औषधांचा शरीर-प्रवेश (१)

Submitted by कुमार१ on 3 May, 2022 - 21:56

निसर्ग आपल्याला जन्मताच एक अमूल्य शरीर देतो. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हे शरीर कधी ना कधी कुठल्या तरी रोगाची शिकार बनते. रोग म्हटला की उपचार करणे आले. उपचारांमध्ये घरगुती उपायांपासून अनेक प्रकारच्या औषधांचा समावेश होतो. आधुनिक वैद्यकात रुग्णास औषध देण्याचे अनेक मार्ग(routes)आहेत. त्यातले सर्वपरिचित मार्ग म्हणजे :

औषध तोंडाने घेणे, औषधाचा वाफारा नाका/तोंडाद्वारे घेणे, स्नायू अथवा रक्तवाहिनीतून इंजेक्शन्स घेणे आणि त्वचेवर मलम लावणे.
पण शरीरात औषध पोचवण्याचे याव्यतिरिक्तही अनेक मार्ग आहेत. वरील चार परिचित प्रकारांचेही अनेक उपप्रकार आहेत. या सर्वांचा सोदाहरण आढावा या लेखद्वयात घ्यायचा आहे. काही ठराविक औषधे शरीराच्या एखाद्याच छोट्या भागात काम करण्यापुरती वापरली जातात. उदाहरणार्थ, डोळ्यात टाकायचे थेंब. परंतु बरीच औषधे शरीरात गेल्यानंतर रक्तप्रवाहाद्वारे संपूर्ण शरीरभर पसरतात. अशा औषध-प्रवासाचा विस्तृत आढावा आता घेतो.

तोंडाद्वारे घेतलेली औषधे
अशी औषधे गोळी, कॅप्सूल, चुरा किंवा द्रव स्वरूपात असतात. तोंडाद्वारे घ्यायच्या मार्गात दोन पद्धती आहेत :
1. औषध जिभेवर ठेवून गिळणे
2. औषध जिभेखाली ठेवून विरघळवू देणे
हे दोन्ही मार्ग जरी एकाच पोकळीत जवळपास असले तरी त्यांच्याद्वारे होणाऱ्या परिणामांमध्ये लक्षणीय फरक आहे ! तो आता समजून घेऊ.

१. जे औषध जिभेवर ठेवून पाण्याच्या मदतीने गिळले जाते त्याचा पुढील प्रवास संपूर्ण पचनसंस्थेतून होतो. बहुतेक औषधांचे सर्वाधिक शोषण लहान आतड्याद्वारा होते. असे शोषण झाल्यानंतर ते पचनसंस्थेच्या स्थानिक रक्तप्रवाहात (portal) जाते. तिथून पुढे यकृतात आणि पुढे मजल दरमजल करीत शरीराच्या मुख्य रक्तप्रवाहात (systemic)पोचते. तोंडातून अशा प्रकारे घेतलेल्या औषधाच्या शोषणावर पचनसंस्थेतील अनेक घटकांचा परिणाम होतो. जसे की, आहाराचे स्वरूप, विविध हॉर्मोन्स व चेतातंतूंचे परिणाम, पचनाचे आजार, इत्यादी. तसेच एखादे औषध हे गोळी, कॅप्सूल की द्रव स्वरूपात आहे यावरही त्याचे शोषण अवलंबून असते.

capsule.jpgकॅप्सूलचे विशिष्ट फायदे :
कॅप्सूल म्हणजे जिलेटिनचे एक कवच असते. त्याच्यात औषध व पूरक रसायने एकत्र घातलेली असतात. आपण कॅप्सूल गिळल्यानंतर ती पचनमार्गात ओली होऊन फुगते आणि मग त्यातले औषध बाहेर पडते. कॅप्सूलमधील औषध द्रव स्वरूपात असल्यास त्याचे शोषण तुलनेने लवकर होते. काही औषधे सामान्य गोळीच्या स्वरूपात थेट जठरात जाणे इष्ट नसते. तिथल्या तीव्र आम्लतेमुळे त्यांचा नाश होऊ शकतो. म्हणून ती कॅप्सूलमध्ये भरून पुन्हा तिच्यावर एक विशिष्ट प्रकारचे वेस्टण चढवले जाते. हे वेस्टण आम्लतारोधक असते. अशी कॅप्सूल जेव्हा जठरात येते तेव्हा तिथल्या आम्लतेचा तिच्यावर परिणाम होत नाही आणि ती मूळ स्वरूपात लहान आतड्यात पोचते. तेथील कमी आम्लता असलेल्या वातावरणात वेस्टण विरघळते आणि मग औषध बाहेर पडते. या प्रकारच्या वेस्टणाला enteric coating असे म्हणतात.

