प्रदक्षिणा

Submitted by पाचपाटील on 28 May, 2022 - 03:09

तुम्ही मला चहा पाजलात.. त्यामुळे कुतूहल
दाखवण्याचा तुम्हाला हक्क मिळालाय.
अर्थात, तुमच्या नजरेतलं हे कुतुहल माझ्याही
ओळखीचं होतं कधीकाळी.
माणसं असलं भिकारछाप आयुष्य कसं काय जगू
शकतात, हे आरामशीर कुतूहल..!
पण माझ्या असण्यामुळंच तुमच्याही असण्याला
थोडाफार अर्थ आलाय, हे तुम्हाला माहिती आहे ना?
पण ते स्वतःशीच कबूल करताना तुम्हाला अस्वस्थ का
वाटतंय‌ ?
कारण तो विचार तुम्ही लगबगीने झटकून टाकताय हे
मला स्पष्ट दिसतंय..!
"माझ्यावर अशी वेळ आली तर मी ताबडतोब आयुष्य
भिरकावून देईन", असंही तुम्हाला वाटतंय का?
परंतु हे तुमचं आत्ताचं वाटणं आहे, मालक.
ते फार सिरीयसली घेऊ नका.

ते तसं एवढं सोपं नसतं.
मी काही चॉईसनं भिकारी झालो नाही.
वाया जाण्याची प्रोसेस कधी सुरू झाली कळलंच
नाही.
कसं कसं काय काय चुकत गेलं कळलंच नाही.
सोपं दिसेल ते करत गेलो.
मग एका क्षणी पुढे उभी राहते सरळसोट भिंत..!
आणि मागे खोल दरी.
त्यातून तयार होतं एक डेडली कॉंबिनेशन.
मग सगळं जग अनोळखी वाटायला लागतं.

जगणं हाच एक नाईलाज वाटत असला तरीही
शरीर तर हर हाल में जिवंतच राहू इच्छितं.
मग आपण आपला आवाज कायमचा बंद करून
टाकतो.
आपली सगळी शस्त्रं खाली टाकून देतो.
चेहऱ्यावरची सगळी सजावट उतरवून ठेवतो.
आणि भिकारी होतो.

मग पोटात दिवसरात्र भुकेचा कडाका उसळत
राहतो.
आतड्यांना फसवण्यासाठी काही ना काही द्यावं
लागतं रोज.
त्याशिवाय दुसरं काही सुचत नाही.
दुसरं काही दिसत नाही.
भूक दयनीय करते माणसाला. हात पसरले जातात.
आत्मसन्मान वगैरे नंतरच्या गोष्टी. आधी शरीर तर
जगलं पाहिजे.

सवय होते मग नजरांची. नकारांची. दुर्लक्षांची.
धुत्कारांची. लोकांच्या मूडवर आपलं सगळं अवलंबून
असण्याची.
स्वतःला इजा करून घेणं शक्य नसतं, कारण
त्यासाठी अतिशय संवेदनशील, तरल इगो असावा
लागतो माणसाजवळ..
कधीकाळी माझ्याही आत तसं होतं नाजूक
काहीतरी..
नुस्त्या हवेचा स्पर्श झाला तरी कोमेजून जाणारं..
आता फक्त धुरकट अशक्त आठवणी आहेत.
कळत नाही, ते सगळं आपल्याला कधी सोडून
जातं ते..
आपण स्वतःहून आपला इगो चारी बाजूंनी कसा
ठेचून टाकत जातो ते..
नंतर मग कशाचं काही वाटत नाही.

एखादं मूल रडतं. तेव्हा त्याची माया केली जाते.
केली जायला पाहिजे.
माया ही सुंदर गोष्ट आहे.
मुलाची मायेशी ओळख होणं ही त्याहून सुंदर गोष्ट
आहे.
त्याशिवाय जग चांगलं आहे, यावर त्याचा विश्वास
बसणार नाही. तसा विश्वास बसला नाही तर, मग
त्याला जग चांगलं दिसणार नाही..
आणि लहान मुलांनाही जग चांगलं वाटायचं बंद झालं
तर मग ती काही चांगली गोष्ट होणार नाही.

मी मघाशी रडलो. एक कप चहासाठी.
तोही कुणी देत नव्हतं. तुम्हाला दया आली..! दया..!
कारण मी काही मूल राहिलेलो नाही. माणूस झालोय.
माणूस मायेस पात्र नसतो. भिकारी तर बिलकुलच पात्र नसतो. त्याच्यासाठी दयाच बरी.
आणि काहीच नसण्यापेक्षा तर बरीच बरी.. नाही का?

