मिलो न तुम तो..

Submitted by पाचपाटील on 21 April, 2022 - 11:11

मिलो न तुम तो हम घबराये
मिलो तो आँख चुराये
हमें क्या हो गया है...!

तर कधीकधी हे असं होतंच ना म्हणजे..!
म्हणजे समजा ती त्याला आवडत असते.
आणि म्हणूनच तिला ते जाणवू न देण्याची त्याची
कोशिश चाललेली काही काळापासून..!

मग समजा ती दिसण्याची शक्यता असेल,
अशा जागांवर एक मूर्ख चक्कर मारून येणं वगैरे..
उदाहरणार्थ स्वतःपासून दूर बेखबर कॉरिडॉरच्या
शेवटी...
कधी जिन्यांवर अधेमधे दीदार ए यार..
कधी कॅन्टीनच्या टोकाला एकटीच सितमगार..
किंवा कधी संध्याकाळी पार्कींगमध्ये एक ॲक्टीव्हा
वाऱ्यावर सवार होत असलेली वगैरे...

किंवा मग तिला दिसेल अशा ठिकाणी
स्वतःत मग्न असल्यासारखा तो उगीच चुळबुळत..!
समजा कधी ती दुरून येताना दिसते.
त्याला ते कळतं आपोआपच.
आधी भवताल बदलताना दिसतो.
मग त्याच्या सगळ्या देहयष्टीत झिरपायला लागतात
आमूलाग्र बदल.
मग आता समजा तो लगेच मोबाईलमध्ये गुंग
असल्याचा बेमालूम बहाणा करतोय.
तिच्याकडे साफ दुर्लक्ष वगैरे..
किंवा कॉरिडॉरमध्ये जो दिसेल त्याच्याशी बोलणं
सुरू करतोय...
ते शक्य नसेल तर उगीच खिडकीतून आभाळ
बघत असल्याचा कांगावा..!
किंवा काहीतरी कामानिमित्त तिथून चाललेलो
आहोत, असं नेपथ्य उभं करतोय..!
आणि त्याच्या शेजारून ती हात पाठीशी गुंफून
सळसळत निघून जातेय आणि तो तिची दखलही
नाहीये घेत..!
'मी त्या गावचाच नाही' अशी वदंता पसरवतोय..!

तिच्या लयबध्द खणकावत जाण्यामुळे,
त्याच्या आत जो बहर आलेला असतो,
जी पालवी फुटलेली असते,
ती तो उघडकीस नाही येऊ देत...!
ती सगळी थडथड, ते सगळं वैपुल्य, तो सगळा
तजेला मोठ्या कष्टाने लपवतो..!
त्या प्रयत्नात क्षत होतो..!
निम्मा अर्धा शाबूत उरतो..!
आणि उपयोग तर काहीच होत नाहीये..!
कारण संपूर्ण मनोविश्व बेहाल करणारी ती चाल..!

ओ भोले साथिया देखी जो शोखी तेरे प्यार की
ओ सोहने जोगिया रंग ले हमें भी इसी रंग में ओय होय

आणि त्यात आता हे आणखी एक नवीनच..!
उदाहरणार्थ हा नवीन डिझाइनचा शुभ्र कुर्ता.
त्यावर रंगांची किरमिजी उधळण.
त्यातलं गुडुप्प लोभसपण.
नखशिखांत नैसर्गिक गव्हाळ.
चोवीस कॅरेटचं सोनं हेच.
अप्राप्य. अलिप्त. सुशुप्त.

कधी कधी फुटकळ यश‌ मिळतं.
तिचं इवलंसं बोलणं..! चांदण चुऱ्यासारखं दुर्मिळ..!
आवाजाचा पोत..! तलम मंजुळ फैलाव..!
थुईथुई संगीत.
ओठांचा लय-विलय..
लालबुंद रवाळ हसू..
मऊ मऊ मंद मंद दाणेदार उजेड..

खैरात...!!

अशा वेळी समोरचं जग वितळायला लागतं
आणि तो जागच्या जागी झंकारत उभा..!

किंवा कधी त्याची घायाळ विद्ध नजर..!
परंतु नजरेचा काय भरोसा..! ती पैदाईशी शरारती..!
कधी दगा देईल, खात्री नाही.‌
म्हणून पायांकडे बघत बोललेलं बरं..!
काटकोळी लांबसडक बोटं..! लालबुंद स्वप्नचित्र..!
तिथूनच भासांचे मंथर प्रदेश सुरू होतात..!
मामुली स्पर्शाची गफलत..!
रक्तचंदनी चकवा..!
चोरट्या आनंदाचं किंचित सुख...!

मग कधीतरी तिचं संदली हसू थांबतं
आणि अचूक त्याच क्षणी दिवस मावळतो..!

देवा..!! काय छळवाद आहे..!

ओ भोले जोगिया देखी जो शोखी तेरे प्यार की....

