क्रिप्टो ( crypto ) भाग - ७

Submitted by मिलिंद महांगडे on 24 May, 2022 - 13:39

₿₿₿

ब्रेकिंग न्यूज -

“ क्रिप्टो कॉइन एक्स ह्या कंपनीचे मालक मृत ओमी मिरचंदानी यांची पत्नी श्रीमती रागिणी ह्या काल लेह , लडाखवरून जुहू मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी आल्या असता सायबर शाखेच्या पोलीस अधिकारी श्री वाघचौरे यांनी त्यांना अटक केली. परंतु त्यांची प्रकृती अचानक बिघडली असल्याने त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे . त्या अद्याप बेशुद्धावस्थेत असल्याचे सूत्रांकडून समजते . ओमी मिरचंदानी यांचा मृत्यू कशा प्रकारे झाला ? , त्यांच्या मृतदेहाचं काय केलं गेलं ? , की ओमी मिरचंदानी यांचा मृत्य झालाच नाही ? क्रिप्टो कॉइन एक्स पुन्हा कधी ऑनलाईन होईल ? हे आणि असे अनेक प्रश्न सध्या लोकांना पडलेले आहेत . ह्यांची उत्तरे आता श्रीमती रागिणी शुद्धीवर आल्यानंतरच मिळू शकतील . ”

