मराठी भाषा दिवस : माझे मराठीचे मास्तर / माझ्या मराठीच्या बाई-मोहिनी१२३- भाग १

Submitted by मोहिनी१२३ on 2 March, 2022 - 01:12

सर्वात प्रथम या निमित्ताने मभादि संयोजकांनी स्मरणरंजनाची संधी मिळवून दिली म्हणून त्यांचे खूप आभार.

लहानपणी घरात, बाहेर, शाळेत, अगदी पंचक्रोशीत सुध्दा प्रामुख्याने मराठी भाषेचाच बोलण्यात/लिहीण्यात वापर व्हायचा.
घरात लहान मुलांची पुस्तके, मोठ्या माणसांची मासिके/पुस्तके , शलाका ग्रंथालयाचे सभासदत्व …अगदी चंगळ होती.
२ री-३ री पासूनच मी मोठ्या माणसांची पुस्तके वाचू लागले. माहेर मासिकातील ज्योत्स्ना देवधरांचे लिखाण लख्खपणे आठवते आहे.

त्यात काही गंमती जंमतीही घडल्या.
आमचा बंगला होता. त्यात वरती आई-बाबा-मी-लहान भाऊ आणि खाली आजी-आजोबा-मामा असे रहात असू. मामा हा त्यातला त्यात लहान असल्याने बरोबरीचा वाटे आणि सगळ्या शंका त्याला प्रथम विचारल्या जात.
मी इयक्ता ३ रीत होते, तेव्हाचा हा किस्सा…
एकदा असे सर्वजण बसलो असताना
माझ्या मामाला मी विचारले
“या कादंबरीत डाळिंब्याच्या दाण्यासारखे ओठ,……. असं वर्णन केलं आहे. म्हणजे नक्की काय रे?
त्यानंतर बराच वेळ पसरलेला विचित्र सन्नाटा अजूनही माझ्या लक्षात आहे.

आमच्या शेजारी विनिता मावशी रहायची. ती तिच्या मुलासाठी खूप मासिके मागवायची. मी तिच्याकडे जाऊन तासंतास मासिके वाचत बसायचे.अर्थात याबद्दल कोणालाच काही हरकत नसायची.
हळुहळू माझ्या आजीला मात्र आपली नात रोज दुसर्यांकडे जाऊन मासिके वाचते हे काही बरे वाटेना. तिने आधी चालू असलेल्या मोठ्या माणसांच्या मासिकांबरोबर माझ्यासाठी लहान मुलांची मासिकेही सुरू केली. त्यावेळी माहेर,घरदार, साप्ताहिक सकाळ,मेनका,स्त्री, किशोर, चंपक,ठकठक अशी तब्बल ११ मासिके घरी यायची.
मे महिन्याच्या सुट्टीत बाबा पेटी भरून चांदोबा, चंपक, किशोक चे जुने अंक आणायचे. शेजारी-पाजारी ही मराठी पुस्तके अमाप असायची. त्यातूनच आम्ही मुला-मुलींनी लहान मुलांचे ग्रंथालयही काही काळ चालवले.
मराठी प्रमाणभाषेचा वापर बरोबर प्रकारे व्हावा याबद्दल जागरूकता होती. त्याबद्दलचे काही किस्से.

सोसायटीत मी-माझी एक मैत्रिण आणि एक मित्र अशी आमची छान मैत्री होती. इतर गप्पांबरोबर मराठी पुस्तके, लेखक, शब्दोच्चार यासंबंधी चर्चा-चर्वंणं, वादविवाद बरेच रंगायचे. मला करेल, पडेल अशा प्रकारे क्रियापदं वापरायची सवय होती. त्यावेळी “करेल” नाही “करेन” असं माझ्याकडून त्यांनी जवळजवळ आठवडाभर वदवून घेतलं होतं. पोटफोड्या ष चा उच्चार मी नीट करायचे नाही म्हणून ते दोघं मला चिडवायचे. शेवटी त्याच मैत्रिणीकडून स्वच्छ आणि स्पष्ट उच्चारात अथर्वशीर्ष शिकून घेतलं आणि त्यांना घडाघडा म्हणून दाखवलं तेव्हा त्या चिडवण्यातून सुटका झाली.

अगदी २री-३रीत रोज सकाळी आई स्वयंपाक करताना ॲाफिसच्या गडबडीत सुध्दा माझं मोठ्यानं केलेलं सकाळवाचन ऐकायची, छान वाचलसं म्हणून कौतुक करायची, अजून वाचायला उत्तेजन द्यायची. अवघड संज्ञा समजावून सांगायची. चिंटू, जाहिराती, श्रध्दांजली पासून सुरवात झालेली गाडी अग्रलेख, मोठ्या बातम्या, मोठमोठ्या लेखांपर्यंत अलगद येऊन पोचली. अग्रलेखांतील मतांबद्दल/ भाषेबद्ल संद्ध्याकाळी चर्चाही व्हायच्या. त्यावेळी “हद्यविकाराने/तीव्र झटक्याने निधन” असं खूपदा पेपरात यायचं. त्यावेळी मरायच्या आधी हद्यविकार होतोच अशी काहीची विचित्र समजूत बराच काळ माझ्या मनात होती.

नववीत असताना बाळासाहेब ठाकरे यांचे “हिंदुत्व-सार आणि धार” हे पुस्तक वाचले. त्या पुस्तकातील मतांपेक्षा त्यातील ओघवत्या, टोकदार,स्पष्ट भाषेने आम्हा मित्रमैत्रिणींवर बराच काळ मोहिनी घातली होती.

