औषधांचा शरीर-प्रवेश (१)

Submitted by हेमंतकुमार on 3 May, 2022 - 21:56

निसर्ग आपल्याला जन्मताच एक अमूल्य शरीर देतो. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हे शरीर कधी ना कधी कुठल्या तरी रोगाची शिकार बनते. रोग म्हटला की उपचार करणे आले. उपचारांमध्ये घरगुती उपायांपासून अनेक प्रकारच्या औषधांचा समावेश होतो. आधुनिक वैद्यकात रुग्णास औषध देण्याचे अनेक मार्ग(routes)आहेत. त्यातले सर्वपरिचित मार्ग म्हणजे :

औषध तोंडाने घेणे, औषधाचा वाफारा नाका/तोंडाद्वारे घेणे, स्नायू अथवा रक्तवाहिनीतून इंजेक्शन्स घेणे आणि त्वचेवर मलम लावणे.
पण शरीरात औषध पोचवण्याचे याव्यतिरिक्तही अनेक मार्ग आहेत. वरील चार परिचित प्रकारांचेही अनेक उपप्रकार आहेत. या सर्वांचा सोदाहरण आढावा या लेखद्वयात घ्यायचा आहे. काही ठराविक औषधे शरीराच्या एखाद्याच छोट्या भागात काम करण्यापुरती वापरली जातात. उदाहरणार्थ, डोळ्यात टाकायचे थेंब. परंतु बरीच औषधे शरीरात गेल्यानंतर रक्तप्रवाहाद्वारे संपूर्ण शरीरभर पसरतात. अशा औषध-प्रवासाचा विस्तृत आढावा आता घेतो.

तोंडाद्वारे घेतलेली औषधे
अशी औषधे गोळी, कॅप्सूल, चुरा किंवा द्रव स्वरूपात असतात. तोंडाद्वारे घ्यायच्या मार्गात दोन पद्धती आहेत :
1. औषध जिभेवर ठेवून गिळणे
2. औषध जिभेखाली ठेवून विरघळवू देणे
हे दोन्ही मार्ग जरी एकाच पोकळीत जवळपास असले तरी त्यांच्याद्वारे होणाऱ्या परिणामांमध्ये लक्षणीय फरक आहे ! तो आता समजून घेऊ.

१. जे औषध जिभेवर ठेवून पाण्याच्या मदतीने गिळले जाते त्याचा पुढील प्रवास संपूर्ण पचनसंस्थेतून होतो. बहुतेक औषधांचे सर्वाधिक शोषण लहान आतड्याद्वारा होते. असे शोषण झाल्यानंतर ते पचनसंस्थेच्या स्थानिक रक्तप्रवाहात (portal) जाते. तिथून पुढे यकृतात आणि पुढे मजल दरमजल करीत शरीराच्या मुख्य रक्तप्रवाहात (systemic)पोचते. तोंडातून अशा प्रकारे घेतलेल्या औषधाच्या शोषणावर पचनसंस्थेतील अनेक घटकांचा परिणाम होतो. जसे की, आहाराचे स्वरूप, विविध हॉर्मोन्स व चेतातंतूंचे परिणाम, पचनाचे आजार, इत्यादी. तसेच एखादे औषध हे गोळी, कॅप्सूल की द्रव स्वरूपात आहे यावरही त्याचे शोषण अवलंबून असते.

