रशियावर पश्विमी राष्ट्रांनी घातलेली आर्थिक निर्बंध आणि परिणाम

Submitted by अमितव on 2 March, 2022 - 13:02

रशिया युक्रेनवर हल्ला करेल वाटू लागल्यावर आणि प्रत्यक्ष हल्ला केल्यावर अनेक पश्विमी राष्टांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध घातल्यावर अनेक बातमीपत्रांत/ रेडिओवर हे असे लादलेले आर्थिक निर्बंध कधीच काम करत नाहीत पासून निर्बंधं घालून हवे ते करुन घ्यायचे असेल तर ते कशा प्रकारचे निर्बंध हवे याबद्द्ल अनेच चर्चा, मतमतांतरे ऐकली.
ते निर्बंध काय आहेत आणि त्यांचे परिणाम काय अपेक्षित आहेत आणि ते कसे होत आहेत याची ढोबळ यादी आणि चर्चा करायला हा धागा.

हा धागा ललित लेखनात काढतोय, कारण आर्थिक नाड्या आवळून बलाढ्य राष्ट्राला नमवता येतं का? आलं किंवा नाही आलं तर ते का? या उत्सुकतेपोटी त्या विषयावर अधिक वाचायची, समजुन घ्यायची इच्छा आहे. त्याचे राजकीय परिणाम अर्थातच आहेत. पण राजकारणावर चर्चा करणे हा या धाग्याचा हेतू नाही. तरी यासाठी राजकीय व्यतिरिक्त अजुन योग्य विभाग असल्यास सुचवावे.

 • स्वीफ्ट SWIFT प्रणालीतून गच्छंती:
 • शनिवार २६ फेब्रु. २०२२ ला युरोपीयन युनियन (ईयू), अमेरिका, युके आणि कॅनडाने रशियाला SWIFT मधुन बाहेर काढायचे ठरवले. ऑनलाईन पैसे पाठवताना SWIFT कोड लागतो हे आपल्याला माहितच आहे. तर SWIFT ही आंतराष्ट्रीय मेसेजिंग सुविधा आहे, ज्या अंतर्गत ११,००० हुन अधिक आर्थिक संस्था एकमेकांशी संलग्ग्न होऊन आपले व्यवहार सुरक्षित आणि सुकर करतात.
  हे केल्याने रशियातील बँकांना, तेथील धनाढ्य लोकांना आणि सामान्य नागरिकांना व्यवहार करण्यात अनंत अडचणी येतील.

 • आंतरराष्ट्रीय मालमत्तांची गोठवणूक
 • रशियाच्या सेंट्रल बँकेची इतर चलनांत असलेली आंतरराट्रीय गुंतवणूक वापरावयास आणि चलन बदल करण्यास निर्बंध घातले आहेत.

 • सोनेरी वर्खाचा पासपोर्ट
 • युरोपिअन राष्ट्रसंघाने त्यातील देशांत गुंतवणूक करुन पासपोर्ट मिळविण्याचा रशिअन नागरिकांचा मार्ग बंद केला आहे. रशिअन धनाढ्य नागरिक इतर देशांत गुंतवणूक करुन तेथिल नागरिकत्त्व स्वीकारुन तेथील आर्थिक जालाचा गैरफायदा घेत असत. त्याला याने आळा बसू शकेल.

 • स्वित्झर्लंडचेही निर्बंध
 • स्वित्झर्लंड सारख्या जगप्रसिद्ध तटस्थ देशानेही आलगार्क बरोबरच पुटीन, सर्गे लॅव्हरॉव्ह आणि प्रंतप्रधानांच्या मालमत्ता त्वरित गोठविल्या आहेत, आणि आपला निर्बंधांवरील असलेला पूर्वीचा चष्मा बदलला आहे.

 • फ्रांसचे चैनीच्या वस्तूंवरील निर्बंध
 • रशिअन आलगार्क आणि इतरांच्या आर्थिक मालमत्ता, स्थावर मालमत्ता, यॉट्स, इतर चैनीच्या गाड्यांवर फ्रांसने निर्बंध आणले आहेत.

  ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, जपान इ. अनेक देशांनी रशिअन मालमत्ता, पुटीच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. अनेकांनी आलगार्कंना देशांत येण्यापासून रोखले आहे.

 • अमेरिकन डॉलर मध्ये व्यवहारास प्रतिबंध
 • रशिअन सेंट्रल बँकेला अमेरिकन डॉलर मध्ये व्यवहारास प्रतिबंध केला आहे. रशिअन डिरेक्ट इनव्हेंस्टमेंट फंडावर निर्बंध घातले आहेत. रशिआ आप्त्कालिन वापरासाठीचा पैसा अमेरिकन डॉलर मध्ये ठेवते. सध्या रुबल नीचांकी पातळीवर आहे, त्यात त्यांना अमेरिकी पैसाही वापरता येणार नाही.

 • तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर निर्बंध
 • याद्वारे रशियाच्या सामरिक आणि वायुदलाच्या वाढीवर निर्बंध बसतील. सेमीकंडक्टर, दूरसंवाद, एनक्रिप्शन, सुरक्षा, लेसर, नेविगेशन, सेंसर्स, विमान आणि सागरी तंत्रज्ञान आणि सुटे भाग या सर्व प्रकारच्या निर्यातीवर यायोगे निर्बंध बसतील.

 • अमेरिकेत पैसे उभे करण्यापासून निर्बंध
 • Gazprom आणि Sberbank सारख्या बलाढ्य उर्जा आणि आर्थिक संस्थांना अमेरिकेत भांडवल उभे करण्यावर निर्बंध घातले आहेत.

 • बेलरूस वर निर्बंध
 • रशियाचा साथिदार बेलरुस वरही अमेरिका, न्यूझिलंड, कॅनडा इ. अनेकांनी असेच जाचक निर्बंध घातले आहेत. तेथिल नागरिकांचा प्रवेश, आर्थिक आणि इतर संस्थांची स्थगित गुंतवणूक इ. प्रकारचे हे निर्बंध आहेत.

 • विमान आणि नौका बंदी
 • कॅनडाने हवाईहद्दीवर निर्बंध घालून रशियन विमानांना प्रवेश बंद केला आहे. तसेच जहाजांनाही बंदी घातली आहे.

 • खनिज तेल
 • कॅनडाने खनिज तेल आयातीवर बंदी घातली आहे.
  जर्मनीने नव्या पाईपलाईचे सर्टिफिकेशन थांबवले आहे.

 • व्हिसा/ मास्टरकार्ड
 • व्हिसा, मास्टरकार्ड या अमेरिकी वित्तसंस्थांनी काही रशियन बँकाबरोबरीचे व्यवहार स्थगित केले आहेत.

 • स्वयंचलित वाहने
 • मर्सिडीज, वॉल्वो, फोर्ड, जीएम, होंडा, मित्सुबिशी, रेनो, बीएमड्ब्लू, माझदा, जग्वार लँड रोव्हर इ. अनेक कंपन्यांनी निर्यात आणि उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

 • हवाई तंत्रज्ञान
 • बोईंग, एअरबस ने स्पेअर पार्ट्स, देखभाल आणि तांत्रिक सपोर्ट बंद केला आहे.

 • खनिजतेल आणि कंपन्या
 • एक्सॉन मोबिल, शेल, टोटल एनर्जी (फ्रांस), इक्विनॉर (नॉर्वे), ऑर्स्टेड (डेन्मार्क) आणि इतर अनेक खनिजतेल, गॅस, कोळसा इ. क्षेत्रांत काम करण्यार्‍या कंपन्यांनी गुंतवणूक सोडून दिली आहे, काही विकत आहेत, काहींनी खरेदी बंद केली आहे इ.

 • चित्रपट
 • डिस्ने, वॉर्नर, सोनी इ. कंपन्यांनी रशियात चित्रपट दाखवणे बंद केले आहे.

