना मुघल गार्डन आणि राष्ट्रपतीभवनातील अतुलनीय वृक्षराजीची भुरळ पडली नसती तरच नवल. ते काही विदेशी दौऱ्यांवर प्रतिभाताईसोबत दिसत पण मूळ गावी अमरावतीला त्यांचे वास्तव्य जास्त असे. त्यांना सर्व 'सरजी' म्हणत.

25D98D07-BF2D-400F-9158-988C0B8E854E.jpeg

तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जीच्या पत्नी शुभ्रा मुखर्जी संगीतप्रेमी. स्वत: उत्तम रविंद्र संगीत गायिका. दिल्लीतील लेडी इर्विन विद्यालयात प्राध्यापिका होत्या. त्यांना फुलांची आणि बागकामाची अतीव आवड असल्याने मुगल गार्डनमध्ये माळीकाम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांशी त्यांचे विशेष सख्य होते. राष्ट्रपती भवनात अखेरचा श्वास घेणाऱ्या त्या एकमेव प्रथम महिला.

389790E7-BD61-4101-B11A-9D0A1AF1C399.jpeg

सध्याच्या प्रथम महिला सविता कोविंद मनमिळावू आणि विनम्र म्हणून ओळखल्या जातात. अनेक सार्वजनिक समारंभात अहोंसोबत दिसतात. कोविड काळात स्वतः मास्क शिवणे आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता यासाठी त्यांनी हिरीरीने काम केले होते.

आता राष्ट्रपती भवनाला प्रतीक्षा आहे ती नवीन 'अम्माजी' किंवा सरजींची. बघुयात.

(चित्रे जालावरून साभार. एका दुर्लक्षित विषयावरची माहिती संकलित करणारे टिपण एवढाच लेखनाचा उद्देश आहे. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच छान, रोचक माहिती !
राष्ट्रपती भवना बद्दल नेहमीच कुतूहल वाटतं. या जुन्या सर्व 'प्रथम महिला' श्रेष्ठ होत्याच, पण बदलत्या काळाबरोबर येणार्‍या नवीन पिढीच्या स्त्रिया अधिक सक्षम पणे, स्वतः च्या ही कर्तृत्वाचा ठसा उमटवतील अशी अपेक्षा!

मला तर नव्या राष्ट्रपती पदासाठी इच्छुक असलेले लोकं पाहुन धडकीच भरलीय.
दैदिप्यमान परंपरा धुळीत मिळु नये इतकीच इच्छा.

खर तर भारताने हे बिन महत्वाचे नामधारी पद रद्द करुन टाकले तरी चालेल. देशाचे भरपुर पैसे वाचतील. असे माझे मत आहे. पण नेहमीप्रमाणे मला कोण विचारतो Happy

खर तर भारताने हे बिन महत्वाचे नामधारी पद रद्द करुन टाकले तरी चालेल. देशाचे भरपुर पैसे वाचतील. असे माझे मत आहे. पण नेहमीप्रमाणे मला कोण विचारतो >> कल्चरल शॉक दिलात Wink

राष्ट्रपती भवना बद्दल नेहमीच कुतूहल वाटतं. >> +११
त्यामुळे लेख जास्तच आवडला.. ! खरोखर राष्ट्र्पतींचे आयुष्य नेमके कसे असेल असे वाटते.. आपल्याला राष्ट्र्पती आठवतात ते दयेच्या अर्जाच्यावेळी.. पण बाकी बेळ नेमके कसे कामकाज चालते भवनात याविषयीपण लिहा !

पण राष्ट्रपतींचे पती डॉ देवीसिंग शेखावत यांना काय म्हणून संबोधायचे असा प्रश्न आला >> Happy

रोचक लेख !

छान लेख!
पण खरंच फारसे अधिकार नसलेले तसे नामधारी असे राष्ट्रपती आणि राज्यपाल अशी पदे का आहेत याचे मलाही कुतुहल आहे. म्हणजे आपण हे ब्रिटिशांकडून उचलले असेल तर तिथे फक्त पंतप्रधानपद आहे. राष्ट्रपती आणि राज्यपाल अमेरिकेत आहेत पण ते आपल्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पदासारखे आहेत. पण आपल्याकडे राष्ट्रपती आणि राज्यपाल, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री असा डबल कारभार आहे Happy

