"मराठी भाषा दिवस : सरस्वतीची चिरंजीव मुले - शांताबाई शेळके {सीमंतिनी}"

Submitted by Barcelona on 26 February, 2022 - 02:16

ShantaShelke.jpeg

लहानपणी रेडियोवर कामगार सभा इ मराठी गीतांचा कार्यक्रम ऐकता ऐकता गरम गरम पोळी खायची नि शाळेला पाळायचं इतका साधा दिनक्रम. तेव्हा कधीतरी शांताबाईंच्या काव्याची ओळख झाली. दूरदर्शनच्या एखाद दुसऱ्या कार्यक्रमात त्यांना पाहिलं-ऐकलं ही होत. “टप टप टप टाकित टापा” आवडायचं वय जाऊन पुढे “पुनवेचा चंद्रमा आला घरी” आवडायचं वय आलं नि ते सरून “कान्हू घेऊन जाय, रानी धेनू घेऊन जाय” ऐकायचं वय आलं. तेव्हाही रेडियोवरची शांताबाईंची गोड, लडिवाळ गाणी सोबतीला होती.

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात शांताबाईंची वेगवेगळी गीते आवडत गेली. पण श्रोता म्हणून त्यांच्या दोन गाण्यांचं मला नेहमी आश्चर्य वाटतं - कसं सुचलं असेल? शांताबाईंची ही ‘परकायाप्रवेशा’ची विद्या फार मोहून टाकते.

जेव्हा बायका फार नोकऱ्या करायच्या नाहीत, “त्या” काळात शांताबाई प्रोफेसर होत्या. त्यांची नऊवार साडी, डोक्यावर पदर, छान ठसठशीत कुंकू यात इतका अदबशीरपणा, दरारा होता की त्यांनी या गाण्यासाठी काय ‘थॉट प्रोसेस’ वापरली असेल याचं कुतूहल नेहमी वाटतं. आपलं वय, आपलं शरीर, आपला व्यवसाय या अनुभवाने सीमित आपलं मन मोकाट सोडणं तसं अवघड असते. मन मोकाट सोडायचं पण ते त्या त्या पात्राच्या मनात जाऊन नेमकेपणाने अलगदपणे बसेल असं… कसं जमत असेल?

पहिलं आवडतं गाणं - “मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश”. या गीताला सूरसिंगार पुरस्कारही मिळाला. महानंदा सिनेमात हे गाणे दोन वेळा आहे. सुरुवातीलाच आशाबाईंच्या आवाजात येते तेव्हा मंगेशाचे देऊळ दिसते. प्रसन्न परिसर, शांत गाभारा, नि श्री मंगेशचा सुरेख चंदेरी मुखवटा. नंतर सिनेमात मंगेशाच्या पालखीच्या वेळी पुन्हा हे गाणे येते. उषा मंगेशकर आणि इतर गायिकांनी म्हणले आहे. सिनेमाची नायिका महानंदा ही भाविणीची मुलगी. कल्याणी ही भाविण तिची आई. कल्याणी म्हणून शशिकला पोक्त आणि तरी राजस फार शोभून दिसते. (भाविण म्हणजे देवाच्या नावाने मंगळसूत्र घालणारी. सामान्यपणे एक किंवा अनेक यजमान सांभाळावे तेव्हा भाविणीचा चरितार्थ चालतो.)

शांताबाईंनी भाविणीसाठी शंकराचे गाणे लिहीले आणि “तांबडी माती” मध्ये गृहिणीसाठीही शंकराचे गाणे लिहीले. तांबडी मातीतले ‘अपर्णा तप करते काननी’ आणि ‘मागे उभा मंगेश’
दोन्ही मध्ये बायको/प्रेयसी या स्त्रीच्या नजरेतून शंकर दिसतो. शंकर पराक्रमी देव - सुधीर मोघ्यांच्या गाण्यात ‘करुणा करा, जग जागवा’ किंवा आरतीत ‘नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले’ असा त्रिनेत्री ज्वाळा असणारा दिसतो. मात्र शांताबाईंच्या गाण्यात ‘जटाजूट माथ्यावरी, चंद्रकला शिरीधरी, सर्प माळ रुळे उरी’ असा जसं जमेल तसं सजून आलेला प्रियकर/नवरा शंकर आहे.