 • दळणवळण
 • फेडेक्स, युपीएस आणि इतर अनेक कंपन्यांनी पार्सल सेवा बंद केली आहे. कंटेनर आणि शिपिंग कंपन्यांनी जाणारी आणि येणारी सेवा बंद केली आहे.

 • तंत्रज्ञान
 • अ‍ॅपलने विक्री बंद केली आहे, गूगलने अ‍ॅप स्टोरवर निर्बंध घातले आहेत, मायक्रोसॉफ्टने जाहिरात बंदी, स्टेटच्या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे, डेल ने विक्री बंद केली आहे.

  टायर्स, घरगुती उपकरणे, रासायनिक पदार्थ, इलेक्ट्रॉनिक्स चिप्स इ. अनेक उद्योगांनी बंदी घातली आहे. रशिया जरी ७०% चिप्स चीन कडून आयात करत असला तरी अमेरिकी इलेक्ट्रॉनिक्स चिप्स निर्बंधांचा बराच परिणाम होईल असं तज्ज्ञ म्हणतात.

हे निर्बंध एकेक करुन बघितले तर येवढ्याने काय होणार असं वाटतं. पण एकजुटीने आणि सर्वसमावेशन घातले गेले तर कदाचित चमत्कारही घडू शकेल.

वरील अनेक आर्थिक निर्बधांमुळे रुबल ३०% हुन अधिक गडगडला आहे. सामान्य नागरिकांचे व्यवहार बंद झाल्याने त्यांच्या नगदी नोटा काढण्यासाठी बँकांबाहेर रांगा लागल्या आहेत, एटीएम यंत्रांतील पैसे संपले आहेत. काही लोक रुबल बाळगण्या ऐवजी घरातील उपकरणे (फ्रीज, वॉशिंग मशीन) घेत आहेत. किमान त्या उपकरणांच्या किंमती तरी गडगडणार नाहीत, कारण त्यांना डॉलर घेणे अशक्य झाले आहे. अशा आणि इतर बातम्या गेले काही दिवस ऐकतो आहे.

ही यादी वाढतच जाईल आणि सध्यातरी रशियाच्या मुसक्या आवळायची आत्यंतिक गरज आहे, पण आण्वस्त्र धमकी मुळे पश्चिमी राष्ट्रे प्रत्यक्ष युद्धभूमीवर मदत करण्यापासून सध्यातरी चार हात लांबच रहातील अशी स्थिती दिसते आहे.

रशिया हा युएसएसआर नाही, आणि आंतरराष्ट्रीय बाजाराशी खोलवर गुंतलेला आहे. अर्थात या निर्बंधांनी जी-७ देशांवरही अनुचित परिणाम/ नुकसान होईलच. हे निर्बंध कितपत अडकवतील, ते खर्‍या अर्थाने काम करे पर्यंत किती काळ जाईल? क्रिप्टोकरंसीचे काय? इ. अनेक प्रश्न मनात आहेतच. निर्बंध घालतानाही आपली कातडी वाचवण्यासाठी काही लोकांना यापासून मुद्दाम तर दूर ठेवले नाही ना? ही शंका घेण्यासारखे ही अनेक प्रसंग घडले आहेत, घडत आहेत.

आज इतिहास लिहिला जातोय, इतिहास बदलला जातोय. हेच काय ते खरं!

संदर्भ:
१. https://www.cnn.com/2022/02/25/business/list-global-sanctions-russia-ukr...
२. https://www.international.gc.ca/world-monde/international_relations-rela...
३. https://www.reuters.com/world/canada-shuts-ports-russian-ships-widening-...
४. https://www.reuters.com/business/corporate-ties-russia-uprooted-sanction...
५. https://www.reuters.com/business/mastercard-blocks-multiple-russian-fina...
६. https://fortune.com/2022/02/25/biden-ban-chip-semiconductors-exports-rus...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण राजकारणावर चर्चा करणे हा या धाग्याचा हेतू नाही. तरी यासाठी राजकीय व्यतिरिक्त अजुन योग्य विभाग असल्यास सुचवावे. >>>> चालू घडामोडी ?

