क्रिप्टो ( Crypto ) - भाग - ९

Submitted by मिलिंद महांगडे on 25 May, 2022 - 12:36

₿₿₿

सायबर क्राईमची टीम जुहूला श्रीमती रागिणीच्या बिल्डिंगपाशी पोहोचली तेव्हा दुपारचे तीन वाजले होते . सौदामिनी मॅडम सुद्धा तिच्या असिस्टंट चिकटे बरोबर जुहू येथे हजर झाली. रागिणी तिच्या बेडरूममध्ये आराम करत होती . फ्लॅटमधे तिचा वकीलसुधा हजर होता . अटकपूर्व जामिनामध्ये श्रीमती रागिणी पोलीस चौकशीला योग्य ते सहकार्य करतील व कोर्टाच्या परवानगीशिवाय मुंबई सोडून कुठेही जाणार नाहीत असे लिहून दिले होते . तसेच तिची प्रकृती खराब असल्याकारणाने चौकशीदरम्यान तिला पोलीस स्टेशनला वारंवार जायला लागू नये अशी विनंती वकिलामार्फत कोर्टाकडे करण्यात आली होती व ती मान्य झाली असल्याने पोलिसांना चौकशीकामी दरवेळेस तिच्या जुहूच्या फ्लॅटवर जाणे भाग होते. तिने स्वतःच्या देखभालीसाठी एक नर्स ठेवली होती . ते सर्व जण बराच वेळ हॉल मध्ये बसून होते . थोड्या वेळाने रागिणी तिचा नाईट गाऊन घालून आली . तो नाईट गाऊन मलमली कापडाचा होता आणि तिच्या गोऱ्या रंगावर उठून दिसत होता. तिचे केस थोडेसे विस्कटलेले होते , डोळे जड झालेले होते. तिच्या त्या अवस्थेतही ती आकर्षक दिसत होती . तिला पाहिल्यावर का कुणास ठाऊक अमरच्या पोटात खड्डा पडला . त्याचा श्वास थोडासा चढला असल्याचं त्याला स्वतःलाच जाणवलं . त्याने पहिल्यांदा जेव्हा तिला पाहिलं त्याच वेळी तिच्याबद्दल एक प्रकारचा सॉफ्ट कॉर्नर त्याच्या मनात तयार झाला होता. त्याचं रूपांतर हळूहळू आकर्षणात होत होतं .
“ आय एम व्हेरी सॉरी , त्या दिवशी माझ्यामुळे तुम्हाला फार त्रास झाला ... ” ती आल्या आल्या तिने सर्वांची माफी मागितली .
“ मेन्शन नॉट . हे तर आमचं कर्तव्यच आहे. ” वाघचौरे साहेब चेहऱ्यावर हास्य आणीत म्हणाले .
“ तब्येत बरी आहे ना आता ? ” , सौदामिनी मॅडमने जराशा खोचक शब्दात विचारलं.
“ हो , आता बरी आहे. हे माझे लॉयर आहेत . मिस्टर मेघनाद निशाणदार ...” ती म्हणाली. तिचं मराठी चांगलं होतं पण त्यात इंग्रजी शब्दच जास्त होते.
“ आमची ओळख झाली त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये. बाकी तुमचं नाव एकदम युनिक आहे , मेघनाद … सध्या हे असलं नाव ऐकायला मिळत नाही . ” वाघचौरे साहेब म्हणाले . दोघांनी एकमेकांकडे बघून औपचारिक हास्य केले .अमरने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला पुन्हा तो हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा खिडकीतला प्रसंग आठवला. वकील मेघनाद निशाणदार तसा दिसायला हॅण्डसम होता, तरुण होता , केस थोडेसे विरळ असले तरी त्याने व्यवस्थित भांग पाडलेला दिसत होता. ट्रिम केलेली मिशी आणि दाढी, डोळ्यांवर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा त्याच्या एकूणच चेहरेपट्टीला शोभून दिसत होता.
“ तुम्ही काय घेणार ? टी ऑर कॉफी ? ”
“ चहा चालेल . ”
“ मला कॉफी . ” इति सौदामिनी.
तिने घरातल्या म्हाताऱ्या नोकराला चहा आणि कॉफी आणायची सुचना केली . “ ओके , शाल वी स्टार्ट ? विचारा काय तुम्हाला विचारायचं आहे ते ... ” ती म्हणाली .
“ ही जी घटना घडली , म्हणजे हे जे घडलं , ते सगळं काय काय झालं ते सुरुवातीपासून सांगा . ” वाघचौरे साहेब म्हणाले . त्यावर ती पुन्हा स्तब्ध झाली . ती विचार करू लागली , थोड्या वेळात तिच्या डोळ्यांत पाणी जमा झालं . अमरने वाघचौरे साहेबांकडे पाहिलं , ते तिच्या हालचाली निरखत होते . सौदामिनी मॅडम मात्र तिच्याकडे काहीशा रागात बघत होत्या , ही बाई नाटकं करतेय असं त्यांचं पहिल्यापासून मत बनलं होतं . डोळे पुसून रागिणीने निश्वास सोडला .
