क्रिप्टो ( Crypto ) भाग - १८

Submitted by मिलिंद महांगडे on 10 June, 2022 - 01:20

₿₿₿

संध्याकाळचा पश्चिमेचा वारा समुद्रावरून येत होता, त्या वाऱ्याने माडांचे लहानसे बन सळसळत होते. रागिणीच्या घराच्या सी फेसिंग बाल्कनीमध्ये ती आणि वकील मेघनाद निशाणदार बसले होते. दोघांमध्ये कंपनीच्या लीगल इश्यूज संदर्भात बोलणं चालू होतं . रागिणीच्या घरातला म्हातारा नोकर दोघांसाठी चहा घेऊन आला. तो येत असल्याची चाहूल लागताच दोघे यांत्रिकपणे बोलायचे थांबले . त्याने दोघांसमोर चहाचे कप ठेवले आणि तो निघून गेला.
" तू ह्या नोकराला किती दिवसांसाठी ठेवणार आहेस ? " , मेघनाद हळू आवाजात तिला म्हणाला.
" का ? काय झालं ? त्याचा काही प्रॉब्लेम आहे का ? "
" आपलं ठरलं होतं , कि महिनाभर ठेवू म्हणून. ”, तो म्हणाला.
" तो साधा आहे रे , ऐकायला सुद्धा कमी येतं त्याला , आणि आता ह्या परिस्थितीत दुसरा माणूस ठेवणे जास्त धोक्याचं आहे. " , ती चहाचा घोट घेत म्हणाली.
" मी दुसरा माणूस ठेव म्हणालो नाही , याला काढून टाक म्हणतोय ." , मेघनाद म्हणाला .
" वा रे वा ! घरची कामे कोण करील ? आणि एवढ्या मोठ्या कंपनीची मालकीण आणि एकही नोकर नाही ? कसं दिसेल ते ! " , रागिणी त्याच्यावर हळू आवाजात खेकसत म्हणाली.
" ओ हो … बाप रे ! हा तर मी विचारच केला नव्हता. भारीच आहात मालकीण बाई !" , म्हणत तो गमतीने हात जोडत म्हणाला.
" वेडा आहेस का ? हसतोयस काय , आणि हात जोडू नकोस , वकील आहेस ना , सिरीयस वाग जरा , तो नोकर बघेल तर काय विचार करेल ?" , रागिणीने दबक्या आवाजात मेघनादला झापलं . तो विचित्र चेहरा करून गंभीर असल्यासारखं दाखवू लागला , उगाचच समोर पडलेले पेपर्स गंभीरपणे वाचण्याचं नाटक करू लागला. त्याच्या ह्या वागणुकीची रागिणीला गंमत वाटली.
" इतकीही ओव्हरऍक्टिंग करायची गरज नाही . ", तिने टोमणा मारला . त्यावर मेघनाद दिलखुलास हसला .
" तुझ्यावर प्रेम करता येत नाही ना , तो म्हातारा असल्यावर ", मेघनाद हळुवारपणे तिचा हात हातात घेत म्हणाला.
" शु ss , काय बोलतोयस ? " तिने डोळे मोठे केले आणि आपला हात मागे घेतला.
" आता काय झालं ? तो आत किचनमध्ये गेलाय … त्याला काही दिसणार नाही . " , मेघनाद म्हणाला .
" पण नको तरीही . रिस्क नको . आणि आपण आपण कशाला चर्चा करतोय त्याच्याविषयी ? फार दिवसांचा प्रश्न नाही. आपल्या पुढच्या प्लॅनबद्दल बोल . ”, रागिणीने मूळ विषयाला हात घातला.
" आपला मागचा प्लॅन सतोशी नाकामोटो वर्क करतोय … सगळीकडे केयोस झालाय . सगळ्या न्यूज चॅनल वर तीच बातमी ! " , मेघनाद उत्साहात म्हणाला .
