जीवनदृश्यं

Submitted by पाचपाटील on 1 May, 2022 - 02:22

{{ लाईट्स..! कॅमेरा..! साउंड..! "रोलिंग..!"
सीन नंबर १, शॉट-५, टेक-२
"ॲक्शन" }}

नवरा : आगं ते जरा बोगद्याकडच्या मळ्यातली
हीर जरा बांदून घ्यायचीय.. त्येज्यासाटी सोसायटी
काडावी लागंल..! सही कर की जरा हितं..!

बायको : ओ जावा तिकडं. कितींदा सोसायट्या काडायच्या? कोन फेडत बसनार ते पुना ??
मी नाय करत सही..!

नवरा : अगं एवढ्या बारीला कर..! पुना नाय मागत.

बायको : तुमची काय जमिनीची माया तुटत नाय..
ह्या शेतात किती बी पैसा ओतला तरी कमीच पडतो..
कळत कसं नाय तुमाला? कटाळा आला सांगून सांगून..
मी नाय करत सही..! जावा तिकडं..!

नवरा : अशी कशी सही करत नाय..? चल तुझ्या बापाफुडं..! बापाफुडंच उभी करतो तुला..!

बायको (घाबरत) : बरं..! आणा हिकडं.! करते..!
------------------------+++++++-------*******--------------

{{ सीन नंबर २, शॉट-६, टेक-५
"ॲक्शन" }}

नवरा (दबकत) : अगं ते जरा तोड आलीय ऊसाला..!
पैशाची जरा नड है..! कुणाला सांगावं काय कळंना झालंय..!

बायको : कुनाला बी सांगा..! मला नका सांगू..!

नवरा : तुला नाय सांगनार तर कुनाला सांगनार..!
ऐक की.. ते जरा सोसायटीचं नवं जुनं करावं लागंल.
तर सही पायजेल हितं..!

बायको : मी नस्तीय सह्य करत आता.
नवरा : अगं ऐक एवढ्या बारीला. पुन्हा नाय मागत.
पुन्हा काय गरजच पडनार नाय..! हे एवढं ऊसाचं बिल
निगालं की मग काय टेन्शनच नाय..! तुला नुस्तं
सोन्यानं मढवतू बघ..! बघच तू..! खोटं नाय बोलत..!

बायको : तोंड बघा सोन्यानं मढवणाऱ्याचं..!
हाय एवढं राह्यलं तरी नशीब..! काय देत नस्ते मी
सही बिही..!

नवरा : अशी कशी सही देत नाय..? चल बापाफुडं..!

बायको (घाबरत) : बरं. आणा हिकडं.. कुठं करायचीय सही?

------------------------+++++++-------*******--------------

{{नंतर मग फार फार वर्षांनंतर..
सीन नंबर ३, शॉट-५, टेक-२
"ॲक्शन" }}

बायको : आवो आण्णा, ह्येंनी असं असं म्हनतेत
सारखं की 'चल बापाफुडं..!' 'चल बापाफुडं..!'

बायकोचे वडील (सुपारी कातरत) : अगं त्यात काय एवडं..! घिऊन यायचं ना मग त्येंन्ला माज्याफुडं..! मी बी बघिटलं आस्तं काय करतेत ते..! आं??

बायको : अग्गो बाईss.! एवढं सोपं असतं होय हे? मी उगीचच घाबरत होते एवढे दिवस..!!

------------------------+++++++-------*******--------------

{{ लाईट्स कॅमेरा साउंड "रोलिंग"
सीन नंबर ४, शॉट-३, टेक-५
"ॲक्शन" }}

नवरा : आमाला कोण इचारनार है तिथं..! सगळा
लाड थोरल्या न् मधल्या पावन्याचा...! घाला आंगठ्या
त्येंन्लाच..! उधळा म्हनावं त्येंच्यावरच सगळं..! त्ये लाडके..! आमी दोडके..!