capsule.jpgकॅप्सूलचे विशिष्ट फायदे :
कॅप्सूल म्हणजे जिलेटिनचे एक कवच असते. त्याच्यात औषध व पूरक रसायने एकत्र घातलेली असतात. आपण कॅप्सूल गिळल्यानंतर ती पचनमार्गात ओली होऊन फुगते आणि मग त्यातले औषध बाहेर पडते. कॅप्सूलमधील औषध द्रव स्वरूपात असल्यास त्याचे शोषण तुलनेने लवकर होते. काही औषधे सामान्य गोळीच्या स्वरूपात थेट जठरात जाणे इष्ट नसते. तिथल्या तीव्र आम्लतेमुळे त्यांचा नाश होऊ शकतो. म्हणून ती कॅप्सूलमध्ये भरून पुन्हा तिच्यावर एक विशिष्ट प्रकारचे वेस्टण चढवले जाते. हे वेस्टण आम्लतारोधक असते. अशी कॅप्सूल जेव्हा जठरात येते तेव्हा तिथल्या आम्लतेचा तिच्यावर परिणाम होत नाही आणि ती मूळ स्वरूपात लहान आतड्यात पोचते. तेथील कमी आम्लता असलेल्या वातावरणात वेस्टण विरघळते आणि मग औषध बाहेर पडते. या प्रकारच्या वेस्टणाला enteric coating असे म्हणतात.

जठरातील अन्न आणि तोंडाने घेतलेल्या औषधाचे शोषण हे दोन्ही घटक एकमेकांशी चांगलेच निगडीत आहेत. औषधाच्या रासायनिक स्वरूपानुसार ते उपाशीपोटी, मुख्य जेवणापूर्वी का जेवणानंतर लगेच घ्यायचे, याचे नियम ठरलेले असतात. बहुतेक रसायनयुक्त औषधे जठराच्या आतील आवरणाचा दाह करणारी असल्यामुळे ती जेवणानंतर घेणे इष्ट असते. मात्र, ज्या औषधांचे शोषण अन्नामुळे बरेच कमी होते अशी औषधे निक्षून सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी घ्यावी लागतात; याचे सध्याचे बहुपरिचित उदाहरण म्हणजे थायरोक्सिनची गोळी. रेचक प्रकारची औषधे रात्रीच्या जेवणानंतर झोपण्यापूर्वी घ्यावी लागतात.

२. औषध जिभेखाली ठेवणे : तोंडातील अन्य भागांशी तुलना करता जिभेखालच्या भागातील म्युकस आवरण विशिष्ट प्रकारचे आहे. त्यामुळे इथे ठेवलेल्या औषधाचे शोषण तुलनेने चांगले व सहज होते. या भागातला रक्तपुरवठाही भरपूर असतो. इथल्या औषधाचे शोषण झाल्यावर ते लगेचच शरीराच्या मुख्य रक्तप्रवाहात जाते. त्यामुळे वरील १ मध्ये असलेला संपूर्ण पचनसंस्था आणि यकृत हा लांबचा प्रवास पूर्णपणे वाचतो. अशा प्रकारे घेतलेल्या औषधाचा परिणाम त्वरित आणि अधिक प्रमाणात दिसून येतो. जी औषधे तोंडाने गिळून घेतली असता जठरात गेल्यावर त्यांचा नाश होण्याची शक्यता असते, अशी औषधे या प्रकारे देता येतात. तसेच गिळण्याच्या व पचनसंस्थेच्या आजारांमध्ये या औषधमार्गाचा उपयोग केला जातो.

अर्थात या औषधमार्गाची एक मर्यादाही आहे. इथे औषधाच्या शोषणासाठी उपलब्ध असलेली जागा अत्यंत कमी आहे. त्यामुळे शक्तिमान (potent) प्रकारचीच औषधे इथून देणे सयुक्तिक ठरते. तसेच जिभेखाली ठेवलेले औषध पूर्ण विरघळून जाईपर्यंत संबंधित रुग्णाने बोलणे, पाणी पिणे आणि गिळणे या सर्व क्रिया निक्षून टाळायच्या असतात. तसे न केल्यास औषधाचा काही भाग अन्ननलिकेतून पुढे जठरात जाईल आणि मग या प्रकारे औषध देण्याच्या प्रकारालाच बाधा पोचेल. या प्रकारे दिलेल्या औषधाचे बहुपरिचित उदाहरण म्हणजे nitroglycerin. हृदयविकारातील अंजायना या स्थितीमध्ये हे औषध रुग्ण स्वतःच पटकन जिभेखाली ठेवू शकतो.