हा एकतर्फी संवाद कसा वाटतो म्हणून मला
कशासाठी विचारता?
तुमचं ते कलात्मक बिलात्मक ग्रेस बिस मला
काही कळत नाही.
मीपण तुमच्यासारखाच येडझवा
आहे‌ असं समजा.
माफ करा. त्या विवक्षित शब्दासाठी मी दिलगीर
आहे. खरंच माफ करा.
माझी दिलगीरी मला शब्दांत व्यक्त करता येत
नाहीये.. शब्दांत सांगता येत नसलं तर मग शिव्या
देऊन सांगितलं तर चालंन काय?

ओह् नो..! जीझस क्राईस्ट..!
असं का बघताय?
बालक असताना वाचलेल्या वपुंच्या पुस्तकांमुळं
माझा मेंदू कामातून गेलाय, अशी तुम्हाला आता शंका
यायला लागलीय का?
कारण त्यांच्या पुस्तकातले भिकारी वगैरे फाटकन्
उठून अशी फिलॉसॉफीची भाषा बोलायला लागतात
का?
आणि खऱ्याखुऱ्या फिलॉसॉफर्सना वपु बहुदा गोट्या
खेळायला पाठवत असतील का ?
माझा हा अंदाज खरा आहे का ते चेक करायला,
मी मागे एकदा जर्मनीत नीत्शेला भेटायला गेलो होतो..
तर त्यानं मला दरवाजातूनच बूट फेकून मारला..!
आणि खिडकीतून माझ्याकडं एक तुच्छ कटाक्ष
टाकला..
काय नव्हतं त्याच्या नजरेत..!
आयुष्याचा सगळा उन्हाळा..! सगळा विषाद..!
सगळं फ्रस्ट्रेशन..!
साला हा कसला फिलॉसॉफर..? ह्याला तर साधं
हसतासुद्धा येत नाही..!
ह्याच्यापेक्षा आमचा गांधी बरा..!
कसला गोड हसतो म्हातारा..!

असं पुटपुटत मी तो बूट उचलला आणि नीत्शेची
तक्रार करायला विमान पकडून थेट पॅरिसला
सार्त्रकडे गेलो..
तर सार्त्र बोलला की अरे माझं मलाच काय सुधरंना
झालंय.. त्यामुळे मी आता सिमॉन डार्लिंगसोबत
आख्खा युरोप भटकायला निघालोय..
पुन्हा एकदा हिप्पींसारखं उनाडपणे भटकल्याशिवाय
मनाला बरं वाटणार नाही. त्यासाठी नीत्शेचा हा
दणकट बूट मला भेट म्हणून आणलास ते बरं केलंस...

मी बोल्लो की सिमॉनवैनींना घेऊन असं पायी पायी
फिरणं बरं नाही.. फ्रेंच लेखक एवढे कंगाल असतात
हे मला माहिती नव्हतं.. आमच्याकडं बरं है...
आमचे लेखक स्प्लेंडरवरनं, हिरो होंडावरनं फिरतात.
मायलेज चांगलं असतंय. ट्रिपलसीट बसता येतं‌.
त्यामुळे पेट्रोलपण तिघांमध्ये शेअर होऊन जातं.
काहीच अडचण नसते.
इथे सार्त्रंनं एक बारकीशी जांभई दाबली.
माझ्या नजरेतनं ती सुटली नाही. खरंतर जांभईनं
मला काही फरकही पडत नाही आता..
लोकांनी तोंडावर जांभया दिल्या तरी मी मागे
हटत नाही.. असल्या किरकोळ अपमानांना कोण
घाबरणार?
म्हणून मी भिंतींवरच्या पेंटींगचं मुक्त
विश्लेषण करण्याच्या तयारीला लागलोच होतो...
तेवढ्यात आतनं सिमॉनबाईंची डरकाळी ऐकू
आली की, वैनी कुणाला म्हणतोस रे
पुरूषसत्ताकवादी डुकरा ??
आता जातोस की येऊ मी बाहेर? आं??

तो अंगार ऐकताच माझ्या लेंड्या पातळ होण्याची
भावना झाली आणि मी घाईघाईनं त्यांन्ला
बॉन् व्हॉयाज् वगैरे शुभेच्छा देऊन तिथनं निसटलो.. !