गृहिणीसाठी गाणे लिहीताना शांताबाईंनी उमेने केलेले तप, वडीलांनी नियोजित केलेला वर विष्णू पण मनात भरलेला शंकर आणि सासर-माहेर इ अशा स्वरूपाचे गाणे लिहिले आहे. पण त्याच जातकुळीतले म्हणजे शंकराच्या आराधनेचे गाणे जेव्हा भाविणीच्या तोंडी येते तेव्हा स्वयंवर-माहेर असे उल्लेख नाहीत. उलट तिचे आत्मभान गाण्यात उमटलेलं दिसतं - "शैलसुता संगे गंगा मस्तकी वाहे". समाजाच्या उतरंडीत गृहिणी सारखा दर्जा नसला तरी आपल्या यजमानाच्या मनाची ती राणी आहे हे नकळत गाण्यात उमटून जाते. ज्या पात्रासाठी गाणे लिहीतो त्याच्याशी इतकी ‘फाईन-ट्यूनिंग’ होणे किंवा जवळीक होणं हे शांताबाईंचं वैशिष्ट्य!

शांताबाईंचे दुसरे आवडते गाणे - “मनाच्या धुंदीत लहरीत ये ना”. शांताबाईंनी अनेक संगीतकारांबरोबर काम केले. त्यातले काही त्यांच्या बरोबरीचे, काही ज्येष्ठ. अशा दिग्गजांबरोबर त्यांच्या लिहिण्याची पद्धत वेगळी धीर गंभीर. जसं सुधीर फडके यांनी गायलेलं “तोच चंद्रमा नभात” मध्ये विरहात भग्न झालेला प्रियकर. “जाईचा कुन्ज तोच” म्हणतो तरी त्याची होरपळच अधिक जाणवत राहते. पण तरुण संगीतकारांबरोबर काम करताना शांताबाईंचे शब्द ही जणू तरुण होत जातात.

मनाच्या धुंदीत या गाण्याला देवदत्त साबळे यांनी चाल लावली तेव्हा बहुधा ते विशीतच असावे. त्यांच्या उडत्या चालीच्या गाण्याला शांताबाईंनी शब्द ही फार साजेसे लिहीले. कदाचित उलटही असेल शांताबाईंनी आधी गाणे लिहीले असेल आणि नंतर चाल लागली असेल. पण तो क्रम इथे महत्त्वाचा नाही तर चाल आणि बोल अगदी एकमेकास शोभून दिसतात. आयुष्यभर लुगडे नि डोक्यावर पदर अशा वेषात वावरणाऱ्या शांताबाई विशीचा प्रियकरात परकाया प्रवेश करतात तेव्हा - ‘जराशी सोडून जनरित ये ना’ लिहून जातात नि असंख्य श्रोत्यांच्या तोंडून नकळत ‘क्या बात!’ उमटते. ‘आता कुठंवर धीर मी धरू, काळीज बघत बघ हुरहुरू’ मध्ये त्याची हुरहूर आपल्यालाही लागते नि ह्याची प्रेयसी ‘बसंती वाऱ्यात तोऱ्यात’ लवकर यावी म्हणून आपणच नकळत गुणगुणू लागतो.

असं परकायाप्रवेशाचे वरदान असलेली शांताबाईंसारखी कवयित्री शतकातून एखादीच होते. पण अनेक शतकांना पुरेल इतके पाथेय देऊन जाते.

(चित्र साभार: विकीपिडीया).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेय
मनाच्या धुंदीत लहरीत ये ना गाणे फार आवडीचे एकेकाळचे

सुंदर आठवणी आहेत. शांताबाई, माझी मोठी बहिण रुईयाला असताना तिच्या मराठीच्या प्राध्यापिका होत्या.