गुदद्वारातून दिलेली औषधे
बद्धकोष्ठतेसाठी देण्यात येणारा ‘एनिमा’ सर्वपरिचित आहे. या प्रसंगात संबंधित औषध हे फक्त स्थानिक काम करते. मात्र काही प्रसंगी या मार्गाने दिलेले औषध रक्तप्रवाहात शोषले जाऊन सर्व शरीरभर पोचू शकते. या मार्गातून औषध देणे अर्थातच सुखावह प्रकार नाही ! त्यामुळे काही विशिष्ट परिस्थितीतच त्याचा अवलंब केला जातो, जसे की :
• रुग्णास प्रचंड उलट्या होत असताना किंवा गिळण्याचे त्रास असताना
• बेशुद्धावस्थेतील रुग्ण
• लहान मुलांमध्ये एखादे कडूजहर औषध देण्यासाठी
Lidocaine हे या प्रकारातील एक उदाहरण. ते भूलकारक असून हृदयतालबिघाडही दुरुस्त करते.
………….
इंजेक्शनद्वारा दिलेली औषधे

injection (2).jpg

इंजेक्शन हा मुळातच लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाच नकोसा वाटणारा प्रकार ! त्याची कमी-अधिक भीती प्रत्येकाच्या मनात असते. इंजेक्शनचे नाव काढताच भोकाड पसरणारी मुले हे तर सार्वत्रिक दृश्य. परंतु, एरवी व्रात्य मुलांना इंजेक्शनवाल्या डॉक्टरांची भीती दाखवणारे पालक, जेव्हा स्वतःवर इंजेक्शन घ्यायची वेळ येते तेव्हा त्यांची अवस्था थोडीफार लहान मुलासारखीच झालेली असते. Happy

या प्रकारात त्वचेतून सुई टोचून औषध शरीरात सोडले जाते. खालील परिस्थितीत या मार्गे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो:
१. काही औषधे पचनसंस्थेद्वारे शोषली जाऊ शकत नाहीत. तर अन्य काही (उदा. इन्सुलिन) पचनसंस्थेतच नाश पावतात.
२. बेशुद्धावस्थेतील रुग्ण
३. जेव्हा औषधाचा परिणाम तातडीने होण्याची गरज असते तेव्हा.

या प्रकारे औषध देण्याचे ३ उपप्रकार आहेत :
१. सामान्य इंजेक्शन : जेव्हा औषध द्रव स्वरूपात लहान प्रमाणात द्यायचे असते तेव्हा ते सिरींजमध्ये भरून सुईद्वारा टोचले जाते.
२. इन्फ्युजन : जेव्हा द्रव औषध मोठ्या प्रमाणात द्यायचे असते तेव्हा ते रक्तवाहिनीतून हळूहळू सोडले जाते.
३. इम्प्लांट : यात एखादे औषध त्वचेवर छेद घेऊन तिच्याखाली ठेवले जाते.

सामान्य इंजेक्शन : हा प्रकार तिघांमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा असल्याने त्याबद्दल सविस्तर पाहू. सामान्य इंजेक्शन शरीरात ४ प्रकारे देता येते :

१.स्नायूंमध्ये.
२. रक्तवाहिनीत
३. त्वचेखालच्या निकटच्या भागात
४. त्वचेमध्येच

*
१. स्नायूंमध्ये (IM) :
IM inject.jpg

हा प्रकार खूप औषधांच्या बाबतीत वापरला जात असल्याने सर्वपरिचित आहे. आपल्यातील प्रत्येकाने कधी ना कधी या प्रकारचे इंजेक्शन घेतलेले असते. अलीकडील उदाहरण म्हणजे कोविडची लस. या प्रकारे इंजेक्शन देताना शरीरातील तीन जागा गरजेनुसार निवडता येतात :

अ) दंडाची बाहेरील बाजू : इथे २ ml पर्यंत द्रव टोचता येतो. इथून टोचलेल्या औषधाच्या शोषणाची गती चांगली असते.
आ) खुब्यावर : इथे ८ ml पर्यंतचा द्रव टोचता येतो. मात्र येथून होणारी शोषणाची गती वरील १ पेक्षा कमी असते.
इ) मांडीची बाहेरील बाजू : इथे ५ ml पर्यंत द्रव टोचता येतो. ही जागा लहान मुलांमध्ये निवडली जाते.

