शोध - एका अदृश्य शहराचा

Submitted by रानभुली on 7 May, 2022 - 10:41

( खूप दिवसांनी. एक अद्भुतरम्य कथा देण्याचा प्रयत्न केला आहे )

आजचा नकार पचवताना कठीण गेलं नाही.
गेली काही वर्षे सातत्याने नकारघंटेने आता सवय झाली होती.

खिडकीतून बाहेर बराच काळ ती ट्रॅफिककडे बघत राहिली. गाड्या इकडून तिकडे धावत होत्या. सिग्नल पोस्ट होता तिथेच होता. जो तो आपापल्या गंतव्य स्थानाकडे धावत होता. प्रत्येकाला ते सापडत होते. त्यांच्या मार्गात त्यांची सोय व्हावी म्हणून तो पोस्ट लाल, हिरवा, पिवळा अशा दिव्यांचं ओझं वागवत निरूद्देशपणे उभा होता. त्याच्या असण्याचं कुणालाच सोयरसुतक नव्हतं.

आपलंही तसंच आहे.
कित्येक संगीतकारांचे उंबरठे झिजवले, स्टुडीओज पालथे घातले. म्युझिक कंपन्यांमधे तास न तास वेटिंग हॉल मधे बसून आलो. पण इथे एक तर ओळख पाहीजे किंवा पैसा पाहीजे. टॅलन्ट सर्वांकडेच असतं. उन्नीस बीसचा फरक असतो. जिंगल्स करून करून किती करणार ? पैसे मिळतात पण नाव नाही ना होत.

बॅण्ड मधे काम केले. अडचणींच्या गावात जाऊन कार्यक्रम केले. पण पुढे काय ?
बॅण्ड च्या मागे लागून दोन तीन व्हिडीओ अल्बम्स बनवले खरे. पण प्रमोशन साठी लागणारा पैसा कुठून आणायचा ? होते नव्हते ते व्हिडीओ अल्बम्स वर खर्च झाले होते. नाईलाजाने कुठे पार्ट टाईम व्हेकेन्सी पाहून मार्केटिंगचे काम करावे लागले. त्यामुळे पुन्हा आर्थिक आधार मिळाला होता. त्यातच महामारीने अजून संकट गहीरं केलं.

आणि आता सगळंच संपलं होतं.
वेळ आली होती निर्णय घ्यायची.

गायिका व्हायचे स्वप्न पाहणे आता सोडून देणे इष्ट याची खूणगाण तिने मनाशी बांधली. आता इथून आपला मुक्काम हलवायला हवा. रूम खाली करायचीय. भाडे द्यायचेय. सर्वांचे राहिलेले हिशेब चुकते करून किती पैसे गाठीला शिल्लक राहतात याचा अंदाज घ्यायचाय.
ती हरली होती !

छे !
गायिका होणं हे तिचं स्वप्न नव्हतं. तिचं स्वप्न, तिचं ध्येय वेगळंच होतं काही. आणि त्यासाठी तिला आधी स्थैर्य हवं होतं. जमवाजमव करायला वेळ हवा होता. तिच्याकडे असणार्‍या कलेच्या जोरावर ती काही काळ तरी गायिका बनू शकली असती. तसे झाले असते तर पैशांची कमतरता भासली नसती. तिला पुरेसे पैसे आले की मग नाहीतरी ती थांबणारच होती.

तिच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे स्वप्न होते ते.

शोध !!
एका रहस्याचा.
एका नात्याचा.
एका अज्ञात अशा वाटेचा..

***********************************************************

पावसाळी रात्र होती.
दारावर अचानक जोराच्या थापा पडल्याने तिला जाग आली. आई उठून बसली होती. बाहेर मुसळधार पाऊस होता. अशा अवेळी कोण असेल ?

पावसाचा जोर वाढेल तशा दारावरच्या थापाही वाढत होत्या.
आतला आवाज बाहेर जात नव्हता. बाहेरचाही आत येत नव्हता. जे कुणी बाहेर होते ते खूपच अस्वस्थ, उतावीळ दिसत होते. पण कोण असेल ?
आईच्या चेहर्‍यावर भीती दाटून आली होती.
कुणाला मदतीसाठी बोलवावे का ?
मघाच पासून टेलिफोन डेड झाला होता. इमर्जनसी लँप केव्हांच मंद झाला होता.
मेणबत्ती पेटण्याची सुतराम शक्यता नव्हती. दारे खिडक्या बंद करूनही थंड वार्‍याची झुळूक कुठून ना कुठून घरात येत होती.

दारावर जोराचे धक्के बसू लागले तशा त्या दोघीही एकमेकींना बिलगल्या.
कडीला हादरे बसत होते. प्रत्येक हादर्‍याला दार आत येई, कोयंड्यात अडकवलेली कडी निघण्याच्या बेतात दिसू लागे. असे खूप वेळ चालले.
आणि एका क्षणी कडी कोयंड्यातून निसटली आणि दरवाजा सताड उघडला.
टॉर्चचा झगझगीत प्रकाश आत आला आणि पाठोपाठ ओळखीचा आवाज आला.
" कधीचा दरवाजा वाजवतोय. दोघीच्या दोघी खुशाल बघताहेत "

बाबांचा आवाज.
तिचा आपल्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वास बसेना.
मग ती आईला सोडून धावत बाबाकडे जाऊन बिलगली.

