क्रिप्टो (Crypto) भाग १२

Submitted by मिलिंद महांगडे on 29 May, 2022 - 07:03

₿₿₿

मीटिंग संपली त्यानंतर त्याच रात्री मुंबई - लेह फ्लाईटमध्ये अमर बसला होता . घटनास्थळ लेह असल्याने तिथे जाऊन काही धागेदोरे सापडतात का ह्याचा शोध घेणं अनिवार्य असल्याने अमर लेहला जायला निघाला होता . तशी लडाखला फिरायला जायची त्याची इच्छा होतीच , पण बाईकवरून लडाख पाहण्यात जी मजा आहे ती दुसऱ्या कशातही नाही . पण तो लेहला फिरायला आला नव्हता , तर कामानिमित्त आला होता. वाघचौरे साहेबांनी त्यांचे काँटक्ट्स वापरून अमरची लेहला जायची सोय करून दिली होती . विमान सकाळी आठ वाजता लेहला उतरले .थंडी म्हणजे हाडे गोठवणारी होती. त्यात गार वारा अंगाला झोंबत होता. लेह एअरपोर्टवर उतरल्या उतरल्याच त्याला हुडहुडी भरली. सुंदर सकाळ होती . सूर्य उगवला होता परंतु त्याची किरणे अलगद अंगावर येत होती . जणूकाही सूर्यप्रकाश नाही तर चंद्रप्रकाश पडला आहे . अमरने एका बाईक ऑन रेंटवाल्या दुकानातून एक बाईक घेतली आणि तो कलवान रेस्टहाऊसच्या शोधात निघाला. विचारत विचारत तो मुख्य शहराच्या बाहेरच्या रस्त्यावर आला . त्याला शंका आली की खरोखर कलवान रेस्टहाऊसचा रस्ता हाच आहे की आपण रस्ता चुकलो , म्हणून त्याने एका बाजूच्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये पुन्हा चौकशी केली . त्यानेही तोच शहराबाहेर जायचा रस्ता दाखवला . तो तसाच पुढे निघाला . तो जात असताना एकदम आभाळ भरून आल्यासारखं झालं . मघाचा सूर्य केव्हाच गायब झाला होता . इतक्या लवकर वातावरण बदलेल ह्याची त्याला काहीच कल्पना नव्हती . थोड्याच वेळात त्याच्या अंगावर पांढऱ्या भूशासारखं काहीतरी पडू लागलं . आजूबाजूला पाहिलं तर बर्फवृष्टी होत होती. आयुष्यात पहिल्यांदाच तो अशी प्रत्यक्ष बर्फवृष्टी होत असताना अनुभवत होता . थोडा वेळ रस्त्यात उभा राहून तो वर आकाशाकडे बघत त्याचा आनंद घेऊ लागला . बर्फाचे बारीक बारीक कण हवेबरोबर उडत वरून खाली येत होते . अमरला एकदम मस्त वाटून गेलं . तो जर आता कामानिमित्त आला नसता तर आणखीन मजा आली असती असं त्याला वाटलं , पण आता निघालं पाहिजे . ते कलवान रेस्टहाऊस सापडायला हवं. हळूहळू घरांची आणि दुकानांची दाटी कमी होऊ लागली. आणखी अर्धा एक किलोमीटर वर गेल्यावर एक बारीकशी पाटी त्याला दिसली . त्यावर कलवान रेस्टहाऊस असं लिहिलं त्याला दिसलं . त्या पाटीवर बर्फ साचलेलं होतं . गेट लावलेलं होतं . त्याने सहज आजूबाजूला जाऊन पाहिलं . ते अतिशय साधं रेस्टहाऊस होतं . मुख्य शहरापासून दूर एकमेव शांत असं ठिकाण होतं . त्याच्या आजूबाजूला लांबपर्यंत वस्ती नव्हती की कुठलं दुकान नव्हतं . त्या रेस्टहाऊसला चारी बाजूंनी तारांचं कुंपण केलं होतं . अमरने बाहेरून ते रेस्टहाऊस पाहून घेतलं . अत्यंत साधं असं दगडी बांधकाम केलेलं होतं . ओळीने रूम्स बांधलेल्या होत्या , जवळपास पाच सहाच रूम्स असतील. सध्या तिथे कोणीही टुरिस्ट उतरले नसावेत . टुरिस्टच्या गाड्या किंवा इतर कसल्याच खुणा दिसत नव्हत्या . ओमी मिरचंदानी आणि श्रीमती रागिणी ह्यांचं हे असं मुख्य शहर सोडून आड बाजूच्या रेस्टहाऊसमध्ये राहायचं काय कारण असावं …? ओमी मिरचंदानी सारख्या पैसेवाल्या बिझनेसमन अशा किरकोळ ठिकाणी का राहील ? खासकरून जेव्हा तुम्ही हनिमूनला जाता तेव्हा साहजिकच एखादं , थ्री स्टार , फाईव्ह स्टार हॉटेल , सर्व सोयींनी युक्त असं राहण्याचं ठिकाण निवडाल . पण हे तर एखाद्या हॉरर फिल्मच्या सेटसारखं दिसत होतं . त्यात बर्फवृष्टी जोरात सुरू झाली. सगळीकडे बर्फाची पांढरी चादर पसरली . एक प्रकारच्या प्रतिकूल लहरी त्या ठिकाणाहून येत आहेत असं अमरला वाटलं . आत जाऊन चौकशी करायला हवी ह्या उद्देशाने त्याने गेटवरची कडी वाजवली . बराच वेळ कोणीच आलं नाही . त्याने आत डोकावून हाका मारल्या तरी कोणीच आलं नाही . शेवटी त्याने आत जायचा निर्णय घेतला . गेट थोडंसं ढकलून त्याने आत शिरण्यापूरती जागा बनवली आणि हळूच आत शिरला . आता जे होईल ते होईल म्हणत तो रिसेप्शनच्या पहिल्या रूम मध्ये आला . तिथेही कोणी नव्हतं . फक्त टीव्ही चालू होता आणि त्यावर कुठलासा काश्मिरी लोकल चॅनल लावलेला होता . त्याने त्या रूमभर नजर फिरवली , एक टेबल , पलीकडे खुर्ची टेबलवर तीन चार रजिस्टर्स ठेवलेली होती .
" कौन चाहीये आपको … ? " मागून आवाज आला . अमरने वळून पाहिलं तर एक लडाखी मुलगा , वय विशीच्या आसपास असलेला त्याला विचारत होता .
" मै मुंबई पुलीस से हुं , मॅनेजर को बुलाव … " अमर त्याला त्याचं आयकार्ड दाखवत कडक आवाजात म्हणाला .
" मै ही हुं मॅनेजर …बैठो ना शर , क्या लेंगे ? चाय बोलू ? " तो तरुण म्हणाला .
" तुम मॅनेजर हो ? क्या नाम है तुम्हारा ? " अमरने एका खुर्चीत बसत विचारलं .
" काझीम ... मेरा नाम काझीम है शर … "
" ठीक है … कितने दिन से यहा काम करता है ? "
" छे मैना हुआ शर . "
" मालिक किधर रेहता है , नाम क्या है मालिक का ? "
" कलवानही नाम है … मालिक इधर बाजू में रेहता है । बुलाव क्या शर ? " म्हणत तो निघालाही .
" रुक … मैं जो पुछता हुं उसका जवाब दे , इधर पिछले महिने कोई टुरिस्ट मर गया था क्या ? " अमरने थेट त्याला विचारलं . हा प्रश्न ऐकून तो तरुण चांगलाच चपापला. त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ स्पष्ट दिसत होता . अमरने त्याला नजरेने पुन्हा विचारलं .
