क्रिप्टो ( Crypto ) भाग - १९

Submitted by मिलिंद महांगडे on 14 June, 2022 - 00:19

₿₿₿

सायबर क्राईमची टीम पुन्हा मिसेस रागिणीच्या घरी दाखल झाली . त्यांच्या सोबत सौदामिनी मॅडम आणि त्याचा असिस्टंट चिकटे सुद्धा होते . यावेळी वाघचौरे साहेब थोडेसे वैतागलेले होते. एका अननोन आणि नॉन ट्रेसेबल ईमेल अकाऊंटवरून पोलीस आणि मीडियाला ओमी मिरचंदानी जिवंत असल्याचा ईमेल गेला होता , त्यामुळे बराच मोठा गोंधळ उडाला होता. मीडियाने हे प्रकरण जास्तच उचलून धरलं होतं . त्यामुळे ज्याला या प्रकरणाबद्दल गंधही नव्हता, तोही आवडीने बातम्या बघू लागला. शाळेत जाणाऱ्या लहान पोरांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांना बिटकॉईन म्हणजे काय , आणि त्या प्रकरणात काय झालं याबद्दल इत्यंभूत माहिती झाली होती. आणि आता पुढे काय घडणार याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. एखादी हाय प्रोफाईल केस असते तसं ह्या केसच्या बाबतीत झालं होतं . ह्या प्रकरणात रोज काही ना काही घडत होतं , त्यामुळे लोक डेली सोप्ससारखे ह्या प्रकरणाकडे बघू लागले . पोलिसांची टीम मिसेस रागिणीच्या घरी पोहोचली तेव्हा तिच्या डोक्याला काहीतरी लागलं होतं आणि कपाळावर पट्टी बांधलेली होती .
" रागिणी मॅडम काय झालं तुम्हाला ? हे डोक्याला कसं लागलं ? " , तिला अशा अवस्थेत बघून वाघचौरे साहेबांचा राग कुठल्या कुठे निघून गेला.
" काल चक्कर आली . किचनमध्ये पडले , थोडं लागलंय डोक्याला . " , ती हळुवारपणे कपाळावरच्या पट्टीला हात लावत म्हणाली .
" फारच लागलंय हो … दुखतंय का ? " , अमरने काळजीने विचारलं .
" काल खूप दुखत होतं , आता कमी आहे थोडं . " , ती अमरकडे पहात म्हणाली.
" काळजी घ्या . " अमर म्हणाला .
" हो थँक्स . " , अमरकडे बघून ती नाजूकशी हसली. अमरच्या काळजाचा ठोका चुकला.
" बरं आम्ही थोडी चौकशी करायला आलोय . तुम्ही ओक्के आहात ना ? ",सौदामिनी मॅडमनी मुद्द्याला हात घातला.
" हो , बोला ना . मी बरी आहे आता . काय विचारायचं ते विचारा . " रागिणी समोरच्या खुर्चीत बसत म्हणाली.
" तुम्हाला तुमच्या वकिलांना बोलवायचं असेल तर बोलावू शकता ." अमर तिला म्हणाला .
" नो ऑफिसर , त्याची काही गरज नाही. " , रागिणी त्याच्या डोळ्यांत पहात म्हणाली.
" ठीक आहे , तर मला सांगा रागिणीजी , तुम्ही लेह मध्ये कलवान रेस्टहाऊसमध्ये उतरला होतात , बरोबर ? " , वाघचौरे साहेबांनी विचारलं .
" हो बरोबर आहे . "
" तिथे किती दिवस होतात तुम्ही ? "
" ओमीची डेथ झाली त्याचं शेवटचं कार्य केलं आणि लगेच मी ते हॉटेल सोडलं . " रागिणी म्हणाली .
" मग बाकीचे दिवस तुम्ही कुठे होतात ? " वाघचौरे साहेबांनी विचारलं . त्यावर ती जरा विचारात पडली.
" ओमी गेला आणि मी एकटी पडले . मी सुन्न झाले होते . काय करावं मला काही सुचत नव्हतं . मला शांत ठिकाणी जाऊन राहावंसं वाटू लागलं त्यामुळे लेहपासून दहा - बारा किलोमीटरवर नेर्मा नावाच्या गावात गेले . तिथे काही नन्स राहतात . त्यांनी मला काही दिवस त्यांच्यात राहू दिलं . मी तिथेच राहिले काही दिवस . " रागिणी म्हणाली .
" काय ? तुम्ही नन्स बरोबर राहिलात ? पण का ? " , अमरला तिचं हे वागणं कळेना .