तुझ्या निष्ठूरपणाला अंत नाही.
माझ्या बालिशपणाला धरबंद नाही.
आणि आता अजून कोणत्या नवीन अदा
दाखवणारेस बाई..!!
आता अजून काय बघायचं राहिलंय?
अजून काय काय हाल सहन करावे लागणारेत..!
ओळीने चाल करून येतायत बिनझोपेच्या जालीम
रात्री..!
तू फेकलेल्या प्रश्नचिन्हांच्या पावसात घेरलेला मी..!
श्वासांवरही अधिकार चालवतेस.!
प्राण संकटात..!
इकडे भुरूभुरू सिग्रेटींचे ढग.!
आणि तुझे जलवे तर काही थांबतच नाहीयेत..!

सोसा..! सोसण्यासारखं तसं बरंच असतं,
पण हे सोसत नाही..!
तरीही सोसा..!!
काय करणार..! न सोसून सांगता कुणाला ??
आणि सांगणार तरी काय??
आणि समजणार कोणाला ??

माझं काही तुझ्यासारखं नाही..!
तुझ्या हाताला गाभा सहज लागतो..!
आणि आमचा हा जन्मजात शुष्क सांगाडा
सडाफटींग..!
सांग, ओल कशी शोधावी?

बाकी तुलाही हे अगदीच समजत नाही,
असं नाहीये..
तू काही अगदीच भाबडी वगैरे आहेस,
असंही नाहीये..

उलट, एक डोळस आंधळेपण कवच म्हणून
स्वीकारलेलं..!
एक नंबरची दुष्ट; की सगळं समजून उमजून
ढळढळीत लपवाछपवी..!
आणि पुन्हा ते प्रियंका गांधींसारखं तेज-तर्रार नाक
नकारार्थी हलवत नंतर म्हणावं की,
'अरेच्चा !! हे सगळं कधी झालं!!
मी बेखबर..! मला यातलं काहीच माहिती
नव्हतं अरे..!'

तुम्हीं को दिल का राज़ बतायें
तुम्हीं से राज़ छुपायें
हमें क्या हो गया है...

तर असतात अलीकडे त्याच्या स्टेटस मध्ये
कविता वगैरे..!
त्या इतरांना दिसू नयेत असं सेटींग असतंच
समजा.
जिच्यासाठी असतात तिलाच दिसाव्या अशी आस.
त्याही बघणं होत नाही..!
कधीतरी चुकून अवकाळी प्रतिसाद येतो की, 'ओह्..!
आज कविता वगैरे? काय विशेष??'

तर काही नाही..!
काही विशेष नाहीये बाई...!
होतो असाच आनंद कधी कधी..!
मग जवळ ठेवून काय करणार..!
उधळावासा वाटतो..! उधळतो..!
काय सांगायचं आणखी...!!

आँचल में भर ली हमने
सारी बहारें संसार की
नयी अदा से हम इठलायें
पायी खुशी लुटायें
हमें क्या हो गया है...

मूळ हिंदी गीताचा/कवितेचा स्त्रोत:
https://www.lyricsindia.net/songs/2589

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाऊ स्वीट !

सगळं वैपुल्य, सगळा तजेला.
अप्राप्य. अलिप्त. सुशुप्त.

कसला भरजरी शब्दविन्यास.

मस्तच..

'खणकावत' शब्द/क्रिया विशेष आवडली..

सुंदर!
सुषुप्त ..शब्द बरोबर आहे ना...?

अफलातून.... भन्नाट!
लयलूट आहे शब्दांची. शब्द न शब्द रिलेट झाला.

<<<<तिथूनच भासांचे मंथर प्रदेश सुरू होतात..!
मामुली स्पर्शाची गफलत..!
रक्तचंदनी चकवा..!
चोरट्या आनंदाचं किंचित सुख...!
मग कधीतरी तिचं संदली हसू थांबतं
आणि अचूक त्याच क्षणी दिवस मावळतो..!<<<
हे नितांत सुंदर! 'संदली' शब्दावर थबकायला झालं!

एकंदरीत खूप दिवसांनीं छानसं काही वाचल्याची अनुभूती आली! Happy
लिहीत राहा!

आणि समजा हे वाचून कोणाला साबणाचे फुगे आठवले तर ...
तलम नाजूक सुंदर...
म्हटलं तर पारदर्शक, म्हटलं तर रंगीबेरंगी...
कुतूहलाने हात पुढे करावा तर हाताला काहीच लागत नाही...
मुळात तो बुडबुडा होता की एक भ्रम?
यावेळी त्यात गुलाबी छटा जास्तच होती ना? की तोही एक भ्रमच...
पण समजा क्षणभर का होईना हरपलं भान त्या झिरझिरीत रंगांचा गरबा निरखताना..
उदाहरणार्थ पलीकडचं गटार आणि त्याकडेचा कचऱ्याचा ढीग दिसेनासाच झाला की तोपर्यंत
मग बुडबुड्यातून हाताला वेगळं काही लागावं हा अट्टाहास कशाला?