जठरातील अन्न आणि तोंडाने घेतलेल्या औषधाचे शोषण हे दोन्ही घटक एकमेकांशी चांगलेच निगडीत आहेत. औषधाच्या रासायनिक स्वरूपानुसार ते उपाशीपोटी, मुख्य जेवणापूर्वी का जेवणानंतर लगेच घ्यायचे, याचे नियम ठरलेले असतात. बहुतेक रसायनयुक्त औषधे जठराच्या आतील आवरणाचा दाह करणारी असल्यामुळे ती जेवणानंतर घेणे इष्ट असते. मात्र, ज्या औषधांचे शोषण अन्नामुळे बरेच कमी होते अशी औषधे निक्षून सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी घ्यावी लागतात; याचे सध्याचे बहुपरिचित उदाहरण म्हणजे थायरोक्सिनची गोळी. रेचक प्रकारची औषधे रात्रीच्या जेवणानंतर झोपण्यापूर्वी घ्यावी लागतात.

२. औषध जिभेखाली ठेवणे : तोंडातील अन्य भागांशी तुलना करता जिभेखालच्या भागातील म्युकस आवरण विशिष्ट प्रकारचे आहे. त्यामुळे इथे ठेवलेल्या औषधाचे शोषण तुलनेने चांगले व सहज होते. या भागातला रक्तपुरवठाही भरपूर असतो. इथल्या औषधाचे शोषण झाल्यावर ते लगेचच शरीराच्या मुख्य रक्तप्रवाहात जाते. त्यामुळे वरील १ मध्ये असलेला संपूर्ण पचनसंस्था आणि यकृत हा लांबचा प्रवास पूर्णपणे वाचतो. अशा प्रकारे घेतलेल्या औषधाचा परिणाम त्वरित आणि अधिक प्रमाणात दिसून येतो. जी औषधे तोंडाने गिळून घेतली असता जठरात गेल्यावर त्यांचा नाश होण्याची शक्यता असते, अशी औषधे या प्रकारे देता येतात. तसेच गिळण्याच्या व पचनसंस्थेच्या आजारांमध्ये या औषधमार्गाचा उपयोग केला जातो.

अर्थात या औषधमार्गाची एक मर्यादाही आहे. इथे औषधाच्या शोषणासाठी उपलब्ध असलेली जागा अत्यंत कमी आहे. त्यामुळे शक्तिमान (potent) प्रकारचीच औषधे इथून देणे सयुक्तिक ठरते. तसेच जिभेखाली ठेवलेले औषध पूर्ण विरघळून जाईपर्यंत संबंधित रुग्णाने बोलणे, पाणी पिणे आणि गिळणे या सर्व क्रिया निक्षून टाळायच्या असतात. तसे न केल्यास औषधाचा काही भाग अन्ननलिकेतून पुढे जठरात जाईल आणि मग या प्रकारे औषध देण्याच्या प्रकारालाच बाधा पोचेल. या प्रकारे दिलेल्या औषधाचे बहुपरिचित उदाहरण म्हणजे nitroglycerin. हृदयविकारातील अंजायना या स्थितीमध्ये हे औषध रुग्ण स्वतःच पटकन जिभेखाली ठेवू शकतो.

