क्रिप्टो (crypto ) भाग - ८

Submitted by मिलिंद महांगडे on 25 May, 2022 - 01:45

₿₿₿

जयसिंग झिपऱ्याबरोबर सोसायटीच्या गार्डनमध्ये बसला होता. बायकोने तब्येतीच्या कारणावरून त्याला बाहेर जायची मनाई केली होती. तोही जास्त कटकट नको म्हणून तिचं निमूटपणे ऐकत होता. खरंतर जयसिंग बायकोचं काहीच ऐकून घ्यायचा नाही , पण आता परिस्थिती जरा नाजूक होती म्हणून तो तिच्याशी जुळवून घेत होता . महाबळेश्वरच्या जागेसाठी तो टोकन देऊन बसला होता. पण उरलेली नव्वद टक्के रक्कम देण्यासाठीचे त्याच्याकडचे असलेले सगळे पैसे संपले होते. समोरच्या पार्टीकडून सारखी विचारणा होत होती पण आता त्याचा नाईलाज झाला होता. एक मोठा घोळ झाला होता , आणि त्यावरच दोघे चर्चा करत बसले होते.
“ मालक , तुम्ही वहिनींना सांगितलंत काय ? ” , झिपऱ्याने विचारलं.
“ याड लागलय का काय तुला ? तिला सांगणं म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे . “
" अहो पण किती दिवस असं तुम्ही लपवून ठेवनार कधी ना कधी तरी सांगावं लागनारच. "
" काय सांगू तिला , प्रतापरावांकडून घेतलेले वीस कोट बुडाले असं सांगू का ? कुठून दुर्बुद्धी सुचली आणि त्या बिटकॉइन मध्ये पैसे टाकले असं झालंय."
" तरी मालक मी सांगत होतो तुम्हाला कि, या फंद्यात पडू नका म्हणून ! माझं ऐकलं नाही तुम्ही. "
" अरे हो बाबा, झाली चूक आता काय करतो ! पह्यलं त्या हरामखोर टोन्याला शोधला पाहिजे. त्याच्याच सांगण्यावरून मी सगळे पैसे टाकले … त्यानीच त्या ओमी मिरचंदानीच्या कंपनीची ओळख करून दिली होती . आता तो ओमीच राह्यला नाही तर आपले पैसे कसे मिळायचे ? "
" पन मालक , आधी टाकलेले पैसे तर दुप्पट मिळाले की एका मह्यन्यात . "
" तेच तर … आधी म्हनलं मिळत्यात का नाही ते बघावं , म्हनून एक लाख टाकून पाह्यलं , तर एका महिन्यात त्याने पैसे दिली की दुप्पट!"
" मग त्या टोन्याची काय चूक ? आता तो ओमीच मेला , त्याला त्यो टोनी तरी काय करनार ? " झिपऱ्याच्या बोलण्यावर जयसिंगला काय बोलावं ते कळेना , त्याला पटत होतं , पण आता चुकीचं खापर कुणाच्या डोक्यावर फोडायचं ?
" तू नक्की कुणाच्या बाजूनं हायस ? माझ्या का त्या टोन्याच्या ? " जयसिंग वैतागला .
" आवो , मालक मी तुमच्याच बाजूनं हाये… पन माझं म्हणनं असं हाय की त्यानं काय आपल्याला सक्ती केली होती का ? आपल्यालाच वाटलं म्हणून टाकले का न्हाई पैसे त्या बिटकॉइनमधी ? ”
" झक मारून झुनका खाल्ला बघ ! माझा काय विचार होता तुला खरं सांगू का , ह्या बिटकॉइन मधी आपल्याला मिळालेले पैसे दुप्पट करायचे , आणि आणि घेतलेले पैसे प्रतापरावांना परत करून टाकायचे … म्हंजे मग आपल्यावर कुणाचं एका रुपयाचं कर्ज राह्यलं नसतं . वरनं वीस करोड आपल्या खात्यात आल्यावर कशाला पायजे ते रिसॉर्ट अन फिसॉर्ट … वीस करोडवर मिळणाऱ्या व्याजातच आपलं आयुष्य निवांत …. कसं काय ? ” , जयसिंग म्हणाला.
“ नाय, तुमची आयडिया बरोबर होती , पन तसं झालं नाय ना … आणि वरनं वीस करोड बी गेले. ”
“ अशे कशे जातील ? म्हणून तर म्हणतो पह्यला त्या टोन्याला शोधून काढू … त्याच्याकडनं काही माहिती मिळतीय का बघू … तो ओमी मिरचंदानी मेला , ठीक आहे … पन आपले बिटकॉईन तर खात्यात असतील ना ? ती बिटकॉईनची कंपनी परत कधी सुरु होईल ते तरी कळंल . ”
“ पन तो टोनी भेटायचा कुठं ? ”
“ त्याचं नेहमीचं ठिकाण आहे … अप्सरा बार !”
“ चालतंय कि , अहो पण मालक , बार तर बंद असतील आता … कोरोनामुळं ” झिपऱ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन म्हणाला.
" कसं काय जमतं रं तुला मांजरासारखं आडवं घालायला ? " , जयसिंग वैतागला.
" मालक आवो , जे खरं हाय तेच तर बोलतोय मी . "
“ ठीक आहे ...पण त्याला शोधायला तर लागल. यमुनेला कळता कामा नये . सध्या एक आठवडा काहीच करता येनार नाय . गप बसावं लागलं . तिची खात्री पटली कि मी बरा झालोय , मग आपल्याला बाहेर पडता येईल. आणि सध्या हे प्रकरण पन लय तापलेलं आहे . सगळ्या न्यूज चॅनेलला तेच चाललेलं असतंय . थोडा वेळ गेला तर ते बी जरा थंड हुईल. ” असं म्हणत सहज त्याने त्याच्या बिल्डिंगकडे नजर टाकली. बाल्कनीत उभी राहून यमुना त्यांच्याकडेच बघत होती.