" हो मी बघितलं न्यूज चॅनेलला … पोलीस तर काहीच बोलू शकले नाहीत . त्यांचे चेहरे पाहण्यालायक झाले होते. मला तर दया यायला लागली त्यांच्यावर " , रागिणी गमतीदार चेहरा करून म्हणाली .
" आता हे लोक तर्क वितर्क करत बसतील , ओमी खरंच जिवंत असेल का ? कुठे असेल ? कुठे लपून बसला असेल ? का लपून बसला असेल ? आणि लवकरच पोलीस त्याबाबत तपास करायला येतील. तुला आता जास्त सावध राहायला हवं आहे . " , मेघनाद म्हणाला .
" हो , मला कल्पना आहे . " , ती म्हणाली .
" काहीही टेन्शन घेऊ नको , बिनधास्त राहा , मला खात्री आहे तू व्यवस्थित हँडल करशील हे . " , मेघनाद तिचा हात हातात घेत म्हणाला .
" हो , तू सांगितल्याप्रमाणे मी करेन सगळं . " , ती म्हणाली .
" मिस्टर ओमी यांनी तुमच्या नावावर जी प्रॉपर्टी केली आहे , त्याची कागदपत्रे लवकरच तयार होतील . तुम्ही काही काळजी करू नका . " , मेघनाद अचानकपणे त्याच्या बोलण्याचा टोन बदलत म्हणाला . याचा अर्थ मघाचा त्यांचा म्हातारा नोकर आजूबाजूला असणार किंवा तो त्यांच्याकडे पहात असणार याचा अंदाज रागिणीला आला . तिनेही मग गंभीर चेहरा करत समजुतीने मान डोलावली . ली.
" पोलीसांचा तपास किती दिवस चालेल अजून ? मला शहर सोडता येत नाही त्यामुळे , कुठे बाहेरही जाता येत नाही . तुम्हाला काही करता येईल का त्यावर मिस्टर निशाणदार ? " , तिनेही गंभीरपणे विचारायचं नाटक केलं . तिला गंमत वाटत होती.
" लवकरच आपण कोर्टात त्याबाबतीत अर्ज करू … सोड , गेला तो किचनमध्ये . ", मेघनाद पलीकडे बघत म्हणाला .
" पण मी खरंच विचारतेय ? अजून किती दिवस चालणार हे ? " , रागिणीने विचारलं .
" फार दिवस लागणार नाहीत . मी लवकर तुला सोडवण्याचा प्रयत्न करेन . तू काही काळजी करू नको , माझ्यावर विश्वास आहे ना ? ", तो तिच्या डोळ्यांत बघत म्हणाला .
" तुझ्यावर तर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे . " , ती हळुवारपणे म्हणाली. तो समाधानाने हसला.
" कधीकधी मला तुझं कौतुक वाटतं , तुझ्यावर मी खूप मोठी जबाबदारी टाकली आहे , तुला भीती नाही ना वाटत ? "
" तू आहेस ना माझ्यासोबत , मग भिण्याचं काय कारण ? ", ती म्हणाली , तो समाधानाने हसला.
दोघांचं बोलणं चालू होतं , पण त्याच वेळी आतल्या म्हाताऱ्या नोकराने गुप्तपणे आपला फोन काढला आणि एका व्यक्तीला फोन लावला .

₿₿₿

जयसिंग आणि झिपऱ्या टोनीच्या घरी आले. त्यावेळी टोनी टीशर्ट आणि घरात घालायच्या शॉर्ट पॅन्टवर होता आणि येरझऱ्या घालत होता .
" जयसिंगराव , बरं झालं तुम्ही आले. मी तुमचीच वाट बघत होतो . " , टोनी घाईघाईने म्हणाला .
" टोनीभाऊ , तुम्ही फोनवर बोलला ते खरं हाय का ? तो ओमी मिरचंदानी खरंच जिवंत हाय का ? " , जयसिंगने विचारलं .
