वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी- वृत्तबद्ध कविता कला आणि शास्त्र

Submitted by भारती.. on 14 April, 2022 - 11:43

वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी- वृत्तबद्ध कविता कला आणि शास्त्र

व्याकरणाचं पुस्तक अतिशय वाचनीय असतं असा माझा  लहानपणापासूनचा अनुभव आहे, सिद्धांतच आहे ! लहानपणी बाबांची जुनी व्याकरणाची पुस्तकं वाचत बसण्यात मला नेहमीच आनंद वाटला होता.त्या आनंदाचं काळानुसार नूतनीकरण करणं आवश्यक आहे हेही अशा प्रत्येक वाचनात जाणवत राहिलं .मात्र हे काम करण्यासाठी योग्य तितका व्यासंग या पिढीतील कोणी करेल आणि अशा लेखनासाठी वेळही काढेल असं वाटत नव्हतं. सुदैवाने असा एक दुर्मिळ योग या पुस्तकाच्या रूपाने जुळून आला आहे. दुर्मिळ अशासाठी की व्याकरणकार आणि कवयित्री अशा दुहेरी भूमिकेतून वर्षाताई वाचकांशी या पुस्तकातून संवाद साधत आहेत .या अर्थाने हे पुस्तक हा मराठी कविता आणि व्याकरण यांच्या संगमावरील एक महत्त्वाचा दस्तावेज आहे.

वर्षा बेंडिगेरी-कुलकर्णी यांच्या ʼवृत्तबद्ध कविता- कला आणि शास्त्रʼ या दिलिपराज प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातून व्याकरण रससिद्ध होऊन आपल्या भेटीला आलं आहे याचं मुख्य कारण म्हणजे हे कवितेचं व्याकरण आहे.

मराठी कवितेच्या व्याकरणाचा असा समग्र आढावा घेण्याचा कौतुकास्पद प्रयत्न वर्षा यांनी केलेला आहे . त्यासाठी अधिक व्यापक भूमिकेतून निरनिराळ्या भाषांमधील साहित्यिक तसेच भाषापंडितांचे महत्वाचे सौंदर्यशास्त्रीय सिद्धांत, रसविचार यांचा धावता परामर्श घेऊन मराठी व्याकरणाचा व्यापक पैस त्या विषयप्रस्तुतीसाठी थोडक्यात मांडतात व नंतर क्रमशः वृत्तबद्ध कवितेच्या आकलनाकडे  येतात. त्यासाठी अनेकानेक अक्षरगणवृत्ते ,मात्रावृत्ते यांचा प्रदीर्घ परिचय पुस्तकात येतो. त्यांचे प्रकार उपप्रकार विस्ताराने आणि उदाहरणांसहित चर्चिले जातात,तसेच अक्षरछंद, अर्धसमवृत्त, सुनीत याही कविता प्रांतात प्रचलित  असलेल्या आकृतिबंधांची थोडक्यात ओळख त्या करून देतात.
शेवटी लयबद्ध स्वैर पद्य आणि अंततः मुक्तछंद इथपर्यंत त्या येऊन पोहोचतात.

या परिचय प्रक्रियेत लघु- गुरु मात्रांचे वृत्तरूपाने झालेले लयबद्ध आविष्कार समकालीन कविता-भाषेत रसिकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी एक अभिनव पद्धत अवलंबात आणली आहे. यातील प्रत्येक आकृतिबंधामध्ये त्यांनी स्वतःच काव्यलेखन केलं आहे. संपूर्ण पुस्तकात या प्रकारचं विपुल लेखन झालं आहे
उदाहरणार्थ पद्मावर्तनी मात्रावृत्त भवानी २+८+८+८+४=३० मात्रा- याचं जुनं उदाहरण म्हणून "जरि ।वास नसे तिळ। यांस तरी तु । म्हास अर्पिली ।सुमने।।" या ओळी वाचनात येतात पण वर्षाताईंची नवी संपूर्ण कविता या वृत्तात वाचताना त्या वृत्ताला एक समकालीन डौल येतो.
"बेभान वादळे धीट किनारी थेट मुक्त उतरावी
भरधाव जळाचा धाक तरी ती हाक कुठुनशी यावी"..
किंवा मंदाक्रांता या अक्षरगणवृत्तातील वर्षाताईंची ही रचना, काही ओळी-
संध्याछाया उतरुन तळी दूर मार्गस्थ झाल्या
झाडे वेली अविचल उभ्या खिन्न व्याकूळलेल्या ..
किंवा अप्रचलित अशा वंशमणि वृत्तातील (८+८+४) या ओळी-
"कातरवेळी आठवणींच्या काठी
बसले कोणी उसवत हळव्या गाठी
मावळतीला पांघरणा-या वाटा
दूर दूरवर विरल्या धूसर लाटा"

