मराठी भाषा दिवस २०२२ - खेळ: भाषेचे अलंकार - २६ फेब्रुवारी - आजचे अलंकार 'उपमा, उत्प्रेक्षा, व्यतिरेक'

Submitted by संयोजक-मभादि on 25 February, 2022 - 19:40

दागिने किंवा अलंकार हे व्यक्तींच्या सौंदर्यात भर टाकतात. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे भाषेचे अलंकारदेखिल आहेत. आपल्यापैकी काहींनी ते शाळेत शिकलेही असतील. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण त्या अलंकारांचे काही खेळ खेळू, म्हणजे ते अलंकार काय आहेत हे कळायला सोपे जाईल आणि जरा मजाही येईल. तसे भाषेचे अलंकार अनेक आहेत, परंतु तूर्तास आपण काही निवडक अलंकार खेळासाठी घेऊ या. २५ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात रोज एकेका अलंकाराचा खेळ खेळला जाईल.

तर आजचे अलंकार आहेत 'उपमा, उत्प्रेक्षा आणि व्यतिरेक'.

थांबा थांबा. अचानक आलेल्या तीन अलंकारांनी भांबावून जाऊ नका. आपण आधी ते काय आहेत ते बघू आणि मग हे तीन एकत्र का घेतलेत तेही बघू.

उपमा, उत्प्रेक्षा आणि व्यतिरेक - काय आहेत हे?
हे कळण्यासाठी आधी आपल्याला 'उपमान' आणि 'उपमेय' काय आहेत ते बघावे लागेल. फार काही अवघड नाही. दोन घटकांतील साम्य/साधर्म्य दाखवताना हे घटक विचारात घेतले जातात.

उपमेय - मुळात ज्या घटकाचे वर्णन केले आहे, ते म्हणजे उपमेय
उपमान - ज्या घटकाशी साम्य दर्शवायचे, तो घटक म्हणजे उपमान

हे तीनही अलंकार उपमान आणि उपमेय ह्यांच्या परस्परसंबंधांवर अवलंबले आहेत.

उपमा
उपमान हे उपमेयासारखेच असल्याचे वर्णन जिथे येते, त्या अलंकाराला उपमा असे म्हणतात. ओळखण्याची सोपी खूण म्हणजे ह्यात 'सम, समान, -सारखे, -वाणी, -गत, जसे, तसे, -प्रमाण, -सदृश, -परी, -तुल्य' यांप्रमाणे एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

उदाहरणार्थ - आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे

उत्प्रेक्षा
उपमेय हे उपमानच आहे अशी जिथे कल्पना केलेली असते, त्या अलंकाराला उत्प्रेक्षा असे म्हणतात. ओळखण्याची सोपी खूण म्हणजे ह्यात 'जणू, जणूकाही, जणूकाय, की, गमे, वाटे, भासे, म्हणजे' यांप्रमाणे एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

उदाहरणार्थ - ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू

व्यतिरेक
उपमेय हे उपमानापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असे वर्णन जिथे येते, त्या अलंकाराला व्यतिरेक असे म्हणतात.

उदाहरणार्थ - अमृताहुनी गोड नाम तुझे देवा

आता आजचा खेळ काय आहे?
हा खेळ म्हणजे गाण्यांचा झब्बू आहे. अशी मराठी गाणी शोधा ज्यांमध्ये उपमा, उत्प्रेक्षा, किंवा व्यतिरेक वापरला गेला आहे. बघूया आपल्याला किती गाणी सापडतात ते. आजचा दिवस ह्या तीन अलंकारांनी सजवूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपमा: ?
ओढ ही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे
भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशिम काटे तुझे

उपमा
लटपट लटपट लटपट लटपट
तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग, नारी ग

कांती नवनवतीची, दिसे चंद्राची, प्रभा ढवळी
जाईची रे वेल कवळी
दिसे नार, सुकुमार, नरम गाल, व्हट पवळी
जशी चवळीची शेंग कवळी
दिसे नार सुकुमार, नरम गाल, व्हट पवळी
तारूणपण अंगात झोक मदनाचं जोरात
चालणं ग मोठ्या नखऱ्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग, नारी ग

रूप सुरतीचा डौल, तेज अनमोल, सगुण गहिना
जशी का पिंजऱ्यातील मैना
हिच्यासाठी कितीकांची जनलोकांत झाली दैना
अशी ही चंचल मृगनयना
हिच्यासाठी कितीकांची जनलोकांत झाली दैना
निर्मळ, कोमल, तेज ग जैसे तुटत्या ताऱ्याचं
चालणं ग मोठ्या नखऱ्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग, नारी ग

उत्प्रेक्षा:
कोमल काया की मोहमाया पुनव चांदणं न्हाली
सोन्यात सजले रूप्यात भिजले रत्नप्रभा तनु ल्याली
ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली

उत्प्रेक्षा
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात

उपमा आणि उत्प्रेक्षा ह्यातला फरक कधीकधी ओळखायला अवघड जातो. आमच्या समजुतीप्रमाणे

मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त >> उपमा वाटते आहे. उपमेय हे उपमानासारखे आहे असे वर्णन आहे.

जिणे गंगौघाचे पाणी >> उत्प्रेक्षा असावी. उपमेय हेच जणू उपमान आहे.

(साधर्म्य असणे आणि समान असणे ह्यातला तो फरक आहे असं वाटतं)

तरी ह्यावर आणखी चर्चा व्हायला हरकत नाही. कदाचित तज्ज्ञांचे मत वेगळे असल्यास त्याची कारणं जाणून घ्यायला सर्वांनाच आवडेल.

