तमिळ मधे होत असलेल्या वेगळ्या वाटेच्या चित्रपटांची दखल घ्यावी हा मूळ हेतू होता. पण मायबोलीवर चित्रपटाची उत्तम जाण असलेले बरेच जण आहेत त्यांच्या लेखणीमुळे मराठी, बंगाली, मल्याळम तसेच हिंदीतही असे चित्रपट मोठ्या संख्येने बनत आहेत हे लक्षात आले. अशा चित्रपटांची दखल घेण्यासाठी हा धागा.
वेगळे याचा अर्थ पॅरलल इतकाच मर्यादीत नाही. चित्रपट ही कला मानून बनलेले व्यावसायिक / कलात्मक असे सगळेच चित्रपट . या धाग्यावर मसाला चित्रपटांना स्थान न दिले तर बरे होईल. त्यांना तद्दन व्यावसायिक म्हटले जाते. अचाट क्षमतेचा नायक हा पडदा व्यापून उरतो हे राजेश खन्ना , अमिताभ बच्चनने सुरू केलेले ट्रेण्ड्स सगळीकडेच पोहोचले आहे. दक्षिणेत तर नायकाला मॅटिनी आयडॉल म्हणतात. त्याची देवळे असतात. ते राजकारण सुद्धा करतात. त्यांच्या गल्लाभरू चित्रपटांनाही इथे स्थान नको द्यायला. गल्ला एव्हढा एकच निकष न लावता जे चित्रपट बनतात अशांचा आपल्याला इथे विचार करता येईल.
भवानी भिवई, मिर्च मसाला सारख्या चित्रपटांनी लयाला गेलेल्या गुजराथी चित्रपटसृष्टीला ओळख दिली. एक चांगला दिग्दर्शक दिला.
तर श्वास पासून मराठी चित्रपटसृष्टीने मोकळा श्वास घेतला असे म्हटले जाते. खूप वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येऊ लागले. पण एव्हढ्या मोठ्या संख्येने तयार होणार्या मराठी चित्रपटांना पडदा मिळत नसल्याने ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचले नाहीत. याबद्दल काही चित्रपट विश्लेषक मराठी चित्रपट निर्मात्यांनाही दोष देतात. मराठी चित्रपट निर्माते प्रमोशन्स, मार्केटिंग आणि चित्रपटाचा रिलीज याचा विचारच करत नसल्याने त्यांना फटका बसत होता. झी सिनेमा सारख्या संस्थांनी जे चित्रपट बनवले त्यांना आर्थिक पाठबळ असल्याने ते गाजले.
इतर भाषांमधे तयार होणार्या चित्रपटांना त्या त्या राज्यातला प्रेक्षकवर्ग पाठिंबा देतो. पश्चिम बंगाल या राज्यात सुद्धा अनेक प्रायोगिक चित्रपट तयार होतात. इथे हिंदी बोलणारे कमी असल्याने बंगाली चित्रपटांना प्रेक्षकवर्ग आहे. बंगाल आणि महाराष्ट्र इथल्या चित्रपटांमधे एक साम्य आहे. या दोन्ही इंडस्ट्रीज स्टारडम वर चालत नाहीत. कंटेण्ट वर भर असतो. प्रयोगांसाठी रिस्क घेतली जाते.
तमिळ मधे कर्णन, असुरन सारख्या चित्रपटात धनुष हा स्टार काम करतो. त्याच्या स्टारडमचा फायदा या चित्रपटांना होतो. हे चित्रपट भारतीय चित्रपटांच्या इतिहासात वेगळे आहेत. जयभीम सारख्या चित्रपटात सूर्या हा सुपरस्टार कामच करत नाही तर तो निर्माता आहे. दक्षिणेचे सर्वच चित्रपट पुष्पा, केजीएफ सारखे तद्दन व्यावसायिक नसतात. मात्र अशा चित्रपटात सुद्धा स्टारडमला पर्याय नाही हे दुर्दैव आहे.
