मराठी भाषा दिवस -२०२२: सरस्वतीची चिरंजीव मुले - शांता शेळके: अमितव

Submitted by अमितव on 26 February, 2022 - 14:08
Shanta Shelke

साधीशीच वाटेल अशी सुती साडी, गोरा रंग, कपाळावर ठसठशीत नजरेत भरेल असं कुंकू, कानात मोत्याच्या कुड्या, मोठे डोळे आणि त्यावर मोठ्या फ्रेमचा चष्मा, डोक्यावरुन पदर घेतलेला, हसतमुख चेहरा, साधंसच वाटेल असं रसाळ, ऐकत रहावं असं प्रेमळ बोलणारी आजी ही शांताबाईंची झालेली पहिली ओळख. त्याकाळी दूरदर्शनवर एक कवितांचा कार्यक्रम सादर होत असे, आणि घरी आजी तो मनोभावे ऐकत असे. त्यात म्हटल्या जाणार्‍या कित्येक पारंपारिक कविता आजीला तोंडपाठ होत्या आणि दूरदर्शनवर त्या सुरू झाल्या की इकडे आजी त्या पूर्ण करत असे. तेव्हा काही कळत नसलं तरी आम्ही तो कार्यक्रम बघत असू, संध्याकाळी खेळून आल्यावर तो लागत असे आणि तेव्हा मनोरंजनाचं दुसरं काही साधन नसल्याने असेल कदाचित. आज आठवू म्हटलं तर त्यातील काहीच आठवणार नाही, पण ते काही तरी सकस होतं इतकं मनावर बिंबलेलं आहे. ते जेव्हा कधी आठवावसं वाटेल तेव्हा काय म्हणून शोधायचं म्हणजे सापडेल... थोडक्यात 'सर्च टर्म' काय द्यायची ती मात्र बरोबर लक्षात आहे. शांता ज. शेळके.

तेव्हाच घरी एक लहान मुलांच्या गाण्यांची कॅसेट होती. त्यात

किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळुझुळू झरे वाहती
पानोपानी फुले बहरती, फुलपाखरे वरी भिरभिरती
स्वप्नी आले काही
स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई

विहिणबाई विहिणबाई उठा आत उठा
भातुकलीचा केला तुम्ही सारा चट्टामट्टा
आता उठा

कर आता गाई गाई - तुला गाते मी अंगाई, पप्पा सांगा कुणाचे , खोडी माझी काढाल तर अशी मारेन फाईट...अशी बरीच सहज तोंडात बसतील अशी बालसुलभ सोप्या सोप्या शब्दांतील गाणी होती. तेव्हा माहित न्हवतं, पण ते सारे शब्द शांताबाईंचेच होते.

मग वय वाढत गेलं तशी शांताबाईंच्या स्फूट लेखनाची, त्यांच्या जीवनानुभावाची पुस्तकं वाचली. त्यावेळी अत्र्यांचं 'कर्‍हेचे पाणी' वाचुन फारच भारावुन गेलो होतो. शांताबाई नवयुग मध्ये काम करायच्या हे समजल्यावर त्यांच्या विषयी आणखी वाचावं वाटू लागलेल. शाळेत त्यांची मला वाटतं 'पैठणी' कविता अभ्यासक्रमात होती. नवीन बालभारतीचं पुस्तक आणलं की आम्ही गद्य विभागात काही मजेदार आहे का बघत असू, आणि आजीच्या हातात पुस्तक पडलं की ती 'यावर्षी कविता कुणाच्या आणि कुठल्या आहेत?' हा प्रश्न हमखास विचारत असे. अशीच तिने पैठणी वाचलेली पुसटशी आठवते. पैठणीच्या 'मऊ रेशमी स्पर्षातुन आजी जवळुन भेटतेच भेटते' काय हे लेणं! Happy

शांताबाईंनी काय लिहिलं नाही? डोलकर दर्याचा राजा, वादल वारं सुटलं गं, माझ्या सारंगा राज्या सारंगा अशी एकाहुन एक कोळीगीतं, प्रसंगानुरुप अनेकोनेक चित्रपटगीतं, लावणी म्हटली की पहिला आठवणारा 'रेशमाच्या लाल काळ्या धाग्यांचा कर्नाटकी कशिदा', निवडुंग मधलं एक ओळ मराठी आणि एक हिंदी असं लिहिलेलं

ना मानो गो तो दूंगी तोहे गारी रे
अंग भिजविले माझी माझी ओढली शेलारी रे!