₿₿₿

“ साहेब , कामात हायेत तुम्ही ? ” वाघचौरे साहेबांचा ड्रायवर हरी अमरला विचारत होता.
“ नाही फार काही नाही . बोल काय काम ? ”
“ जरा विचारायचं होतं ... ”
“ विचार की मग . ”
“ साहेब , हे बीटकॉईन काय आहे ? कसला प्रकारचा कॉईन आहे हा ? ”, अमर त्यावेळी नेटवर त्याच संदर्भात माहितीचा शोध घेत होता.
“ का रे बाबा ? तुला कशाला पाहिजे बीटकॉईन ? ”
“ सहज विचारलं हो , आता तुम्ही ह्या केसवर काम करताय म्हणून ... वाघचौरे साहेबांना विचारलं तर म्हणाले माझं डोकं नको खाऊस ... ” त्याच्या बोलण्यावर अमरला हसायला आलं .
“ ते आधीच वैतागलेत ह्या केसमुळे . जाउदे तुला सांगतो बस ... ” अमर असं म्हणाला आणि हरीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. “ हे बीटकॉईन म्हणजे एक प्रकारचं आभासी चलन आहे . आता तुझ्याकडे नोटा आणि पाच – दहा रुपयाचे कॉईन आहेत तसंच . फक्त हे नोटा आणि कॉईन तुला दिसतात , हाताळता येतात तसं हे चलन फक्त कॉम्प्युटरमधेच असतं , ते तुला दिसत नाही . ”
“ दिसत नाही ? खर्च कसं करायचं मग ? आन आपल्याकडं किती पैसे हायेत हे कसं कळायचं ? ” हरीने आश्चर्याने विचारलं.
“ त्यासाठी बीटकॉईन खरेदी विक्री करणारे एक्स्चेंज असतात . त्यात तुम्ही खरे पैसे वापरून हे बीटकॉईन खरेदी करू शकता , आणि त्यात साठवून ठेऊ शकता . आपले कंपन्यांचे शेअर्स जसे असतात तसे त्या बीटकॉईनची किंमत कमी जास्त होत असते . लोक काय करतात बीटकॉईन घेऊन ठेवतात , त्याची किंमत वाढली की जास्त किमतीला विकून त्यातला नफा कमावतात. सिम्पल आहे हे ... ”
" कितीचा घपला झाला आसल ह्या केसमधी …? म्हंजी तुमचा अंदाज काय ? "
" त्यांचे जेवढे क्लाएंटस आहेत त्या नुसार तर बहुतेक दोन तीन हजार बिटकॉईनचा तर पत्ताच नाही . आणखी बाकी इथेरियम आहे , एक्सआरपी आहेत . पण ते जास्त नाहीत . "
" हात्तीच्या … फक्त दोन तीन हजार कॉइनसाठी एवढी मारामारी ? आवो , वाघचौरे साहेबांनी तर ह्याच्यापेक्षा मोठ्या केस सोडवल्यात … "
" अच्छा ? किती मोठ्या केसेस ? " अमरला त्याच्या बोलण्याची गंमत वाटली .
" आवो , तशा लय हायेत . एका प्रकरणात पाच कोटींची रिकव्हरी केली होती साहेबांनी . तीच मोठी केस आठवतीया मला . " हरी अभिमानाने सांगत होता .
" अरे वा ! भारीच की ! " अमर खरं तर हे उपहासाने म्हणाला पण ते काही हरीला कळलं नाही .
“ मला पन घेता येईल का बीटकॉईन ? ” , हरीने विचारलं .
