औषधांचा शरीर-प्रवेश (२)

Submitted by कुमार१ on 8 May, 2022 - 19:24

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/81575
....................
या भागात आपण औषधे देण्याचे जे शरीरमार्ग बघणार आहोत त्यापैकी श्वसनमार्ग हा सर्वात महत्त्वाचा आहे.

श्वसनमार्गातून घेतलेले औषधी फवारे
अशा औषधांचा (श्वासनलिका रुंदावणारी आणि स्टिरॉइड्स) मुख्य उपयोग विविध श्वसनरोगांसाठी केला जातो. उदा. दमा व तत्सम आजार. या प्रकारे घेतलेले औषध त्वरित शोषले जाते आणि काही सेकंदात त्याचा प्रभाव दाखवते. एकेकाळी दम्याची नियमित औषधे गोळीरूपात पोटातून दिली जात. त्यामुळे त्यांचा प्रभाव दिसण्यास तर वेळ लागेच, परंतु ती संपूर्ण शरीरभर पसरल्याने त्यांचे दुष्परिणामही बऱ्यापैकी दिसून येत. ते टाळण्यासाठी या प्रकारच्या औषधमार्गाचा शोध लावण्यात आला. इथून दिलेल्या औषधाचा प्रभाव (कमी मात्रेत) जास्तीत जास्त आणि दुष्परिणाम अत्यंत कमी स्वरूपात दिसून येतात.
असे औषध ३ प्रकारच्या उपकरणांमधून देता येते :
१. Inhaler : यात वायुरूप औषध विशिष्ट दाबाखाली साठवलेले असते. जेव्हा आपण ते श्वासातून आत ओढतो तेव्हा एका झडपेच्या माध्यमातून ते बाहेर पडते.
Asthma_inhaler_Icon_256.png

२. (कोरड्या) पावडरचे इन्हेलर्स
एका इन्हेलर उपकरणात साधारणपणे एक ते दोन महिने पुरेल इतके औषध साठवलेले असते. त्यामुळे रुग्णास ते बरोबर बाळगणे अतिशय सोयीचे असते.

Dry_powder_inhalers.jpg
अशा प्रकारे औषध घेण्याचे तंत्र नीट आत्मसात करावे लागते. औषध श्वासाबरोबर आत ओढल्यानंतर १० सेकंद श्वास रोखून ठेवायचा असतो. तसेच श्वास सोडल्यानंतर पाण्याने खळखळून गुळण्या करणे आवश्यक.

३. Nebulizer : यात औषध द्रवरुपात साठवलेले असते आणि अल्ट्रासोनिक तंत्राच्या मदतीने त्याचे फवाऱ्यात रूपांतर होते.
Nebulizer_Mask_(Child).png

………

नाकपुडीद्वारा दिलेली औषधे
या मार्गाने औषध देण्याचा हेतू ते फुप्फुसात पोचणे हा नसतो. याचे हेतू दोन प्रकारचे असतात :
१. औषधाची नाकापुरतीच मर्यादित क्रिया
२. नाकाद्वारे रक्तप्रवाहात शोषले जाणे.

१. अशी औषधे थेंब किंवा फवारा या स्वरूपात दिली जातात. कुठल्या प्रकारची औषधे इथून दिली जाऊ शकतात त्याला खूप मर्यादा आहेत. तसेच दिल्या जाणाऱ्या औषधाची मात्राही खूप कमी प्रमाणात(काही मायक्रोलिटर्समध्ये) असते. या प्रकारे देण्यात येणाऱ्या औषधांची ठळक उदाहरणे म्हणजे ऍलर्जिक सर्दीसाठी दिलेली काही औषधे आणि स्टिरॉइड्सचे फवारे.

2. श्वसनमार्गातून घेतलेले औषध तेथील रक्तप्रवाहामार्फत संपूर्ण शरीरभर पसरू शकते का, हा रोचक प्रश्न आहे. या प्रकारे औषध शोषले जाऊ शकते हे बरोबर. काही औषधांच्या बाबतीत असे प्रयोग झालेले आहेत- उदा. इन्सुलिनचा फवारा. काही वर्षांपूर्वी या औषधाला मान्यता मिळून ते वापरात होते. परंतु नंतर त्याच्या मर्यादा (खूप जास्त मात्रा लागणे) आणि अन्य काही दुष्परिणाम लक्षात आल्याने सध्या ते फारसे वापरात नाही. नेहमीच्या इन्सुलिन इंजेक्शनला जोड उपचार म्हणून त्याचा काही ठिकाणी वापर होतो. नाकातून घेतलेल्या इन्सुलिनचा स्मृतिभ्रंशासारख्या काही मेंदूविकारांमध्ये उपयोग होऊ शकेल का, या विषयावर गेली काही वर्षे संशोधन चालू आहे.