गुदद्वारातून दिलेली औषधे
बद्धकोष्ठतेसाठी देण्यात येणारा ‘एनिमा’ सर्वपरिचित आहे. या प्रसंगात संबंधित औषध हे फक्त स्थानिक काम करते. मात्र काही प्रसंगी या मार्गाने दिलेले औषध रक्तप्रवाहात शोषले जाऊन सर्व शरीरभर पोचू शकते. या मार्गातून औषध देणे अर्थातच सुखावह प्रकार नाही ! त्यामुळे काही विशिष्ट परिस्थितीतच त्याचा अवलंब केला जातो, जसे की :
• रुग्णास प्रचंड उलट्या होत असताना किंवा गिळण्याचे त्रास असताना
• बेशुद्धावस्थेतील रुग्ण
• लहान मुलांमध्ये एखादे कडूजहर औषध देण्यासाठी
Lidocaine हे या प्रकारातील एक उदाहरण. ते भूलकारक असून हृदयतालबिघाडही दुरुस्त करते.
………….
इंजेक्शनद्वारा दिलेली औषधे

injection (2).jpg

इंजेक्शन हा मुळातच लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाच नकोसा वाटणारा प्रकार ! त्याची कमी-अधिक भीती प्रत्येकाच्या मनात असते. इंजेक्शनचे नाव काढताच भोकाड पसरणारी मुले हे तर सार्वत्रिक दृश्य. परंतु, एरवी व्रात्य मुलांना इंजेक्शनवाल्या डॉक्टरांची भीती दाखवणारे पालक, जेव्हा स्वतःवर इंजेक्शन घ्यायची वेळ येते तेव्हा त्यांची अवस्था थोडीफार लहान मुलासारखीच झालेली असते. Happy

या प्रकारात त्वचेतून सुई टोचून औषध शरीरात सोडले जाते. खालील परिस्थितीत या मार्गे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो:
१. काही औषधे पचनसंस्थेद्वारे शोषली जाऊ शकत नाहीत. तर अन्य काही (उदा. इन्सुलिन) पचनसंस्थेतच नाश पावतात.
२. बेशुद्धावस्थेतील रुग्ण
३. जेव्हा औषधाचा परिणाम तातडीने होण्याची गरज असते तेव्हा.

या प्रकारे औषध देण्याचे ३ उपप्रकार आहेत :
१. सामान्य इंजेक्शन : जेव्हा औषध द्रव स्वरूपात लहान प्रमाणात द्यायचे असते तेव्हा ते सिरींजमध्ये भरून सुईद्वारा टोचले जाते.
२. इन्फ्युजन : जेव्हा द्रव औषध मोठ्या प्रमाणात द्यायचे असते तेव्हा ते रक्तवाहिनीतून हळूहळू सोडले जाते.
३. इम्प्लांट : यात एखादे औषध त्वचेवर छेद घेऊन तिच्याखाली ठेवले जाते.

सामान्य इंजेक्शन : हा प्रकार तिघांमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा असल्याने त्याबद्दल सविस्तर पाहू. सामान्य इंजेक्शन शरीरात ४ प्रकारे देता येते :

१.स्नायूंमध्ये.
२. रक्तवाहिनीत
३. त्वचेखालच्या निकटच्या भागात
४. त्वचेमध्येच

*
१. स्नायूंमध्ये (IM) :
IM inject.jpg

हा प्रकार खूप औषधांच्या बाबतीत वापरला जात असल्याने सर्वपरिचित आहे. आपल्यातील प्रत्येकाने कधी ना कधी या प्रकारचे इंजेक्शन घेतलेले असते. अलीकडील उदाहरण म्हणजे कोविडची लस. या प्रकारे इंजेक्शन देताना शरीरातील तीन जागा गरजेनुसार निवडता येतात :

अ) दंडाची बाहेरील बाजू : इथे २ ml पर्यंत द्रव टोचता येतो. इथून टोचलेल्या औषधाच्या शोषणाची गती चांगली असते.
आ) खुब्यावर : इथे ८ ml पर्यंतचा द्रव टोचता येतो. मात्र येथून होणारी शोषणाची गती वरील १ पेक्षा कमी असते.
इ) मांडीची बाहेरील बाजू : इथे ५ ml पर्यंत द्रव टोचता येतो. ही जागा लहान मुलांमध्ये निवडली जाते.