'शूर आम्ही सरदार आम्हाला' हे आमच्या काळात आंतरशालेय समूहगीत टाईप स्पर्धेत अगदी हमखास ऐकू येणारं गाणं.

गुलजारांच्या त्रिवेणी ह्या तीन ओळी कवितांच्या फॉर्मचं मराठी रुपांतर त्यांनी केलंय हे हा लेख लिहाण्याच्या निमित्ताने समजलं. एका दिग्गज कवीच्या कवितांचं रुपांतर कसं केलं असेल त्यांनी हे वाचायची फार उत्सुक्ता आहे.

देवळातली प्रचंड घंटा नाद करेना धजू
तिच्या कडेवर गाढ झोपले
एकच फुलपाखरू.

असे हायकू.

जशी संगीतकारांची पिढी बदलली तसे त्यांचे शब्द ही आजच्या काळचे, तरुण झाले

माझ्या मना रे ऐक जरा, हळवे पणा हा नाही बरा
ही चाल तुरूतुरू उडती केस भुरूभुरू
मनाच्या धुंदीत लहरीत ये ना, सखे ग साजणी ये ना.. अशी अनेक.

किशोरीताईंचं मराठी भावगीत म्हटलं की आठवणारं 'हे शाम सुंदर राजसा मनमोहना', 'जाईन विचारित रानफुला' ही त्यांचीच. ही सगळी गाणी आईमुळे लहानपणी नकळत आणि सतत कानावर पडली, ती पेटीवर बसवुन त्यातील थोड्याफार का होईना खाचाखोचा समजल्या आणि 'आयुष्य ओघळोनी' कधी 'रिक्त हस्त' व्हायची वेळ आली तरी हा काटा नसून 'मज फुल ही रुतल्याचा दैव योग' च असणार असं वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही ही जाणिव नक्कीच देऊन जातील. हो! जातीलच बहुतेक!
त्याकाळी 'गणराज रंगी नाचतो' आणि 'गजानना श्री गणराया' जोवर सलग २१ वेळा लागत नाही तोवर गणपतीला ही मोदक पचत नसत म्हणे.

हल्लीच दादा कोडक्यांचं 'एकटा जीव' वाचलं... खरंतर ऐकलं... त्यात शांताबाई आणखी एका वेगळ्या अंगाने दिसल्या. त्या सेंसॉर बोर्डवर होत्या तेव्हा अनेकदा दादांच्या गाण्यांच्या द्वयर्थी शब्दांवर बोर्डाने आक्षेप घेतला की दादा तो शब्द तिकडे कसा आवश्यक आहे यावर वाद घालत आणि बोर्डाने ऐकलं नाही की मग त्या जागी पर्यायी शब्द द्यावयास सांगत. तेव्हा शांताबाई कशा त्या मीटर मध्ये बसणारा आणि अर्थवाही शब्द शोधुन द्यायच्या याच्या अगदी हृद्य आठवणी दादांनी लिहिल्या आहेत.

शांताबाईंनी विविध प्रसंगानुरुप अनेक गीते, कविता लिहिल्या. त्यांच्या कवितांत परंपरा इ. दिसतातच पण कायम मला भावते ती ताठ कण्याची स्त्री. प्रेमाच्या आणाभाका घेताना तू आणि मी दोघांनी सारखाच जीव ओतला आहे सांगताना त्या लिहितात

आणिले धागे तुझे तू मी ही माझे आणिले
गुंफिला जो गोफ त्याचा पीळ तू विसरुन जा
चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा

वसंत पवारांची शब्दवाही चाल आणि माणिक वर्मांचा आवाज. निव्वळ शब्द, आणि ते ही भरजरी अलंकारल्याले नाही तर रोजच्या वापरातले साधे शब्द मनाला किती धग पोहोचवू शकतात!
असंच मनाला विद्ध करणारं पण तरीही परत परत ऐकत रहावं असं गाणं म्हणजे

नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे....