"बाबा कुठे गेला होतास ? असा का करतोयस ? आम्ही कित्ती घाबरलो होतो "
त्या क्षणी बाबाचा राग कुठल्या कुठे पळाला.
लेकीला उचलून घेत तिचे पटापट पापे घेताना त्याचे डोळे आनंदाने वाहू लागले. खूप दिवसांनी आपले अपत्य आपल्या कुशीत असण्याचे सुख तो अनुभवत होता. जगातले सगळ्यात मोठे सुख !!
लेकीलाही तिचा बाबा खूप दिवसांनी मिळाल्याचा केव्हढा आनंद झाला होता.
आईवर प्रेम होतंच. पण बाबा तिच्यासाठी स्पेशल होता.

आता उद्यापासून काय काय करायचं याची कल्पना करण्यात ती मग्न झाली.

तिकडे बाबा आईला कुजबुजत्या आवाजात काहीतरी सांगत होता. आईने हनुवटीला चार बोटं लावली होती आणि तिचे डोळे विस्फारले होते.
" मग आत्ता ?"
तिच्या त्या मोठ्या आवाजातल्या प्रश्नाने ती भानावर आली.

"माझ्याकडे अज्जिबात वेळ नाही. कोणत्याही क्षणी ते मला गाठतील. त्या आधी मला काही सांगायचंय. खूप महत्वाचं आहे. पण तेव्हढा वेळ नाही"
असं पुटपुटत बाबा आतल्या खोलीत गेला.

टॉर्च खिडकीत ठेवून त्याने डायरी ओढली.
तीत तो अगम्य चित्रांच्या भाषेत काहीतरी खरडू लागला.

अक्षरशः एकच पान भरलं असेल.
बाबा म्हणाला. "मला निघायला हवं "

आई हक्काबक्का होत म्हणाली " असं काय करता ? इतक्या दिवसांनी असं अपरात्री आला आहात. दोन घास गरम गरम खाऊन घ्या. बरं वाटेल "
तिची वेडी आशा होती.

पावसाचा जोर कमी झाला होता.
बाहेर जीपने कच्चकन ब्रेक मारल्याचा आवाज झाला. तसा बाबा बॅग घेऊन बाहेरच्या जिन्याने गच्चीवर पळाला.
जाताना दार लावून घे सांगायला तो विसरला नाही.

दारावर थाप पडली. पाठोपाठ करड्या आवाजातला प्रश्न आला.
" दक्ष प्रजापती ?"
" हो. त्यांचंच घर आहे हे "
" कुठे आहेत ते ?"
बाहेरची व्यक्ती आत आली. खाकी वर्दीतले पोलीस होते.
आई घाबरून गेली होती. गडबडली होती. "
तिच्या तोंडून शब्दच फुटेना.

" आम्हाला माहिती आहे ते इकडेच आले आहेत. कुठे आहेत ?"
आईला अजूनही काही सुचत नव्हते.
" हे पहा, गुन्हेगाराला मदत करणे हा ही गुन्हाच असतो. तुम्ही प्लीज कोऑपरेट करा"
" अहो, पण झालंय काय ? मला काहीच माहिती नाही "
" काय झालंय ? तुम्ही कोण त्यांच्या ?"
" ते माझे पती आहेत. मला प्लीज सांगाल का काय चाललंय हे ?"
" अच्छा, तुम्हाला माहितीच नाही का ? तुमचे मिस्टर देशद्रोही आहेत. आणि त्यांना मदत करणे हा देशद्रोहच आहे. बर्‍या बोलाने त्यांना बाहेर बोलवा"
" पण ते घरात नाहीत "
" अच्छा ! म्हणजे तुम्ही सहकार्य करणार नाहीत तर. ए चला रे सगळं घर धुंडाळा आणि मानगुटीला धरून बाहेर आणा त्याला "

जवळपास सात आठ पोलीस असतील. आणि दोन सिव्हिल ड्रेस मधले अधिकारी असावेत. ते मराठी दिसत नव्हते. पंजाबी वाटत होते.
ते आत गेल्याचे पाहून आई कडे बघता बघताच ती जिन्याकडे पळाली.

आई तिच्या मागे तिला हाक मारत धावली. त्या कृत्याने पोलिसांचे लक्ष वेधून घेतले.

" झिलमिल, थांब ! पळू नकोस "

झिलमिल तीरासारखी गच्चीवर पोहोचली.

" बाबा थांब "

तिचा आर्त टाहो पाऊस थांबल्याने जिन्यावरून घुमत घुमत घरात शिरला. पोलीसांचे कान टवकारले आणि ते ही जिन्याकडे धावत सुटले.

