मराठी भाषा दिवस २०२२ - खेळ: भाषेचे अलंकार - २६ फेब्रुवारी - आजचे अलंकार 'उपमा, उत्प्रेक्षा, व्यतिरेक'

Submitted by संयोजक-मभादि on 25 February, 2022 - 19:40

दागिने किंवा अलंकार हे व्यक्तींच्या सौंदर्यात भर टाकतात. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे भाषेचे अलंकारदेखिल आहेत. आपल्यापैकी काहींनी ते शाळेत शिकलेही असतील. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण त्या अलंकारांचे काही खेळ खेळू, म्हणजे ते अलंकार काय आहेत हे कळायला सोपे जाईल आणि जरा मजाही येईल. तसे भाषेचे अलंकार अनेक आहेत, परंतु तूर्तास आपण काही निवडक अलंकार खेळासाठी घेऊ या. २५ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात रोज एकेका अलंकाराचा खेळ खेळला जाईल.

तर आजचे अलंकार आहेत 'उपमा, उत्प्रेक्षा आणि व्यतिरेक'.

थांबा थांबा. अचानक आलेल्या तीन अलंकारांनी भांबावून जाऊ नका. आपण आधी ते काय आहेत ते बघू आणि मग हे तीन एकत्र का घेतलेत तेही बघू.

उपमा, उत्प्रेक्षा आणि व्यतिरेक - काय आहेत हे?
हे कळण्यासाठी आधी आपल्याला 'उपमान' आणि 'उपमेय' काय आहेत ते बघावे लागेल. फार काही अवघड नाही. दोन घटकांतील साम्य/साधर्म्य दाखवताना हे घटक विचारात घेतले जातात.

उपमेय - मुळात ज्या घटकाचे वर्णन केले आहे, ते म्हणजे उपमेय
उपमान - ज्या घटकाशी साम्य दर्शवायचे, तो घटक म्हणजे उपमान

हे तीनही अलंकार उपमान आणि उपमेय ह्यांच्या परस्परसंबंधांवर अवलंबले आहेत.

उपमा
उपमान हे उपमेयासारखेच असल्याचे वर्णन जिथे येते, त्या अलंकाराला उपमा असे म्हणतात. ओळखण्याची सोपी खूण म्हणजे ह्यात 'सम, समान, -सारखे, -वाणी, -गत, जसे, तसे, -प्रमाण, -सदृश, -परी, -तुल्य' यांप्रमाणे एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

उदाहरणार्थ - आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे

उत्प्रेक्षा
उपमेय हे उपमानच आहे अशी जिथे कल्पना केलेली असते, त्या अलंकाराला उत्प्रेक्षा असे म्हणतात. ओळखण्याची सोपी खूण म्हणजे ह्यात 'जणू, जणूकाही, जणूकाय, की, गमे, वाटे, भासे, म्हणजे' यांप्रमाणे एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

उदाहरणार्थ - ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू

व्यतिरेक
उपमेय हे उपमानापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असे वर्णन जिथे येते, त्या अलंकाराला व्यतिरेक असे म्हणतात.

उदाहरणार्थ - अमृताहुनी गोड नाम तुझे देवा

आता आजचा खेळ काय आहे?
हा खेळ म्हणजे गाण्यांचा झब्बू आहे. अशी मराठी गाणी शोधा ज्यांमध्ये उपमा, उत्प्रेक्षा, किंवा व्यतिरेक वापरला गेला आहे. बघूया आपल्याला किती गाणी सापडतात ते. आजचा दिवस ह्या तीन अलंकारांनी सजवूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खोचते वीज पंखात
तरी पदरात सांडून चालली माया
ओठात हसू गोंदून
उभी निक्षून जणू आभाळ उभं भेदाया
हि अनुरागाची ओल हरवूनी तोल
स्वये शृंगार जिथे मोहरतो
ती समर्पणाची शर्त प्रीतीचा अर्थ
तिच्या त्या गात्रातून पाझरतो
हि सती हती रेवती हि तारामती
हिचा गं रोज निराळा गंध
हि नदी मत मोकळी जी आतुर जळी
तोडण्या सज्ज रुढींचे बांध

हे चालेल का, गोठचे शीर्षकगीत आहे. स्त्रीला दिलेल्या विविध उपमा आहेत म्हणजे उपमा अलंकार. गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं आहे. असं पूर्ण दिलं तर कॉपीराईट भंग होणार नाहीना. तसं असेल तर अर्ध देता येईल. नेटवर पूर्ण गाणे मिळाले, माझं अर्ध पाठ होतं.

व्यतिरेक व उपमा :
बालकवींची कविता 'बालविहग'

सांज खुले सोन्याहूनी पिवळें हें पडलें ऊन
चोहिंकडे लसलशीत बहरल्या हिरवाळी छान

पांघरली जरतार जांभळी वनमाला शाल
सांध्यतेज गिरिशिखरीं बिखरी संमोहनजाल

त्या तेजाचा प्राण चिमुकला संध्येचा दूत
बाल विहगा आनंद मूर्तिमान झुलतो गगनांत

सी Happy

उत्प्रेक्षा:
लिंबलोण उतरू कशी

एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका
तूच दुःखसागरी उभविलीस द्वारका
सर्व भार घेतला असा समर्थ खांब तू

व्यतिरेक :
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

सुंदर चर्चा.

"दूति नसे ही माला, सवतचि भासे मला" - हे उत्प्रेक्षा की अपन्हुति? >> अपन्हुति वाटते आहे.

Pages