बुमरँग !

Submitted by Dr. Satilal Patil on 13 June, 2022 - 01:26

नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सायकल वरच्या प्रभातफेरीला निघालो. आज रविवार असल्याने जरा लांबचा पल्ला गाठणार होतो. मावळातल्या खेड्यापाड्यातून सकाळी सकाळी सायकल चालवायचा आनंद काही वेगळाच आहे. मंदिराच्या घंटानादाशी जुगलबंदी करणारा बैलांच्या गळ्यातला घंटेचा आवाज. थंड हवेवर पसरलेला गोठ्यातील गोमुत्राचा गंध. अश्या वातावरणात सायकल चालवायचा आनंद काही औरच. अंगणात पहाटेची झाडलोट सुरु होती. एवढ्यात, अश्या सुरेल सकाळी (बे)सूर कानावर पडले. समोरच्या गल्लीत दोन बायका हे (बे)सूर आलापत होत्या. एवढ्या सकाळी भांडण? अश्या रामप्रहरी या बायांना भांडणासाठी कोणता वैश्विक मुद्दा मिळाला असेल? या कुतूहलाने कडेला थांबून भांडणानंद घेऊ लागलो. दोन्ही शेजारणी होत्या. हातात झाडू घेऊन त्या कडाकडा भांडत होत्या. एकीने अंगण झाडताना तिचा कचरा दुसरीच्या अंगणात ढकलला होता. मग दुसरीने हळूच तो वानोळा तिच्याकडे साभार परतवला होता. तुझा कचरा माझ्या अंगणात का टाकला? यावरून हे भांडण पेटले होते. बायांनो कचऱ्यावरून तुम्हीच काय पण मोठमोठाले देश देखील भांडताहेत असं मनातल्या मनात म्हणत, मेंदूवर विचारांचा आणि सायकलच्या पायडलवर पायाचा जोर वाढवत, विचार आणि सायकल दोघांच्या चाकाला गती दिली.

खरंच, आपला कचरा दुसऱ्याच्या अंगणात टाकायची खोड जागोजागी दिसते. बऱ्याच ठिकाणी घरं चकाचक असतात आणि अंगणात मात्र कचऱ्याचा ढीग साठलेला असतो. एवढंच काय, पण बस, रेल्वेच्या खिडकीतून पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक कागद, फळांच्या साली फेकणारे फेकू सर्रास आपलं कचारफेकीचं कसब आजमावतांना दिसतात. ही झाली कचारफेकीची पहिली पातळी. पुढच्या पातळीवर वातावरणात फेकले जाणारे धुराचे लोट, शेतीतील रसायनांचा मारा, घराघरातून निघणारे, नद्यानाले आणि समुद्र प्रदूषित करणारे साबणी सांडपाण्याचे लोट. म्हणजे आपल्या घराबाहेर कचरा टाकला की प्रॉब्लेम संपला असं त्यांना वाटतं. पण मग हा कचरा साफ तरी कोणी करायचा? आणि तो खरंच साफ केला जातो का?

निसर्ग ही समस्या सोडवण्यासाठी काय उपाययोजना करत असेल असा प्रश्न पडला आणि माझ्या विचारांचं चाक त्या दिशेने भिरभिरू लागलं. निसर्गाने प्रत्येक जीवाचा पाय एकदुसऱ्याशी बांधून या ग्रहावर पाठवलंय. हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश यांसह पंचमहाभूतीय तत्वांना वनस्पती, एकत्र बांधून अन्न तयार करतात. मग शाकाहारी, मांसाहारी जीवांच्या मार्गे हे अन्न सूक्ष्म जीवांपर्यंत पोहोचतं. वनस्पतींनी बांधलेली अन्नद्र्यव्यांची माळ सूक्ष्मजीव सोडवतात आणि त्यांना परत वातावरणात मुक्त करतात. एका जिवाने जसं दुसऱ्या जिवाच्या अन्नाची जबाबदारी घेतलीय, तशीच त्याच्या कचरानिर्मूलनाची देखल घेतलीय. अन्नसाखळीच्या पहिल्या स्तरावर, झाडाच्या पालापाचोळ्याला प्राणि, पक्षी, किडे आणि सूक्ष्मजीव अन्न म्हणून संपवतात आणि आपली घरं बांधण्याबरोबर दैनंदिन कामासाठी त्याचा उपयोग करतात.

वनस्पतीच्या कचऱ्याची विल्हेवाट तर लागली पण प्राणी, किडे आणि इतर जीवांचं काय? या शाकाहारी आणि मांसाहारी जीवांनी तयार केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट वनस्पती, किडे, पक्षी, जलचर आणि सूक्ष्मजीव लावतात. माणसाने फेकलेल्या किचनमधल्या कचऱ्यापासून ते मानवी विष्ठेपर्यंत प्रत्येक गोष्टीची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी निसर्गातील घटक घेतात.