क्या बात! चित्र रेखिले! पण ते कुणी? तर पडछायांत दिसणारे चित्र. अर्थातच कधी विरुन जाईल याचा नेम नसणारे पण 'एकांती मजसमीप' प्रेससी असताना रेखाटलेले चित्र. हे चित्र भंगणार आहे याची जाणिव होऊ लागते आणि बाबुजींच्या पुढच्या ओळी कानावर येतात
सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे?
मीही तोच, तीच तूही प्रिती आज ती कुठे?
ही 'वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधण्याची' वेळ आपल्या भाळी ही लिहीली असेलच ना? पुढे मागे कधी येईल तेव्हा ह्या गाण्याने थोडं सुसह्य वाटेल का मनाला? कोण जाणे!

पण वाटेल मला वाटतं, कारण शांताबाईंनी सांगितलं आहे ना...

कुणास काय ठाउके कसे कुठे उद्या असू?
निळ्या नभात रेखिली नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे
असेन मी नसेन मी, तरी असेल गीत हे!

धन्यवाद शांताबाई! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!!! काय सुरेख संकलन झाले आहे गीतांचे. मस्तच!!
शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे नावानेही गीते/कविता लिहील्या आहेत. तेही सर्चटर्म असू दे.

मस्त.

>>>
देवळातली प्रचंड घंटा नाद करेना धजू
तिच्या कडेवर गाढ झोपले
एकच फुलपाखरू.

<<<

अरे हे काय! किती गंमत.

शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे नावानेही गीते/कविता लिहील्या आहेत. <<< हे माहीत नव्हतं, सीमंतिनी.

सुंदर!

नंबर ५४ द हाउस विथ बँबु डोअर
शारद सुंदर चंदेरी राती
जिवलगा.. राहीले दुर घर माझे

ही गाणीही त्यांचीच!

आणी दाटुनी कंठ येतो हे त्यांनी लिहीलेले गाणे ऐकुन वडिलांची व माहेरची आठवण येउन न रडलेली नविन लग्न झालेली मराठी मुलगी मला अजुन पहायची आहे!

धन्यवाद सीमंतिनी, सामो, गजानन, मै, अस्मिता आणि मुकुंद.
मुकुंद हो. दाटून कंठ येतो, हे बंध रेशमांचे नाटकातील का धरिला परदेस, काटा रुते कुणाला, दैव किती अविचारी, बकुळ पंडीतांने गायलेलं विकल मन आज झुरत असहाय्य, ऋतु हिरवा, घनराणी साजणा, जय शारदे वागीश्वरी... किती तरी गाण्यांच्या काही ना काही आठवणी, काही वेगेळेपण मनात घर करुन असतंच. त्याबद्द्ल लिहायचं होतं, पण पुन्हा कधीतरी विचार करुन आज लेख पोस्ट केला.
या लेखाच्या निमित्ताने त्यांच्या मुलाखती परत ऐकल्या आणि जाणवलं किती काय काय मुखोद्गत होतं त्यांना. पूर्वसुरी, समकालिन इतर कवी, आणि नव्या पिढी बद्दल किती आपुलकिने, जिव्हाळ्याने बोलत होत्या त्या! समरसुन आणि रसरशीत जगल्या असतील त्या.

छान आवडलं, त्या सर्वात आधी रानजाई मधून भेटल्या, काय सुंदर गप्पा असत त्या कार्यक्रमात. युट्युब वर 100 मान्यवर त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत , त्या क्लिप्स मस्त आहेत. संस्कृत सुभाषित संपदा पण किती दांडगी होती त्यांची , किती तरी श्लोक अगदी सहजी पेरत त्या गप्पांमध्ये.