" हो , मी खूप डिस्टर्ब होते , मला मनःशांती हवी होती . त्यामुळे मी तिथे राहिले . नंतर लॉकडाऊन उघडल्यावर मी तिथून निघाले. "
“ तुम्ही आम्हाला पहिल्या भेटीत हे सांगितलं नाही रागिणी मॅडम . ”, वाघचौरे साहेब तिच्याकडे रोखून पहात म्हणाले.
“ तुम्ही मला त्याबद्दल काहीच विचारलं नव्हतं सर . ”, तीही वाघचौरे साहेबांच्या डोळ्यांत बघत म्हणाली.
" बरं ठीक आहे . मिस्टर ओमी मिरचंदानी जिवंत आहे असा एक ईमेल पोलिसांना आणि बाकीच्या बऱ्याच मीडिया फर्मसना मिळाला आहे . तुम्हाला काय वाटतं कोणी केलं असेल हे ? " वाघचौरे साहेबांनी विचारलं .
" काय ? असा मेल आलाय ? छे ! कोणीतरी मस्करी केली असेल . ओमी गेलाय ऑफिसर . मी स्वतः त्याचे अंतिम संस्कार केलेत . " , रागिणी रडवेली होऊन बोलू लागली.
" पण ओमी मिरचंदानी खरोखर वारले आहेत , याचा काही पुरावाही तुम्ही मागे ठेवला नाहीत, ते गेले आणि तुम्ही त्यांचं दहनकार्य तिकडेच उरकलं , त्यांच्या अस्थीही तुम्ही सिंधू नदीत अर्पण केल्या म्हणताय …कुणास ठाऊक ते वारले नसतील आणि असेच कुठे लपून बसले असतील तर ? किंवा तुम्ही त्यांना लपवलं असू शकतं. " , सौदामिनी मॅडम थंड स्वरात म्हणाल्या .
" ओ गॉड ! तुमचा माझ्यावर अजूनही विश्वास नाही का ? मी कशाला करेन हे सगळं ? " , रागिनीच्या चेहऱ्यावर वैताग स्पष्टपणे दिसू लागला.
" त्याचीच चौकशी करायला आलोय मॅडम आम्ही . सांगा , कुठे आहेत ओमी मिरचंदानी ? " , सौदामिनी मॅडमचा आवाज वाढलेला होता.
“ सर मी खरंच सांगतेय. तुम्हाला खोटं वाटत असेल तर आम्ही राहात होतो त्या कलवान रेस्टहाऊसला तुम्ही विचारू शकता , किंवा लेह मधल्या डॉक्टर सेवांग दोरजे यांना विचारू शकता. त्यांनीच ओमीची ट्रीटमेंट केली होती , मी त्यांचा फोन नंबर तुम्हाला देऊ शकते. ” , असं म्हणत तिने तिचा फोन तपासला आणि डॉक्टर सेवांग दोरजेचा नंबर वाघचौरे साहेबांना दिला. अमरने तो त्याच्या मोबाईलमध्ये सेवा करून घेतला.
“ मला सांगा मॅडम , ओमी मिरचंदानी यांचे हे फोटो मधले केस आहेत ते खरे आहेत कि त्यांनी विग लावलाय ? ”, अमरने बाजूच्या टीपॉयवर ठेवलेल्या फोटोफ्रेममध्ये बोट दाखवत विचारलं. त्याने तसं विचारल्यावर मिसेस रागिणीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ती काही काळ त्या फोटोकडे एकटक बघत राहिली. तिच्या डोक्यात भराभर चक्रे फिरली. तिच्याकडून येणाऱ्या उत्तराला वेळ लागतो आहे हे अमरच्या लक्षात आलं. आपला प्रश्नरूपी बाण बरोब्बर ठिकाणी लागला याची त्याला खात्री झाली. तो प्रश्न पुन्हा विचारणार तोच ,
“ हो , ओमी विग लावायचा. त्याचे केस कमी होते. ”, ती अमरकडे बघत ठामपणे म्हणाली. अमरला तिच्याकडे बघून ती खरं बोलतेय की खोटं याचा अंदाज येत नव्हता.
" ओके , मला सांगा , तुमच्या दोघांचे फारच कमी फोटो आहेत , पर्यायाने मी विचारेन की , ओमी मिरचंदानी यांचे तुमच्याबरोबर फार फोटो नाहीत , असं का ? " , अमरने पुन्हा विचारलं .