याचप्रमाणे हिंदी बेल्ट मधे बनणारे आयुष्यमान खुरानाचे चित्रपट वेगळे आहेत. बरेली कि बर्फी हा उत्तरेतल्या छोट्या शहरांचा चेहरा आहे. अशा चित्रपटांनी भारतातल्या वेगवेगळ्या भागाचा फ्लेवर आणला आहे. आर्टिकल १५ सारखा चित्रपट आयुष्यमान खुराना करतो. राजकुमार राव हा ही वेगळ्या चित्रपटातून पुढे आला आहे. गँग्ज ऑफ वासेपूर हा एका विशिष्ट भागाच्या दबंग कल्चरचे दर्शन घडवतो. हिंसाचार बॉलीवूडला नवीन नाही. पण तपशीलाने त्या भागाचे राजकारण हा चित्रपट मांडतो.
मराठीत संगीत नाटके मोठ्या पडद्यावर आली. बालगंधर्व सारखा चित्रपट सुबोध भावेने पडद्यावर आणला. काशिनाथ घाणेकर आणला. हे बायोपिक उत्तम होते. कट्यारने तर परदेशातल्या लोकांची सुद्धा मने जिंकली. एलिझाबेथ एकादशी, एक उनाड दिवस, श्वास, देऊळ, नटसम्राट, हायवे एक सेल्फी, जोगवा, शाळा, हरिश्चंद्राची फॅक्टरी, काकस्पर्श असे अनेक चित्रपट वेगळे आहेत. यातले अनेक यशस्वी ठरले. तर काहींना स्क्रीन मिळाली नाही. किंवा प्राईम टाईम न मिळाल्याने लोकांपर्यंत पोहोचले नाहीत.
नीळकंठ मास्तरची गाणी गाजली पण चित्रपट म्हणावा इतका गाजला नाही. अशा चित्रपटांची संख्या वाढल्याने त्याचा परिणाम निर्मितीवर झाला आहे. अलिकडे त्यामुळेच बायोपिक किंवा ऐतिहासिक चित्रपटाकडे चित्रपट व्यावसायिक वळताना दिसत आहेत. प्रेक्षक म्हणून मराठी रसिकांनीही हातचे राखून पाठिंबा दिल्याने एके काळी सर्वाधिक प्रयोग होत असलेली इंडस्ट्री अशी तयार झालेली ओळख आता पुसली जाईल कि काय अशी भीती निर्माण होतेय. मराठी चित्रपट सृष्टी सुद्धा आता स्टारडम चा विचार करतेय ही दुर्दैवी गोष्ट आहे. चित्रपटामुळे कलाकारांना ओळख मिळते. स्टारमुळे मिळू लागली तर वेगळेपण काय राहीले ?
इथे आपण अशा चित्रपटांबद्दल थोडक्यात बोलूयात.
तिथी (कन्नड)
तिथी (कन्नड)
कर्नाटक मधल्या कुण्या एका खेड्यात एक अत्यंत खवट म्हातारा वयाची शंभरी पार केल्यावर वारला आहे.
त्याच्या फॅमिली मेंबर्स च्या इंडिविज्युअल स्टोरी आर्क्स - साठीचा निकम्मा मुलगा, नातू ज्याला फक्त वडिलोपार्जित जमीन विकून पैसा कमवायचा आहे आणि शाळकरी पणतू जो फक्त गावातल्या पोरींच्या मागे लागण्यात इंटरेस्टेड आहे, आणि बाकीच्या गावच्या म्हातारा गेल्या बद्दल च्या रिऍक्शन ह्या अनुषंगाने हा सिनेमा छान नर्म विनोदी वळणाने पुढे सरकतो .
अगदी नवा नाहीये (5-6 वर्ष नक्कीच झाली असतील) पण बघायचा असेल तर 100% रेकंमेंडेड.
रामचंद पाकिस्तानी
रामचंद पाकिस्तानी
Pages