मराठी भाषा गौरव दिवस २०२२ - समारोप

Submitted by संयोजक-मभादि on 3 March, 2022 - 07:15

नमस्कार मायबोलीकर मंडळी,

मराठी भाषा गौरव दिनाची सांगता झाल्याची घोषणा आता आम्ही संयोजक मंडळ करत आहोत. ज्यांची अभिवाचने अजून प्रकाशित होणे बाकी आहे, ती यथावकाश होतीलच. ह्या निमित्ताने समारोपाचे चार शब्द आम्ही लिहू इच्छितो.

दरवर्षी हा उपक्रम आपण आपल्या मायमराठीवरील प्रेम व्यक्त करायला एक निमित्त म्हणून राबवतो, असे म्हणू शकतो. आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका असणाऱ्या मराठी भाषेच्या सौंदर्यस्थळांची चर्चा घडावी, नवीन माहिती कळावी, अन पुढच्या पिढीला गोडी निर्माण व्हावी हा उद्देश याही वर्षी साध्य झाला. यासाठी नक्कीच आपण सर्व मायबोलीकर कौतुकास पात्र आहात.

विविध अलंकार, शब्दांचा झब्बू, गाण्याच्या भेंड्या या खेळांना खूपच छान प्रतिसाद लाभला. उत्साही मायबोलीकरांनी रोजच्या खेळांमध्ये हिरीरीने सहभाग नोंदवला. काही वेळा उद्बोधक चर्चा होऊन भाषेतील गमती आणि खाचाखोचा नव्याने माहिती झाल्या. 'सरस्वतीची चिरंजीव मुले' आणि 'माझे मराठीचे मास्तर/मराठी च्या बाई' ह्या दोन्ही उपक्रमात आलेले सर्वच लेख वाचनीय होते. आपापल्या जगण्यातील काही छोट्या वाटणार्‍या परंतु महत्त्वाच्या असणार्‍या आठवणींचे स्मरणरंजन त्यातून झाले, असे म्हणता येईल. त्याबरोबरच अभिवाचन/साहित्य वाचन उपक्रमात सहभागी सर्वांचे विशेष कौतुक संयोजक मंडळाला करावेसे वाटते. ह्या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला व हितगुजमध्ये हाही एक प्रकार असावा, अशीही मागणी पुढे आली, ह्याने आमच्या उत्साहाला वेगळेच कोंदण मिळाले.

अक्षरचित्रे उपक्रमास मात्र एकही प्रवेशिका आली नाही असे खेदाने सांगावेसे वाटते. परंतु सध्या मुलांच्या शाळा आणि इतर उपक्रम जोमात असल्यामुळे कदाचित हा फरक पडला असावा. पुढील वेळी मराठी भाषा गौरव दिनास मुलांचा सहभाग मिळावा, यासाठी काय करावे लागेल याबद्दल काही सूचना असल्यास त्यांचे स्वागतच आहे.

सोहळ्यादरम्यान आलेल्या सूचनेनुसार २७ फेब्रुवारी हा 'मराठी भाषा दिवस' नसून 'मराठी भाषा गौरव दिन' असल्याचे लक्षात आले. ते लक्षात आणून दिल्याबद्दल चीकू यांचे आभार.

संयोजक मंडळाच्या हरचंद पालव, किशोर मुंढे, भास्कराचार्य, किल्ली, तेजो, आणि कुंतल या सर्व सदस्यांनी आपापले व्याप सांभाळून ह्या उपक्रमांसाठी वेळ दिला. चर्चा करून, अडचणी दूर करत उपक्रम यशस्वीरीत्या राबविले. अर्थातच मायबोलीकरांच्या सहकार्याने हे शक्य झाले. त्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे आम्ही ऋणी आहोत. त्याचबरोबर प्रशासनाने हरतर्‍हेचे सहकार्य संयोजक मंडळाला देऊ केले. त्याबद्दल आणि विशेषतः तांत्रिक मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल मायबोली प्रशासनाचे आम्ही आभार मानतो.

अखेरीस मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व उपक्रमांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो. आपल्या मायबोलीचा हा उत्सव दर वर्षी वृद्धिंगत होत राहो अशी इच्छा व्यक्त करून हे संयोजकांचे मनोगत संपवतो.

- हरचंद पालव, किशोर मुंढे, भास्कराचार्य, किल्ली, तेजो, आणि कुंतल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हरचंद पालव, किशोर मुंढे, भास्कराचार्य, किल्ली, तेजो, आणि कुंतल
सर्वांचे सुरेख उपक्रम आयोजित केल्याबद्दल अभिनंदन !

कृतार्थ झालो !