बाबाने एकवार तिच्याकडे पाहीलं.
अवजड बॅग पाठीला लटकवली आणि फक्त तिला ऐकू येईल असं म्हणाला.
" डायरी डायरी . बेटा हुषारीने काम घे. बाय बेटा "

आणि गच्चीवर आलेल्या झाडाच्या एका लवचिक फांदीला बाबाने तारेने खाली ओढले.
मग ती दोनी हातात धरली आणि टाचेने शरीराला हवेत झोका दिला.
फांदी ओढली गेली असल्याने तिच्यात उंच उडीच्या खांबाप्रमाणे बाक येऊन तो सरळ व्हायच्या प्रक्रियेत बाबाला उंच झोका मिळाला आणि तो हवेत उडाला.

पलिकडच्या चाळीच्या कौलावर धडपडल्याचा आवाज आला.
"बाबाला लागलं "
म्हणत झिलमिल रडू लागली.
इतक्यात पोलीसही पोहोचले. त्यांच्या समोर बाबा हवेत उडाला.

ते दृश्य बघताच पोलीसही धावत खाली गेले. कंपाऊंडवरून चढण्यासाठी ड्रम कंपाऊंड लावेपर्यंत कुणीतरी ड्रायव्हरला जीप पलिकडच्या लेन मधे आणण्यासाठी ओरडले.

चाळीच्या मागून बुलेट चालू झाल्याचा आवाज झाला आणि थोड्या वेळाने जीपवर सायरन लावून पाठलाग सुरू झाला.

झिलमिल खाली आली तेव्हां आई मटकन खाली बसली होती.
तिलाही खूप रडू फुटत होते.

" आई, ते आपल्या बाबाला मारून टाकतील का गं "
आणि आईने हंबरडा फोडला !!

******************************************************************************

ती दचकून उठली.
आज पुन्हा ते स्वप्न पडलं होतं. गेली कित्येक वर्षे नियमित पडत होतं.

तेव्हांपासून बाबाचं पत्रही आलं नाही, ना टेलिफोन आला. ना बाबा पुन्हा दिसला
नातेवाईकांनी, मित्रांनी शोध घ्यायचा प्रयत्न केला. पण काहीच उपयोग नव्हता.
आता सगळेच म्हणू लागले होते.
दक्ष प्रजापती या दुनियेत नाहीत.

जे झिलमिलला मान्य नव्हतं.
मोठी झाल्यावर, स्वतःच्या पायावर उभी राहिल्यावर ती आपल्या बाबाचा शोध सुरू करणार होती.
त्याच्यावरचा कलंक पुसून टाकणार होती.

पण कसं तेच माहिती नव्हतं !!!

एकच ते डायरीच पान होतं जे नशीबाने पोलिसांच्या हाती लागलं नव्हतं.
सगळंच तर तिला समजलं नव्हतं.

पण जेव्हढं समजलं होतं त्यावरून हजारो वर्षांपूर्वी गडप झालेल्या एका शहराच्या शोधाशी सगळ्याचा संबंध होता.

****************************

थोडंसंच तर सामान होतं.
ते ही बांधून ठेवताना काहीही सुचत नव्हतं.
बाबाने त्या कोडेड संदेशाच्या वर मराठीत लिहीले होते.
"योग्य वेळेची प्रतिक्षा कर "
अखेर ती वेळ आली होती.

सकाळ होईपर्यंत तिला धीर निघत नव्हता.
दिवा पेटवून ती सरळ थंड पाण्याचा शॉवर घ्यायला गेली.

पुढील भागाकडे जाण्यासाठी कृपया इथे टिचकी मारावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटोतली जागा शँग्रीला किंवा सिद्धाश्रम आहे का ? जे आहे ते सुरेख व अद्भुत आहे.
सुरवात दमदार झाली आहे, पुलेशु. Happy

छान सुरुवात
म्हाळसा +७८६ मलाही जग्गा जासूस आठवला.
लवकर येऊद्या..

धमाकेदार सुरुवात...!
नक्कीच वेगळी कहाणी असणार
सुरुवातीचा फोटो सुंदर आहे..
पुभाप्र..!!

वा, मस्तच. मजा आली वाचताना, उत्सुकता वाढलीय. छान लिहितेयस.
पटपट लिही पुढचे भाग आता Happy
हा जॉनर लिहिणे अवघड असते पण तुला जमलेय, किप इट अप
(जाता जाता राजेंद्र खेर यांच्या बिंदु सरोवरची आठवण झाली.)

सर्वांचे मनापासून आभार. __/\__
अस्मिता - बरोबर आहे. तोच फोटो आहे. Happy
जग्गा जासूस , इंडीयाना जोन्स पाहिलेले नाहीत Happy
सगळे भाग झाल्यावर पाहीन.
अवल - धन्यवाद. Happy
(पहिल्यांदाच ज्या ठिकाणांना भेटी दिलेल्या नाहीत त्याबद्दल लिहीत असल्याने थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. )

राभु, छानच सुरवात . पण मी क्रमशः गोष्टी शक्यतो पूर्ण होत आल्यावर वाचते. कारण काही कारणांनी जर कथालेखक पूर्ण नाही करू शकले तर मला फार चुटपूट लागते. पण तू तसं करणार नाहीस अशी आशा करते. Happy पूर्ण करशील गोष्ट.