" वो शाब , मै मालिक को बुलाके लाता है … " म्हणत तो तरुण पाय काढत निघाला होता .
" अरे ? किधर जाता है ? रुक … इधर आ … मैने क्या पुछा ? ठिकसे बता . " अमर आवाज वाढवत म्हणाला. त्यावर तो थोडासा घुटमळला .
" हा शर … पिछले महिनेमें एक कपल आया था … "
" क्या नाम था उनका ? रजिस्टर किधर है हॉटेल का ? " अमर ने थोडं आवाज चढवला . तो तरुण मॅनेजर एकदम गडबडला . टेबलाच्या पलीकडे जाऊन त्याने लगेच रजिस्टर शोधलं आणि अमरच्या हातात उघडून दिलं . अमरने तारीखवार रजिस्टर पाहायला सुरवात केली . मागच्या काही महिन्याच्या एंट्रीज त्याने पाहिल्या . त्यात महिन्यापूर्वी एका तारखेवर ओमी मिरचंदानीचं नाव दिसलं.
“ तुम्हारे यहा सीसीटीव्ही का रेकॉर्डिंग चाहिये मुझे … ”, अमर रूममध्ये नजर फिरवत म्हणाला.
“ सॉरी शर , ये सीसीटीव्ही बंद है दो महिनेसे . ”, तो तरुण कसनुसा चेहरा करीत म्हणाला. त्यावर आता काय बोलणार ? अमरने नकारार्थी मान हलवली.
" ये ओमी मिरचंदानी का क्या हुआ ? वो कैसे मरा ? " अमरने त्या तरुणाला विचारलं . इतक्यात एक उंचापुरा माणूस आत आला . त्याचा बांधा मजबूत होता . रुबाबदार मिशी आणि दाढी सुद्धा होती . तो ज्या पद्धतीने आत आला त्यानुसार तर तो ह्या हॉटेलचा मालक असावा असं अमरला वाटलं .
" आबे काझीम , बेहरा हो गया क्या ? कितनी आवाजे दे राहा था मै … " तो माणूस आल्या आल्या त्या तरुणावर भडकला .
" ये शर आये है , मुंबई पुलीश से … ये पुछ रहे थे कुछ … " काझीम म्हणाला .
" मुंबई पुलिस ? मुझे क्यूँ नही बताया फिर …? "
" मैनेही उसे कहा था …. आप कौन है ? " अमर मधेच म्हणाला .
" मै मालिक हूँ इस हॉटल का , कलवान नाम है मेरा . " त्याच्या बोलण्यात एक प्रकारचा रगेलपणा होता . कदाचित त्याला थोडासा राग सुद्धा आला असावा .
" ओके … मै सब इन्स्पेक्टर अमर हूँ , मुंबई सायबर क्राईम ब्राँच से ." म्हणत अमरने त्याला आपलं आयकार्ड दाखवलं. ते लांबूनच बघितलं न बघितल्यासारखं त्या मालकाने केलं आणि टेबलापलीकडे आपल्या खुर्चीवर जाऊन बसला .
" कारड दिखाने का कोई जरूरत नहीं सर जी … लेकिन ये घदे का बच्चा ने मुझे बताना चाहीये था ना … पिछले महिनेसे तो भोत परेशान है … ओ टुरिस्ट हमारे यहा मर गया ऐसा बात पुरा लेह में फैल गया … पुलीस आया , पत्रकार लोक आया … हमारा रेस्टहाऊस का नाम खराब हुआ ना उसकी बजे से … अब देखो एक भी टुरिस्ट नहीं है … क्या करे अब हम लोग … " कलवान वैतागून बोलत होता . तसं त्याचं काही चूक नव्हतं . जी परिस्थिती घडली ते तो सांगत होता . परंतु असंही महिनाभर लॉकडाऊन होता, पण हॉटेल मालकाला काहीतरी कारण मिळालं आणि तो तेच रडगाणं गात बसला.