उत्प्रेक्षा:
देवाचं देणं हे देवाचं देणं
सोन्याच्या ताटाला मोत्याचं दाणं

उपमा
साखरझोपेमधेच अलगद प्राजक्तासम टिपले गं
(मी मज हरपुन बसले गं)

मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त >> उपमा वाटते आहे. उपमेय हे उपमानासारखे आहे असे वर्णन आहे.

जिणे गंगौघाचे पाणी >> उत्प्रेक्षा असावी. उपमेय हेच जणू उपमान आहे.

+१

व्याकरणाच्या पुस्तकातून
१ उपमा - उपमेय हे उपमानासारखे आहे. सारखे, सम, समान, सा, जेवि, सदृश , परी, तुल्य , जसा- तसा, इ. साधर्म्यसूचक शब्द
२ उत्प्रेक्षा - उपमेय हे जणू उपमानच आहे. - जणू, काय, गमे , भासे, की , खचित , बहुधा
३ रूपक - उपमेय हे उपमानच आहे असा अभेद. काही स्थानी रूपी, साची, साक्षात, केवळ इ. साधर्म्यसूचक शब्द.
४ अपन्हुती - उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे. न , नव्हे , नाही, नसून, छे, कसला, कशब्द, इ. नकारार्थी शब्द
५. अनन्वय - उपमेय हे अद्वितीय आहे. त्या च्याशी तुलना करायला योग्य असे उपमानच अस्तित्वात नाही.
६. व्यतिरेक - उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे.

याशिवाय दृष्टान्त आणि अर्थान्तरन्यास हे साधर्म्याधारित अलंकार आहेत.

हो.
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात हे रूपक होतील असं आता वाटतं.

भेटीलागी जीवा हा अभंग दृष्टान्त.

गदिमांनी गीतरामायणात हे अलंकार पुष्कळ वापरले आहे.
कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे - उत्प्रेक्षा
राजस मुद्रा वेष मुनींचे , गंधर्वच ते तपोवनीचे
फुलांपरी ते ओठ उमलती
सुगंधसे स्वर भुवनी झुलती-उपमा

राजा दशरथ.. गृही चंद्रसा, नगरी इंद्रसा, सूर्य जसा संगरी...उपमा

प्रत्येक गाण्यात भरपूर आढळतील

सुके सुके बोंबील आणले काय ग तूनी केले ?
मला वाटलं खिल्लंच हाय मी भिंतीला ठोकलं

या ठिकाणी बोंबील हे उपमेय आहे आणि खिळा उपमान आहे. उपमेय आणि उपमान हे इतके तादात्म्य पावले आहेत कि नायिकेची त्यामुळे फसगत होऊन तिने बोंबील भिंतीत ठोकले आहेत. त्यामुळे इथे उत्प्रेक्षा अलंकार आहे असे म्हटले तर ते चूक होणार नाही ना ?

गंगू तारूण्य तुज बेफाम
जसा इश्काचा एटमबाम

इथे कवितेतला नायक हा ग्रामीण भागातून आलेला असल्याने त्याने अ‍ॅटमबाँब ऐवजी एटमबाम असा अशब्द वापरलेला आहे. हल्ली आयटम हा शब्द सर्रास वापरला जातो. ज्यास पूर्वी सौंदर्याचा अ‍ॅटमबाँब म्हणत असत. ही सुद्धा उपमाच होती. काही लोक त्यास श्लेष असे सुद्धा म्हणत असत. सदर उदाहरणात कवीने इश्काचा एटमबाम म्हणताना जसा हा शब्द वापरला आहे. त्यामुळे उपमान आणि उपमेय हे एकच नाहीत याची नायकाला जाणीव असल्याचे दिसते. त्याने व्याकरणाचा विचार करून जसा हा शब्द आपल्या भावना प्रकट करताना वापरल्याने उपमा हा अलंकार इथे प्रकट झाला आहे असे म्हणता येईल असे वाटते.

>>>>>सवतचि भासे मला । दूती नसे ही माला ॥ नच एकान्‍ती सोडी नाथा । भेटू न दे हृदयाला ॥

वाह काय सुंदर ओळींची (नाट्यगीतातील) आठवण काढलीत भरत.
इतक्या कमी शब्दात इतकं माधुर्य!!! निव्वळ गोड आहे हे जे काही आहे.

अलंकारांचा सराव गेलाय, चुकत असेल तर सांगा कोणीही...

व्यतिरेक
रम्य ही स्वर्गाहुनी लंका

गाण्याचे शब्द आणि गायकीचा भाव --- लंकेबद्दल अपार अभिमान जाणवून देते
कुठे माझी लंका आणि कुठे तो स्वर्ग, समुद्र, चंद्र, लक्ष्मी
म्हणून मला वाटले. अलंकारांचा शाळेत असताना होता तसा खात्रीचा अभ्यास नाही राहिला

भरत , उपयुक्त प्रतिसाद !

उपमा :
आल्हादक मुखचंद्रही होता
होती दृष्टि ती प्रेम-रसवाहिनी रसिक मोहिनी
मृगनयना रसिक मोहिनी

देश हा देव असे माझा
अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा
(उत्प्रेक्षा)

उपमा :
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा
काळजामधे ठसला, गं बाई-बाई काळजामधे ठसला
दिसला गं बाई दिसला

दणकट दंड स्नायू जैसे लोखंडाचा वळला नाग
काळ्याकभिन्न मांड्या जैशा पोलादाचा चिरला साग

नव्या मनूचा गिरीधर पुतळा या कवितेतून - बा .सी . मर्ढेकर (बहुतेक )

उपमा :
(माझी आवडती कविता )
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

Pages