मग तिथून विमान वळवून थेट रशिया गाठला..!
तिथं एका अड्ड्यावर दोस्तोवस्की जुगार खेळत
बसलेला.
मी त्याला बोललो की असं असं आहे. जरा बोअर
झालो म्हणून तुझ्याकडं आलो.
तर तो कुजबुजला की तुमच्या हिंदू लोकांमधी
एवढ्या सगळ्या देवांची, धर्मांची व्हरायटी असताना
तुला बोअर होण्याचं कारणच काय??
मी ह्या कानानं ऐकून त्या कानानं सोडून दिलं.
आणि तसाच व्होडक्यावर नजर ठेवून बसून राह्यलो.
पण मध्येच अचानक त्याला काय झटका आला
कुणास ठाऊक..!
त्यानं सरळ माझी कॉलर पकडली आणि बोल्ला की,
माझे सगळे पैशे ह्या डावात उडाले.. आणि पुढचा डाव
तर लावलाच पाहिजे..
बरा सापडलास तू.! खिशात आहे-नाही ते सगळं
काढ..! नायतर कोथळाच बाहेर काढतो बघ तुझा..!
रासकॉलनिकॉव्ह आठवतोय ना? आं??

गपगुमान सगळे चाराणे-आठाणे चिल्लर वगैरे
काढून त्याला दिली आणि मग लपत छपत
हिमालय उतरून काश्मीरमध्ये घुसण्याचं नियोजन
केलं.
तेवढ्यात सायबेरियन क्रौंचचा एक थवा भारताकडं
निघालेला दिसला. ते बोल्ले की चल आमच्यासोबत.
अजून तरी आम्हाला कुणी व्हिसा पासपोर्ट मागत
नाय.
व्हिसा नाय म्हणून आम्हाला कुणी गोळ्या घालत
नाहीत.. अजून तरी एवढे वाईट दिवस आले नाहीत.

मग बिनधास्त पाकिस्तानवरून उडत उडत
भरतपूरच्या अभयारण्यात उतरलो.
तिथून कपडे वगैरे बदलून मग शिमल्याला गेलो..
'नेमाडे नेमाडे' घोष करत शिमल्याच्या गल्ली बोळात
हिंडायला लागलो.
तर त्यांचा काय पत्त्या लागेना..
मग सांगवीवरून, औरंगाबादमार्गे, गोवा पालथं
घालून शेवटी मुंबैत सापडले नेमाडेमास्तर..!
ते फिस्कारून बोलले की कोण नीत्शे न् कोण सार्त्र?
मी मोजत नाय असल्या कुणाला..!
तू सरळ देहूला जा..!
तिथं ह्या सगळ्यांचा बाप बसलाय..!

मी बोललो की हे आधी नाय का सांगायचं..??
उदाहरणार्थ हे..

कोडीयाचे गोरेपण /
तैसे अहंकारी ज्ञान //

पांssडुरंssग...! पांssडुरंssग..!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू सरळ देहूला जा..!
तिथं ह्या सगळ्यांचा बाप बसलाय..!
_/\_

चालून थकले पाय राहिले नगर नऊ कोस ।

मध्येच तळ पडला तों म्हणू कुणाचा दोष ॥

चालशील तू कुठवर ते ठाऊक नसता नांव ।

गेले युगही जरी होते ते पाव कोसचि गाव ॥
-कबीर
Happy लेखन आवडले.

(अजून याच्याही पुढे जाऊन 'जे पिंडी ते ब्रह्माण्डी' किंवा 'तुझे आहे तुजपाशी | परि तू जागा चुकलासी |' असाही शेवट होऊ शकतो, तुकोबाराया या भटक्या बैरागी जीवाला कदाचित तेच म्हणाले असते.)

@आबा Happy
संत्र सोलायाचा प्रयत्न करते....
एक भटका जीव जो लौकिकार्थाने भिकारी नाही. केवळ परमज्ञानाने वंचित असल्याने फाटकी झोळी घेऊन देशोदेशी हिंडत आहे. देशोदेशीच्या थोर तत्वज्ञांकडून त्याला मोठीच आशा होती , महाराष्ट्रात वपुंच्या बाळकडूनी त्याला जरासे चुकीचे मार्गदर्शन केलेय , जर्मनीत नीत्शे, फ्रान्स मधे सार्त्र आणि सिमॉन डे बॉव्हर हे तत्वज्ञ पती-पत्नी यात सिमॉन यांचा फेमिनिझमकडे असणारा कल दाखवलाय, शेवटी फिरतफिरत परत भारतात नेमाडेंकडे येऊन त्या भटक्याला परमज्ञानासाठी नेमके कुठे जावे लागेल हे कळलेय. यात लेखकाने कथेमधे नायकाच्या प्रवासानुसार त्या त्या तत्वज्ञाच्या स्वभावाचे कल , लेखनातील वेगळेपण, लेखनातून आलेला अनुभव, अनुभवाने आलेल्या आठवणी (गांधींचे गोड हसणे इ) ह्या गोष्टी गुंफल्या आहेत.
हा मला कळलेला आशय ,पाचपाटील अधिक योग्य सांगू शकतील.

