क्रिप्टो ( crypto ) भाग - १३

Submitted by मिलिंद महांगडे on 29 May, 2022 - 23:24

₿₿₿

जयसिंग आणि झिपऱ्या हॉटेलच्या वेटरला घेऊन निघाले. टोनीला दारू प्रिय होती. आता त्याच्याकडून माहिती काढायची म्हणजे त्याला काहीतरी देणं भाग होतं. त्याने सोबत अर्धा खंबा रम घेतली. तो टोनी चिंबई व्हिलेज मध्ये राहात होता , एका एकमजली घरासमोर वेटरने त्या दोघांना आणलं. क्रिस्टिना व्हिला नावाची लाल रंगाची मोठी पाटी त्या बंगल्यावर लागलेली होती . हिरव्या रंगाचे मोठे गेट होते , आत छोटीशी बाग होती, बरीच फुलझाडे लावलेली होती. बऱ्याच वेली गेटवर आणि कंपाउंडवर पसरलेल्या होत्या. बाहेर पांढऱ्या रंगाचा बल्ब लावला होता. त्याचा अंधुकसा प्रकाश पडला होता. घरात अंधार दिसत होता.
“ हेच घर आहे टोनी साहेबांचं , मी जाऊ ? ” , वेटर म्हणाला.
“ हे ? आरं हितं तर सगळा अंधार दिसतुया . भायेर गेलाय का काय कुटं ? ”, झिपऱ्या म्हणाला.
“ नाय ओ , असंच असतं हे घर . ते आत असतील , मी जाऊ का ? ”, वेटर पुन्हा म्हणाला.
“ ठीक आहे . जा . ”, जयसिंग म्हणाला. पण तरीही तो वेटर काही जागचा हलेना . मग झिपऱ्याच्या लक्षात आलं तो जयसिंगाच्या कानाशी लागला , मग जयसिंगाच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने पाकिटाला हात घातला आणि शंभर रुपयाची नोट काढली. तेवढ्याने काही त्याचं समाधान झालं नाही . तो तसाच उभा राहिला , जयसिंगने आणखी दोन शंभरच्या नोटा काढल्या आणि त्याच्या हातात कोंबल्या . तो वेटर आनंदात निघून गेला.
“ जायचं का रं आत ? कुत्रं बित्रं नसंल ना ? ”, जयसिंग झिपऱ्याला म्हणाला.
“ काय नाय ओ मालक ,मग आलोय कशाला ? चला … ”, झिपऱ्या म्हणाला.
दोघेही आत गेले. आत घरात अंधारच होता. जयसिंगने बेल वाजवली. बराच वेळ कोणीच दार उघडलं नाही. ह्या वेळी त्याने जोरात बेल वाजवली. दरवाज्याची कडी काढल्याचा आवाज आला . दार उघडलं , समोर टोनी उभा होता.
“ टोनीभाऊ , मी जयसिंग … ओळखलं का ? ” , टॉनीने त्याच्याकडे निरखून पाहिलं , पण त्याला काही आठवलं आहे असं त्याच्या चेहऱ्यावर दिसेना . त्याने कदाचित बरीच दारू प्यायली होती . देशी दारूचा भपकारा येत होता. त्याने काही समजलं नाही अशा अर्थाची खूण केली .
“ टोनी भाऊ , आपण अप्सरा बार मध्ये भेटलो होतो , आठवतंय का ? तुम्ही पार्टी दिली होती . ” जयसिंग म्हणाला. अप्सरा बारचं नाव त्याच्या कानांवर पडताच , “ अप्सरा … अप्सरा … ” म्हणत तो रडायलाच लागला. जयसिंगने झिपऱ्याकडे बघितलं . ‘ कामातून गेलंय ! ’ अशा अर्थाचा चेहरा त्याने केला.
“ टोनी भाऊ , काय झालं एवढं रडायला ? अहो मला ओळखलं का तुम्ही ? मी जयसिंग … आपण बार मध्ये भेटलो होतो , तुम्ही मला बिटकॉइनबद्दल सांगितलं होतं , आठवलं का ? ”, जयसिंग विचारू लागला. आता बिटकॉइनचं नाव ऐकताच तो आणखी जोरजोरात रडायला लागला. “ बिटकॉइन … बिटकॉइन … “ म्हणत कपाळावर मारून घेऊ लागला.
