अभयारण्य

Submitted by पाचपाटील on 3 June, 2022 - 23:32

रात्रीचे अडीच वाजले आहेत.
लेखक डोळे मिटतो.
झोपण्याचा प्रयत्न करतो.
पण आत सगळा तोच घोंगा चालू होतो.
डोकं फुटायला हवं होतं एव्हाना.
थकून डोळे उघडतो.
तर अंधारात गरगरणारा पंखा दिसतो.

हे असं का होतंय ? काय झालंय लेखकाला ?
त्याचा भोसडा वगैरे उदास झालाय का?
पण भोसडा उदास होऊन तरी काय करणार..!
प्रॉब्लेम असतातच..! सगळ्यांनाच असतात..!
पण लेखक लोक स्वतःच्या भोसडा उदास
होण्याचं भांडवल करतात.
त्यात ते पटाईत असतात.
अर्थात, ते करत काहीच नाहीत.
जागच्या जागी तडतडत बसतात..!
त्यांच्या संतापाचा कधी भडका उडत नाही.‌
त्यामुळे त्या भडक्याचा लख्ख उजेड
पडत नाही.
आणि त्या उजेडातून कुणाचे डोळेही
दिपत नाहीत.
आणि त्यातून आर या पार निकालही
लागत नाही.
लेखकांचा क्रोध रॉकेलवरच्या चिमणीसारखा
मिणमिणता.! त्यातून नाईलाजाने सांडणारा
अशक्त पिवळसर उजेड..!
त्यात काजळीच जास्त.
आणि जवळच्यांना ताप..!

पण कधीकधी अति होतं. आणि मग ते हातात
पेन घेऊन कागदावर तांडव करू पाहतात.
सगळा ताप त्यांच्या उजव्या हातातून प्रवास
करत बोटांच्या टोकांमधून पेनामार्फत
कागदावर उतरतो.
अर्थात, कागद काही जळत-बिळत नाही.
पण चटका बसतो.

असे अनेक कागद साठले की त्याची
कथा-बिथा होते.
अशा अनेक कथा-बिथा साठल्या की त्यांचा
कथासंग्रह होतो.
कथासंग्रहाला 'काजवा' नाव दिलं जातं.
'काजवा' पाच पिढ्या धूळ खात पडून राहतं.

पुढे कधीतरी सहाव्या पिढीतल्या एका चष्मिश
वाचकाला ते फुटपाथवर सापडतं..
आणि तो हळहळतो की, कशाकशातून गेला
असेल हा माणूस, हे सगळं लिहिताना..!
तरीही कसली सशक्त भाषा आहे ही..!
एवढ्या महत्त्वाच्या लेखकाचं काहीही मोल
झालं नाही..! लाज वाटली पाहिजे..!

हे सगळं असं कसं काय झालं?
तर फार पूर्वीच्या काळी एक-दोन रूपयांच्या
नोटा बिनकामाच्या होऊन बाद झाल्या.
आणि नंतर शंभरच्या नोटेचीही तीच गत झाली.
पण काही लोकांना अजूनही शंभरची नोट मोठी
वाटत होती.
तसल्या रकट्यालंगोट्या लोकांना काय वाटते,
हे कोण विचारतो?
आणि किडा-मुंग्यांना चिरडायला किती वेळ लागतो?
त्यामुळे ते लोकही नोटेसारखेच रद्दबातल होत
चालले.
ते पाहून काही लेखक ओरडायला लागले.
पण सगळीकडे झगमगाट दणदणाटच एवढा
होता की त्यांचा आवाज त्यांना स्वतःलाही ऐकू
येईना..!
मग तेही रद्दबातल होत चालले.
एन्डेजर्ड स्पेसीज. लुप्त होण्याच्या मार्गावर
असलेली प्रजाती.
'जगायला जमत नसेल तर नष्ट होणं नैसर्गिकच..!'
डार्विनचा उच्चार..!

शिवाय त्यातच सगळीकडे ऑनलाईन शिकारी
दबा धरून बसलेले.
ते उरल्यासुरल्या लेखकांना फटकवायला
लागले. औकात काढायला लागले.
लेखकांनी हबका खाल्ला.
मग समूहमनाचा विवेक बिवेक जागा झाला.
आणि मग लेखकांना वाचवण्यासाठी पत्रकं
निघायला लागली.

शासनदरबारातल्या गेंड्यांनी सवयीप्रमाणे ती
पत्रकं ढुंगणाखाली सरकवली आणि कूस
बदलली.
म्हणजे तशा बातम्या आल्या..!
तेवढ्यात ऑनलाईन शिकाऱ्यांनी अजून
चारपाच लेखकांना घोळसलं.
थोडीफार तुरळक बोंबाबोंब झाली.
म्हणजे तशा बातम्या आल्या..!
शासनदरबारातले गेंडे कुरकुरत जागे झाले.
म्हणजे तशा बातम्या आल्या..!
गेंडे घाईघाईने टॉयलेटमध्ये गेले.
म्हणजे तशा बातम्या आल्या..!
गेंड्यांनी टॉयलेटमधूनच व्हर्च्युअल मिटींग्ज
घेतल्या.
म्हणजे तशा बातम्या आल्या..!
गेंड्यांनी कमिट्या बसवल्याच्या घोषणा
केल्या.
म्हणजे तशा बातम्या आल्या..!

कमिट्यातले सदस्य माणसंच होती.
आणि माणूस म्हटल्यावर त्याला जात धर्म
बॅकग्राऊंड वगैरे असणारच ना..!
तरीही त्याची चर्चा झाली.
म्हणजे तशा बातम्या आल्या..!

