अरबी समुद्रावर टेहळणी

Submitted by पराग१२२६३ on 3 April, 2022 - 02:32

भारतीय नौदलाच्या हवाई शाखेत नव्या तुकडीचा – आयएनएएस 316 (INAS 316) समावेश गेल्या 29 मार्चला करण्यात आला आहे. या तुकडीत सागरी टेहळणी करणाऱ्या P-8I या दीर्घपल्ल्याच्या विमानांचा समावेश आहे. गोव्यात दाभोलिममध्ये असलेल्या नौदलाच्या हवाईतळावर (आयएनएस हंसा) ही तुकडी तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे अरबी समुद्राची अधिक प्रभावीपणे टेहळणी करणे शक्य झाले आहे. भारतीय नौदलात सध्या एकूण 12 P-8I विमाने सामील करण्यात आलेली आहेत.

किनाऱ्यापासून दूरपर्यंत उड्डाण करून टेहळणी करण्याची क्षमता असलेले P-8I विमान पाणबुडीविरोधी अत्याधुनिक युद्धप्रणालीने सज्ज आहे. या विमानांचा भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वापरकर्ता आहे. हिंदी महासागरीय क्षेत्रात अलीकडील काळात घडत असलेल्या विविध घडामोडींमुळे भारताच्या सुरक्षेसमोर आव्हानं निर्माण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर P-8I विमाने भारतीय नौदलाची टेहळणी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवत आहेत. भारतासाठी हिंदी महासागर सामरिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा असल्यामुळे त्यात होणाऱ्या प्रत्येक हालचालीबाबत जागरूक राहणं गरजेचं झालेलं आहे. विमानाचा वेग अन्य वाहतूक साधनांपेक्षा जास्त असल्यामुळे ते दूरवरच्या प्रदेशापर्यंत कमीतकमी वेळेत पोहचू शकते. विमानाच्या या वैशिष्ट्यामुळे भारतीय नौदलाला P-8I विमानाच्या मदतीने दूरवरच्या प्रदेशावर टेहळणी करणे, तिथून निर्माण होणारे धोके त्वरित ओळखणे, एखाद्या प्रदेशातील हालचाली टिपून त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यांच्याबाबत तितक्याच त्वरेने योग्य तो निर्णय घेणे शक्य होते. P-8I विमानांवर बसवलेल्या विविध यंत्रणांच्या मदतीने ही कार्ये झटपट पार पाडता येतात.

‘हिंदी महासागरातील मुख्य नाविकशक्ती’ या नात्याने या क्षेत्रात सुरक्षा, शांतता आणि स्थैर्य राखण्याची मुख्य जबाबदारी भारतीय नौदल पार पाडत आहे. त्या कार्यातही P-8I महत्वाची भूमिका बजावत आहेत. भारतीय नौदलाचा हिंदी महासागरातील दबदबा वाढवण्यात या विमानांची मदत होत आहे. ही विमाने ओमान, सेशल्स, मॉरिशस यांसारख्या देशांनाही रसद आणि त्यांच्या सागरी क्षेत्राची टेहळणी अशा कारणांनी भेटी देत आहेत.

भारतीय नौदलासाठी अमेरिकेच्या Boeing कंपनीकडून 8 P-8I विमाने खरेदी करण्यासंबंधीचा करार जानेवारी 2009 मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर भारतीय नौदलाच्या गरजांनुरुप घडवलेल्या या विमानांपैकी पहिले विमान डिसेंबर 2012 मध्ये भारताकडे सुपूर्द करण्यात आले होते. त्या करारात आणखी 4 विमाने खरेदी करण्याचाही पर्याय ठेवण्यात आला होता. त्या 4 विमानांच्या खरेदीसाठीचा 1 अब्ज अमेरिकन डॉलर किंमतीचा करार जुलै 2016 मध्ये करण्यात आला होता. त्यानुसार भारतीय नौदलाला मिळालेल्या त्या 4 विमानांचा समावेश नव्या तुकडीत (316) मध्ये करण्यात आला आहे.

P-8I हे विमान सतत दहा तास हवेत उडत राहू शकते. मोहिमेवर असताना या विमानात जहाजभेदी हार्पून ब्लॉक-2 ही क्षेपणास्त्रे, MK-54 हे पाणतीर (torpedo), पाणसुरुंग (Depth Charges), Rockets इत्यादी शस्त्रसामग्री बसवली जाते. या विमानावर बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक रडार संवेदकांच्या मदतीने शत्रुच्या हालचाली लक्षात आल्या की, त्या विरोधात तातडीने कारवाई करता येते. या साधनसामग्रीबरोबरच या विमानावर अत्याधुनिक संवेदक, संपर्क यंत्रणा आणि अन्य साधनेही बसवलेली आहेतच. त्याचबरोबर या विमानावर स्वसंरक्षणासाठीही काही यंत्रणा बसवलेल्या आहेत. त्यामुळे शत्रूच्या इंफ्रारेड क्षेपणास्त्रांपासून याला स्वत:चा बचाव करता येतो. या सगळ्या शस्त्रसाठ्यासह उड्डाण करताना याचे वजन सुमारे 85 टन भरते.

ताशी 789 किलोमीटर वेगाने उडणाऱ्या P-8I चा पल्ला 1,200 सागरी मैलांपर्यंत (2,222 किलोमीटर) आहे. आपल्या मोहिमेच्यावेळी प्रत्यक्ष लक्ष्याच्या ठिकाणी चार तास टेहळणी करत उडत राहण्याची याची क्षमता आहे. या विमानाच्या संचालनासाठी 9 कर्मचाऱ्यांची गरज असते. याच्या कॉकपीटमध्ये बसवण्यात आलेल्या IFF यंत्रणेच्या मदतीने रडारवर दिसणारे लक्ष्य कोणत्या प्रकारचे आहे, म्हणजे मित्र आहे की शत्रू, ते जलदगतीने ठरवता येते. यावरच्या Raytheon APY-10 या टेहळणी रडारच्या मदतीने हे विमान कोणत्याही प्रकारच्या हवामानात, दिवसा आणि रात्रीही प्रभावीपणे कार्यरत राहू शकते.

Link
https://avateebhavatee.blogspot.com/2022/04/blog-post_3.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users