बायको : चला ओ आता..! आटपा लवकर..!
नंतर रूसा..! आता काय काडलंय हे ऐन टायमाला ?
तिकडं सगळी खोळंबले आसतेल..!

नवरा: काय येत नस्तो मी कुठं आता..! मागं बी
तुज्या भावाच्या लग्नात मला आंगठी करनार म्हणून
हूल उठवली नुस्ती..! मी येड्यासारखा तिथं मांडवात यिऊन वाट बघत बस्लो..! पन कुठलं काय..!! नुस्ता फुफाटा..!!

बायको : आवो आता कुठलं काय जुनं उकरून
काडताय?पंधरा वर्सं झाली आता लग्नाला..!
आण्णांन्ला जाऊन बी पाच वर्षं होत आली..!
काय आंगठीत जीव अडकून पडलाय काय म्हाईत..!
आता काय कमी है का आपल्याला ? चला लवकर..!
आक्षदा पडायचा टाईम चुकंल..!!

नवरा : आंगठीचा सवाल नाय..! पन रीत-भात म्हणून
काय असती का नाय? आं? आमी काय हितं पालं
टाकून राह्यलो की काय?

बायको : हम्म.. आता हितं तुमी उगंच माज्याफुडं
पिरपिर करू नका बरं गा..! काय बोलायचं ते त्येंन्लाच जाऊन बोला.. नायतर मीच सांगते तुमचा निरोप दादाला‌..! चला उठा आता..!! येताय की जाऊ?

नवरा (दबकत) : कशाला कुनाला काय सांगायला
पायजेल ? माझं म्हणणं एवढंच होतं की बाबा त्येंचं
त्येंन्ला समजायला पायजेल..! बाकी माझं काय
म्हननं नाय..! चल बस मागं.‌.! बसलीस का ?
आणि आईक की.. कुनाला काय बोलू नको बरं गा..!
मी आपलं सजच बोल्लो..!

------------------------+++++++-------*******--------------

{{ लाईट्स कॅमेरा साउंड "रोलिंग"
सीन नंबर ५ , शॉट-५, टेक-२
"ॲक्शन" }}

ते : कारं बाळू ? कसा काय आला सकाळी सकाळी?

मी : आवो बापूसायेब, मळा सगळा वाळून चाल्ला
माजा..! क्यानालचं पानीच आमच्याकडं यिऊ दिना झालेत.. काल रातच्याला जरा धराधरी झाली..!
पाटाच्या दाराला हात लावला तर खोरं डोक्यात
घालतू म्हनाय लागले.. म्हणून तुमच्याकडं आलू..
कायतरी करा बापू.. लय आवगड दिवस आलेत..!

ते : आरं एवड्या तेवड्याला घाबरून कसं चालन्..?
आसंच आस्तंय हे..!
हितं आमी आलतो तवा आमाला बी कुळव घालू
देत नव्हती रानात..! आमच्याच हिश्शाच्या रानात..!
ह्या सद्या कदमाची सगळी भावकी कुराडी घिऊन
आलती आंगावर..!

मी : बाब्बौ..! मंग काय केलं तुमी ?

ते : मग आमी शितोळ्यांची सोयरीक केली. नवीन वाट
चालू केली. शितोळ्यांचं पावनं म्हनल्यावर मग सगळी
आपसूक गार पडली. चुलत सासरं लय उग्राट..!
कोण टोले घेनार त्येच्याबरूबर..!
बरं जाऊ दी..! चल..! काड गाडी..! मी यितू तुज्याबरोबर..! जायाचं आनी डायरेक् पाटाचं दार फोडायचं..! बगू कोन
तुज्या डोक्यात खोरं घालतंय ते..! च्यायला हितं काय
मोगलाय लागून गेली का काय..!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाइ चि दुखरि बाजु .......अनि त्या वरिल औशद. खुपच सोफ्या भाशेत मान्दले.>> तुमी काहुन बोबडं लिवुन रायले?

<<बंडल
हा हा ....... तुम्हि कहुन मझ्ह्या माग लाग् ल्यात ....