स्नायूमध्ये टोचलेले औषध हळूहळू झिरपत रक्तप्रवाहात पोचते. जी औषधे स्नायूदाह करणारी असतात ती या प्रकारे देता येत नाहीत; ती थेट रक्तवाहिनीतच द्यावी लागतात.

२. रक्तवाहिनीतून दिलेले इंजेक्शन (IV):
याप्रकारे दिलेले औषध थेट रक्तप्रवाहात जात असल्याने त्याची पूर्ण मात्रा शरीरासाठी उपलब्ध होते.
सर्वसाधारणपणे या प्रकारचे इंजेक्शन नीलावाहिन्यांमधून (veins) देतात. या वाहिन्या त्वचेखालोखाल असतात आणि त्या त्वचेवरून सहज दिसतात. बहुतेक वेळा कोपर किंवा मनगटाच्या पुढील बाजूच्या नीलांची निवड केली जाते.
या इंजेक्शनचे दोन प्रकार आहेत :

a. एका दमात दिलेले इंजेक्शन : यात सिरींजमध्ये द्रव भरून तो रक्तवाहिनीत वेगाने सोडला जातो. अशा प्रकारे जास्तीत जास्त १० ml द्रव देता येतो. रक्तात शिरलेले औषध आधी हृदय, मग फुफ्फुसे आणि मग रोहिणी वाहिन्यांद्वारा सर्व शरीरात पोचते. अशा औषधी इंजेक्शनचा परिणाम सुमारे 20 ते 40 सेकंदात दिसतो. अशा इंजेक्शनचे एक उदा. म्हणजे Calcium gluconate.

b. हळू दिलेले इन्फ्युजन : जेव्हा एखादे औषध मोठ्या प्रमाणात बऱ्याच वेळासाठी द्यायचे असते तेव्हा या पद्धतीचा वापर केला जातो. यात मूळ औषध एखाद्या सलाईनच्या बाटलीमध्ये मिसळले जाते. आणि मग हे मिश्रण थेंब थेंब स्वरूपात रक्तात सोडले जाते. रुग्णालयात दाखल झालेल्या विविध प्रकारच्या रुग्णांच्या बाबतीत अशा प्रकारे औषधे दिली जातात.

c. रोहिणीवाहिन्यांतून (arteries) दिलेले इंजेक्शन (IA):
याचा वापर अत्यंत मर्यादित असून काही ठराविक आजारांतच केला जातो. अशा प्रकारे दिलेले औषध फक्त निवडक पेशींपुरते काम करते. उदाहरणार्थ, एखाद्या कर्करोगाची गाठ. अशा प्रकारे इंजेक्शन दिल्याने त्याचा जास्तीत जास्त परिणाम संबंधित गाठीवर होतो आणि संपूर्ण शरीरावर होणारे दुष्परिणाम कमीत कमी राहतात. तसेच विशिष्ट रोहिणीमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यासही या प्रकारे इंजेक्शन देतात.

३. त्वचेच्या खालच्या निकटच्या मेदथरात (SC):
अशी इंजेक्शन्स सहसा दंड/मांडीच्या बाहेरील बाजूस किंवा पोटावर देतात. स्नायूमध्ये दिलेल्या इंजेक्शनपेक्षा यात कमी प्रमाणात औषध टोचता येते. त्या औषधाचे शोषण स्नायूपेक्षा कमी गतीने परंतु तोंडाने घेतलेल्या औषधापेक्षा जास्त गतीने होते. या प्रकारात ३ उपप्रकार असून त्यांची उदाहरणे अशी आहेत :
a. एका दमात दिलेले इंजेक्शन: इन्सुलिनचा एक डोस किंवा रक्तगुठळ्यांच्या उपचारासाठी दिलेले हेपारिन ही त्याची परिचित उदाहरणे.
b. इन्फ्युजन : सध्या विविध प्रकारचे इन्शुलिन पंप उपलब्ध आहेत. त्यातून गरजेनुसार इन्शुलिन शरीरात सोडले जाते.
c. इम्प्लांट : यात त्वचेवर छोटीशी शस्त्रक्रिया करून औषध आत छोट्या वडीच्या स्वरूपात ठेवले जाते. गर्भनिरोधक हॉर्मोन्स हे याचे उत्तम उदाहरण आहे. अशा वडीतून संबंधित औषध सुमारे 3 ते 5 वर्षे हळूहळू शरीरात सोडले जाते.