स्नायूमध्ये टोचलेले औषध हळूहळू झिरपत रक्तप्रवाहात पोचते. जी औषधे स्नायूदाह करणारी असतात ती या प्रकारे देता येत नाहीत; ती थेट रक्तवाहिनीतच द्यावी लागतात.

२. रक्तवाहिनीतून दिलेले इंजेक्शन (IV):
याप्रकारे दिलेले औषध थेट रक्तप्रवाहात जात असल्याने त्याची पूर्ण मात्रा शरीरासाठी उपलब्ध होते.
सर्वसाधारणपणे या प्रकारचे इंजेक्शन नीलावाहिन्यांमधून (veins) देतात. या वाहिन्या त्वचेखालोखाल असतात आणि त्या त्वचेवरून सहज दिसतात. बहुतेक वेळा कोपर किंवा मनगटाच्या पुढील बाजूच्या नीलांची निवड केली जाते.
या इंजेक्शनचे दोन प्रकार आहेत :

a. एका दमात दिलेले इंजेक्शन : यात सिरींजमध्ये द्रव भरून तो रक्तवाहिनीत वेगाने सोडला जातो. अशा प्रकारे जास्तीत जास्त १० ml द्रव देता येतो. रक्तात शिरलेले औषध आधी हृदय, मग फुफ्फुसे आणि मग रोहिणी वाहिन्यांद्वारा सर्व शरीरात पोचते. अशा औषधी इंजेक्शनचा परिणाम सुमारे 20 ते 40 सेकंदात दिसतो. अशा इंजेक्शनचे एक उदा. म्हणजे Calcium gluconate.

b. हळू दिलेले इन्फ्युजन : जेव्हा एखादे औषध मोठ्या प्रमाणात बऱ्याच वेळासाठी द्यायचे असते तेव्हा या पद्धतीचा वापर केला जातो. यात मूळ औषध एखाद्या सलाईनच्या बाटलीमध्ये मिसळले जाते. आणि मग हे मिश्रण थेंब थेंब स्वरूपात रक्तात सोडले जाते. रुग्णालयात दाखल झालेल्या विविध प्रकारच्या रुग्णांच्या बाबतीत अशा प्रकारे औषधे दिली जातात.

c. रोहिणीवाहिन्यांतून (arteries) दिलेले इंजेक्शन (IA):
याचा वापर अत्यंत मर्यादित असून काही ठराविक आजारांतच केला जातो. अशा प्रकारे दिलेले औषध फक्त निवडक पेशींपुरते काम करते. उदाहरणार्थ, एखाद्या कर्करोगाची गाठ. अशा प्रकारे इंजेक्शन दिल्याने त्याचा जास्तीत जास्त परिणाम संबंधित गाठीवर होतो आणि संपूर्ण शरीरावर होणारे दुष्परिणाम कमीत कमी राहतात. तसेच विशिष्ट रोहिणीमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यासही या प्रकारे इंजेक्शन देतात.