३. काही रोगप्रतिबंधक लसी देखील या मार्गाने देण्यात येतात. इन्फ्लूएंजाची लस बऱ्याच वर्षांपासून वापरात आहे. आता लवकरच अशी कोविडविरोधी लस विकसित होत आहे.
……..
औषधे देण्याचे अतिविशिष्ट मार्ग
काही आरोग्य समस्यांमध्ये एखादे औषध संपूर्ण रक्तप्रवाहात मिसळण्याऐवजी शरीराच्या ठराविक भागापुरतेच आणि तातडीने तिथे पोचणे आवश्यक असते. अशा प्रसंगी या विविध मार्गांचा अवलंब केला जातो.

A. पाठीच्या कण्यातील मज्जारज्जू
त्याच्या अंतर्गत भागात इंजेक्शनच्या माध्यमातून औषधे देता येतात. मुख्यत्वे हे मार्ग ठराविक शस्त्रक्रियांच्या पूर्वी भूल देण्यासाठी वापरतात. यामध्ये दोन उपप्रकार आहेत :
१. Epidural : हा प्रकार बाळंतपणाच्या वेदना कमी करण्यासाठी बऱ्यापैकी वापरला जातो.
२. स्पायनल : यात औषध मज्जारज्जूच्या आत असलेल्या द्रवात सोडले जाते.
काही आजारांमध्ये रुग्णास असह्य वेदना होत असतात तेव्हादेखील या मार्गाद्वारे वेदनाशामक औषध देता येते.

B. थेट मेंदूच्या अंतरंगात (पोकळीत) इंजेक्शन:
मेंदूच्या विशिष्ट ट्युमरमध्ये हा मार्ग वापरतात.

C. थेट हृदयात दिलेले इंजेक्शन
जेव्हा काही कारणाने अचानक हृदयक्रिया बंद पडते तेव्हा Adrenalineचे इंजेक्शन एका लांब सुईतून थेट हृदयात देता येते. एकेकाळी या मार्गाचा वापर करण्यात येत असे. परंतु अलीकडे अशा प्रसंगात वापरण्यासाठी अन्य चांगले मार्ग उपलब्ध झाल्यामुळे सहसा या मार्गाचा वापर केला जात नाही. तसेही हा मार्ग कटकटीचा व इजा पोचवणारा असतो.

D. सांध्यामध्ये दिलेले इंजेक्शन
काही प्रकारच्या संधिदाहांत स्टिरॉइड्सचे इंजेक्शन हे विशिष्ट सांध्यांमध्ये देता येते.

E. लिम्फ ग्रंथींमध्ये
काही ऑटोइम्यून आजारांमध्ये इथे इंजेक्शनद्वारा मूळ पेशी देण्यात येतात.

F. हाडाच्या गाभ्यात इंजेक्शन: आणीबाणीच्या परिस्थितीत, विशेषतः लहान मुलांमध्ये जेव्हा नीलारक्तवाहिनी इंजेक्शनसाठी सापडू शकत नाही तेव्हा या मार्गाचा अवलंब करता येतो.

G. अन्य मार्ग : उदरपोकळी तसेच फुप्फुसे आणि त्यांच्या आवरणांच्या मधल्या पोकळीत थेट औषध देता येते.

H. विविध स्थानिक मार्ग : डोळे, कान, योनी, गुदद्वार आणि त्वचा
या अवयवांच्या सौम्य आजारांत काही औषधे थेंब किंवा मलम स्वरुपात दिली जातात. डोळ्यांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेपूर्वी डोळ्यामध्ये स्थानिक भूल देणारे थेंब आता नित्यनेमाने वापरले जातात.
त्वचेवर लावायची औषधे तेल, मलम आणि औषधी पापुद्रा या स्वरुपात असतात. अलीकडे काही वेदनाशामक औषधे अशा पापुद्र्याच्या स्वरूपात मिळतात, जो त्वचेवरची लावून ठेवता येतो. त्यातून औषध हळू गतीने दीर्घकाळ बाहेर पडत राहते.

I. शरीराच्या एखाद्या भागाची छोटी शस्रक्रिया करताना स्थानिक भूलकारक औषध इंजेक्शन किंवा फवाऱ्याच्या स्वरुपात दिले जाते.

J. योनीमार्गे गर्भाशयात बसवलेली गर्भनिरोधक साधने : या साधनांद्वारा काही प्रकारची गर्भनिरोधक औषधे तिथे दीर्घकाळ साठवून ठेवली जातात. 1980- 90 च्या दशकात ‘तांबी’ (Copper T) हे खूप वापरात होते. अलीकडे अशा साधनांमध्ये प्रोजेस्टेरॉनशी संबंधित रसायने वापरलेली असतात.
........................................................