“ अरे , टोनीभाऊ ,आवरा स्वतःला . असं का करताय तुम्ही . या… इकडे बसा … पाणी आन रे झिपऱ्या … ” जयसिंग म्हणाला त्यासरशी झिपऱ्या आत गेला , फ्रिज मधून पाण्याची बाटली आणली , टोनीच्या हातात दिली . टोनीने बाटली तोंडाला लावली आणि तो घटाघट पाणी पिऊ लागला. पाणी प्यायल्यावर दमल्यासारखा चेहरा करून खुर्चीला टेकून बसून राहिला. त्याचं शरीर घामाने भिजलं होतं . जयसिंगने त्याला थोडं शांत होऊ दिलं.
“ आता बरं वाटतंय का टोनी भाऊ ? ”, मृदू आवाजात त्याने विचारलं. त्याने मानेनेच होकार दिला. पण तो काही बोलेना. तसाच बसून राहिला. थोडा वेळ गेल्यानंतर जयसिंग पुन्हा म्हणाला , “ टोनीभाऊ , ते आपलं … ” तो पुढे काही बोलणार इतक्यात टोनीनेच त्याला थांबवलं.
“ जयसिंगराव , तुम्ही का आले ते मला माहित आहे. पण आता मी काहीच करू शकत नाय … आहो माझे स्वतःचे जेवढे कमावले होते तेवढे सगळे पैसे मी बिटकॉइनमधी लावले होते . तो कंपनीचा मालक मेला आणि आता ते सगळे पैसे बुडाले… माझं होतं नव्हतं तेवढं सगळं बुडालं . एक वेळ होती कि माझ्याकडे करोडो रुपये होते, कसली पायजे तसली फॉरेनची दारू पीत होतो आणि आता ? देशी घ्यायचे पण पैसे नायत माझ्याकडे … ”, असं म्हणून तो आणखीनच रडू लागला. त्याची हि अवस्था बघून जयसिंगला पुढे काही विचारावंसं वाटलं नाही. उघड्या शेजारी नागडं गेलं आणि रात्रभर थंडीनं मेलं अशी अवस्था झाली दोघांची. दोघांचे पैसे बुडाले होते . कोण कोणाला धीर देणार ? जयसिंगही सुन्न झाला होता. त्यालाही पुढे सगळा अंधार दिसत होता. बरं , रक्कम काही थोडी थोडकी नव्हती . त्याची स्वतःची असती तरी एक वेळ चालून गेलं असतं पण इथे तर कर्जाऊ रक्कम आणि तीही वीस करोड ! छे ! काहीतरीच होऊन बसलं हे … कुठून अवदसा सुचली आणि ह्या बिटकॉइनमध्ये पैसे टाकायचं ठरवलं , असं त्याला झालं. तरी सुहासिनी ताई म्हणत होती , एवढे पैसे कशाला ? पण आपण तिला वेड्यात काढलं . आपल्याकडून खूप मोठी चूक झाली. आता प्रतापरावांना कोणत्या तोंडाने सांगायचं की त्यांनी विश्वासाने दिलेले सगळे पैसे आपण गमावून बसलोय … एक वेळ त्या रिसॉर्टमध्ये पैसे खर्च झाले असते , आणि पुढे ते चाललं नसतं तरी ठीक होतं , आपण काहीतरी प्रयत्न करून रिसॉर्ट उभं केलं आहे , हे तरी दिसलं असतं , आज ना उद्या त्यातून काहीतरी कमाई झाली असती . पण आपण शॉर्टकट मारायला गेलो . आपल्याला वाटलं आपण झटक्यात पैसे कमावू , उसने घेतलेले पैसे प्रतापरावांना लगेच परत करू , म्हणजे त्यांनाही पैशांबाबत काही काळजी वाटली नसती . आपला मेहुणा काहीतरी करतोय ह्याचं समाधान त्यांना वाटलं असतं , पण सगळंच उलटं झालं . प्रतापराव आता आपली चांगलीच किंमत करतील . आणि सुहासिनी ताई ? तिला काय वाटेल ज्यावेळी तिला समजेल की मला दिलेले 20 करोड मी घालवून बसलोय ? अरे देवा ! सुहासिनी ताईच्या विचाराने जयसिंगला पुन्हा सगळं जग आपल्या भोवती फिरतंय की काय असं वाटू लागलं . चक्कर येईल की काय असं वाटल्याने त्याने त्याने आपला हाताने डोकं धरलं.
