कातरवेळ

Submitted by बिपिनसांगळे on 27 February, 2022 - 13:09

कातरवेळ
--------------------------------------------
जेव्हा केशरी रंगाचं अस्तित्व पुसत
राखाडी रंग आकाशात पसरत जातो
तेव्हा उत्फुल्लपणाचं अस्तित्व पुसत
अस्वस्थपणा मनात उतरत जातो
मनात अनामिक हुरहूर दाटून येते
कारण ती कातरवेळ असते

जेव्हा पाखरं माघारी फिरतात
जेव्हा माणसं घरात शिरतात
तेव्हा कुठल्याकुठल्या आठवणींची
वटवाघळं मनात भिरभिरतात
कधी कोणाची दुखावणारी
मनात खोल याद असते
कारण ती कातरवेळ असते

मन अंतर्मुख होतं
मन आधारहीन वाटतं
साऱ्या जगाशीच संबंध
तुटल्यासारखं वाटतं
ती साली - त्रिशंकू अवस्था असते
कारण ती कातरवेळ असते

कधी उदासी कवटाळते
अन कशी शांतता वेटाळते
ही वेळ अशी का जीवघेणी ?
उगाच खुळा जीव जाळते
काय आहे काय नाही
कशाची कशाला जाणीव नसते
कारण ती कातरवेळ असते

आपण न आपले राहतो
गडद उगा विचार वाहतो
कुण्या जन्माचे दुःख साहतो
मग मी रात्रीची वाट पाहतो
थोड्या वेळाने ती नवतरुणी संध्या
काळी चंद्रकळा नेसणार असते
अन ती जिवा सलणारी
कातरवेळ सरणार असते
कारण ती कातरवेळ असते

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रुपाली
सामो
खूप आभार

कवितेला प्रतिसाद म्हणजे लै भारी ! ...

हरचंदजी
खूप आभारी आहे .

हॉरर अन मराण या दोन्ही कथांसाठी वेगवेगळा आवाज लावण्याचा प्रयत्न केला होता

हि कविता मी माझ्या मूळ आवाजात इथेच वाचली आहे .

कृपया खालील लिंक आपण व रसिकांनी पाहावी / ऐकावी

https://www.maayboli.com/node/81220