चालू घडामोडीतच काढायचा प्रयत्न होता. पण तिकडे लेखनाच्या धाग्याचा ऑप्शनच दिसला नाही आज.

धन्यवाद हे सगळे लिहील्याबद्दल. मला त्रोटक वाचले होते काय काय निर्बंध आहेत त्याबद्दल. काल बायडेनच्या स्टेट ऑफ द युनियन मधेही ऐकले. "इव्हन स्वित्झर्लण्ड" अशा शब्दांत त्याने उल्लेख केला Happy

हुकुमशहांच्या विरोधात त्या देशातील लोकांना त्रास होईल असे निर्बंध आणण्यात एक धोका हा असतो की सर्वसामान्य पब्लिकही मग त्या हुकूमशहाच्या बाजूने उभे राहू शकते. सर्वसामान्य रशियन लोकांचा या आक्रमणाला विरोध आहे असे चित्र आत्तापर्यंततरी वेस्टर्न मीडिया मधे दिसत आहे. या निर्बंधांमुळे जनरल पब्लिक आणखी उठाव करेल, की पुतिनला सपोर्ट करेल, माहीत नाही.

सँक्शन्स चे मला समजलेले लॉजिक हे आहे - या देशांतील धनाढ्य लोकांना स्वतःच्याच देशात पैसा ठेवायला सेफ वाटत नसते. कारण कधी राज्यकर्त्यांची मर्जी बदलेल सांगता येत नाही. रशिया, चीन दोन्हीकडे हेच आहे. त्यामुळे हे लोक इतरत्र, विशेषतः लोकशाही व मुक्त अर्थव्यवस्था असलेल्या देशांमधे ते गुंतवतात. त्या मालमत्तेवर टाच आली तर हे लोक मग अशा हुकूमशहांना विरोध करू शकतात. जर पुतिनसारखे लोक यांच्या पाठिंब्यावर अवलंबून असतील तर मग त्यांना मागे हटावे लागते.

दोन प्रश्नः
१. हे असे निर्बंध पूर्वी यशस्वी झाले आहेत अशी उदाहरणे आहेत का?
२. हे असे काही होईल याची तयारी पुतिन व तेथील ऑलिगार्क्सनी केली असेल ना? की इतकी वेळ येणार नाही - नेटो देशांमधे इतकी एकजूट होणार नाही - या गृहीतकावर हे आक्रमण केले गेले?

एकंदर रशियाच्या मुसक्या आवळण्याचे काम चालू आहे. आवरणार का पण इतक्याने.
https://www.nytimes.com/2022/02/27/us/politics/putin-nuclear-alert-biden...
अणुयुद्धाची भाषा (सुसज्जतेची कॄती) करतोय ना रशिया! मग इतकंही त्याला कोंडीत सापडवु नका की 'They have nothing to lose' परिस्थिती येइल Sad

काल एका ठिकाणी वाचलं त्याप्रमाणे कीव्ह पहिल्या काहीच दिवसात हाताला लागेल असा रशियन कयास होता. युक्रेनि सामान्य नागरिक आणि जवान इतकं तग धरतील असं वाटलं न्हवतं. लिंक सापडली की देतो.
सॅक्शन काम करतात का याची मोजपट्टी ज्यासाठी हे केलं ते मिळालं का? किती लगेच मिळालं? ही असली पाहिजे. त्यावर विचार करता अजुन तरी वर्क झालेली नाहीत असं नि:संदिग्धपणे म्हणावं लागेल. ज्यासाठी निर्बंधांचा अट्टाहास आहे ते जितके उशीरा हाताशी लागेल त्यावरुन निर्बंध काम करत नाही म्हणावं का याविना परिस्थिती आणखी भयावह असती. इतक्यात निभावलं म्हणावं हे आपापल्या पवित्र्यावर अवलंबुन असेल कदाचित.