भारताच्या 'अम्माजीं'ची ('सरजीं'ची देखील Happy ) ओळख करून देणारा फारच सुंदर लेख.
१-२ वर्षांपूर्वी CNN वर 'First Ladies' ही सिरीज बघितली होती. Eleanor Roosevelt, Lady Bird Johnson आणि Jackie Kennedy या माझ्या आवडत्या First Ladies चे भाग विशेष आवडले होते.
भारतीय 'प्रथम महिला' यांवर आधारित काही documentary/series आहेत का ? विमला शर्मा आणि बेगम आबिदा अहमद यांच्याविषयी अजूनही वाचायला/बघायला आवडेल.
राष्ट्रपती भवनाचे फोटू मस्त आहेत... दुसरा फार आवडला. Happy

@ राधिका,

… भारतीय 'प्रथम महिला' यांवर आधारित काही documentary/series आहेत का ?,,,

माझ्या माहितीत तरी नाही. तसा दुर्लक्षित विषय आहे हा.

विमलाजींची नाही पण त्यांच्या बंधूंची एका ‘कांदेपोहे’ टाईप कार्यक्रमात भेट झाली होती, तेव्हां संस्कृत, इंग्रजी आणि हिंदी तिन्ही भाषांतून क्षणार्धात तोंडीच भाषांतर करण्याचे त्यांचे कसब बघून प्रचंड आश्चर्य वाटले होते. पूर्वाश्रमीच्या रीवां संस्थानाचे दीवाण होते ते. अर्थात् हे फारच अवांतर झाले Happy

अस वाचलेल आठवत कि, अब्दुल कलामजी काही करु इच्छित होते परंतु राजकारणी लोकांनी त्यांचे काही चालु दिले नाही. मग या पदाचा पर्पज खरच फक्त औपचारिकता म्हणुन आहे का ? प्रतिभा पाटलांच्या फक्त भ्रष्टाचार, भेट वस्तु स्वतःच्या घरी नेवून ठेवणे, मुलाबाळांसाठी परदेशी ट्रिप्स, पुण्यात घर बळकाविणे इत्यादी गोष्टीच ऐकल्या आहेत.
लेख इंटेरेस्टींग आहे अनिंद्य.

मस्त लेख आणि माहिती. Happy

म्हणजे आपण हे ब्रिटिशांकडून उचलले असेल तर तिथे फक्त पंतप्रधानपद आहे >>>> तिथे अजूनही राणी आणि राजघराणं आहे. त्याजागी आपल्याकडे राष्ट्रपतीपद आहे. काही कॉमनवेल्थ देशांमध्ये अजूनही ब्रिटीश राजघराण्याला मान मिळतो आणि राणीचा प्रतिनिधी घटनात्मक पेचप्रसंगांमध्ये भाग घेतो.

>>पण खरंच फारसे अधिकार नसलेले तसे नामधारी असे राष्ट्रपती आणि राज्यपाल अशी पदे का आहेत याचे मलाही कुतुहल आहे.<<
ती राजकिय नेत्यांची रिटायरमेंट स्किम आहे. किंवा एखादा नेता डोईजड व्हायला लागला कि त्याला या पदांवर ढकलता येतं... Happy

अवांतरा बद्दल क्षमस्व...

छान माहिती.

दोन गोष्टी आठवल्या.

1. प्रणवदा राष्ट्रपती असताना आम्ही सहकुटुंब राष्ट्रपती भवनला visit दिली होती. खूप छान अनुभव होता तो.
नुकताच नोकरीला लागलो होतो. स्वकष्टाने मिळालेल्या पैश्यांमधून केलेली पहिलीच ट्रीप (दिल्ली जयपूर आग्रा) म्हणून नेहमीच लक्षात राहील.

2. प्रतिभाताई राष्ट्रपती असताना त्यांनी आमच्या कॉलेजच्या संस्थेला भेट दिली होती.

धन्स अनिंद्य

प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्या तेंव्हा अजून एक पेच समाज माध्यमे आणि वृत्तपत्रात गाजला होता की त्यांना राष्ट्रपती म्हणायचे की राष्ट्रपत्नी.

राष्ट्रपतींचे पद नामधारी नाही , पण लोकशाहीमध्ये आपण निवडून आलेले आहोत , ह्या भ्रमात लोकसभेतील , विधानसभेतील लोकांना नको एवढे महत्व प्राप्त झालेले आहे , त्यामुळे ही पदे नामधारी वाटतात. पण ती नामधारी नाहीत

Pages