" बहुतेक तो बास्टर्ड जिवंत आहे . मला एका रिपोर्टरचा फोन आला होता , चला आपल्याला त्याला भेटायला जायचंय " , म्हणत टोनी कपडे बदलू लागला .
" कुटं जायचंय पण नक्की ? आणि कोन रिपोर्टर हाये ? " , झिपऱ्या विचारू लागला.
" हाय आपला ओळखीचा . तो आज आपल्याला सांगणार हाय " , टोनी शर्टाची बटणे लावत म्हणाला .
" काय सांगनार हाय पण ? " , जयसिंगने विचारलं .
" मला तो रिपोर्टर म्हणाला त्याला कायतरी समजलंय … आता काय ते आपल्याला त्याला भेटल्यावरच समजेल . पण तो म्हणाला की ओमी मिरचंदानी जिवंत हाय आणि तो कुठंतरी लपून बसलाय . " , टोनी म्हणाला .
" आयला , सापडायला पाहिजे तो ओम्या … असा बदकाविन त्याला का ज्याचं नाव ते ! माझे 20 करोड खाल्लेत त्यानी . त्याला असा सोडनार नाय . " , जयसिंग एकदम पेटला होता.
" मालक , पण आधी भेटूद्या तरी … चला जाऊ आपण लवकर " झिपऱ्या म्हणाला .
तिघे निघाले . टोनीने त्याची स्कुटी काढली .
" टोनीभाऊ , आम्ही कसं येऊ ?"
" हे काय , बसा की स्कुटीवर "
" तिघं कसं बसणार ? " , जयसिंगने विचारलं
" आवो बसा, ट्रिपल सीट जाऊ …कुटं रिक्षाला पैशे खर्च करता ! जास्त लांब नाय जायचं . बसा लवकर " , टोनी स्कुटी चालू करीत म्हणाला . जयसिंगने झिपऱ्याला मध्ये बसायला सांगितलं , त्याच्या मागे जयसिंग बसला . आधीच टोनी म्हणजे भला मोठा जाडा माणूस ! ती बारीकशी स्कुटी ! त्या दोघांच्या मध्ये झिपऱ्याचं सँडविच झालं , पण आता करता काय ? तिघेही कसेबसे कसरत करत त्या एवढ्याशा स्कुटीवरून निघाले . थोड्या वेळाने ते शहरनामा वृत्तपत्राच्या ऑफिसशेजारी येऊन पोहोचले . वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये बरीच गर्दी होती , बरेच लोक येत जात होते . टोनीने त्याच्या खिशातून मोबाईल काढला आणि एक नंबर डायल केला . थोडं बोलल्यावर तो जयसिंगपाशी आला आणि म्हणाला , " येतोय आपला माणूस . "
थोड्या वेळात एक मध्यम वयाचा डोक्यावर काळ्या पांढऱ्या केसांचे पट्टे असलेला व्यक्ती तिथे आला .
" हे रिपोर्टर सोनकांबळे . आणि सोनकांबळेजी हे माझे फ्रेंड जयसिंगराव . " टोनीने ओळख करून दिली.
" नमस्कार , बोला काय काम आहे ? " , सोनकांबळे विचारू लागला .
" आहो , असं काय करताय , तुम्ही काहीतरी इन्फॉर्मेशन देणार होता ना , ओमी मिरचंदानीबद्दल … " , टोनीने आठवण करून दिली.
" अरे हो , आम्हाला एक इमेल आला होता , त्यात लिहिलं होतं की ओमी मिरचंदानी मेलेला नाही , तो जिवंत आहे आणि लपून बसलाय . " सोनकांबळे म्हणाला .
" काय सांगता ? कुटं हाय त्यो ? कुटं लपून बसलाय ? " , जयसिंगने उत्साहाच्या भरात विचारलं .
" ते काय त्या ईमेलमध्ये लिहिलं नाय बघा ! " ,सोनकांबळे म्हणाला.