पुढे काय परिणाम होतो ते पाहणे रोचक ठरेल. ह्या निर्बंधांचा रशियन अर्थव्यवस्थेवर परिणाम हा उघडच आहे. परंतु इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर काय विपरित परिणाम होईल हे ही पहावे लागेल. ह्या कंपन्या, ज्या रशियात गुंतवणूक करत होत्या किंवा देश जे रशियाकडून आयात करत होते, ते काही रशियावर उपकार म्हणून करत नसणार. त्यांचा जो काही फायदा ह्या व्यवहारातून होत असे, त्यात आता तोटा होईल. शिवाय रशियाही ह्यावर उत्तर म्हणून काय पावले उचलते तेही बघावे लागेल. (पोखरण अणुचाचण्यांनंतर भारतावर अमेरिका आणि यु यु ने घातलेल्या निर्बंधांची आठवण झाली.)

सगळ्या जगाला गुंडाळून ठेवण्यात रशिया यशस्वी झाली असे वाटतेय. चीनही त्यांच्या बाजूने आहे. भारत तटस्थ.
( अमेरिका आणि रशिया यांच्याशी पंगा घेणे भारताला परवडणारे नाही.)

लष्करी takat ही सर्वात महत्वाची.
आता रशिया वर अमेरिका आणि eu नी आर्थिक बंधन घातली आहेत.
त्या वर लष्करी takat ह्याचा वापर करून चीन,भारत,रशिया (सात की आठ time झोन आहेत))
सर्व युरोपियन देशांचे समुद्री रस्ते आणि हवाई मार्ग बंद केले तर काय होईल .

भारताने काय केलं ह्याची ना अमेरिकेला पडलेली आहे, ना रशियाला त्याने काही मदत होणार आहे.
भारताने यू एन मध्ये काय केले याची बातमी/ चर्चा इथल्या वर्तमानपत्रात दिसल्या नाहीत फार. चर्चा चीन ने खरंच मदत करायची ठरवली तर निर्बंध काम करतील का? आणखी काय बदल करावे लागतील अशा अनुषंगाने वाचल्या.
भारताने स्वतःच्या फायद्याचे जे असेल ते करावे. त्याने जगाच्या परीस्थितीत काहीच फरक पडेल असं वाटत नाही. भारताच्या दीर्घकालीन परिणामांचा विचार करावा आणि निर्णय घ्यावा. लोकशाही देशाने ज्याला जी ७ का ८ का १० मध्ये स्थान हवं आहे त्याने केवळ असुरक्षिततेपोटी हुकूमशहाची पाठराखण करणे जर आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असेल तर तमा बाळगण्याचे कारण नाही. ते तसं नसावं असं वैयक्तिक मला वाटतं.

https://threadreaderapp.com/thread/1499153205552623616.html
Asst State Secy Donald Lu at the US Senate Committee hearing on 'US Policy towards India'

अमेरिका न्याय्य हक्कांचा रक्षणकर्ता, कुठल्याही देशासाठी लोकशाहीचा पक्ष घेऊन उभा राहणारा आहे, असं मला वाटत नाही. तसा तो नसल्याचे अनेक दाखले आहेत.
भारताने काय केलं याची अमेरिकेला किती पडली आहे हे कळण्याइतकी वरची बातमी महत्त्वाची आहे का माहीत नाही.
भारताने इराणकडून तेल आयात करू नये म्हणून अमेरिकेने दबाव आणला होता.
रशियाकडून शस्त्रास्त्र घेऊ नयेत म्हणूनही आणला होता. ती ती घेता यावीत यासाठी काय देणंघेणं झालं (व्यक्ती नव्हे, देशांमध्ये ) ते उघड झालेलं नाही.

सुरक्षा समितीच्या बैठकीत तटस्थ राहणार्‍या देशांपैकी एकाने आमसभेत ठरावाच्या बाजूने मतदान केले.