जबरदस्तच आहे,
पण..नेहमीप्रमाणे..
तुझे आहे तुजपाशी ,परी तू जागा चुकलासी!

प्रदक्षिणा पूर्ण झाली का? म्हणजे तुम्ही खरंच देहूच्या तुक्यापासून निघाला होतात का? तरच तुक्यापाशी आल्यावर ती संपेल. starting point महत्त्वाचा. म्हणजे तुम्ही कुठे होता, कुठे आहात
वगैरे...
म्हणजे कायये की आपण उगीचच उजवं डावं करीत राहातो. मधलं ते दगडी ध्यान स्थिरच असतं की सेंटरला. समचरण म्हणा त्रिभंगी म्हणा, असतंच ते तिथे अठ्ठावीस का काय तरी युगं !

वाह वाह सुंदर!
अस्मिता, तुझी पोस्ट वाचून अजून छान कळलं स्फुट Happy

आवडले!
अस्मिता, तुझी पोस्ट वाचून अजून छान कळलं स्फुट>>+१

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार.
@ अस्मिता,
तुमच्याच शब्दांत सांगायचे झाले तर,
"आपण काही तरी रॉ / अर्ध-कच्चं मॉडर्न स्पिरिचुअल वगैरे खरडावं आणि ते चक्क कुणापर्यंत तरी पोचावं याच्या समाधानाची पोच..!"... _/\_
Happy

हीरा,
प्रदक्षिणा चालूच आहे अजून.. देहूतून बहुतेक आळंदीतल्या त्या सदैव शांतिबिंब असणाऱ्या हॅंडसम तरुणाची भेट घ्यायला जावं लागेल..!
बाकी, ते दोघंही ध्यानीमनी सारखा "पंढरपूर पंढरपूर" म्हणून धावा करत असतात... म्हणून पंढरपूरलाही जाणं भागच आहे, जिथून सुरुवात झाली होती.. Happy

<< मधलं ते दगडी ध्यान स्थिरच असतं की सेंटरला. समचरण म्हणा त्रिभंगी म्हणा, असतंच ते तिथे अठ्ठावीस का काय तरी युगं ! >>>
"काजळल्या देव्हाऱ्यात काजवा पेटवा..
आता विठ्ठल भेटवा आता विठ्ठल भेटवा "

_/\__/\_

जि, धनुडी, स्वातीताई आभार Happy
पाचपाटील, उत्तरादाखल तुमचा विपू पेस्टावा म्हटलं तर सगळं अदृश्य करून टाकलंय. Happy अशी फिट्टमफाट करण्यात आनंदच वाटतो.
येऊद्या अजून, आंतरिक शोधाच्या अंधारात मधेच लखलखणाऱ्या प्रकाशाचे कवडसे..!! पुलेशु.

वा !
"काजळल्या देव्हाऱ्यात काजवा पेटवा..
आता विठ्ठल भेटवा आता विठ्ठल भेटवा "
_/\__/\_
फारच सुंदर.

वा! पाचपाटील वा!

तुकारामाच्या गाथेने
जेव्हा पछाडले मला
तेव्हा ज्ञानोबा नावाचा
एक मांत्रिक शोधला

भ्रम रिंगण तोडून
ज्ञानोबाने केली शर्थ
कानामध्ये सांगितला
गहनाचा गूढ अर्थ

त्याची बहीण मुक्ताई
होती मांत्रिकांची माय
सूर्य गिळण्या ही मुंगी
पार आकाशात जाय

"गाथा बुडवून टाक"
मला मुक्ताई दटावे
गाथा तरंगून येते
अंतर्यामी तिला ठावे

गाथा वज्रलेप होते
गाथा रक्तात भिनते
शब्द रोकडे बोलता
पुन्हा पुन्हा पछाडते