एकदा शाळेत आमच्या बाईंनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देताना बोलण्याच्या ओघात चुकून “यांनी अनेकांची आत्मचरित्रे लिहीली आहेत.”त्यावेळी हसू आवरायला आम्हाला फारच प्रयास पडले होते. नंतर घरी आल्यावर हा किस्सा माझ्या मैत्रिणीला सांगायला धावत घरी गेले होते. तिचे वडील त्यावेळी होते. त्यांनी हा किस्सा हसून ऐकून घेतला. आणि नंतर आत्मचरित्र-चरित्र यातील फरक वेगवेगळ्या उदाहरणांनी छान समजून सांगितला.

माझी वाचनाची झेप मात्र कथा-कादंबरी-ललित-मनोरंजक पध्दतींनी लिहीलेली चरित्रे यापुरतीच जास्त करून सीमित राहिली. नववी-दहावीत असताना सकाळमधे रविवार पुरवणीत नवीन कवींच्या कविता यायच्या. त्यातील “बाकी सारं क्षेम” ही कवित आवडली होती. त्या कवितेवर आजीशी विविध अंगानी चर्चा केली होती. त्याच धर्तीवर आयुष्यातील पहिली-वाहिली कविताही लिहीली होती. त्याचं समीक्षण कम चिरफाड आजीने अगदी पध्दतशीररीत्या केल्याने मराठी भाषेत एका नवकवीची भर पडता पडता राहिली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>२ री-३ री पासूनच मी मोठ्या माणसांची पुस्तके वाचू लागले.
मोहीनी माझे डिट्टो!!!
अगं 'ययाती' चवथीत वाचलेले पूर्ण. आणि तेव्हाही आवडलेले Happy
--------
>>>>>>>>डाळींबाच्या दाण्यांसारखे ओठ
आई गा! =))
>>>>>>>>अगदी २री-३रीत रोज सकाळी आई स्वयंपाक करताना ॲाफिसच्या गडबडीत सुध्दा माझं मोठ्यानं केलेलं सकाळवाचन ऐकायची, छान वाचलसं म्हणून कौतुक करायची, अजून वाचायला उत्तेजन द्यायची. अवघड संज्ञा समजावून सांगायची.
वाह!! _/\_
माझ्या आईचा शुद्ध लेखनावर भयंकर भर असे. आता ते जे वळण तिने लावले, ते आता माझ्यात राहीलेले नाही हे वेगळे.
>>>>बोलण्याच्या ओघात चुकून “यांनी अनेकांची आत्मचरित्रे लिहीली आहेत.”
वात्रट असतात मुलं. बरोब्बर पकडतात चूक. =))
-------------------
>>>>>>त्याचं समीक्षण कम चिरफाड आजीने अगदी पध्दतशीररीत्या केल्याने मराठी भाषेत एका नवकवीची भर पडता पडता राहिली.
अगं काय हे!!! =))
लिही ना.
-------------------
भाग २ रा वाचण्याची फार उत्सुकता आहे.

धन्यवाद सामो , इतका भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल.
>>>>>२ री-३ री पासूनच मी मोठ्या माणसांची पुस्तके वाचू लागले.
मोहीनी माझे डिट्टो!!!
अगं 'ययाती' चवथीत वाचलेले पूर्ण. आणि तेव्हाही आवडलेले Happy
--------बाबो, भारी. मी नववीत वाचलं ते.
>>>>>>>>डाळींबाच्या दाण्यांसारखे ओठ
आई गा! =))—-आणि अजूनही काही….
>>>>>>>>अगदी २री-३रीत रोज सकाळी आई स्वयंपाक करताना ॲाफिसच्या गडबडीत सुध्दा माझं मोठ्यानं केलेलं सकाळवाचन ऐकायची, छान वाचलसं म्हणून कौतुक करायची, अजून वाचायला उत्तेजन द्यायची. अवघड संज्ञा समजावून सांगायची.
वाह!! _/\_
माझ्या आईचा शुद्ध लेखनावर भयंकर भर असे. आता ते जे वळण तिने लावले, ते आता माझ्यात राहीलेले नाही हे वेगळे.
—अरे वा.
>>>>बोलण्याच्या ओघात चुकून “यांनी अनेकांची आत्मचरित्रे लिहीली आहेत.”
वात्रट असतात मुलं. बरोब्बर पकडतात चूक. =))
-------------------
मग काय….
>>>>>>त्याचं समीक्षण कम चिरफाड आजीने अगदी पध्दतशीररीत्या केल्याने मराठी भाषेत एका नवकवीची भर पडता पडता राहिली.
अगं काय हे!!! =))
लिही ना.
—-नाही गं, जमत नाही फारशा…लिहील्यात २-३ इथे.
-------------------
भाग २ रा वाचण्याची फार उत्सुकता आहे.-धन्यवाद गं, वेळ काढून लिहीते. तुझ्यासारखं मला ओघवतं लिहीता येत नाही छान.

छान.
लिहित राहा. सरावाने जमते सर्व

भारी मस्त लिहीलंय.

अगदी दुसरी तिसरीत नाही पण चौथीपासून मोठी मोठी पुस्तकं वाचायला सुरुवात केली असावी मी. चौथी पाचवीत मृत्युंजय वाचल्याचे लख्ख आठवतंय. मासिके वाचायला आवडायचं पण आई किंवा शेजारच्या काकू लायब्ररीतून कौटुंबिक कादंबऱ्या आणायच्या, त्यात मन नाही रमले. कुसुम अभ्यंकर, योगिनी जोगळेकर, सुमती क्षेत्रमाडे ह्यांच्याच जास्त करुन असायच्या असं आठवतंय. कथा वेगवेगळ्या वाचायला जास्त आवडायच्या कादंबरीपेक्षा.