संयोजकांचे अभिनंदन. अभिवाचन आणि मराठीच्या शिक्षकांबद्दलचे लेख विशेष करुन आवडले. शांताबाईंच्या कवितांची उजळणी झाली, भीमसेन जोशींची माझी आवडती गाणी इतरांच्याही लिस्टवर आहेत ते पाहून मजा वाटली.
तुम्हा सर्वांना मायबोली उपक्रमाच्या संयोजनाचा अनुभव खूप काही शिकवून गेला असणार. घरचे/ ऑफिसचे व्याप सांभाळून हे सर्व नीट पार पाडलंत या बद्दल पुनश्च अभिनंदन आणि धन्यवाद

आयोजन उत्तम होते...
त्यासाठी संयोजकांचे अभिनंदन.
अजून बरेच वाचायचे/ऐकायचे आहे. जे वाचले/ऐकले ते आनंददायी, ज्ञायदायी होते. त्यासाठी लेखकांचे आभार....
शेवटी सगळ्या प्रतिसादातून वाहणाऱ्या प्रतिभाशाली ज्ञानगंगेला अभिवादन .

संयोजन उत्तम होते. एक जाणवले ते म्हणजे संयोजकांवर येणारा ताण.
विशेषतः अभिवाचनासारख्या स्पर्धेत जिथे प्रवेशिकांसाठी ईमेल्स चेक करणे, वेमांच्या मेल मधे आवश्यक परवानग्या आल्यात कि नाही ते चेक करणे , आलेल्या प्रवेशिकांमधून एमपी४ फाईल्सवर योग्य ते संस्करण करणे, अधून मधून संवाद ठेवणे यात किती वेळ जात असेल याची पूर्ण कल्पना आहे. माझ्या माहितीप्रमाणे मायबोलीच्या धाग्यातच विंडो उपलब्ध करून देणारा हा पहिलाच उपक्रम असावा. (काही वर्षांपूर्वी सदस्यांनाच ही सुविधा उपलब्ध होती असे आठवते).

जन्मशताब्दीनिमित्त आलेल्या लेखांत विविधता होती. एकाच वेळी खूप लेख आल्याने सगळे वाचणे शक्य झाले नाही तरीही एकंदर चांगला कार्यक्रम झाला.

सूचना तरी काय करणार ?
२०१३ जानेवारी पासून महाराष्ट्र शासनाने २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून स्विकारला आहे. त्या आधी या दिनाचे नाव
"कुसुमाग्रज - मराठी भाषा गौरव दिन" असे योजले होते अशी माहिती आहे. शासनाच्या दप्तरात मात्र कुसुमाग्रज यांचा जन्मदिन "मराठी भाषा गौरव दिन" असे लिहीले आहे. पूर्वीचा वाकप्रचार जास्त योग्य होता. कुसुमाग्रज हे मराठी भाषेचे गौरव आहेत असे धनित होत होते.

शासन दरबारी "मराठी भाषा दिन" किंवा " राजभाषा दिन" हा आणि महाराष्ट्र दिन एकच आहे. कारण राज्य भाषावार आहे. या दोन्ही दिवसाचे औचित्य साधत काही उपक्रम मराठी भाषा दिनाच्या वेळी घेतले तर दोन्ही दिवस साजरे होतील आणि एकाच वेळी ताणही येणार नाही. फेब्रुवारी मार्च हा दहावी बारावीच्या परीक्षांचाही काळ आहे. इथून पुढे सर्व इयत्तांच्या परीक्षा होतात. एक मे ला हे सर्व बालगोपाळ सुट्टीचा आनंद उपभोगत असतात. त्यांना असे खेळ नक्कीच आवडतील. सुट्टीत त्यांना चांगला उपक्रम सुद्धा देणे पालकांना शक्य होईल असे सुचवावेसे वाटते.

धन्यवाद.

विशेष दिन, फार छान साजरा झाला. संयोजकांनी प्रचंड मेहनत घेतली. खूप आभारी आहे.
हरचंद पालव, किशोर मुंढे, भास्कराचार्य, किल्ली, तेजो, आणि कुंतल - आभार आभार आभार!!! _/\_

यावेळचं संयोजन अतिशय उत्तम होते.मायबोलीकरांच्या उत्साहाला तुम्ही छान दाद दिलीत. वाट मिळवून दिलीत. त्याबद्दल मनःपूर्वक आभार.

मगौदि खूप छान साजरा झाला, संयोजक.
उपक्रमही कल्पक होते आणि नियोजनही उत्तम होतं.

या ग्रूपमधले धागे मला 'माझ्यासाठी नवीन' रकान्यात सुरुवातीला दिसत नव्हते.
त्यामुळे, आणि त्या दिवसांत वेळही न मिळाल्यामुळे खेळांमध्ये भाग घेता आला नाही. शेवटी मुदत वाढवून मिळाल्यामुळे लेखन, अभिवाचन पाठवता आलं याचं समाधान वाटतं.

या निमित्ताने खूप छान छान लेख आणि अभिवाचनांचा आस्वाद घेता आला.
संयोजक, प्रशासक आणि सहभागी मायबोलीकर, सर्वाचे अनेक आभार! Happy

अरे हो, तेवढं मुख्य पानाचं बघा की शक्य असेल तर! हे इथे आहे तसं.