छान लिहिलं आहे. शांताबाईंचा कदाचित थोडा अपरिचित पैलू म्हणजे त्याने अनुवादही सुरेख केले आहेत.
Louisa May Alcott च्या Little Women चा त्यांनी 'चौघीजणी' हा सुरेख अनुवाद केला होता.
तसेच Anthony Hope च्या Prisoner of Zenda आणि Rupert of Hentzau चे त्यानी अस्सल मराठी/कोल्हापुरी साज चढवून सुरेख रूपांतर केले आहे. पैकी पहिल्याचे नाव आता पटकन आठवत नाही पण दुसर्‍याचे नाव 'गाठ पडली ठका ठका' असे आहे. आता ही पुस्तके कुठे उपलब्ध आहेत का ते माहिती नाही.

आता जरा अवांतरः आज मराठी भाषा गौरव दिवस आहे, मराठी भाषा दिवस नाही. तो १ मे रोजी साजरा केला जातो. मी संयोजक मंडळींना बदल करण्याविषयी सुचवले आहे जेणेकरून योग्य माहिती लोकांपुढे जावी. इथेही ही टीप टाकत आहे. धन्यवाद!

आयुष्य ओघळोनी' कधी 'रिक्त हस्त' व्हायची वेळ आली तरी हा काटा नसून 'मज फुल ही रुतल्याचा दैव योग' च असणार असं वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही ही जाणिव नक्कीच देऊन जातील. हो! जातीलच बहुतेक!>> वाह्.
छान लिखाण.

>>>>आयुष्य ओघळोनी' कधी 'रिक्त हस्त' व्हायची वेळ आली तरी हा काटा नसून 'मज फुल ही रुतल्याचा दैव योग' च असणार असं वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही ही जाणिव नक्कीच देऊन जातील.
होय हे वाक्य तर कळस आहे. फार मस्त भावना आहेत या.

छान लिहिलंय

'शूर आम्ही सरदार आम्हाला' हे आमच्या काळात आंतरशालेय समूहगीत टाईप स्पर्धेत अगदी हमखास ऐकू येणारं गाणं.
>>>>>
आमच्या घरात आजही हे ऐकू येते, माझ्या तोंडी, सरासरी आठवड्याला दोनदा तरी.. मला सवय आहे हे गायची.. शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कोणाची भिती Happy

शब्द खरेच अजरामर असतात.. आणि ते रचणारेही होतात Happy

वाह फार सुरेख आणि ओघवता लेख. प्रतिसादही अतिशय सुरेख.

म टा मध्ये त्यांचे स्फुटलेखन यायचे ते फार आवडायचे त्याआधी कवितेतून, गीतातून, रानजाईतून त्या भेटल्याच होत्या.

मस्त लिहिलंयस! Happy
तो त्या आणि सरोजिनी बाबर करायच्या ना रानजाई कार्यक्रम?

अप्रतिम लेख. शांताबाई म्हणजे प्रश्नच नाही.
आशाबाईंचं गाजलेलं मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश पण त्यांनीच लिहिलं आहे.

सुंदर लेख...!
किलबिल किलबिल पक्षी बोलती... हे बालगीत लहानपणी ऐकायला कानांना खूपच गोड वाटायचे.
'

छानच लिहिले आहे अमित. शांताबाई आवडत्या आहेतच. मी ही लिहिले असते तर शांताबाईंबद्दलच लिहिले असते.

खूपच छान!

इथे उपक्रमाच्या निमित्ताने खूप छान लिहिलंय सगळ्यांनी. हे नेहमी करत जा अशी विनंती. मी अजून सगळं वाचलं नाहिये, पण भरत, स्वाती आंबोळे, सीमंतिनी, अजय यांनी नियमितपणे हे असं सुरेख लिहिलं तर फार आवडेल. अजूनही अनेकांनी लिहिलंय पण मी वाचलं नाहिये, वाचणर आहे हे नक्की, त्यांनाही विनंती. लिखते रहो!