४. त्वचेमध्ये दिलेले इंजेक्शन (ID) :
साधारणपणे ते हाताच्या कोपर ते मनगट या पट्ट्यातील पुढच्या बाजूस दिले जाते. अशा प्रकारे दिलेले औषध रक्तप्रवाहात जवळजवळ शोषले जात नाही. याची ठळक उदाहरणे :
a. काही रोगांसाठी लसीकरण
b. रोगनिदान चाचण्यांसाठी टोचलेला द्रव.
….
पारंपरिक इंजेक्शन पद्धतीत सिरींजमध्ये औषध भरले जाते आणि तिला जोडलेल्या सुईमार्फत शरीरात सोडले जाते. यामध्ये रुग्णाला सुई टोचणे हा भाग वेदनादायी असतो. त्या दृष्टीने सुईविरहित इंजेक्शन ही संकल्पना गेल्या दशकात मांडली गेली. त्यावर अव्याहत संशोधन चालू आहे. या तंत्रज्ञानात विशिष्ट औषध खालील प्रकारे त्वचेतून आत वेगाने सोडले जाते :
• धक्का लहरींचा वापर
• वायुदाबाचा वापर
• सूक्ष्म वीजवापर
• लेझर तंत्र

या नव्या पद्धतीचे फायदे आणि तोटे दोन्ही लक्षात घ्यावे लागतील.
• फायदा : काही औषधे मुळातच घट्ट व चिकट स्वरूपाची असतात. ती पारंपरिक इंजेक्शनने देता येत नाहीत. ती देणे आता शक्य होईल.
• तोटा : औषध त्वचेखाली सोडण्यासाठी उच्च दाबाचा वापर केला जातो. त्यातून त्वचेखालील थरांना इजा होऊ शकते.
एक महत्त्वाचे : या नव्या तंत्राने रक्तवाहिनीतून इंजेक्शन देता येत नाही. इंजेक्शनचे बाकी वर वर्णन केलेले इतर मार्ग या प्रकारे हाताळता येतील.
....

आतापर्यंत आपण पचनसंस्थेद्वारा आणि विविध इंजेक्शन्सच्या स्वरूपात देण्यात येणाऱ्या औषधमार्गांचा आढावा घेतला. बहुसंख्य रोगोपचारांत हे दोन मार्ग प्रामुख्याने वापरले जातात. याव्यतिरिक्त औषध देण्याचे जे अन्य शरीरमार्ग आहेत त्यांचे विवेचन पुढील भागात करेन.
...................................................
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख आणि माहितीपूर्ण.

<< IV मधून एका दमात दिलेले इंजेक्शन : >>
याचे अजून एक उदाहरण म्हणजे अनेस्थेशियाचे इंजेक्शन. मी अक्षरशः ५-७ सेकंदात झोपी गेलो.

त्यावरून नंतर सुचले की एखाद्याला देहांत शिक्षा द्यायला ही पद्धत अगदी सुयोग्य आहे. अगदी झटपट आणि शांत मरण येण्यासाठी.

छान माहिती.
सामान्यज्ञान (आणि कॉमनसेन्स) म्हणून यातलं काही ना काही माहिती असतंच. पण त्याचं एकत्र संकलन आवडलं.

सर्व प्रतिसादकांचे आभार !
...
त्यावरून नंतर सुचले की एखाद्याला देहांत शिक्षा द्यायला ही पद्धत अगदी सुयोग्य आहे. अगदी झटपट आणि शांत मरण
>> +१
खरंय. पण अजून याचा कायदेशीर पातळीवर का विचार होत नाही याची कल्पना नाही.
...
त्याचं एकत्र संकलन आवडलं. >> +१
दुसऱ्या भागातील माहिती अधिक रोचक असेल.