३. त्वचेच्या खालच्या निकटच्या मेदथरात (SC):
अशी इंजेक्शन्स सहसा दंड/मांडीच्या बाहेरील बाजूस किंवा पोटावर देतात. स्नायूमध्ये दिलेल्या इंजेक्शनपेक्षा यात कमी प्रमाणात औषध टोचता येते. त्या औषधाचे शोषण स्नायूपेक्षा कमी गतीने परंतु तोंडाने घेतलेल्या औषधापेक्षा जास्त गतीने होते. या प्रकारात ३ उपप्रकार असून त्यांची उदाहरणे अशी आहेत :
a. एका दमात दिलेले इंजेक्शन: इन्सुलिनचा एक डोस किंवा रक्तगुठळ्यांच्या उपचारासाठी दिलेले हेपारिन ही त्याची परिचित उदाहरणे.
b. इन्फ्युजन : सध्या विविध प्रकारचे इन्शुलिन पंप उपलब्ध आहेत. त्यातून गरजेनुसार इन्शुलिन शरीरात सोडले जाते.
c. इम्प्लांट : यात त्वचेवर छोटीशी शस्त्रक्रिया करून औषध आत छोट्या वडीच्या स्वरूपात ठेवले जाते. गर्भनिरोधक हॉर्मोन्स हे याचे उत्तम उदाहरण आहे. अशा वडीतून संबंधित औषध सुमारे 3 ते 5 वर्षे हळूहळू शरीरात सोडले जाते.

४. त्वचेमध्ये दिलेले इंजेक्शन (ID) :
साधारणपणे ते हाताच्या कोपर ते मनगट या पट्ट्यातील पुढच्या बाजूस दिले जाते. अशा प्रकारे दिलेले औषध रक्तप्रवाहात जवळजवळ शोषले जात नाही. याची ठळक उदाहरणे :
a. काही रोगांसाठी लसीकरण
b. रोगनिदान चाचण्यांसाठी टोचलेला द्रव.
….
पारंपरिक इंजेक्शन पद्धतीत सिरींजमध्ये औषध भरले जाते आणि तिला जोडलेल्या सुईमार्फत शरीरात सोडले जाते. यामध्ये रुग्णाला सुई टोचणे हा भाग वेदनादायी असतो. त्या दृष्टीने सुईविरहित इंजेक्शन ही संकल्पना गेल्या दशकात मांडली गेली. त्यावर अव्याहत संशोधन चालू आहे. या तंत्रज्ञानात विशिष्ट औषध खालील प्रकारे त्वचेतून आत वेगाने सोडले जाते :
• धक्का लहरींचा वापर
• वायुदाबाचा वापर
• सूक्ष्म वीजवापर
• लेझर तंत्र

या नव्या पद्धतीचे फायदे आणि तोटे दोन्ही लक्षात घ्यावे लागतील.
• फायदा : काही औषधे मुळातच घट्ट व चिकट स्वरूपाची असतात. ती पारंपरिक इंजेक्शनने देता येत नाहीत. ती देणे आता शक्य होईल.
• तोटा : औषध त्वचेखाली सोडण्यासाठी उच्च दाबाचा वापर केला जातो. त्यातून त्वचेखालील थरांना इजा होऊ शकते.
एक महत्त्वाचे : या नव्या तंत्राने रक्तवाहिनीतून इंजेक्शन देता येत नाही. इंजेक्शनचे बाकी वर वर्णन केलेले इतर मार्ग या प्रकारे हाताळता येतील.
....

आतापर्यंत आपण पचनसंस्थेद्वारा आणि विविध इंजेक्शन्सच्या स्वरूपात देण्यात येणाऱ्या औषधमार्गांचा आढावा घेतला. बहुसंख्य रोगोपचारांत हे दोन मार्ग प्रामुख्याने वापरले जातात. याव्यतिरिक्त औषध देण्याचे जे अन्य शरीरमार्ग आहेत त्यांचे विवेचन पुढील भागात करेन.
...................................................
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बनावट आणि निम्न दर्जाच्या औषधांच्या सुळसुळाट
आधुनिक वैद्यकाची 188 औषधे प्रमाणित-दर्जेदार नाहीत. ही औषधे बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये हिमाचल प्रदेश आघाडीवर असून महाराष्ट्रही त्यात सामील आहे.

https://wbpay.in/en/fake-medicine-alert-188-medicines-fail-quality-tests...

वरच्या प्रतिसादात उल्लेख असलेल्या 128 औषधांची पूर्ण यादी येथे पाहता येईल :
https://medicaldialogues.in/news/industry/pharma/cdsco/state-drug-alert-...