अमेरिका भरवसा ठेवण्याचं लायकीच देश नाही .
भारता पेक्षा आकारमानाने खूप मोठा असून आणि सर्व बाबतीत भारतीय शेतकऱ्यानं पेक्षा प्रगत जास्त मोठ्या जमिनी चे मालक असलेल्या अमेरिकन शेतकऱ्या शी भारताने स्पर्धा करावी हा मूर्ख स्वार्थी विचार करून .भारतीय शेतकऱ्यानं ना जी तुटपुंजी मदत भारत सरकार देते त्या वर पण आक्षेप घेत असतो.
अमेरिका हा विश्वास ठेवण्यास योग्य देश नाही.
पाकिस्तान लं नेहमीच मदत करण्यात तो पुढे असतो.
रशिया ला पाठिंबा देणे हे भारताच्या हिताचेच आहे ..त्या साठी आता मोठी किंमत द्यावी लागली तरी चालेल

आर्थिक निर्बंध ह्या युरोपियन राष्ट्रांनी टाकले आहेत .
त्यांनी जास्त फरक पडणार नाही
फक्त अतिशय आक्रमक धोरण रशिया नी आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी अवलंबले तरी युरोपियन देश शरण येतील.
UAE, चीन ,भारत हे तर पक्के साथी आहेत.
आफ्रिकन खंडात युरोपियन राष्ट्रांना कसलेच संबंध ठेवता येणार नाहीत असे लष्करी आक्रमक धोरण रशिया नी पुढाकार घेवून अवलंबले पाहिजे.
आखाती देशातील सर्व गरजा रशिया आणि मित्र राष्ट्र ह्यांनी पूर्ण कराव्यात.
युरोपियन देश आणि अमेरिका ह्यांना विश्व बाजार मिळालाच नाही पाहिजे अशी रण निती आणि त्या साठी लष्करी आक्रमक पना हे दाखवले तर .
ही राष्ट्र शरण येतील.

युएस सरळसरळ व्यापारी देश आहे.
रशियाने तंबी दिली आहे स्पेसस्टेशनला गडबड केलीय तर युद्ध समजण्यात येईल. ( Russia Today channel चालू आहे. त्यावर पाहा. शिवाय मागच्या दोन वर्षांतल्या युद्धाच्या डॉक्यु दाखवत आहेत. त्या भागातील लहान मुलं गोळ्यांच्या पुंगळ्या,ग्रेनेडची झाकणं जमवून खेळण्यात वापरतात.

भारतीय शेतकऱ्यानं ना जी तुटपुंजी मदत भारत सरकार देते त्या वर पण आक्षेप घेत असतो.

पण त्यांचेकडे bailout असा चंगा शब्द आहे.

भारताने काय केलं ह्याची ना अमेरिकेला पडलेली आहे, ना रशियाला त्याने काही मदत होणार आहे...असे एकदम एका फटक्यात खरे नका बोलत जाउ, उगीच दुखावली जातात हळवी मने.

कुलकर्णीसर,
लिंक उत्तम आहे. तुमच्याकडून आली याचं सुखद आश्चर्य वाटलं. 2014 चा हिंसक coup हा नाटो-अमेरिकेने घडवून आणलेला regime change होता. याबद्दल वाचल्यानंतर एकूणच युक्रेन-रशिया प्रकरण दिसतं तितकं सरळ नाही हे लक्षात आलं. चिमुकला युक्रेन काही गरीब बिचारा निष्पाप नाही. भारताविरुद्धही काड्या केलेल्या आहेत. तिथल्याही नेत्यांच्या आणि नाझिंच्या कृत्याची फळं सामान्य लोकांना भोगायला लागत आहेत हे वाईट आहे.
मोदींनी घेतलेली भूमिका योग्य आहे. तुमचं तुम्ही बघा. युद्ध होऊ नये आणि निष्पाप नागरिकांचे जीव जाऊ नयेत इतकंच खरं.