आरोग्यलेखन आवडीने वाचणाऱ्या वरील सर्व नियमित वाचकांचे आभार !

विषय तसा परिचित आहे.
फक्त काही बारकावे समजून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.

छान माहिती देत आहात डॉक्टर.
सर्वात डेंजर प्रकार म्हणजे पोटावर दिली जाणारी इन्शुलिनसारखे किंवा अ‍ॅन्टीरेबिजची इन्जेक्शने कोणत्या प्रकारात मोडतात?

+१ . धन्यवाद.

आर्या
तुम्ही म्हणताय ती अ‍ॅन्टीरेबिजची पोटावरची 14 इंजेक्शन्स प्रकार आता खूप जुना झाला !

आता अलीकडील २ प्रकार म्हणजे :
१. त्वचेमध्ये देणे (ID) : डब्ल्यूएचओनुसार
२. स्नायूंमध्ये देण्याचा पर्याय (IM) सुद्धा उपलब्ध आहे.
देशानुसार यातील एक पर्याय निवडला जातो.
…..
इन्सुलिन >>> यात डेंजर काही नाही !
तुमची नजरचूक झाली असावी.

<< तुम्ही म्हणताय ती अ‍ॅन्टीरेबिजची पोटावरची 14 इंजेक्शन्स प्रकार आता खूप जुना झाला !<< हो हे माहित आहे. आता बराच सुसह्य झालाय हा प्रकार.

<<इन्सुलिन >>> यात डेंजर काही नाही !
तुमची नजरचूक झाली असावी.<<

डेंजर या अर्थाने की, नाभीच्या अवतिभवती किंवा पोटासारख्या नाजुक भागावर घ्यावी लागतात... या कल्पनेनेच घाम फुटतो हो. Lol

चांगली माहिती. महत्त्वाची आणि सोप्या शब्दांत.
थोडे प्रश्न आहेत,
रक्तवाहिनीतून इंजेक्शन देताना ---
** सुई शिरेत घुसवताना 'आऊट होतेय' म्हणतात नर्स, ते काय असते नेमके?
** शीर सापडत नसेल तर पाणी प्यायला सांगून थांबतात थोडा वेळ, त्याने काय होते?
** मनगटाकडे शीर सापडत नसेल किंवा सुई जाताना खूप अडथळा येत असेल, तर कोपराकडे ( तपासणीचे रक्त काढतात तिथून ) टोचा असे सुचवले तर नर्स म्हणाल्या --- लगेच नको, इथे प्रयत्न करू. त्या जागी शीर डॅमेज झाली तर पुन्हा वापरता येणार नाही. हे काय असते?
शरीरभर नीला असतात तर मोजक्या जागीच का वापरतात?
** स्तनांच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झालेली असल्यास त्या बाजूच्या शिरेने आयव्ही देणे वर्ज्य का असते?

कारवी धन्यवाद.
एक एक प्रश्न घेऊ.
१. सुई शिरेत घुसवताना 'आऊट होतेय' म्हणतात >>
समजा, सुई शिरेत गेली आणि ती शिर आरपार छेदून बाजूच्या टिशू मध्ये पोचली , तर आपण इंजेक्शनने दिलेले औषध रक्तात न जाता आजूबाजूच्या टिशू मध्ये जाऊन पोचेल आणि तिथे सूज येईल आणि औषधाने इजा सुद्धा होऊ शकेल.
' नीडल आऊट ऑफ द व्हेन' हा त्याचा अर्थ.
....
२. शीर सापडत नसेल तर पाणी प्यायला सांगून थांबतात थोडा वेळ,
>>>
हे मी तरी नाही ऐकलेले. त्यामागे कुठला वैद्यकीय तर्क मला दिसत नाही.
नीला सापडत नसेल तर दंडावर आवळपट्टी बांधणे वगैरे उपाय आहेत.