-प्रत्येक वृत्तात असं लिहिणं हे एक आव्हान आहे आणि वर्षाताईंनी ते समर्थपणे पेललं आहे.
तर एक स्वतंत्र कवितासंग्रहच या पुस्तकाच्या पहिल्या भागाच्या पोटात लपला आहे . याशिवाय पुस्तकाचा भाग-2  ʼकाही निवडक कविताʼ अशा शीर्षकाचा आहे. ज्यामध्ये वर्षाताई यांनी अनेक महत्त्वाच्या वृत्तांमध्ये केलेलं सुंदर कवितालेखन आहे. हा संपूर्ण कवितासंग्रह स्वतंत्रपणे प्रकाशित झाला असता तर कदाचित कविता म्हणून आपण त्यांच्याकडे अधिक अवधान दिलं असतं , त्यांच्या काव्यगुणांवर अधिक लिहिलं असतं असं वाटून जातं कारण इथे प्राथमिकता कवितेच्या व्याकरणाला मिळते .

अर्थात वर्षाताई स्वतः सिद्धहस्त कवयित्री असल्यामुळे एक टवटवीत असा सौंदर्यानुभव कवितेचे व्याकरण समजून घेता घेताच रसिक वाचकाला मिळत जातो, हे एक अभिनव प्रायोगिक असं पर्यावरण वर्षाताईंनी वृत्तबद्ध कविता समजून घेण्यासाठी निर्माण केलं आहे. ही त्यांची ठरवून घेतलेली तात्विक भूमिका आहे .

हे करतानाच वृत्तबद्ध कवितेबद्दलचे निरनिराळे आक्षेप त्यांनी विचारात घेतले आणि चर्चिले आहेत. कविता वृत्तबद्ध असावी की नसावी, मुक्तछंद कवितेची बलस्थानं काय आहेत असा एकूणच कवितेच्या क्षेत्राचा वेध घेताना कवयित्री आतून कवितेच्या वृत्तबद्धतेशी वचनबद्ध आहे असं जाणवत राहतं.या निष्ठेतून हे सर्व लेखन झालं आहे.

पुस्तकाचं मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांचं आहे. त्यांची रंगरेषांची मांडणी पुस्तकाच्या आशयाप्रमाणेच ताजीतवानी आहे पुस्तकाचा ब्लर्ब मायबोलीकर स्नेही श्री अशोक पाटील यांनी आपल्या नेहमीच्या विचक्षण रसिकतेने लिहिलेला आहे प्रस्तावना वर्षाताईंना गुरुस्थानी असलेल्या न्यूझीलंडस्थित कवी निलेश पंडित यांची आहे. वृत्तबद्ध कवितालेखनात आपल्या व्यासंगाने आणि प्रतिभेने ते खरोखरच गुरुही आहेत आणि पंडितही आहेत. या पुस्तकाला आणि कवयित्री वर्षाताईंना सर्व शुभेच्छा देऊन हा अल्पपरिचय इथेच पूर्ण करते. कवितेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला अभ्यासासोबत आनंदाचा अनुभव देणारं असं हे पुस्तक आहे, त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद नक्कीच लाभेल.

भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा... मस्त परिचय...
मनापासून धन्यवाद...

वाचलेच पाहिजे हे पुस्तक...

धन्यवाद शशांकजी :)तुम्हीही अनेक वृत्तांमध्ये सहजतेने लिहीत असता हे जाणते.
जुने मायबोलीकर आणि नेहमीच वाचनीय उत्कट हृदयस्थ असे प्रतिसाद त्यांना भावलेल्या लेखनावर देणारे स्नेही श्री अशोक पाटील यांनी लिहिलेला ब्लर्ब मी मूळ लेखात समाविष्ट करू शकले नाही म्हणून वरील प्रतिसादात त्याचा फोटो टाकत आहे.

अरे, वा, मस्त ओळख.
मला वृत्त, छंद यांची भारी भिती आहे, या पुस्तकानिमित्ताने घालवेन म्हणते. धन्यवाद भारती
अशोकमामांनी लिहिलेलेही आवडलेच.

नवकवितेच्या वाटेवरचे वळण द्यायचे हाक,
"गण-मात्रांचे कृत्रिम बंधन सत्वर तोडुनी टाक !"

यतिभंगाचे भूत लेखणीस कायम भिववित होते
त्या भीतीने तरल काहिसे हातून निसटत होते

गोळा करूनी धैर्य, ठरविले, नको अता मळलेली
वाट पुन्हा ती छंद-बद्ध कवितांची कोंदटलेली

वृत्त-छंद-मात्रांचे अवजड ओझे लेवुनी बसली..
..होती माझी कविता, विमुक्त होता निर्मळ हसली

त्या हसण्याचा खळाळ ध्वनि मज सांगुनी गेला काही,
"मुक्तक लिही, पण ध्यानी ठेव..यमकाविण "गंमत" नाही !"

जरी वृत्त छंदे मना वेड लागे
तरी मुक्तछंदे कदा ना वहावे
नसे बंध काही तरी पद्य व्हावे
तरी आठवो काय राही पहावे

कृपया हलके घ्यावे... ___/\___

Ok thanks

जाई ❤
अश्विनी मावशी, विपु केलीय . ॲमेझाॅनवर नाही ..