रशिअन शस्त्रे आपण घेत आलो आहोत. सरकार बदलले तरी धोरण काही बदलता येत नाही. दुसरीकडे भारतीय नागरिक अमेरिकेत नोकऱ्या करतात मोठ्या संख्येने. कुणाला दुखवता येत नाही.
पण आपले असंख्त्र विद्यार्थी युक्रेनात ओलीस ठेवले गेले आहेत अजून. शिक्षण,भवितव्य आणि पैशाचा बोऱ्या वाजला आहे.

रशिया भारताचं मोदीचं म्हणणं ऐकते, त्यानुसार वागतेसुद्धा.
https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1499392091247419393
हा नवीन भारत आहे!
युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी 6 तास रशियाने युद्ध थांबवलं.

पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांच्याशी बोलल्यावर हे शक्य झालं.

रशियन एअरफोर्स विमान व सैनिकी वाहनाने बाहेर काढण्याचं जाहीर केलं.

युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी 6 तास रशियाने युद्ध थांबवलं.: बागचीची प्रेस कॉन्फरंस पाहिली का? त्याला पण हसु आवरत नव्हते. मह्तप्रयासाने हसु दाबत उत्तर दिले त्याने.

रशियाला महाराष्ट्राची द्राक्षे निर्यात होतात, नाशिक वाल्यांचे नुकसान आहे जर त्यांनी आयात थांबवली या धांदलीत तर. युक्रेनची तर थांबलीच आहे द्राक्षे आयात.

<< स्वीफ्ट SWIFT प्रणालीतून गच्छंती:
शनिवार २६ फेब्रु. २०२२ ला युरोपीयन युनियन (ईयू), अमेरिका, युके आणि कॅनडाने रशियाला SWIFT मधुन बाहेर काढायचे ठरवले. >>

------ रशियातल्या काही ' महत्वाच्या ' बँकांना वगळले आहे, पण यात सर्वच बँका नाही आहेत. आर्थिक नाड्या आवळल्या जात आहे आणि पहिले पेक्षा हे जास्त परिणामकारक शस्त्र आहे असे दाखवत आहेत.

रशियाला चीन मदत करेल. रशियाच्या सेंट्रल बँकेकडे अंदाजे १५० अब्ज (billion) डॉलर्सचे चायनीज बाँड्स आहेत आणि जोडीला Cross Border Interbank Payment System CIPS वापरु शकतात.
https://en.wikipedia.org/wiki/Cross-Border_Interbank_Payment_System

स्चित्झर्लंडने पहिल्यांदाच तटस्थता सोडून रशियावरच्या निर्बंधांत भाग घेतला आहे.
आता स्विस बँकांत असलेली रशियन धनाढ्यराजकारण्यांची खाती गोठवली जातील.

आमसभेत ठरावाच्या विरोधात आणि रशियाच्या बाजूने ५ मतं पडली . रशियाचे मित्र म्हणवल्या जाणार्‍या इराण, क्युबा या देशांनीही ठरावाच्या बाजूने मत दिलं.
संयुक्त अरब अमीरातींनी सुरक्षा परिषदेत तटस्थ भूमिका घेतल्यावर आमसभेत ठरावाच्या बाजूने मत दिलं. मध्यपूर्वेतल्या रशिया मित्रांनीही रशियाच्या बाजूने मत न देता ठरावाच्या बाजूने मत दिलं किंवा तटस्थ राहणं पसंत केलं.

जर रशिया व्हेतो करणार हे माहित होतं तर या सगळ्या फार्सचा उपयोग काय होता हे समजले नाही. केवळ रशियाविरुद्ध एकता दाखवणे हे उद्दिष्ट होतं का ?

सध्या वाढलेल्या गॅस च्या किंमती रशियाला युद्ध करायला पैसे मिळवून देणारी दुभती गाय आहे. हा रशियन गॅस आयात बंद केली तर युरोपला तडाखा बसेल आणि चालू ठेवली तर युद्ध चालू ठेवायला रशियाला निरंतर आणि भरपूर पैसे मिळत रहातील या कात्रीत सध्या सगळं आहे.
आण्विक इंधन तडकाफडकी बंद करणं जर्मनी आणि युरोप ला महागात पडणार आहे.

Pages