त्यात पॅरासिटॅमॉल या साध्या गोळीपासून अनेक प्रतिजैविके, स्टिरॉइड्स, मधुमेहावरील औषधे आणि इतर अनेक महत्त्वाच्या औषधांचा समावेश आहे

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे.

काल न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना रस्त्यावरच खाऊ घालणाऱ्या श्वानप्रेमींना चांगलेच फटकारले आहे.
“तुम्ही भटक्या कुत्र्यांना स्वतःच्या घरात का खाऊ घालत नाही? तुम्ही सकाळी सायकल चालवायला जाता का? असे विचारुन, “सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांनाही भटक्या कुत्र्यांचा धोका असून तो दुचाकीस्वारांना अधिक असल्याचे” न्यायालयाने नमूद केले आहे.

भटक्या कुत्र्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निवारा केंद्रांची स्थापना करावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. त्या केंद्रांमध्ये कुत्र्यांचे लसीकरण आणि निर्बीजीकरण करण्याच्या पण सूचना आहेत.

https://www.lokmat.com/editorial/editorial-on-supreme-court-orders-to-se...

रेबिज मृत्यू
गुजरातमधील अहमदाबाद शहर पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक वानराज मंजारिया यांचा रेबिजमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपल्या पाळीव कुत्र्याच्या नखांच्या ओरखड्यांमुळे त्यांना रेबिजचा संसर्ग झाला होता.

मंजारिया यांनी घटनेनंतर कोणतीही काळजी घेतली नाही, कारण सर्वसामान्यांमध्ये असा समज आहे की रेबिज केवळ कुत्र्याच्या चावण्याने होतो.

अरेरे ! दुर्लक्ष जिवावर बेतले.

https://www.indiatoday.in/india/story/gujarat-cop-contracts-rabies-after...

वरील प्रकरणात अशी शक्यता असावी :
१. त्या कुत्र्याच्या पंजाला/ नखांना विषाणूदूषित लाळ लागलेली असणार आणि त्या कुत्र्याचा मानवी त्वचेवरील ओरखडा त्वचेला भेदून गेला असला पाहिजे.
२. पाळीव कुत्र्याच्या लसीकरणात काही त्रुटी राहिली होती का, हे पण तपासावे लागेल.

बापरे.
पहिली शक्यता जास्त वाटत आहे.
यात रेबीज vaccine सोबत Immunoglobulin पण घेणे महत्वाचे आहे.

<पाळीव कुत्र्याच्या नखांच्या ओरखड्यांमुळे>
बाप रे! खूप वाईट.
रेबीज वरील खात्रीशीर औषधाचा अजून शोध का नाही लागत?

*खात्रीशीर औषधाचा अजून शोध का नाही>>
चांगला प्रश्न.
जेव्हा रेबीजचा विषाणू माणसाच्या रक्तातून मेंदूत शिरतो तेव्हा तो बऱ्याच मेंदूपेशींचा अपरिवर्तनीय नाश करतो आणि इतर रसायनांना रक्तातून मेंदूत शिरण्याचे प्रवेशद्वार बंद करून टाकतो. त्यामुळे सध्याची विषाणूविरोधी औषधे रक्तातून दिली तरी मेंदूत शिरू शकत नाहीत. म्हणून सध्या फक्त प्रतिबंधात्मक उपचारांवरच अवलंबून राहावे लागते आणि ते तातडीने करणे आवश्यक.

यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न नव्या संशोधनात होत आहेत. दोन monoclonal antibodies च्या मिश्रणाचे उंदरांवर प्रयोग झालेले आहेत आणि त्यातून काही आशादायक गोष्टी समजल्यात. अर्थात त्यासाठी असे मिश्रण विशिष्ट मार्गाने थेट मेंदूत द्यावे लागते.

या संशोधनातील प्रगतीनुसार पुढील गोष्टी समजतील.

https://www.embopress.org/doi/full/10.15252/emmm.202012628

Pages