अशी ही कातरवेळ

Submitted by Udage Mayuri Ra... on 7 March, 2022 - 23:23

अशी ही कातरवेळ

आठवणींच्या पाचोळ्यावर
नाद करिती खुणा
स्पर्श नवासा जरी वाटे,
आभास हा जुना.

आसवांसवे बरसून जाता
हास्यास कारण व्हावा
कातरवेळी बसूनी जरा,
डाव मांडूया नवा.

आभाळ भरुन येता
दाटून येते तसेच काही,
आसवांसवे बरसतो पाऊस ही
आठवणींना तर अंतच नाही....!

भावनांची मांडूनिया गणिते
कातरवेळी व्हावे रिते,
बोलताना मौन शब्दांचे
अबोल होऊनी ही कळते.

कातरवेळी हूरहूर लागता
सर एक अशी येते
न कळे,कसे काय?
हळूच येऊनी कुठे घेऊनी जाते?

ही भिती कशाची?
येण्याची की,आरंभाची सांगता होण्याची
अनपेक्षित विचारांची
हे मनास उमजत नाही.

हरवलेली ही संध्या
रंगात न्हाऊनी निघते,
अर्थ जरी वेगळा प्रत्येकाला
उद्याची स्वप्न देऊनी जाते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users