" एक्चुली , मै आपसे उसी सिलसिले में पुछताछ के लिये आया हूँ … क्या हुआ था यहा ? " अमरने विचारलं .
" अरे , सर जी कुछ भी नहीं हुआ यहा … वो मिरचंदानी नाम का आदमी और उसकी वाईफ इदर आये थे , तीन चार दिन यहा पे रहे थे ... एक दिन वो आदमी को चेस्टपेन हुआ तो उसकी वाईफ उस्को लेके हॉस्पिटल गयी , और ओ आदमी को वहा हार्ट अटॅक आया और वो मर गया … अब इसमे हमारे रेस्टहाऊस की क्या गलती है … आप ही बताव . "
“ यही वो दोनो थे ? ” , अमर त्याच्याकडचा त्या दोघांचा फोटो दाखवत विचारू लागला.
“ हा सर्जी , यही दोनो थे … ”
" कौन सा हॉस्पिटल गये थे वो लोग ? "
" सोनल हॉस्पिटल "
" उसकी डेथ वही हुई क्या ? "
" वो हमको मालूम नय सरजी … "
" ओके , फिर वो उसकी वाईफ कब गयी यहा से ? " अमरने विचारलं
" वो तो दुसरेही दिन चली गयी ।" कलवान म्हणाला.
" कहा गयी ? "
" वो तो साब मालूम नहीं । और इस्से ज्यादा हमे कुछ मालूम नहीं । " कलवानने हात वर केले .
" मिरचंदानी जब तक यहा पे था , तब कोई उसे मिलने आया था ? "
" नहीं साब , कोई नहीं … ठीक है सर , हमको इतना ही मालूम है … " आता तुम्ही निघा , असंच त्या हॉटेल मालकाला सांगायचं होतं . अमरला नाईलाजाने तिथून निघावं लागलं . तो गेटच्या बाहेर पडला , बाहेर लावलेल्या टू व्हीलरवर बसणार इतक्यात मघाचा तो तरुण मॅनेजर त्यांच्या मागोमाग बाहेर आला .
" शर , मेरेको आपसे एक बात बोलने का है …” तो मॅनेजर चोरट्या नजरेने इकडे तिकडे बघत म्हणाला .
“ बोलो … ”
“ लेकिन पता नहीं आपके काम का है या नहीं … ”, तो थोडासा गोंधळात पडला.
“ तूम बोलो तो , जो भी है … ”, म्हणत अमरने त्याच्या पाकिटातून पाचशे रुपयांची नोट काढली आणि त्याच्या हातावर ठेवली.
“ अरे , नय शर , इस्की जरुरत नहीं . ”
“ रख लो , और बताओ ”
“ क्या है ना शर , एक दिन सर्व्हिस देनेवाला वेटर नय आया था तो मै खाने का ऑर्डर लेने के लिये उनके रूम में गया तो मैने देखा कि टेबल पे नकली बालों का एक विग पडा हुआ था … ”
“ नकली बाल ? बडे थे या छोटे … ”
“ छोटे शर , वो आदमी का विग था शायद … ”
“ मतलब वो मीरचंदानी का था ? और वो किधर था ? ”
“ वो बाथ रूम में था शायद … ”
“ ओके , और ? ”
“ बस इतना ही शर… थँक यु शर … ”, म्हणत तो तरुण मॅनेजर निघून गेला. अमरने बाईकला किक मारली . बर्फवृष्टी थांबली होती. रस्त्याच्या बाजूला पांढरे भुसभुशीत बर्फ पडलेले दिसत होते . त्याला आता सोनल हॉस्पिटलला जायचं होतं . पण त्याला चांगलीच भूक लागली होती . वाटेत एखाद्या रेस्टॉरंट मध्ये काहीतरी खावं असा विचार करून तो आजूबाजूला पहात एखादं चांगलं रेस्टॉरंट शोधत बाईक चालवू लागला . बरीचशी चायनीज रेस्टॉरंट रस्त्यात लागली . काही पंजाबी हॉटेल्स सुद्धा होती . त्यातल्या त्यात चांगल्या दिसणाऱ्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये तो शिरला . नूडल्स आणि मोमोजची ऑर्डर दिली . आणि तो ऑर्डर येण्याची वाट पहात बसला. त्याला चांगलीच भूक लागली होती . नूडल्स आणि मोमोजवर ताव मारल्यानंतर तो सोनल हॉस्पिटलच्या शोधात निघाला. ते हॉस्पिटल लेहच्या दुसऱ्या टोकाला होतं. लेहच्या मानाने हॉस्पिटल बऱ्यापैकी मोठं होतं . रिसेप्शन पाशी पोहोचल्यावर त्याने आपली ओळख दिली आणि येण्याचं कारण सांगितलं . हॉस्पिटलचा स्टाफ चांगला होता , त्यांनी त्याला एका लहानशा मिटिंग हॉल बसायला सांगितलं , एका शिपायाने कॉफी आणून दिली . थोड्याच वेळात तिथे एक तरुण आला , त्याच्या गळ्यात स्टेथोस्कोप अडकवलेला होता .
“ हाय , आय एम डॉ सेवांग दोरजे ... व्हॉट कॅन आय डू फॉर यु ? ” समोरचा तो तरुण हसऱ्या चेहऱ्याने म्हणाला , हसल्यावर त्याचे डोळे आणखीनच बारीक झाले.
“हलो , आय एम सब इन्स्पेक्टर अमर , फ्रॉम मुंबई पुलिस , सायबर क्राईम . आय एम लुकिंग फॉर सम इन्फोर्मेशन ”
“ येस , पुछिये ... ”
“ दस दिन पेहले यहाँ पे कोई ओमी मिरचंदानी नाम का पेशंट एक्स्पायर हुआ था क्या ? ” अमरने विचारले. त्यावर त्याने विचार करत असल्यासारखा चेहरा केला .
“ आय थिंक , हां . एक ओमी नाम का आदमी आय था ... कार्डिएक अरेस्ट था शायद
“ उसकी डेथ कैसे हुई ? ”
“ लेट मी चेक . ” म्हणत त्याने एक फोन लावला आणि त्याबाबत विचारणा केली. , “ हमारे हॉस्पिटल आने से पेहलेही उसकी डेथ हुई थी. येस सर , हार्ट अटॅक की वजह से उसकी डेथ हो गयी थी ... ”
“ मुझे उसका रेकॉर्ड देख सकता हुं …? ” अमरने विनंती केली . समोरच्या डॉक्टरने पुन्हा थोडंसं विचार केल्यासारखं केलं आणि मग त्याने होकारार्थी मान हलवली. अमरला घेऊन तो रेकॉर्ड रूममध्ये गेला . तिथे एका रजिस्टरमध्ये ओमी मिरचंदानीच्या मृत्यूची नोंद केलेली होती . त्याच्या मृत्यू चं सर्टिफिकेट ची एक कॉपी सुद्धा रेकॉर्डवर होती. अमरने त्याची फोटोकॉपी घेतली. त्याचं इथलं काम संपलं होतं . फार खास काही हाती लागलं नव्हतं , पण ओमी मिरचंदानी खरोखर मेला आहे आणि त्याचा मृत्यू नैसर्गिक आहे ह्यावर त्याचा विश्वास बसला होता . त्या तरुण डॉ. दोरजेचा निरोप घेऊन तो हॉस्पिटल बाहेर पडलाही नसेल तोच डॉ. दोरजेने आपला मोबाईल काढला आणि एक फोन लावला.
“ हॅलो , जैसा आप ने बोला , वैसेही सब हुआ ... डोन्ट वरी ... ”

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!
ओमी मेला नसेलच अशी खात्री व्हायला लागली आहे.

पुभाप्र. Happy