शरीरभर नीला असतात तर मोजक्या जागीच का वापरतात?
>> चांगला प्रश्न.
१. आपल्याला जर फक्त एका दमातलेच इंजेक्शन द्यायचे असेल तर आपण शरीरावरील कुठल्या ठिकाणची नीला वापरतो याला तसे महत्त्व नाही. तरीसुद्धा रुग्णाची आणि आपली सोय बघता कोपर आणि मनगटाच्या अनुक्रमे पुढच्या व मागच्या बाजू सुयोग्य ठरतात. कोपराच्या इथे मागून चांगल्यापैकी सांध्याचा आधारही मिळतो. दंडावर आवळपट्टी बांधणे खूप सोयीचे आणि प्रभावी.

२. समजा, इन्फ्युजन द्यायचे आहे (विशेषता रुग्णालयात भरती झालेल्याच्याबाबतीत). तेव्हा नीलेची जागा निवडताना एक मूलभूत नियम असतो. तो म्हणजे पहिले इन्फ्युजन देताना नेहमी हृदयापासूनची सर्वात लांब असलेली(distal) जागा आधी निवडा. कालांतराने अधिक इन्फ्युजनस जशी द्यावी लागतील तसे तसे वर सरकत (proximal) जायचे असते.

म्हणजेच : आधी नेहमी मनगट, कालांतराने कोपर या क्रमाने .

आता यामागे कारण असे आहे :
दीर्घकाळ जेव्हा इन्फ्युजन चालू राहते तेव्हा रक्तप्रवाहात काही वेळेस गुठळी निर्माण होण्याचा धोका असतो. जर का आपण सुरुवातीलाच शरीराच्या टोकाची वाहिनी न निवडता मध्यावरची निवडली तर वरच्या पातळीवर रक्तप्रवाहात ब्लॉक होऊन बसेल आणि मग वांदा होईल !
याउलट आधी टोकाच्या रक्तवाहिनीकडे ब्लॉक झाला तर पुढच्या वेळेस तुम्हाला वरच्या दिशेने (proximally) सरकत जाणे सोपे जाते.

- अवांतर -
एखाद्याला देहांत शिक्षा द्यायला ही पद्धत अगदी सुयोग्य आहे. अगदी झटपट आणि शांत मरण येण्यासाठी.>>> मुळीच नाही, उलट सध्या अस्तित्वात असलेलीच पद्धत अति-प्रेमळ आहे असे माझे मत आहे, म्हणजे बलात्कार, दरोडा, खून असे गंभीर आणि क्रूर गुन्हे करणाऱ्यांना गुन्हेगारांना खरेतर हालहाल करून मारून टाकण्याची पद्धत पाहिजे.

ज्याला स्वतःहून 'दयामरण' हवे आहे (जे भारतात कायदेशीर नाही) त्यांना अशीच पद्धत वापरली जाते.

वि मु
मुद्दा समजला, या अवांतरवर कोणाला अधिक चर्चा करायची असल्यास इथे नको ही विनंती.
खून, फाशी इत्यादी चर्चा खालील धाग्यावर बऱ्यापैकी चालू आहेत :
खुनी डॉक्टर व तारणहार आडनावबंधू (https://www.maayboli.com/node/81475)

तिथे केल्यास बरे पडेल

देहांताची शिक्षा या अवांतरवर कोणाला अधिक चर्चा करायची असल्यास इथे नको ही पुन्हा विनंती.

धाग्याच्या विषयाशी संबंधित चांगले प्रश्न आले असून चर्चा चालू आहे.

कुठल्या परिस्थितीत गोळ्या द्यायच्या किंवा इंजेशन द्यायचे याचे काही निकष आहेत का? की ते पेशंटच्या मर्जीनुसार दिले जाते? आता इंजेक्शनच्या सुया अतिशय सूक्ष्म असतात आणि त्या फारशा टोचत नाहीत, तरी निव्वळ भीतीमुळे पेशंट ते टाळतात का?
अवांतर: एका वर्षी फ्लूसाठी नाकातून घेण्याचा फवारा उपलब्ध होता, म्हणून घेतला होता. तो अनुभव इतका भयंकर होता की तेव्हापासून मी ५ सेकंदात इंजेक्शन घेणे पसंत करतो.