" नुसतं जिवंत आहे , एवढंच लिहिलंय ? आणखी काही माहिती दिलीय का ? त्याचा पत्ताबित्ता ? " , झिपऱ्याने विचारलं .
" नाही . एवढंच लिहिलं होतं . " सोनकांबळेच्या या वाक्यावर जयसिंग एकदम हताश झाला . ज्या वेळी टोनीचा त्याला फोन आला होता की ओमी मिरचंदानी जिवंत आहे , त्यावेळी त्याला केवढा तरी उत्साह वाटला होता , तो आता एकदम नाहीसा झाल्यासारखं त्याला वाटू लागलं . एक आशेचा किरण त्याला दिसत होता , कुठून तरी आपले गेलेले पैसे परत मिळतील असं त्याला वाटलं ,पण आता त्याचा काही उपयोग नाही , या टोनीवर सुद्धा आपण गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवतोय , या टोनीला खरंच अक्कल नाही . उगाच आपल्याला आशेला लावलं असं त्याला वाटू लागलं . वैतागून तो बाजूच्या पायरीवर जाऊन बसला. त्याला आता काहीच करावसं वाटेना. इकडे टोनी सोनकांबळेला बाजूला घेऊन बोलू लागला . झिपऱ्या जयसिंगच्या बाजूला जाऊन बसला .
" मालक , हा टोनी अर्धवट , त्यात त्याचा हा पत्रकार सोनकांबळे डबल अर्धवट हाय बघा. आपल्याला कशाला इतक्या लांब बोलावलं असंल ह्या येड्यानं ? " , झिपऱ्या म्हणाला.
" व्हय लेका , कुठून ह्या येड्यांच्या नादी लागलो असं झालंय . मला वाटलं काहीतरी माहिती मिळल त्या ओम्याची , पण कसंल काय ! नशीबच फुटकं हाय आपलं . " , नैराश्याने जयसिंग म्हणाला.
" त्यो टोनी येतोय बघा . " झिपऱ्या म्हणाला . टोनी कसनुसा चेहरा घेऊन जयसिंग पाशी आला .
" सॉरी जयसिंगराव , माझ्या ऐकण्यात कायतरी मिष्टेक झाली . मी त्या रिपोर्टरला सांगून ठेवलंय कि, आणखी काही इन्फॉर्मेशन मिळाली की आम्हाला लगेच सांग म्हणून ! "
" ठीक आहे टोनी भाऊ , चला निघुया आपण ?" , जयसिंग म्हणाला.
" पण जाताजाता एक महत्वाची गोष्ट त्याने मला दिली ." असं म्हणून टोनीने एक कागद जयसिंगपुढे नाचवला.
" काय आहे त्यात ? "
" बघा तरी ! " जयसिंगने कागद उघडून पाहिला , त्यावर दहा अंक लिहिले होते .
" कसला नंबर आहे हा ? " , न समजून त्याने टोनीला विचारलं .
" हा मोबाईल नंबर आहे , आपल्या रिपोर्टरने दिला "
" कुणाचा आहे हा मोबाईल नंबर ? "
" ओळखा बघू ! " , जयसिंगला वैताग आला होता आणि हा टोनी उगाचच कोडी घालत होता.
" मला कसं माहीत आसणार? तुम्हीच सांगा राव " , जयसिंग वैतागून म्हणाला
" ओमी मिरचंदानीच्या बायकोचा, रागिणी मिरचंदानीचा मोबाईल नंबर हाय हा … " टोनी असं म्हणाला आणि जयसिंगचा चेहरा आनंदाने खुलून गेला.
" काय सांगता टोनिभाऊ ? हा खरंच तिचा नंबर आहे का ? "
" हो जयसिंगराव … तिचाच नंबर आहे हा ! "
" टोनी भाऊ , खूप महत्त्वाची गोष्ट दिलीत तुम्ही मला . आता बघा मी काय करतो ते ! ", जयसिंगच्या डोळ्यांत निर्धार दिसत होता.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users