मग कमिट्यांचे सदस्य सहपरिवार चीन,
उत्तर कोरिया, रशिया, म्यानमार, युगांडा,
सोमालिया, कंबोडिया, अफगाणिस्तान वगैरे
देशांमध्ये सखोल अभ्यासादौऱ्यावर माय पासली
घालायला गेले.
म्हणजे तशा बातम्या आल्या..!

आणि त्या दौऱ्याचं फलित म्हणजे
लेखकांसाठी हे सुंदर अभयारण्य तयार झालं..!
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असं इंटरनॅशनल
पार्क..! काही कमी नाही..!
लेखकांनी हवं ते लिहावं..!
मुक्तपणे लिहावं..!
आणि ते स्वतःच वाचत बसावं..!
इतरांच्या डोक्याला ताप द्यायचं कारण नाही.

इथे जंगल सफारी वगैरेही असते.
पर्यटक वगैरे येतात समर व्हॅकेशनमध्ये.
काऊबॉय-हॅट्स बिस्लेरी गॉगल्स दुर्बिणी
कॅमेरे वगैरे साग्रसंगीत तंतोतंत...!
कधी कधी नशिबानं दूरवर एखादा लेखक
दिसतो.
स्वतःशीच बडबडत उभा असतो.
आभाळात नजर लावून हातवारे करत असतो.
त्याच्या डोळ्यांत मोडकळीस आल्याची झाक
दिसते.
पर्यटक एक्साईट होतात..!
किंवा समजा एक थ्रील वगैरे वाटतं.
सगळेजण घाबरल्याचा आव आणतात.
अंगावर माफक शहारे वगैरे..!
अर्थात, मुळातली भीतीच बालिश असल्यामुळे
नंतर सुटकेचा निःश्वासही फारसा गंभीर
असण्याची गरज नसते..
पण हे एक करावं लागतं..! प्रथा आहे तशी.
बाकी मग नंतर एक लेखक नाचून वगैरे
दाखवतो. पोवाडे वगैरे म्हणून दाखवतो.
त्यातून एक सांस्कृतिक अपलिफ्टमेंट होते.
लोकांचे तिकिटाचे पैशे वसूल होतात.
त्यामुळे आणखीनच बरं वाटतं.

शिवाय नंतर मग ठिकठिकाणी वेगवेगळ्या
पोजमधले फोटोज तर आवश्यकच असतात
ना म्हणजे..!

मेमरीज तर क्रिएट केल्याच पाहिजेत ना..!
क्रिएट करण्यासारखं समजा त्यात काहीही
नसलं, तरीही क्रिएट तर केलंच पाहिजे ना..!
फोटोंशिवाय आयुष्य म्हणजे भुसा भरलेलं
पोतंच होऊन जाईल ना..!

बाकी मग नंतर ती सगळी फोटो-स्टोरी वगैरे
व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुकवर वगैरे टाकलीच
पाहिजे ना..!
आपल्या भावनांचं वहन केलंच पाहिजे ना..!
आपल्या अनुभवांचं, हगल्या-मुतल्याचं
ताबडतोब प्रक्षेपण केलंच पाहिजे ना..!
आणि नंतर मग लोकांच्या प्रतिसादांची वाट
बघत बसलंच पाहिजे ना..!
लोकांना आपण आवडतोय का, ते चेक
करून बघितलंच पाहिजे ना..!
स्वतःला गुदगुल्या करून घेतल्याच
पाहिजेत ना..!
लोकांच्या मूडवर आपण लटकत राहिलंच
पाहिजे ना..!

आपल्या सृजनाचा आनंद जगभरात चहुकडे
पसरवलाच पाहिजे ना..!
म्हणून मग नंतर व्हिडिओ वगैरे बनवून
ते यू ट्यूबच्या अथांग समुद्रात सोडून दिलेच
पाहिजे ना..!
बाकी, मग ते व्हिडिओज इतर कुणी शेअर
करायची कशाला वाट बघायची उगाचच...!!
आपण स्वतःहूनच त्या लिंक्स सगळ्या
गावभर शेअर केल्याच पाहिजेत ना..!
जबरदस्तीने वाऱ्याहाती माप दिलंच
पाहिजे ना..!

एवढं करूनही;
समजा ते व्हिडिओ किनाऱ्यावरच डुबून गेले
असतील..
आणि समजा वर्षाभरानेही त्याला झिरो व्ह्यूज
असतील, तरीही काय हरकत आहे..!!
आपण आपला सृजनाचा आनंदसोहळा
अनुभवणं महत्वाचं..! नाही का??
हे बघा, कुणी काय करावं हा शेवटी ज्याचा त्याचा
प्रश्न आहे..! लोकशाही आहे आपल्याकडे..!
पण तरीही शेवटी सामाजिक जीवनात काम करत
असताना, कौटुंबिक जीवनात काम करत असताना,
कुठं थांबायचं हे ज्याचं त्याला कळलं पायजे..!

असो. ही लांबड फार लावता येईल.

बाकी, नीट बघितलं तर,
फोटोंमध्ये दिसतं की त्या लेखकांचे दात आणि
नख्या जाग्यावर नाहीत..
उपटून टाकले असतील बहुतेक..
उगाच कुणाचं रक्त-बिक्त काढलं तर काय घ्या..!

फोटोंमध्ये दिसतं की त्या लेखकांच्या मणक्यात
लिबलिबीत कणीक भरलेली आहे..
तिथलं मूळचं पोलाद कुठं दिसत नाही..!
कुठं गायब झालं असेल?
भंगारात विकलं असेल काय?
शोधलं पाहिजे ते ताबडतोब..!
पोलाद असं नष्ट झालं तर मग बिल्डिंगा कशा
बांधणार??
एखादी कमिटीच बसवायला पाहिजे..!
ते शोधतील बरोब्बर..!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users