कारवी
३. स्तनांच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झालेली असल्यास त्या बाजूच्या शिरेने आयव्ही देणे वर्ज्य का असते?
>>>

हे कोणी अधिकृत व्यक्तीने सांगितले आहे का, किंवा संदर्भ आहे का ?
मला तरी यामागे काही तर्क दिसत नाही. मी माझ्या सर्जन मित्राशी फोनवर चर्चा केली.
तोही म्हणाला की यात काही तथ्य नाही.

* कुठल्या परिस्थितीत गोळ्या द्यायच्या किंवा इंजेशन द्यायचे याचे काही निकष आहेत का?
>>>
इंजेक्शन देण्यामागची मूलभूत कारणे लेखात दिलेली आहेत.

काही औषधे ही इंजेक्शन स्वरूपातच दिली असता शरीरासाठी उपयुक्त ठरतात.
आता मुद्दा आहे की, जी औषधे दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांच्याबाबत. जेव्हा तातडीचा उपाय/ आणीबाणीची परिस्थिती असते तेव्हा इंजेक्शन आवश्यक.
जेव्हा सौम्य/ मध्यम आजार हा दिवसातून तीन-चार वेळा गोळ्या खाऊन व्यवस्थित नियंत्रणात येणार असतो तेव्हा गोळ्याघेणे हितावह.
समंजस डॉक्टर विनाकारण इंजेक्शन देणार नाही कारण इंजेक्शन देण्यात काही मूलभूत कटकटी अंतर्भूत असतात.

स्नायूत इंजेक्शन देण्याच्या तंत्रात दुर्लक्ष किंवा चूक झाल्यास खालील धोके संभवतात:

रक्तगुठळी होणे, पू होणे, जखमेचा व्रण राहणे व चेतातंतूना इजा.
खुब्यावरील इंजेक्शनच्या बाबतीत sciatic nerve ला इजा संभवते.
यांचे प्रमाण दखल घेण्याइतके असते.

अभिप्राय व सूचनांबद्दल सर्वांचे आभार !

१. या लेखाचा हेतू औषध कोणत्या मार्गांनी शरीरात जाते आणि शेवटी रक्तप्रवाहात कसे पोचते इथपर्यंत सांगणे एवढाच आहे. (Routes of administration). पुढे त्याचा चयापचय आणि मूत्रपिंड आणि अन्य मार्गांनी उत्सर्जन हे या लेखाच्या व्याप्तीबाहेरचे आहे याची नोंद घ्यावी. तो वेगळा विषय होईल.

२. गर्भनिरोधके >> ही त्वचेखाली वडीच्या स्वरूपात ठेवण्याचा उल्लेख या लेखात आलाच आहे. तसेच ती गोळी आणि इंजेक्शन या स्वरूपात उपलब्ध आहेतच. त्यामुळे त्यांच्यावर तपशीलात या लेखात लिहावे का असा पेच पडतो.
Devices अपेक्षित असेल तर त्याचा ओझरता उल्लेख पुढच्या भागात येणार आहे.

( अधिक तपशिलासाठी त्यावर सवडीने स्वतंत्रपणे विचार करेन.)

छान लेख. औषधे जशी घेण्यासाठी डिझाइन केली आहेत, तशी न घेता वेगळ्या प्रकारे घेतली तर त्यांच्या शोषणामध्ये फरक पडेल. त्यावरून काही अपायही होत असतील ना?

उदा:
१. कॅप्सूल आख्खी न गिळता काही जण त्याचे आवरण फोडून आतले औषध बाहेर काढून ते घेतात.
२. (क्रोसिनादी) गोळ्यांना जे कोटिंग असतं, त्याचेही काही प्रयोजन असणार ना? गोळी अर्धी तोडून खाल्ली तर त्याचा तुटलेला भाग हा आतले औषध उघडे पाडतो.

Pages