निसर्गाच्या योजनेनुसार या ग्रहावर तयार होणारा कचरा येथील रहिवाशी आपल्या शरीरात सामावून घेतात. त्यातील प्रदूषण गाळून घेऊन उरलेला माल अन्नसाखळीतील पुढच्या मेम्बरकडे सफाईसाठी पाठवला जातो. उदाहरण द्यायचं झाल्यास, शेतातील भाजीपाल्यावर, लवकर विघटित न होणारं, चुकीचं कीटकनाशक फवारलं असेल, तर त्याचे अंश पिकांमध्ये साठून राहतात. साठून राहतात म्हणण्यापेक्षा, सफाईचा नादात त्या रसायनाला आपल्या शरीराच्या चाळणीत अडकवून ठेवतात. मग हे भाजीपाले माणसाच्या जेवणात येतात. आपलं शरीर त्यातील बरेचसे रसायनं गाळून उरलेला रसायन विरहित किंवा कमी रसायन असलेला भाग विष्ठेवाटे बाहेर टाकतं आणि स्वच्छ निसर्ग अभियानात आपलं योगदान देतं. या विष्ठेवर वनस्पती आणि किडे प्रक्रिया करून साफसाईच्या कामात हातभार लावतात. सर्वात शेवटी सूक्ष्मजीव त्या पदार्थातील घटकांना वेगळे करून त्यांच्या मूळ स्वरूपात मुक्त करतात. झाडांनी बांधलेले पंचमहाभूतं सूक्ष्मजीव मोकळे करतात आणि निसर्गचक्राचं आवर्तन पूर्ण करतात.

निसर्गाची ही वैश्विक कचरानिर्मूलन योजना तोपर्यंत सुरळीत सुरु होती जोपर्यंत अन्न बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून निसर्गात उपलब्ध गोष्टींचा उपयोग व्हायचा. पण मेंदूबरोबर मानवाची दादागिरी वाढली आणि निसर्गात अस्तित्वात नसलेल्या गोष्टींची निर्मिती त्याने करायला सुरवात केली. पृथ्वीच्या पोटात खोलवर दडलेल्या बाटलीबंद पेट्रोलियम पदार्थाच्या सैतानाला बाहेर काढून त्यापासून हजारो वेगवेगळी रसायनं बनवली गेली. त्यांचा वापर दैनंदिन जीवनात होऊ लागला. प्लास्टिक हे पेट्रोलियम पदार्थांचाच एक भाऊबंद. हे नवरासायने बनवले, पण त्यांची विल्हेवाट लावण्याची यंत्रणेविणा. आता गोची ही झाली, की निसर्गनिर्मित कच्च्या मालापासून बनलेल्या गोष्टींची विल्हेवाट लावायची यंत्रणा जीवांकडे त्यांच्याकडे होती. पण निसर्गात अस्तित्वात नसलेले हे पदार्थ कसे विघटित करायचे याची तोड मात्र त्यांच्याकडे नव्हती. हा प्रश्न त्यांच्यासाठी आउट ऑफ सिलॅबस होता. मग जीवसंस्था कन्फ्युज झाली. या एलियन पदार्थाची विल्हेवाट लावतांना तिचा गोंधळ उडू लागला. व्हायरस लागलेल्या कॉम्पुटर सारखी तिची अस्वस्था झाली. सध्या वातावरणात पसरलेल्या रसायनांच्या विल्हेवाटीसाठी प्रत्येक जीव झटतोय. त्याच्या शरीरात या रसायनांची मात्र वाढतेय. हे रासायनिक भुत कसं उतरवावं हे माहित नसल्याने त्यांच्या शरीरातील संस्था गोंधळली आहे. त्यामुळे कॅन्सर, मधुमेहासारखे रोगांच्या विळख्यात त्यांनी स्वतःला अडकवलंय.

