यादृच्छिक

Submitted by पाचपाटील on 5 March, 2022 - 00:30

१. थांबलेल्या रिक्षावाल्यानं समजा सहजच विचारलं की, चलाss स्वार्गेssट हायकाय स्वार्गेssट??

तर हा लगेच चालू होतो की," नाईये. स्वारगेटला जाण्याची माझी इच्छा नाहीये. खरंतर कुठेच जायची माझी इच्छा
नाहीये. मी फक्त इथून सहज चालत निघालो आहे. असं सहज टाईमपास म्हणून चालणं ही मौल्यवान गोष्ट आहे..! आणि ही साधी सुंदर गोष्टसुद्धा ह्या वेगवान काळात आपण हरवून बसलो आहोत.!
तुम्ही माझ्याकडे असे चमत्कारिक नजरेनं का पाहत आहात? हे रिक्षावाले बंधू, तुम्ही कृपया गैरसमज करून घेऊ नका..! मला काही वेड वगैरे लागलेलं नाहीये..! हे पहा सिविल
सर्जनचं सर्टीफिकेट..! हल्ली मी खिशात घेऊनच फिरत असतो..!"

२. "तुमच्या बेरहम उलट्यांच्या आवाजाने आमची सगळी गिऱ्हाईकं पळून गेली..! हे पाचशे रूपये त्याचे लावलेत
बिलात..!"
<<< हे आसं कुटं आसतंय का मालक? दारू थोडी जास्त झाली तर उलटी होनारच ना मानसाला..! आमच्या गावात हे कॉमन हाय..! तिथं असा येकपन बार नाय जिथं आमी उलटी नाय केली.. >>>
आरं फेक ना पाश्शे रूपै त्येच्या तोंडावरss ! काय आयकून घितूय तू पन..! नुस्ता बिनकामाचा पाटील हाय लगा तू !

३. साला यू ट्यूबवर ह्या सगळ्या जाहिरातवाल्यांचा उताड आलाय नुसता..! एक बारका व्हिडिओसुद्धा शांतपणे बघू-ऐकू देत नाहीत..!
उदाहरणार्थ Agoda वर बुकींग केलं की आपण पाहिजे
तेवढा काळ मेडीटेशन करू शकतो..! अगदी वर्षभर वगैरे..! इट्स सिंपली अनबिलिवेबल यू नोss..!

४. "पानी येतंय का रं म्हागचं.? लाटा दिसल्या पायजेत बग..!
थांबss मी आता तिकडं बगताना काड फोटो.. आता असा
हिकडं बगताना एक काड !.. चार पाच काड..! येकादा तरी चांगला यीलच..!"

५. मी एक हाफ कोल्ड कॉफी घेतो.. तोपर्यंत तू माझ्या
तोंडाकडं बघत बस.. वीसच रूपै राह्यलेत आता..!

६. मला आत्ता हे लिहिताना जसं वाटतंय ते तसंच तंतोतंत
तुलाही वाटायला हवंय..! तू वाचते आहेस ना हे? मग आता जशी असशील तशी ये..! आणि ताबडतोब माझा गळा कापून घेऊन जा!

७. एखाद्या विचारसरणीच्या फार आहारी जाण्यात अर्थ नाही..! मन विषारी होतं..! विरोधी मताची माणसं दुष्मन
वाटायला लागतात..!
उदाहरणार्थ एकेकाळी मी डाव्या विचारांची पुस्तकं लेख
मासिकं बक्कळ वाचायचो.. मग मला सगळीकडेच वर्गवाद
दिसायला लागला..! कुत्र्यांमध्येसुद्धा..! म्हणजे रस्त्यावरची भटकी भणंग कुत्री 'नाही रे' वर्गातली.. आणि आपापल्या
बुर्झ्वा मालकांसोबत फिरायला निघणारी गुबगुबीत कुत्री
'आहे रे' वर्गातली..!

तर हे प्रिय भटक्या श्वानबंधुंनो आणि भगिनींनो, तुम्ही ह्या
गुबगुबीत श्रीमंत कुत्र्यांवर भुंकू नका.‌.! आधी त्यांच्या
अनैसर्गिक चरबीकडे बघा..! त्यांच्या गळ्यातील साखळीकडे बघा..! अन्नाच्या बदल्यात मिळालेली साखळी आहे ती..! त्यांना घरातल्या लोकांना चावण्याचे स्वातंत्र्य नाही..!
तुम्हाला मात्र सर्वांना चावण्याचं मुक्त स्वातंत्र्य आहे..!
एकमेकांना बेहिशेब घोळसण्याचं स्वातंत्र्य आहे..!
तुमच्या रक्तातील आदिम हाक अजून शाबूत आहे..!
ती जपून सांभाळा..!
कशाला उगाच आयुष्याबद्दल तक्रार करता..!