" ओमीला आणि मला दोघांनाही फोटो काढायला आवडत नव्हतं , आम्ही दोघेही साधेपणाने राहात होतो , म्हणून तर लग्न सुद्धा साधेपणाने कोर्ट मॅरेज केलं . लग्नाचे थोडेफार फोटो आहेत , पण मला कळलं नाही कि तुम्ही असं का विचारताय ? " , तिने काहीशा संशयाने विचारलं .
" मी सहज विचारलं , जनरली नवरा- बायकोचे एकत्र असे बरेच फोटो असतात , तसे तुमचे फार दिसत नाही .", अमर म्हणाला.
“ बरं , आमचे जास्त फोटो नाहीत. मग ? तुम्हाला काय म्हणायचंय ? ” ती त्याच्याकडे रोखून पाहू लागली.
“ तुमचं एकमेकांशी नीट पटत होतं ना ? " , अमरने थेट विचारलं. त्यावर रागिणी हताशपणे हसली. “ काय झालं मॅडम ? ”
“ नाही , मला तुमच्या प्रश्नांची गंमत वाटतेय . आमचे एकमेकांबरोबर जास्त फोटो नाहीत याचा अर्थ आमचं एकमेकांशी नीट पटत नाही , असा जो तुम्ही तर्क केलाय त्यावर मला हसायला आलं . ” तिने टोमणा मारला.
“ ओके , ठीक आहे , मिस्टर ओमी मिरचंदानी यांनी बिटकॉईन कोणत्या क्रिप्टो वॉलेटमध्ये , किंवा कोणत्या ठिकाणी ठेवले आहेत ? याबद्दल आपल्याला काही माहिती आहे का ? ”, वाघचौरे साहेबांनी मूळ प्रश्नावर सगळ्यांना वळवलं .
“ सॉरी सर , त्याबद्दल मला जास्त काही माहिती नाही. ”, रागिणी नकारार्थी मान डोलावत म्हणाली.
“ पण सगळा बिझनेस जो आहे , तो तुम्हीच पाहात होतात ना ? आम्ही चौकशी केली आहे , त्यात तुमच्या एक्स्चेंजच्या एम्प्लॉयींनी हेच सांगितलंय. ”, सौदामिनी मॅडम म्हणाल्या.
“ बरोबर आहे. पण मी फक्त एक्स्चेंजचे डेली ऑपरेशन्स पहात होते. बाकी कंपनीची स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट आणि न्यू क्लाएन्ट , न्यू टाय-अप वगैरे मोठी मोठी कामे ओमी स्वतः करायचा. त्यामुळे एक्स्चेंजमध्ये असणाऱ्या फंड्सबाबत तोच बघायचा. मला त्याच्या क्रिप्टो वॉलेटबद्दल काहीच माहिती नाही. ”
“ ठीक आहे, त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल फोन आम्हाला पुढील तपासासाठी लागेल. आणि तुमच्या घराची तपासणीही करावी लागेल. ”, सौदामिनी मॅडम म्हणाल्या. रागिणीने त्याला मूक संमती दिली आणि ओमीचा फोन आणि लॅपटॉप सौदामिनी मॅडमना आणून दिला.
" या दोघांना पासवर्ड आहे का ? " , सौदामिनी मॅडमने विचारलं.
“ हो , दोन्ही पासवर्ड प्रोटेक्टेड आहेत, पण मला त्याचा पासवर्ड माहित नाही. ”, रागिणी म्हणाली.
“ असं कसं काय ? तुम्हाला पासवर्ड माहीत नाही ? ”, वाघचौरे साहेबांनी आश्चर्याने विचारलं .
" तसा आधीचा पासवर्ड माहीत होता , बट फॉर सिक्युरिटी रिझन , ओमी पासवर्ड नेहमी बदलायचा . रिसेन्ट जो पासवर्ड त्याने टाकला होता , तो मला माहित नाही . ", रागिणी म्हणाली .
" ठीक आहे , आमचे चिकटे साहेब पासवर्ड क्रॅक करतील , तुम्ही लॅपटॉप आणि मोबाईल दोन्ही द्या ", सौदामिनी म्हणाली. त्यावर अमर काहीतरी म्हणणार इतक्यात सौदामिनीने ओमीचा फोन आणि लॅपटॉप चिकटेंकडे दिला सुद्धा ! तात्पुरती चौकशी थांबवून पोलीस निघून गेले. रागिणीने कपाळावर जमा झालेला घाम टिपून घेतला. आणि एका अननोन नंबरला फोन लावला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!