हे झालं घन कचऱ्याचं. पण वायुप्रदूषणाचं काय? असा प्रश पडणं स्वाभाविक आहे. तर हवा शुद्ध करायचं कामही सर्व जीव करतात. पक्षी, प्राणी, किडे, सूक्ष्मजीव यासारखा प्रत्त्येक जण वातावरणातील हवा आपल्या शरीरात शोषून घेतो आणि परत बाहेर टाकतो. माणसाला निसर्गाने हवा साफ करण्यासाठी फुफ्फुसं दिलीयेत. प्रदूषित हवा आपण आपल्या फुफ्फुसात भरून घेतो आणि ऑक्सिजन बरोबरच त्यातील धूर, धूळ आणि रसायनं देखील फुफ्फुसात शोषून घेऊन स्वच्छ हवा बाहेर टाकतो. फॅक्टरीतला, कचरा जाळतांनाचा, गाडीच्या धुरकांडातून सोडलेला आणि लग्नात उडवलेल्या फटाक्यांच्या बारांबरोबर हवेत सोडलेला प्रत्त्येक रासायनिक वायूचा, धुराचा, धुळीचा कण, आपल्या फुफ्फुसाच्या गाळणीने आपल्याला गाळावा लागणार हे अंतिम सत्य आहे. फुफ्फुसाच्या कॅन्सर रुग्णांची वाढणारा आकडा त्याचा पुरावा आहे.

जसं प्राण्यांचं तसंच जलचरांचंदेखील आहे. पाणी हीच त्यांची हवा. पाण्यातून ऑक्सिजन गाळून घेतांना त्यातील रसायंदेखील गाळले जातात. ही रसायनं त्यांच्या शरीरात साठवले जातात. अन्नसाखळीच्या उतरंडीत मासा हा सर्वात जास्त संवेदनक्षम आहे. पाण्यातील प्रदूषके शोषून घेत त्यांचं जलजीवनमान सुरु असतं. आजमितीला जड धातू आणि रसायनं मोठ्या प्रमाणात माश्यांमध्ये आढळतात. हेच मासे आपल्या जेवणाच्या प्लेटमध्ये येऊन रसायनशुद्धीसाठी आपल्या शरीराच्या चाळणीतून जातात.

माणसापुरतं बोलायचं झाल्यास आपण जमिनीत, पाण्यात टाकलेला जैविक, रासायनिक कचरा आपल्या अन्नामार्गे आपल्याला शरीरात जाणार आहे. आपल्या लिव्हरमध्ये, चरबीमध्ये आणि शरीराच्या इतर भागामध्ये त्याला साठवून, निसर्गाने नेमून दिलेलं सफाईकाम आपण करणार आहोत. हवेतील कचरा साफ करण्यासाठी फुफ्फुसाचा फिल्टर वापरणार आहोत.

याचा अर्थ, पृथ्वीवासियांनी तयार केलेला कचरा त्यांनाच साफ करावा लागणार आहे. वनस्पतींचा कचरा प्राणी, प्राण्यांचा कचरा कीटक आणि इतर जीव, असा एकदुसऱ्याचा कचरा साफ करत, या ग्रहाला स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. ‘साथी हात बढाना’ च्या चालीवर एकदुसऱ्याचा कचऱ्याचं निर्मूलन करणे अपेक्षित आहे. झाडं, पशुपक्षी, किडे आणि सूक्ष्मजीव प्रामाणिकपणे आपलं काम करताहेत. माणसा सारखी आपली जबाबदारी ते झटकत नाहीत. आज भल्या पहाटे आपलं अंगण साफ करण्याच्या प्रयत्नात, आपला कचरा दुसरीच्या अंगणात ढकलणाऱ्या बाईला काय माहित, की ती हा कचरा कुठेही ढकलू शकत नाही. तिचा हा कचरा एक दिवस तिच्याकडे परत येणार आहे. आपण केलेलं कचराकर्म आपल्याला याच जन्मात भोगायचं आहे. आपण वातावरणात फेकलेली प्रत्येक गोष्ट बुमरँगसारखी आपल्याकडे परत येणार आहे. यापुढे कोणतीही गोष्ट फेकताना, ती किंवा तिचे अंश माझ्याकडे परत येणार आहेत हे लक्षात असू द्या. आणि जर फेकलेली गोष्ट परत येणार असेल तर मग चांगली गोष्ट फेकूयात... म्हणजे चांगलंच परत येईल. मग होऊन जाऊदे.... चांगलं बुमरँग !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. सिक्स्थ एक्स्टिंक्षन मध्ये निसर्ग ह्या सर्व वैश्विक कचर्‍यावर मात करेल व पुढे निघुन येइल पण त्या आधी समूळ विनाश.

छान लेख आहे. छान मांडलेय वास्तव.

पण हे पटले तरी आपण कधी सुधारणार नाही.
कारण आपण सारे एक मनुष्यजात एक वसुंधरा म्हणून कधी विचार करणार नाही. आपण फक्त आपला स्वत:चा आणि आपल्या कुटुंबाचा विचार करतो. त्यातही आपल्या मृत्युपश्चात दोन पिढ्यांना काय भोगावे लागेल हा विचारही करत नाही.