सिटी हॉस्पिटलच्या लाऊंजमध्ये लावलेल्या टीव्हीवरच्या न्यूज चॅनलवर ही बातमी बघत वाघचौरे साहेब आणि अमर बसले होते . काही वेळापूर्वी पत्रकारांची फौज हॉस्पिटलच्या आवारात गोळा झाली होती . त्यांना आवरता आवरता आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता वाघचौरे साहेब आणि अमरच्या नाकी नऊ आले होते. बाजूच्या रूममध्ये रागिणीला ऍडमिट केलं होतं . कॉन्स्टेबल कवठेकर मॅडम तिच्या रूममधून बाहेर आल्या .
" मॅडम , कशा आहेत श्रीमती रागिणी ? शुद्धीवर आल्या का त्या ? " अमरने त्यांना विचारलं .
" नाय ओ सर , सलाईन लावलंय . अजून काय शुद्धीवर आलेली नाय ." कवठेकर मॅडम म्हणाल्या .
“ मला तर वाटतंय नाटकं करतेय ती . ”, सौदामिनी मॅडम एकदम म्हणाल्या.
" काही सांगता येत नाही . खरंच बेशुद्ध झाली असेल . लेहवरून नुकतीच आली असणार , त्यात नवरा गेलाय तिचा . त्या धक्क्याने पडली असेल बेशुद्ध, काय अमर ? " वाघचौरे साहेब म्हणाले .
" हम्म ... तसंही असेल . "
" काय सांगताय सर , आपण यायच्या आधी चांगली बसली होती की हवा खात . आपण आल्यावरच नाटकं सुरू केली तिनं . " सौदामिनी मॅडम म्हणाल्या .
" ती बिचारी सूर्यास्त बघत होती मॅडम... " अमर म्हणाला .
" बिचारी वगैरे काही नाही... मला तर कुठल्याच अँगलने ती बिचारी वाटत नाही . " सौदामिनी मॅडम म्हणाल्या.
“ पण मॅडम तुम्ही त्या रागिणीला भेटल्यापासूनच तिला धारेवर धरायला सुरुवात केलीत . ”, वाघचौरे म्हणाले.
“ का कुणास ठाऊक पण मला असं वाटतंय कि ती हे सगळं नाटक करतेय . मला तिचा खूप संशय येतोय. ”
“ संशय तर आम्हालाही आहे ,पण इंटेरॉगेशनची एक पद्धत असते. ” , अमर मधेच म्हणाला.
“ अच्छा , तर आता तुम्ही मला शिकवणार का इंटेरॉगेशन कसं करायचं ते ? ” , सौदामिनी मॅडम एकदम उसळून म्हणाल्या.
“ तसं नाही मॅडम , मी सहज म्हणालो कि त्या एक स्त्री आहेत , आणि थोडंसं स्त्री दाक्षिण्य दाखवलं तर काही फरक पडणार नाही . ”
“ स्त्री दाक्षिण्य वगैरे दाखवायचं असेल तर एखाद्या गरजू स्त्रीला दाखवा , एखाद्या विधवेला दाखवा … हि बाई क्रिमिनल आहे… ”, सौदामिनी भांडणाच्या विचारात दिसत होती.
“ हि सुद्धा एक विधवाच आहे ना ! ” अमरने बरोब्बर मुद्दा काढला त्यावर सौदामिनी मॅडमना पुढे काही बोलता येईना , वाघचौरे साहेब मिशीतल्या मिशीत हसत दुसरीकडे बघू लागले. त्यांचं बोलणं सुरू असताना तिथे काळा कोट घातलेला एक व्यक्ती आला .
" नमस्कार वाघचौरे साहेब , मी ओमी मिरचंदानी यांचा वकील मेघनाद निशाणदार . " तो व्यक्ती हस्तांदोलनासाठी हात पुढे करत म्हणाला .
" ओह ... येस , येस ... बोला " त्याच्याशी हस्तांदोलन करत वाघचौरे साहेब म्हणाले .
" मी श्रीमती रागिणींचा अटकपूर्व जामीन घेऊन आलोय . " म्हणत त्याने वाघचौरे साहेबांपुढे जामीनाची कागदपत्रे ठेवली. वाघचौरे साहेबांनी त्यावर एक नजर फिरवली आणि मानेनेच होकार दिला .
" साहेब , एक रिक्वेस्ट आहे . माझ्या आशिलाची प्रकृती बिघडली आहे . त्या सध्या शॉकमध्ये आहेत . ओमी मिरचंदानींच्या अकस्मात मृत्यूमुळे त्यांना मानसिक धक्का बसलाय. त्यांची प्रकृती आणखी बिघडून चिंताजनक होऊ शकते . त्यांना वारंवार प्रवास झेपणारा नाही . आमचं तुम्हाला सहकार्य नेहमीच राहील . फक्त तुम्ही सुद्धा सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. " एक औपचारिक हास्य चेहऱ्यावर आणून त्या वकिलाने निरोप घेतला आणि तो रागिणीच्या रूममध्ये गेला .
" चला , आपलं काम इथपर्यंतच ! जाऊ आता आपण ." म्हणत वाघचौरे साहेब उठले .
" आणि ती रागिणी ? " अमरने विचारलं .
" ती कुठे जात नाही . तिचा वकील आलाय आता तिची काळजी घ्यायला . ती बरी झाली की चौकशी करू तिची . चला सौदामिनी मॅडम . आपल्याला निघायला पाहिजे . बरं झालं तो वकील लवकर आला ते . "
" म्हणजे तुम्हाला माहीत होतं ते असं होणार ते ? " अमरने विचारलं .
" मघाशी तिने तिच्या वकिलाला फोन कशासाठी केला होता मग ? ही रागिणी वाटते तेवढी साधी नाही . आपल्याला अटक होणार हे तिने आधीच ओळखलं होतं .”, सौदामिनी मॅडम म्हणाल्या.
“ हम्म … चलाख आहे बाई ! सौदामिनी मॅडम , आता मलाही तुमचं म्हणणं पटायला लागलंय . ", वाघचौरे साहेब म्हणाले. सगळे जाण्यासाठी निघाले. हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर अमरचं सहज लक्ष गेलं. मिसेस रागिणीला ऍडमिट केलेल्या रूमच्या खिडकीच्या पडद्यांच्या फटीतून त्याला एक ओझरतं दृश्य दिसलं. म्हटलं तर साधं आणि म्हटलं तर थोडंसं विचित्र ! त्याने पाहिलं , मिसेस रागिणी अजूनही बेडवर बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या आणि वकील मेघनाद निशाणदार यांनी मिसेस रागिणीचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला होता.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users