८. श्वासांची करवत. काळाचं लाकूड. कापत रहा. कापत रहा.

९. बागेत एखाद्या बेंचवर निवांत बसून झाडाची खाली पडत पानं असलेली बघणं, हे माझ्या छंदाच्या कक्षेत येतं..!
गिरक्या घेत घेत पडणाऱ्या पानासोबत मनही हवेत सैलावत झुलत खाली खाली येत राहतं..!
आणि जेव्हा पान जमिनीवर आदळतं, तेव्हा मनासोबत
सगळंच क्षणभर स्तब्ध होऊन जातं...!
मग पुन्हा दुसरं पान..! मग तिसरं..!
आणि ह्याला अजूनतरी काही पैसे मोजावे लागत नाहीत,
हे एक बरंय..!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं!
स्वारगेटला पोचल्यावर 'ठेसन..ठेसन..ठेसन हाय का?' असतंच. त्यापेक्षा मुळात स्वारगेटलाच कशाला जा? Wink

तर हे प्रिय भटक्या श्वानबंधुंनो आणि भगिनींनो, तुम्ही ह्या
गुबगुबीत श्रीमंत कुत्र्यांवर भुंकू नका.‌.! आधी त्यांच्या
अनैसर्गिक चरबीकडे बघा..! त्यांच्या गळ्यातील साखळीकडे बघा..! अन्नाच्या बदल्यात मिळालेली साखळी आहे ती..! त्यांना घरातल्या लोकांना चावण्याचे स्वातंत्र्य नाही..!
तुम्हाला मात्र सर्वांना चावण्याचं मुक्त स्वातंत्र्य आहे..!
एकमेकांना बेहिशेब घोळसण्याचं स्वातंत्र्य आहे..!
तुमच्या रक्तातील आदिम हाक अजून शाबूत आहे..!
ती जपून सांभाळा..!
कशाला उगाच आयुष्याबद्दल तक्रार करता..!>> माहिती विना गैरसमज आहेत हो. पाळीव व भटके एकमेकांत भांडत नाहीत. उन्हात ताहानलेली / पावसात भिजून कुडकुडलेली / थंडीत बसल्या जागी श्वास सोडणारी भटकी पाहिली आहेत का? त्यांच्यासाठी काही उपलब्ध केले आहे का? कोरडा आसरा व एखादे पोते /मुठभर पेडिग्री घोट भर पाण्यासाठी ती किती तडफडतात सर्व कुत्र्यांना अन्न पाणी व आसर्‍याचा हक्क आहे.
ते पुरवण्याचा प्रय त्न करणारे लोक आहेत.

छान
दारू पिऊन उलट्या करणाऱ्यांचे, अन्नाच्या बदल्यात साखळी असलेल्या कुत्र्यांचे, आणि झाडावरून पडणारे पान निवांत बघायच्या छंदाचे, हे तीन आवडले.

हे काय आहे? चिंतन? आत्मप्रगटन? absurdism? existetialism ?
लिहिलंय चांगलं. तुटक तुटक लिहून त्यातून एक स्टोरी उभी करायची, एक narrative उभं करायचं.
पण असं stranger, outsider असल्यासारखं का दाखवायचं/ मिरवायचं ?
असं पाचशे हजार शब्दांचं तुटक लिखाण नको. एक सलग कादंबरी, दीर्घकथा लिहा. ठुमऱ्या बऱ्याच झाल्या. आता बडा ख्याल येऊ दे.

प्रतिसादांबद्दल आभार भरत, वावे, ऋन्मेष.

अमा,
'ते' मी थोडं वेगळ्या context मध्ये लिहिलं होतं आणि ते अपुरंही आहे.. असो. Happy
पण तुमचा मुद्दा माझ्यापर्यंत पोचला आहे..
रस्त्यावरची किंवा घरातली कुत्री, एकदा ओळख पटल्यावर काय पद्धतीचा जीव लावतात ते मी पुरेपूर अनुभवलं आहे, अनुभवतही असतो.
-- (सुदैवी श्वानप्रेमी) पाचपाटील

हीरा,
प्रतिसाद भारीय.
मर्मावर बोट वगैरे.. तेही अगदी संयत शब्दांत..!
<<
हे काय आहे? चिंतन? आत्मप्रगटन? absurdism? existetialism ?
>>

'खरडायची राहून गेलेली पानं..!' हा अजून एक (खरंतर भलताच) पर्याय..!

-- (तूर्तास विखुरलेपण कमी करून एकसंघ होण्याच्या प्रयत्नात असलेला) पा.पा.