मस्त साजरा झाला यंदाचा मराठी भाषा गौरव दिन...!
संयोजक मंडळाचे खूप आभार आणि खूप कौतुक...
उपक्रमांसाठी मुदत वाढ दिल्यामुळे शालेय जीवनाच्या जुन्या स्मृतींना उजाळा देणारा लेख लिहता आला... धन्यवाद..!!

यंदाचे उपक्रम मस्त होते किंबहुना आहेत.. कारण समारोप झाला असे वाटत नाहीये अजून.. वातावरण उत्सवाचेच आहे अजूनही.. .
थ्री चीअर्स फॉर संयोजक !!!

संयोजक मंडळाचे खूप कौतुक आणि आभार! छान होते सगळेच उपक्रम!
उपक्रमात सहभागी झालेल्या मायबोलीकरांचेही आभार. माझे अजून बरेचसे वाचायचे आणि ऐकायचे बाकी आहे, म्हणून ही नुसतीच पोच.

संयोजक मंडळाचे खूप कौतुक आणि आभार! छान होते सगळेच उपक्रम! >>> +७८६
संयोजक मंडळाला सर्वांचे सर्व ड्युआयडी माहिती होत असतील ना ? Wink अ‍ॅडमिन आणि वेमांप्रमाणे त्यांच्यावर विश्वास टाकता येईल ही खात्री वाटते.
पुढच्या वर्षी ऋ सरांच्या मार्गदर्शनाखाली मी पण काम करीन.

सगळे उपक्रम छान होते. उत्तम लेख वाचायला मिळाले, सगळ्या लेखांवर आणि अभिवाचनांच्या धाग्यांवर स्वतंत्र प्रतिक्रिया नोंदवता आली नाही, पण समृद्ध करणारा अनुभव होता. संयोजक मंडळाचे आभार.

उत्तम आणि कल्पक संयोजन. मस्त झाला मराठी भाषा गौरव दिन सोहळा. सर्व संयोजकांचे कौतुक आणि आभार.

अजुन बरंच वाचन बाकी आहे, ते आता हळूहळू वाचतेय.

कमालीचा सुंदर झाला ह उपक्रम! अजून खूप वाचायचं आहे, पण जे वाचलं/ ऐकलं ते सुरेखच आहे!
संयोजक, हॅट्स ऑफ! मनापासून कौतुक आणि आभार __/\__

कमालीचा सुंदर झाला ह उपक्रम! अजून खूप वाचायचं आहे, पण जे वाचलं/ ऐकलं ते सुरेखच आहे!
संयोजक, हॅट्स ऑफ! मनापासून कौतुक आणि आभार __/\__ >>>> प्रज्ञा9+1

सर्व प्रवेशिका वाचायच्या आहेत. वाचते.

<<<<पुढील वेळी मराठी भाषा गौरव दिनास मुलांचा सहभाग मिळावा, यासाठी काय करावे लागेल याबद्दल काही सूचना असल्यास त्यांचे स्वागतच आहे.>>>>

मी सहज तूनळीवर फेरफटका मारत असता ब-याच बालभारती आणि कुमारभारतीतल्या वेगवेगळ्या कविता आढळल्या. त्यापैकी मला काव्यगंध चॅनेल वर छान ॲनिमेशन आणि सुस्वर गायन केलेल्या कविता आढळल्या...एक नमुना म्हणून इंदिरा संत यांची ६ वी ला असलेली "गवत फुला" हि कविता पहा...
https://youtu.be/6nFa4dDXWR4

मुलांना ॲनिमेशन वगैरे नाही जमले तरी त्यांना आवडणा-या कुठल्याही कवितेचे गायन अथवा अभिवाचन जमेल. कदाचित थोडी तालीम घ्यावी लागेल. पण हे त्यांना आवडेल असे वाटते.

छान झाला उपक्रम. सर्व संयोजकांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे . सर्व संयोजकांचे अभिनंदन आणि मनापासून आभार !!!

उत्तम आणि कल्पक संयोजन. मस्त झाला मराठी भाषा गौरव दिन सोहळा. सर्व संयोजकांचे कौतुक आणि आभार.

अजुन बरंच वाचन बाकी आहे, ते आता हळूहळू वाचतेय. >>> +1

संयोजक मंडळाचे हार्दीक अभिनंदन खुप सुरेख, नेटका आणि नाविन्यपूर्ण असा खूप वर्ष लक्षात राहिल असा उपक्रम साजरा झाला .
मायबोलीचे आणि सर्व मराठी प्रेमींचे अभिनंदन .

यानिमित्ताने सर्वांनी नेहमीशक्यतो मराठी शब्दांचा वापर करावा . एखादा शब्द माहित नसल्यास तिथेच न लाजता विचारावे असे सुचवावेसे वाटते . आपल्या गावातील बोलीभाषेतील शब्द वेगळे असले तर उतमच .