“ वी वेअर ऑन अवर हनिमून... एक महिन्यापूर्वीच आमचं लग्न झालं होतं अँड ही वॉज सो हॅपी ... ओमीने माला सांगितलं की आपण हनिमूनसाठी लदाखला जाऊ , अँड दॅट साऊंड इंटरेस्टिंग टू मी अल्सो ... कारण मला पहाडांमध्ये फिरायला खूप आवडतं , आणि हे ओमीला माहित होतं. ही बुक्ड प्लेन टिकेट्स… ”
“ मॅडम , हे सगळं आम्हाला माहित आहे . तुम्ही मुद्द्याचं बोला. तिथे गेल्यावर काय झालं ते सांगा . ” वाघचौरे साहेबांनी मधेच तिला टोकलं.
“ तेच सांगते सर , तिथे आम्ही पोचलो . आणि सडनली स्नोफॉल सुरु झाला . आधी मस्त वाटलं . पण नंतर ओमीला त्रास व्हायला लागला. फस्ट आय थॉट की हाय अल्टीट्युडमुळे असेल , पण नंतर त्याची हेल्थ जास्तच खराब झाली . ही हॅड चेस्ट पेन ... आय टूक हिम टू दि हॉस्पिटल बट खूप उशीर झाला होता .... ” असं म्हणून ती ओंझळीत तोंड लपवून रडू लागली . सर्वजण पुन्हा शांत बसून राहिले.
“ डॉक्टरांचं ओपिनिअन काय होतं ? ” वाघचौरे साहेबांनी थोड्या वेळाने विचारलं.
“ त्याला हार्ट अटॅक आला होता , माझ्याकडे डेथ सर्टीफिकेट सुधा आहे . आय कॅन शो इट टू यु . ”
“ ओके . दाखवा . ”
तिने तिच्या वकिलाकडे पाहिलं. त्याने लगेच त्याच्या जवळ असलेल्या फोल्डरमधून डेथ सर्टीफिकेट काढून वाघचौरे साहेबांच्या हातात दिलं . त्यात मृत्यूचे ठिकाण , आणि तारीख लिहिली होती .
“ ह्याची एक झेरॉक्स लागेल आम्हाला . ” वाघचौरे साहेब म्हणाले.
“ यु मीन फोटोकॉपी , येस , हि घ्या ... ” म्हणत वकील मेघनाद निशाणदारने फोटोकॉपी त्यांना दिली . अमरने ती व्यवस्थित पाहिली .
“ मलाही एक कॉपी द्या. ”, सौदामिनी मॅडम म्हणाल्या.
“ ठीक आहे ... त्यानंतर काय झालं ? ”
“ आय वॉज इन शॉक , मला काहीच समजत नव्हतं , की काय करू ... मी तिथेच ओमीचं शेवटच कार्य तिथेच केलं . कारण तिथे , कोरोनामुळे लॉक डाऊन लागला होता. आय थिंक जवळपास एक महिना स्ट्रिक्ट लॉकडाऊन होता . ऑल रोड्स वेअर ब्लॉक्ड … अँड ऑल फ्लाईट्स वेअर कॅन्सल्ड आणि तुम्हाला थोडं विअर्ड वाटेल , पण ओमीची अशी इच्छा होती की त्याच्या डेथनंतर त्याच्या अस्ती सिंधू नदीत अर्पण करावी . ”
“ काय ? शेवटची इच्छा ? पण त्यांना कसं माहित की ते लगेच मरणार आहेत ते ? ” अमरने आश्चर्याने विचारलं.
“ आय डोन्ट नो ... मलाही ते थोडं विअर्ड वाटलं . आम्ही लदाखला जायच्या चारच दिवस आधी त्याने त्याचं विल बनवलं होतं . ते म्हणतात ना , कधी कधी माणसाला ह्या गोष्टी आधीच समजतात. सिक्स्थ सेन्स मे बी … ”
" विचित्रच आहे खरं ! मिस्टर ओमीनीं बनवलेलं विल दाखवता का जरा ? " वाघचौरे साहेबांनी साशंक मनाने विचारलं. वकील मेघनाद निशाणदार याने लगेच त्याच फोल्डरमधून त्याचं विल काढलं आणि मूळ प्रतिसोबत त्याची फोटोकॉपी सुद्धा अमरकडे दिली . वाघचौरे साहेबांनी निमूटपणे त्या विल वरून नजर फिरवली त्यात ओमीच्या सर्व प्रॉपर्टीची मालकीण त्याने रागिणीला केलं होतं आणि मघाशी ती म्हटल्याप्रमाणे खरोखरच त्याच्या मृत्यूनंतर काय काय करावं हे त्याने त्याच विलमध्ये लिहिलं होतं . हे खरोखर आश्चर्यकारक होतं. वाघचौरे साहेबांनी त्या विलची कॉपी अमरकडे दिली .