वाचुन अगदी अहाहा! झालं. फारा दिवसांनी असं तलम romantic वाचायला मिळालं. I am sure आता चाळीशीत असेलेल्यांना आपले दिवस आठवले असतील

>> नवीन डिझाइनचा शुभ्र कुर्ता. त्यावर रंगांची किरमिजी उधळण. त्यातलं गुडुप्प लोभसपण. नखशिखांत नैसर्गिक
>> कॉरिडॉरमध्ये जो दिसेल त्याच्याशी बोलणं सुरू करतोय... ते शक्य नसेल तर उगीच खिडकीतून आभाळ बघत असल्याचा कांगावा..!
>> 'मला यातलं काहीच माहिती नव्हतं अरे..!'

होय तसंच घडतं ते सगळं Happy
एकेक फोटू छान काढून ठेवलेत तुम्ही. आठवणी आमच्या फोटो तुमचे. Lol

पाचपाटील, काय लिहिलंत.. एक एक ओळ पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतेय.. असं अजून येऊ द्यात .. फार फार आणि फारच आवडलं

मस्त , मस्त आणि मस्तच लिहिलंय पाटील तुम्ही !!! शब्दांची निवड एकदम चपखल . जुने काहीतरी तळाला गेले होते ते वर आले . लिहीत रहा !!!

खूप सुंदर आणि तरल...!

वैपुल्य, ..अप्राप्य. अलिप्त. सुशुप्त....!! एकदम ताज्या पिस्त्याची पखरण असलेले शब्द!!

खूप आवडली

‘संदली..’. सुंदर!!! आवडलं.

फक्त ‘आणि त्याच्या शेजारून ती हात पाठीशी गुंफून’>> ही पोझ नाही पटली.

<<फक्त ‘आणि त्याच्या शेजारून ती हात पाठीशी गुंफून’>> ही पोझ नाही पटली.<< मी ही या पोजचा विचार करत बसले होते.

भरभरून दिलेल्या प्रतिसादांबद्दल / अभिप्रायांबद्दल सर्वांचे तहे दिलसे आभार...! _/\_
बहुदा सगळ्यांनाच अशा प्रकारच्या प्रेमविव्हलतेची
कमी-जास्त बाधा कधी ना कधी होऊन गेलेली
दिसतेय. Happy

व्यत्यय,
>>> मुळात तो बुडबुडा होता की एक भ्रम?
यावेळी त्यात गुलाबी छटा जास्तच होती ना? की तोही एक भ्रमच.
.. <<<
ह्या संदर्भात नेमाडे गुरूजींच्या त्या प्रसिद्ध कवितेतली एक महाओळ आठवते;
"ह्या विश्वभानाच्या घोंघावत्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा.."

बाकी अधूनमधून साबणाचे बुडबुडे उडवत राहणं बरं असतं, काळ मऊ होतो किमान तेवढ्यापुरता तरी..!
इतर वेळ मग रोजचा खकाणा असतोच..! तो काही
चुकत नाही. Happy

SharmilaR, मी_आर्या ;
>>> आणि त्याच्या शेजारून ती हात पाठीशी गुंफून <<<
होतं हे कधी कधी..
विशेषतः ती आजूबाजूच्यांहून सर्वार्थाने सरस असेल
आणि तिला त्याची यथायोग्य जाणीव असेल, तर
आसपास टेहळणी करणाऱ्या इच्छुक नजरांना
काडीचीही किंमत न देता, लांबलचक कॉरिडॉर्स
झपाझप संपवण्यासाठी, ही पोज उपयुक्त असू
शकते एखादीसाठी..!
त्यातून समजा मागे वळून बघण्याचेही कष्ट वाचत
असावेत, की बाबा आत्ता एवढ्यात आणखी
कुणाकुणाचा, किती जणांचा कत्ले आम होऊन
गेला..! Happy
किंवा तशा पोजमध्ये समजा आपोआपच एक
प्रकारची अधिकार सिद्ध करण्याचीही जाणीव येत
असावी की इथं कुणाची मालकी चालते..!
की बाबांनो, बघा बघायचं असेल तर.. पण जरा जपून..!
आणि आपापल्या जबाबदारीवर..! कारण शेवटी इथं सूत्रं कायम माझ्याच हातात असणार आहेत..!

काय भारी लिहिलय. Happy
. I am sure आता चाळीशीत असेलेल्यांना आपले दिवस आठवले असतील >>>> तर काय, पाटलांनी लिहिलंच आहे असं जबराट

मस्तच हो पाचपाटील.

काही विशेष नाहीये बाई...!
होतो असाच आनंद कधी कधी >>> Lol व्हावं असंच आनंदी कधी कधी Lol

Pages