परंपरा

Submitted by दत्तात्रय साळुंके on 31 May, 2022 - 08:55

जशी दिसाला माथ्यावर यायची घाई झाली
तशी ती डोईवर भाकरीचं टोपलं घेऊन निघली
टोपल्याला तोल सावरताना तिच्या संग धाप लागली
पावलागणिक तेही तिच्या जीवा सारखं झालं वर खाली
वाटही तिच्या पावलांच्या गतीनं बेभान पळाया लागली
पांदीतलल्या खट्याळ पाण्याची घुंगर छुमछुमली
इजगत चमकून पांदीतन ती एकदाची बांधावर आली
आन मळ्याची सळसळ म्हणाली
“ कारभारी न्याहरी आली”
तव्हा सुस्कारा टाकला औतानं म्हणलं ल‌ई भुक लागली
तो न्याहरी करताना ती हरकून त्याला निरखत गेली
त्यानं हात धुतलं आन सावलीला आडवा झाला
ती उठली बैलांच्या गव्हाणीत वैरण टाकली
फडक्यातली शिळी भाकर, शिळं कालवान सवईनं खाल्लं
गडी लय कष्टतो म्हून शिळपाकं बाईनं खायचं
सासू, सास-याची सेवा करायची, दीर, नंदला मया लावायची
नव-याची जलमभर दासी बनायची
असलं समंद बरमज्ञान तिला आई सांगायची
एक दीस ती म्हणली आई तुला कसं समदं कळतं
आई म्हणली माझी गुरु माझी आय, आन तिची गुरु तिची आई….
आसी आपली परंपरा एक पिढीकडून दुसरीकडं चालत राही‌

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोना पाटील म
SharmilaR

आपले खूप धन्यवाद....