" तुम्हाला असं नाही वाटत की हे सगळं ठरवून केल्याप्रमाणे आहे म्हणून ? " सौदामिनी मॅडम तिच्या डोळ्यांत पहात म्हणाले .
" सॉरी…! मला समजलं नाही. " तिनेही त्यांच्याकडे रोखून बघितलं .
" मला असं म्हणायचं आहे की हे सगळं प्रिप्लॅन्ड असावं इतकं जुळतंय . "
" ऑर यु कॅन कॉल इट एज अ कोईनसिडन्स … "
" एक दोन घटनांचा असू शकतो कोईनसिडन्स ,पण इथे तर सगळंच आधी ठरल्यासारखं वाटतंय , काय वकील साहेब ? " त्यावर मेघनाद निशाणदार वकिलाने नुसते खांदे उडवले .
" ठीक आहे . तुम्ही लेह मध्ये कोणत्या हॉटेलमध्ये उतरला होतात ? " वाघचौरे साहेबांनी विचारलं.
" कलवान रेस्टहाऊस … "
" आणि मिस्टर ओमी ह्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं ? "
" सोनल , की मीनल … असंच काहीतरी नाव होतं . आय डोन्ट रिमेम्बर इट एक्झाक्टली . बट इट इज मेंशन इन हिज डेथ सर्टिफिकेट … " मिसेस रागिणी हे सांगत असताना सौदामिनी मॅडम सोबत असलेले त्यांचे असिस्टंट चिकटे मॅडमच्या कानाजवळ जाऊन काहीतरी सांगू लागले. आणि सौदामिनी मॅडम सुद्धा कान देऊन बारकाईने त्यांचं ऐकू लागल्या. त्यांच्या कानगोष्टी झाल्यावर सौदामिनी मॅडम मिसेस रागिणीला म्हणाल्या , “ मॅडम , मिस्टर ओमी मिरचंदानी यांचा मोबाईल , लॅपटॉप आणि आणखी काही वस्तू असतील तर त्या आम्हाला पाहायच्या आहेत. ” हे ऐकल्यावर ती थोडी विचारात पडली. एकदा तिने तिच्या वकिलाकडे पाहिलं. त्याने डोळ्यांनी तिला दिलासा दिला. पण त्यानंतर त्याने दोनदा पापण्या मिटवून उघडल्या. हि गोष्ट अमरच्या नजरेतून सुटली नाही. हि नक्कीच कसली तरी खूण होती. मिसेस रागिणी आणि वकील मेघनाद निशाणदार यांनी कोणालाही कळणार नाही अशाप्रकारे एकमेकांशी मूकपणे संवाद साधला होता. पण ह्या दोन वेळा पापण्या मिटण्याचा अर्थ काय असू शकतो ? अमर विचार करू लागला.
" ओके , मिस्टर ओमी ह्यांच्या मृत्यूनंतर सगळी प्रॉपर्टी … " वाघचौरे साहेब पुढे काही बोलणार इतक्यात त्यांनी पाहिलं की रागिणीला चक्कर येत होती , आणि तिने आपलं डोकं दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवलं होतं . " रागिणीजी , तुम्हाला काय होतंय ? बरं वाटत नाही का ? "
" चक्कर …. चक्कर …. " म्हणत ती बाजूच्या खुर्चीत थेट कोसळलीच ! सर्वजण गडबडले . नर्स तिला सावरायला धावली. म्हाताऱ्या नोकराने लगेच पाणी आणलं . थोडं तिच्या चेहऱ्यावर शिंपडलं . ती अर्धवट शुद्धीवर आली . हळूहळू तिने डोळे उघडले. म्हाताऱ्या नोकराने तिला पाणी प्यायला दिलं . थोडंसं पाणी प्यायल्यावर तिला बरं वाटलं .
" खूप स्ट्रेस आलाय. ह्यांना आरामाची गरज आहे . " नर्स म्हणाली आणि पडत्या फळाची आज्ञा समजून रागिणी आणखीनच दमल्यासारखा चेहरा करू लागली .
" मला वाटतं , आपण जरा त्यांना आराम करू द्यावा . त्यांना बरं वाटलं तर त्या पुन्हा कॉल करतील , किंवा मी कळवतो तुम्हाला सर . " मेघनाद निशाणदार वकील म्हणाला . अत्यंत नाईलाजाने वाघचौरे आणि त्यांची टीम ह्या सर्व गोष्टींना तयार झाली . समोरच्या माणसाची तब्येतच बरी नाही तर त्यांना त्यांची चौकशी थांबवणं अनिवार्य होतं . काय करू शकणार होते ते !

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users