वर "भस्म विलेपित..." चा उल्लेख आलेला आहे, त्याच सिनेमातलं (तांबडी माती), "मागते मन एक काहि...", मोहित्यांची मंजुळा मधलं "निळ्या आभाळी, कातर वेळी...", पवना काठचा धोंडी मधलं "पावनेर ग मायेला करु..."; "रातीची झोप मज येइना..." आणि शेवटचं गैरफिल्मी "पहा टाकले पुसुनी डोळे..." हि सगळी शांताबाई+लताबाईची गाणी मराठी संगितातली सौंदर्यस्थळं आहेत...

शांताबाई आवडत्या कवयित्री आहेत. आणि तू छानच लिहीलयस सी.
मला फक्त एक शंका आहे, जाणकारांनी सांगा कृपया >>>
>>>>> “तोच चंद्रमा नभात” मध्ये विरहात भग्न झालेला प्रियकर. “जाईचा कुन्ज तोच” म्हणतो तरी त्याची होरपळच अधिक जाणवत राहते.>>>> हे विरह गीत नाहीये ना? "एकांती मज समीप तीच तू ही कामिनी" जे क्षण तरुणपणी अनुभवले ते म्हातारपणात अनुभवता येत नसल्याची खंत ( मला नीट लिहीता येत नाही, सामो छान लिहू शकेल)

Love simply fizzled out - हा मला लागलेला अर्थ. प्रिय व्यक्ती दूर आहे अशा अर्थाने विरह नाही. ती असून नसल्यासारखी -
"सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे?
मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे?
ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी"
(कुणाला तरी विचारावे लागेल. जाणकार सांगतीलच... पण तुझे बरोबर आहे "विरह गीत" शब्द चपखल नाही तिथे.)

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. (इथे "थ्रेडेड" प्रतिसादांची सोय हवी असे वाटून गेले. प्रत्येकाने इतके वेगवेगळे मुद्दे लिहीले नि सुंदर भर टाकली आहे.).

सुंदर लेख...!
गेल्याच महिन्यात 'निवडक शांताबाई शेळके ' हे पुस्तक वाचनालयातून आणून वाचले होते. पुस्तक वाचून शांताबाईंच्या व्यक्तिमत्वात असलेल्या अनेक पैलूंचे दर्शन झाले.

असं परकायाप्रवेशाचे वरदान असलेली शांताबाईंसारखी कवयित्री शतकातून एखादीच होते. पण अनेक शतकांना पुरेल इतके पाथेय देऊन जाते.>> अगदी! परफेक्ट लिहिले आहेस
हृदयनाथ मंगेशकर यांनी एक आठवण सांगितली होती. ते कोळीवाड्यात पौर्णिमेच्या रात्री गेले होते आणि तो आसमंत बघून त्यांना चाल सुचली. त्यांनी शांताबाईंना ऐकवली आणि त्या आसमंताचे आणि त्यांच्या अनुभुतीचे त्यांच्या शब्दात वर्णन केले. ते म्हणतात माझ्याकडे सार्थ शब्दच नव्हते, मी बरेच काय काय शब्द वापरले पण शांताबाईंनी त्यातून सुंदर गीत लिहून दिले ते म्हणजे "आज पुनवा सुटलाय दमानं"
पुनवा हा शब्दच पुरेसा आहे! मला गीताच्या मागची कथा ऐकली की ते गीत नव्याने भेटल्यासारखे वाटते.

छान लिहिलंय. वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे त्या दोन गाण्यांची अशी तुलना डोक्यात आली नव्हती.

मला शान्ताबाईंबद्दल लिहायचं होतं म्हणून आतापर्यंत हा लेख वाचला नव्हता.
अतिशय सुंदर झाला आहे.
शैलसुतासंगे गंगा मधून उलगडलेल्या अर्थासाठी एक स्पेशल 'वा!'

आता हे वाचताना लक्षात आलं की अपर्णा तप करते काननी हे चित्रपटात श्रीमंताची (पाटलाची) लेक असलेल्या आशा काळेच्या तोंडी आहे. आणि तिला आवडलाय गरीब पैलवान. शंकर भस्मविलेपित. तर पैलवान अंगाला तांबडी माती फासणारा. दक्ष राजाची मुलगी पार्वती हेही आहेच.

देवदत्त साबळेंची गाणी - चाल आधी , शब्द नंतर असं वाचल्याचं आठवतं.

Pages