औषध आणि दवाखाना - अगदी नकोनकोसे वाटणारे शब्द ! पण करता काय ? जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येकाला कधी ना कधी कुठले तरी औषध घ्यायची वेळ येतेच. आधुनिक वैद्यकानुसार औषधे घेण्याचे तब्बल २३ मार्ग/ प्रकार आपण या लेखद्वयात पाहिले. अर्थात हा आकडा अंतिम समजू नये ! सामान्यज्ञानाच्या मर्यादेत एवढे पुरे म्हणून विवेचन थांबवले आहे. काही औषधे गोळी/ फवारा/ इंजेक्शन या सर्व स्वरूपात उपलब्ध असतात (उदा. स्टिरॉइड्स). पण काही औषधे त्यांच्या शोधापासून आजतागायत इंजेक्शन स्वरूपातच उपयुक्त ठरली आहेत. (उदाहरणार्थ इन्सुलिन). अर्थात त्यामागे जैवरासायनिक कारणे आहेत. अशी औषधे गोळीरूपात आणण्याचे संशोधकांचे आटोकाट प्रयत्न अनेक दशकांपासून चालू आहेत. त्याला भविष्यात यश येवो.

आपल्या वाचकांपैकी......
• जे तरुण आहेत त्यांना कुठलाही दीर्घकालीन आजार मागे न लागो ही इच्छा;

• जे मध्यमवयीन आहेत त्यांच्यातील काहींना कुठला तरी आजार झालेला असू शकेल. त्याचे उपचार मोजक्या गोळ्या /फवाऱ्यापुरते मर्यादित राहोत ही सदिच्छा;
आणि

• ज्यांच्यावर दीर्घकालीन इंजेक्शनरुपी औषध घेण्याची वेळ आलेली आहे, त्यांना ते सहन करण्याची ताकद मिळो ही प्रार्थना.
.................................................................
समाप्त
चित्रे जालावरून साभार !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती मिळाली!

मला गेली 15-16 वर्षे सर्दीचा त्रास वारंवार होत असतो. त्यासाठी मी आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा antihistamine गोळी अगदी कमी mg ची घेते. डॉ नी over the counter मिळणारा फवारा पण कधीतरी वापरते. पण बरेचदा गोळ्याच घेतल्या जातात. वरील माहितीवरून मला असे समजले आहे की मी regular basis वर फवारा वापरायला हवा. हे बरोबर आहे का?

अजून एक शंका. वारंवार होणाऱ्या सर्दी/शिंका मुळे 12-13 वर्षांपूर्वी allergy टेस्टस केल्या होत्या पण allergy चे नक्की कारण सापडले नाही. Non-allergic rhninacittes असे डॉ म्हणाले होते. जर सर्दी नॉन allergic आहे तरी अँटी हिस्टमईन कसे काय काम करतात?

धन्यवाद डॉक्टर!

वत्सला धन्यवाद.
सर्दी हा तसा कटकटीचा विषय आहे. बऱ्याचदा एलर्जीसाठी विविध चाचण्या करून सुद्धा फारसे काही हाती लागत नाही. किंवा लागलेच तरी वातावरणातील किती गोष्टींपासून आपल्या नाकाचे संरक्षण करणार असा प्रश्न उद्भवतो.

Antihista या प्रकारच्या औषधांच्या वापराबाबत तज्ञांमध्ये मतभेद आहेत. फवारा नियमीत घ्यायचा का नाही हे मात्र तुमच्या डॉक्टरांना विचारूनच ठरवावे. पोटातील औषधांपेक्षा नाकातील फवारे काही अंशी बरे असे सर्वसाधारण मत असते.

सर्दीसाठी अन्य उपचार पद्धती सुद्धा वापरून पाहायला हरकत नाही.

हा भागही छान झाला आहे. चित्रात २ इन्हेलरस दाखवले आहेत त्यापैकी अधिक चांगला कुठला असतो ?

धन्यवाद.
चित्रात २ इन्हेलरस दाखवले आहेत त्यापैकी अधिक चांगला

पहिला जो इन्हेलर आहे त्याच्या यंत्रणेनुसार प्रत्येक वापराच्या वेळी सूक्ष्म वायू पर्यावरणात मिसळतो. त्यापैकी काही वायू पर्यावरणाची हानी करणारे असतात. म्हणून दुसऱ्या प्रकारचा (पावडरवाला) इन्हेलर विकसित करण्यात आला.

तसेच पहिल्या प्रकारात रुग्णाला औषधाची कडवट चव जिभेवर जाणवते. पण पावडरवाल्या प्रकारात ती बऱ्याच वेळा जाणवत नाही.

दम्यावर उपचाराच्या दृष्टीने दोघेही सारखेच उपयुक्त असतात.