" मालक , काय होतंय तुम्हाला ? चक्कर येतीय का ? हे घ्या पाणी … ", झिपऱ्याने तातडीने त्याला पाण्याची बाटली दिली . थंड पाणी प्यायल्यावर त्याला थोडं बरं वाटलं.
" जयसिंगराव , काय झालं ? बरं वाटतंय ना ? ", टोनीने विचारलं .
" हो, बरं आहे . मला सांगा टोनी भाऊ , आता आपले पैसे कायमचे गेले का ? की परत मिळायचा काय चान्स आहे ?"
" आताच कायपन सांगता येनार नाय … ते क्रिप्टो एक्सचेंज कधी ओपन होईल त्यावेळी समजेल . पन तुम्हाला खरा सांगू , आपल्याकडे आसले फ्रॉड झाले तर पैसे परत मिळायचे चान्सेस लय कमी असतात . म्हणून मला आता लय टेन्शन आलंय बघा . आणि मला वाईट पन वाटतंय की माझ्यामुळे तुमचे पन पैशे डुबले … "
" त्यात तुमचा काय दोष टोनी भाऊ , आम्हालाच हाव होती पैशाची … त्याला तुम्ही तरी काय करणार … " नकारार्थी मान हलवत जयसिंग म्हणाला.
" मला बी किती हाव बघा, पाच - सहा करोड कमावले होते मी , तसं बघायला गेलं असतं तर माझं आयुष्य निवांत गेलं असतं तेवढ्या पैशात , पण मग विचार केला आणखी पैसे मिळाले तर काय वाईट , म्हणून कमावलेले सगळे पैसे परत टाकले . आणि संपलं सगळं … "
" जाऊ द्या टोनी भाऊ , ही घ्या रम . तुमच्यासाठीच आणलीय … " , म्हणत जयसिंगने अर्धा खंबा त्याच्या समोर ठेवला . आईस्क्रीम बघून लहान मुलांचे डोळे जसे चमकतात तसे ती बाटली बघून टोनीचे चमकले . त्याच्या तोंडाला पाणी सुटले . त्याचे हात थरथरू लागले . ते बघून जयसिंगने झिपऱ्याला खूण केली . तो लगेच दोन ग्लास घेऊन आला . जयसिंगने दोन पेग बनवले. एक त्याच्या हातात दिला . " जाऊद्या , जे होईल ते बघून घेऊ , चिअर्स !"
" जयसिंग राव , लय उपकार झाले बघा , तीन चार आठवडे झाले देशी दारू पितोय , काय अवस्था झाली बघा…. पण तुम्ही खास माझ्यासाठी रम आणलीत , हे मी मरेपर्यंत विसरणार नाय … चिअर्स ! ", थरथरत्या हाताने टोनीने तो ग्लास तोंडाला लावला …. अर्धा खंबा दोघांत रिचवल्यावर जयसिंगने त्याचा निरोप घेतला. तो दरवाज्यापर्यंत गेला असेल नसेल तोच मागून आवाज आला ,
" जयसिंगराव , ह्या दारूची शप्पत, आपण आपले पैसे परत मिळवूच ! टोनीचा शब्द हाय हा … टोनीचा शब …. " जयसिंगने मागे वळून पाहिले , बोलता बोलता टोनी कधीच आडवा झाला होता.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टोनी पण ओमी कड़े गेला की काय Uhoh
----------~°~----------
एकंदर मालिका रोचक आणि खुप भागांची बनत चालली आहे तर प्रत्येक भागाच्या सुरुवातीस आधीच्या भागाची लिंक आणि क्रमशः नंतर पुढील भागाची लिंक दिली तर नवीन वाचकांस सलगपणे वाचण्यास सुलभ होईल. लिखाण संपादित करण्याच्या कालावधीतच हे मूळ लेखात अंतर्भूत करणे संभव आहे.

प्रत्येक भागाच्या सुरुवातीस आधीच्या भागाची लिंक आणि क्रमशः नंतर पुढील भागाची लिंक दिली तर नवीन वाचकांस सलगपणे वाचण्यास सुलभ होईल. ...... हे कसे करायचे ?