“ घेता येईल की , किती घ्यायचेत तुला ? ” , अमरने गमतीने विचारलं, कारण हरी काय उत्तर देणार हे त्याला माहित होतं .
“ जास्त नाय , पन्नास शंभर कॉईन घेऊन ठेवावंत आपलं ... ” तो अगदी सहज म्हणाला. त्यावर अमर जोरात हसला.
“ हरिभाऊ , एका बीटकॉईनची आत्ताची किंमत माहिती आहे का आपल्याला ? आजची त्याची किंमत आहे पंचेचाळीस लाख रुपये ! ”
“ काय ? नुसत्या एका कॉईनची किंमत पंचेचाळीस लाख ? बाबो ... ” डोळे मोठे करीत हरी म्हणाला.
“ ही तरी कमी झालीय किंमत ... मागच्या महिन्यात हीच किंमत एकोणपन्नास लाखाच्या वर होती . ”
“ आयो ... एकोणपन्नास लाख ! नुसत्या येका कॉईनसाठी द्यायाचे ? बाप रे ! नाय परवडत आपल्याला. पन साहेब , ज्याच्याकड आसं शंभर कॉईन असत्याल त्याची तर चांदीच की ! ” हरी उत्तेजित होऊन म्हणाला . त्याचं बोलणं ऐकून अमरला गंमत वाटत होती .
“ तसं तुझ्याकडे पंचेचाळीस लाख नसतील तरी तू काही सतोशी घेऊ शकतोस ... एका बीटकॉईनमध्ये दहा कोटी सतोशी असतात ... ”
“ काय साहेब , चेष्टा करतायसा का गरीबाची , तुम्ही तर लाख आन कोटीशिवाय बोलानाच ! ”
“ तुच म्हणाला होतास ना , बीटकॉईन घेऊ शकतोस का म्हणून ... ” अमर हसत म्हणाला.
“ मला काय म्हाईत हे असलं काय हाये ते ... आन त्यो सतीश का कोण , त्याची काय भानगड हाये ? ”
“ सतीश नाही रे बाबा , सतोशी … सतोशी नाकामोटो नावाच्या माणसाने बीटकॉईनचा शोध लावला. त्याच्या नावावरून हे सतोशी नाव पडलं. आपल्याकडे चार आणे , आठ आणे असतात तसे ... ”
“ ह्या बीटकॉईनचे चाराने, आठाने बी परवडायचे नाईत ... आमाला आपले रुपयेच बरे... साहेब , आपण जुहूला त्या बाईकड गेलो होतो , तिच्याकडं तर लय असतील बीटकॉईन ... किती असत्याल तरी ? ”
“ माहित नाही यार .. तेच तर शोधायच आहे. बाई कधी बरी होतेय देवाला ठाऊक . ”
“ झाली बरी , तिच्या वकिलाचा फोन आला होता. चला आपल्याला जुहूला जायचं आहे ” वाघचौरे साहेब अमरच्या केबिनमध्ये शिरत म्हणाले .
“ ओके सर … ”
“ अरे हो, त्या सौदामिनीला सुद्धा सांग , परस्पर यायला तिकडे . ”
“ तिला कशाला सर ? ”, अमर नाखुशीने म्हणाला.
“ अरे बाबा , तिला सुद्धा तपास करायला सांगितलंय ना , आणि त्या दोघींची जुगलबंदी बघायला गंमत येते जरा ... ” , वाघचौरे साहेब डोळा मारत म्हणाले. नाईलाजाने अमरने तिला फोन लावला.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users